सेवा परमो धर्म: ।
सेवा परमो धर्म: ।
अत्यंत जादुई असा हा जयघोष. तब्बल सात दिवस या जयघोषाच्या अनुभूतीने कान आणि मन अगदी तृप्त झालंय. त्या तृप्तीतच परतीचा प्रवास सुरू आहे. डोळ्यासमोरून व्यंकटेशाचे रूप हटतच नाहीये आणि ते सर्व क्षण नजरेसमोर सतत तरळत आहेत. ये हृदयीचे ते हृदयी पोहोचावं म्हणून माझं हे मनोगत ... हा लेखप्रपंच ❤️ ... त्याचं झालं असं ....
मागच्या वर्षीपासून सतत माझ्या मनात येत होतं की आपण तिरुपती बालाजीच्या सेवाकार्यासाठी जाऊया. माझी जाऊ नऊ/दहा वर्षांपूर्वीच या सेवेसाठी जाऊन आली होती. पण मी कधी तो विचारही मनात केला नाही. पण गेल्या दोन-चार वर्षात परमेश्वराने माझ्यावर/माझ्या कुटुंबावर जो काही सुखाचा, आनंदाचा, यशाचा वर्षाव केला तेव्हा मात्र त्या परमेश्वराचे आभार आपण मानलेच पाहिजेत ही भावना दृढ झाली आणि सेवेला जाऊयाच या विचाराने जोर धरला. पण जाणं इतकं सहज/सोपं नाहीये हे लक्षात आलं. दोन-चार वेळा संधी येऊनही कुठल्या ना कुठल्या कारणाने हुकली (इथे ती कारणे लिहीत नाहीये) पण यावेळी मात्र योग आला आणि तो देखील अधिक महिन्यात... या वेळेची अडचण तसं बघायला गेलं तर जास्त मोठी होती पण ओम शांती ओम या चित्रपटातल्या "अगर किसी चीज़ को दिल से चाहो, तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है।" या डायलॉगची अक्षरशः प्रचिती आली. मी इतके दिवस कदाचित इतकी तीव्र इच्छा केलीच नसेल किंवा माझ्या नशिबात अधिक महिन्यात सेवेचा योग लिहिला असेल असं मला वाटतंय. काही का असेना पण केवळ आठ दिवस आधी माझ्या या यात्रेवर शिक्कामोर्तब झाले. माझ्याबरोबर आलेल्या कोणालाही याची कल्पना सुद्धा नाहीये, किंबहुना मी त्याबाबत कुठेच वाच्यताही केली नाही. सेवेचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन, रेल्वे प्रवासाचे रिझर्वेशन वगैरे सर्व झालेच होते. मला ही सेवा मिळवून देण्यात मोलाची मदत करणाऱ्या विजयदादा कुलकर्णी यांचे मनःपूर्वक आभार 🙏
१ जूनला रात्री पुणे रेल्वे स्थानकावरून गाडीत बसल्यानंतर सर्व विचारांना दूर लोटले आणि फक्त व्यंकटेशाची आराधना सुरू ठेवली.
२ जूनला तिरुपतीमध्ये नियोजित निवासस्थानी पोहोचल्यानंतर स्नान वगैरे करून लगेचच आम्ही पद्मावती देवी आणि गोविंदराज यांच्या दर्शनासाठी रवाना झालो. दोन्ही ठिकाणी दर्शन यथासांग पार पडलं. आता हळूहळू सगळ्यांची ओळख होत होती. आमचा पंधरा जणांचा ग्रुप होता, पण स्नेहल ही एकमेव मैत्रीण... आपण इथे फिरायला, मज्जा करायला आलो नसून सेवेसाठी आलो आहोत हे मनाला बजावलं, तरीही सवयीने सगळ्यांशी गप्पा मारणं सुरू केलंच. हळूहळू ओळख होत होती. कुलकर्णी दाम्पत्याने त्या रात्रीच्या भोजनाचं यजमानपद घेतलं आणि आपोआपच अनोळखीपणाचा ताण निवळत गेला. देशमुख व कुलकर्णी ही दोन दाम्पत्य, बाकी सगळा नातेवाईक कम मैत्रिणींचा ग्रुप आणि यात आम्ही दोघीच वेगळ्या ही भावना आता गळून पडत होती.
३ जूनला सकाळीच आम्ही तिरुमलाला जाण्यासाठी निघालो. तीन जून ते नऊ जून या कालावधीत आम्हाला सेवा मिळाली होती. नावनोंदणी, आधार कार्ड तपासणी, बायोमेट्रिक वगैरे सोपस्कार करून आम्ही सेवासदन मध्ये येऊन पोहोचलो. आमच्या गटाचे नेतृत्व अनुजाताई करत होत्या. कोणाला कुठली सेवा करायला मिळणार याबाबत सगळ्यांच्या मनात उत्सुकता होती. काहीजण पहिल्यांदाच तिरुपतीला आले होते, काही जण तिरुपतीला बालाजी दर्शनासाठी आले होते पण सेवेला आत्ता पहिल्यांदाच आले आणि काही जण तर सेवेलाच दुसऱ्यांदा/ तिसऱ्यांदा येत होत्या. असा विविधतेने नटलेला आमचा ग्रुप सेवेसाठी मात्र दोन गटात विभागला गेला. पहिल्या गटातील आठ जणांना अन्न प्रसादलयात सेवा मिळाली तर दुसऱ्या गटातील आम्हा सात जणांना लड्डू काउंटरवर सेवा मिळाली. अधिक महिन्यात आपला संपूर्ण गट भगवंताचा प्रसाद भक्तांपर्यंत पोहोचवणार आहे या भावनेने सगळ्यांना खूपच आनंद झाला. आणि प्रसाद म्हणजे तर प्रभूंचे साक्षात दर्शन ... अर्थात कुठलीही सेवा मिळाली तरी ती अगदी आनंदाने आणि मनापासून करायची हे आमचं ठरलं होतंच. चतुर्थीच्या दिवशी सेवा सुरू होत असल्याने तो विघ्नहर्ता गणराया कुठलेही विघ्न येऊच देणार नाही याची मनोमन खात्री सर्वांना पटली होती.
आमच्या ग्रुपमधील पहिला गट त्याच दिवशी संध्याकाळी सेवेसाठी गेला, परंतु आमची वेळ सकाळची होती आणि एव्हाना दुपारी दीड वाजला होता त्यामुळे आम्ही त्या दिवशी वराहस्वामी मंदिरात दर्शनासाठी गेलो. आमची सेवा व्यवस्थित पूर्ण होऊ दे, गोड मानून घे यासाठी भगवंतांचे आशीर्वाद मागितले. दर्शनाच्या रांगेत बराच वेळ उभे राहावे लागल्याने आम्हा सात जणांच्या भरपूर गप्पा झाल्या आणि एकमेकांची जनरल कुंडली सगळ्यांना कळली. आनंदाच्या, उत्सुकतेच्या भरात तशी झोप लागलीच नाही आणि ४ जूनला पहाटे चार वाजताच सगळे उठले. स्नान वगैरे आवरून पावणेसहा वाजता लड्डू काउंटरवर दाखल झालो.
आता खरं म्हणजे परीक्षाच सुरू झाली होती. मोबाईल, स्मार्ट वॉच, लेदरच्या पट्ट्याचे घड्याळ, पर्स काहीही न्यायला परवानगी नाही. फक्त गणवेशात TTD ने दिलेला स्कार्फ आणि ओळखपत्र घालून अनवाणी पायाने आम्ही तिथे गेलो होतो. आमच्या सर्वांची ओळखपत्र स्कॅन करण्यात आली आणि तिथे नेमलेल्या सुपरवायझरने आम्ही सर्वजण सेवेसाठी वेळेत उपस्थित झालो आहोत अशा आशयाचा मेसेज आणि आमचा फोटो त्यांच्या एका गटावर पाठवला. आम्हा सर्वांना वेगवेगळ्या काउंटरवर धाडण्यात आले. इडलीपात्रासारखा दिसणारा आयताकृती भला मोठा ट्रे आणि त्यात पन्नास लाडू... अशा अनेक ट्रेची मोठी चळत... अशा चार-पाच चळती ... रुखवतात ठेवतो तसा भला मोठा लाडू असलेले ट्रे ... संगणक, एका हाताने तो हाताळणारा आणि दुसऱ्या हाताने लड्डू वाटप करणारा, तेलुगु/ तमिळ भाषेत बोलणारा माणूस ... असं सगळं बघून खरं म्हणजे दडपणच आलं. पण त्या माणसाने अगदी सहज विचारलं सेवा ??? मी हो म्हणताच त्यांनं विचारलं इंदी ??? मी मख्ख. तो म्हणाला अम्मा इंदी ऑ तेलुगू ?? आता मला कळलं की तो इंदी म्हणत नसून हिंदी म्हणत आहे. हसू दाबतच मी त्याला म्हणले हिंदी /इंग्लिश कुछ भी चलेगा. आता त्याने मला हातात gloves घालायला दिले आणि मग तो सांगेल तितके लाडू काउंटरवर ठेवायला सांगितलं. मी बरोबर मोजून देते आहे ना याकडे त्या माणसाचं सतत लक्ष आहे हे माझ्या लक्षातही आलं पण मी काहीही बोलले नाही. आम्ही दररोज वेगवेगळ्या काउंटरवर होतो, प्रत्येक काऊंटरचा अनुभव वेगळा होता. काहीजण अगदी पैसेसुद्धा मोजायला द्यायचे, तर काहीजण तुम्हाला तेलुगू येत नाहीये तर तुमचा काही उपयोग नाही असं तेलुगूतच बोलायचे. आम्हाला दुसरं कोणीतरी येऊन तिथून बाहेर काढायचे आणि एखाद्या हिंदी येणाऱ्या काउंटरवर नेऊन सोडायचे. जाम मज्जा यायची. नाश्त्याची वेळ झाल्यावर आम्हाला तिथे नाश्ता मिळायचा. आमची ड्युटी सकाळी सहा ते बारा अशी होती, पण आम्ही जवळपास एक-दीड पर्यंत रोज थांबायचो आणि जेवूनच सेवासदनला जायचो. दररोज मिळणारा हा प्रसाद विलक्षण चविष्ट वाटायचा. एरवी घरी भात न खाणारी मंडळी देखील हा प्रसाद अगदी चवीने खात होती. त्याच दिवशी संध्याकाळी मी आणि सानिकाने श्री व्यंकटेश विजय ग्रंथाचे तीन दिवसीय पारायण सुरू केले. आम्ही ओवीबद्ध अध्याय वाचत होतो तर स्नेहल कथासार वाचत होती आणि परमेश्वराचा जप करत होती. आमच्या सकाळच्या ग्रुपने सुद्धा त्याच दिवशी पारायणाला सुरुवात केली होती.
५ जूनला म्हणजे पारायणाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता. शुक्रवारी पुष्करिणी स्नान करूया असे ठरवून आम्ही सकाळी ४ वाजता निघालो खरे पण तिथे जाऊन बघतो तर वेळ सकाळी ६ ते रात्री ६ ... धावतपळत सेवासदनात परतलो आणि आवरून आमच्या ड्युटीवर पोहोचलो. त्यादिवशी आम्हाला सात ते आठ मोकळा वेळ होता आणि आदल्या दिवशी आम्हाला कळले होते की गुलाबांच्या बागेत फुलं तोडायची सेवा आम्ही सकाळी करू शकतो. मग काय ... आमची वरात गुलाब पुष्प वाटिकेकडे ...
ते काटे टोचले, अनेक ठिकाणी ओरखडे आले, रक्त देखील आलं... पण मन मात्र अगदी तृप्त होतं. आम्ही जी फुलं तोडली ती व्यंकटेशाच्या गळ्यात पडणार आहेत ही भावनाच अगदी वेगळी होती. तासाभरात ती सेवा करून आम्ही पुन्हा लड्डू काउंटरवर दाखल झालो... आपल्या हौसेसाठी आपण वेगळं काम केलं तरी आपल्याला जे काम दिलं आहे ते आपण पूर्ण करायचंच असतं या हेतूने. नंतर सहजच माझ्या मनात आले की आज अनायासे शुक्रवार आहे तर सलग तीन रात्री बारा वाजता उठून २१ वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणावे. मी सहजच सगळ्यांना सांगितले की असं करूया का ? जवळपास सर्वजणींनी होकार भरला आणि आम्ही रात्री बारा वाजता स्नान वगैरे उरकून मंदिराकडे रवाना झालो. मंदिराच्या कळसाचे सतत दर्शन घेत अडीच/पावणेतीन तासात व्यंकटेश स्तोत्राची एकवीस आवर्तने झाल्यानंतर आम्ही सेवासदनात परतलो. जेमतेम दीड/ दोन तास झोप घेऊन पुन्हा आमच्या लड्डू काउंटरच्या ड्युटीवर रुजू झालो.
६ जूनला थोडं थकल्यासारखं झालं होतं खरं, पण मन मात्र जाम आनंदी होतं. आमच्या सकाळच्या ग्रुप मधल्या बायका तर पारायण चालू असेपर्यंत उपवास करत आहेत हे कळल्यावर तर मला अक्षरशः झीट येणं बाकी होतं. पारायणाचे दोन दिवस आणि आवर्तनाचा एक दिवस यशस्वी पार पडल्याबद्दल मी स्वतःलाच शाब्बासकी दिली. आता शनिवारी आमचे पारायण संपन्न होणार होते. आम्ही सर्वांनी जपाली हनुमानला जायचे ठरवले होते. पण स्नेहलचा पाय खूप जास्त दुखावला असल्याने ती आणि मी सेवासदनातच थांबलो. सानिका एकटीच त्या दोन्ही दाम्पत्यांबरोबर गेली. दररोज संध्याकाळी सहा/ साडेसहाच्या दरम्यान नोटीस बोर्डवर दुसऱ्या दिवशी ज्यांना मंदिरसेवा मिळते त्यांची यादी लागत असे. गेले तीन दिवस आमचा विरस झाला होता. आज मी आणि स्नेहल नेहमीप्रमाणे लिस्ट बघायला गेलो तर आमच्या ग्रुपचे नाव बघून आम्हाला अत्यानंद झाला. मी अनुजाताईंना फोन करून लगेच कळवून देखील टाकले. अर्थात त्यांना TTD कडून देखील फोन आला. मी आणि स्नेहलने जाऊन आमच्या मंदिर सेवेबद्दलची स्लिप घेऊन आलो. आम्हाला ७ जूनला पहाटे ३ ते ८ मंदिर सेवा मिळाली होती. तब्बल ५ तास आम्ही व्यंकटेशापासून काही फुटांवर असणार या भावनेने अंगावर काटा आला, डोळ्यात अश्रू उभे राहिले. जवळपास सर्वांची हीच प्रतिक्रिया होती. सकाळच्या ग्रुपचे पारायण पूर्ण झाले, शुक्रवारी मध्यरात्री व्यंकटेश स्तोत्राची आवर्तने झाली, एका गटाने जपाली हनुमानाला जाऊन नारळ वाढवला ... या सर्वांचे फलित म्हणजे ही ब्राह्म मुहूर्तावर मिळालेली मंदिर सेवा असेच आम्हा सर्वांना वाटले. आता आम्हाला रात्री दीड वाजता मंदिर परिसरात पोहोचायचे होते आणि आमचे काम नक्की काय असणार ते समजून घ्यायचे होते. त्यापूर्वी व्यंकटेश विजय ग्रंथाच्या पारायणाची सांगता करायची आहे हे आम्ही विसरलो नाही. पारायण पूर्तता, आरती झाल्यानंतर आम्ही भगवंताचे आभार मानले आणि आता आम्हा सर्वांना दर्शनाची ओढ लागली. आता रात्री बारा वाजता व्यंकटेश स्तोत्राची आवर्तने कशी करायची असा प्रश्न आमच्या दोघींच्या मनात उपस्थित झाला असतानाच मनाने कौल दिला ... आपण सुरुवात करूया, पुढचं सगळं भगवंत बघून घेतील. लोकहो, तुम्हाला खोटं वाटेल पण २१ आवर्तनं पूर्ण होऊन श्रीव्यंकटेशार्पणमस्तु असं म्हटल्यानंतर अक्षरशः शून्य मिनिटात आम्हाला कामासाठी बोलावले. त्या लोकांनी तेलुगु /हिंदी भाषेतून सांगितलेल्या सूचना ऐकतच आम्ही शेवटची काही आवर्तने केली होती. सर्व सोपस्कार पार पाडून ब्राह्म मुहूर्तावर पहाटे ३ वाजता आम्ही मंदिरात प्रवेश केला तो व्यंकटेश सुप्रभातमचे स्वर ऐकतच ... आता आम्हा प्रत्येकाला वेगवेगळी सेवा मिळाली होती. कुणी हुंडीजवळ थांबले होते, तर कुणी मंदिरात प्रवेश करतानाच्या खांबाजावळ. कोणी मुख्य मंदिरात भाविकांना पुढे पुढे ढकलायला थांबले होते, तर कोणी बाहेर जातानाच्या गर्दीला आवरत होते. गटप्रमुख अनुजाताईंना त्यांनी केलेल्या नेतृत्वाचे बक्षीस म्हणून चक्क गाभाऱ्यात सेवा मिळाली. पण एकंदरीत संपूर्ण पाच तास आम्ही श्री व्यंकटेशापासून काही फुटांवर होतो हा आनंद फार फार वेगळा आहे. मी आत्तापर्यंत बालाजी दर्शनाचा रौप्य महोत्सव साजरा केला आहे (२५ वेळेस दर्शनाला आले आहे) परंतु इतकी वर्ष मिळून तेही दर्शन + प्रदक्षिणा अशी बेरीज करून जितका वेळ मी मंदिर आवारात होते त्यापेक्षा कितीतरी जास्त वेळ आज मी इथे होते. आत आरती सुरू झाल्यावर त्या तालात मी माझ्या जागेवरून व्यंकटेशाची आरती गायले. एकता कपूर वगैरे स्टार मंडळी, काही राजकारणी लोक, काही उद्योगपती, काही विश्वस्त या सर्वांसाठी VVIP तर अनेक लोकांसाठी VIP दर्शन होते. त्या काळात मंदिराच्या आवारातील अनेक मंदिरे खुली होती व अनायासे ते दर्शन घडले. मधूनमधून आम्हा सेवेकऱ्यांना ते लोक दर्शनासाठी सोडत होते. आज हा मोठा योग भगवंतांनी भाग्यात लिहिला आणि मंदिर परिसरात सेवा करून घेतली या भावनेने मन अगदी कृतकृत्य झालं ... तरीही सेवा कुठलीही असो त्यातला भाव महत्त्वाचा हे मात्र अगदी १००% बरोबर आहे ... मंदिराबाहेर उभे राहून मी व्यंकटेशाची सेवा करत आहे असं मनात येणे हे गाभाऱ्यात थांबून मला काम करावं लागतंय या भावनेपेक्षा खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या वाट्याला जे काम येईल ते मनापासून करणे ही परमेश्वराची खूप मोठी आणि खरी सेवा आहे. कुठलंही काम समर्पित भावनेने करण्याला खूप महत्व आहे. त्या पाच तासात ३/४ वेळा घडलेल्या व्यंकटेश दर्शनाने मन अगदी भरून आणि भारून गेलं. व्यंकटेशाचे ते रूप डोळ्यात साठवतच आम्ही सेवासदनाकडे गेलो. दुपारी झोप काढून संध्याकाळी खरेदीसाठी म्हणून बाहेर पडलो तर प्रचंड पाऊस ... आज रात्री तर आमचा आवर्तनाचा शेवटचा दिवस ... पावसामुळे मंदिरात न जाता सेवासदनातच आवर्तने करूया असं आम्ही ठरवलं. पण रात्री बारा वाजता स्नान केल्यानंतर वाटलं की मंदिर परिसरातच जाऊया. कळसाचे दर्शन घेत घेत आवर्तने करूया. काही अडचण आली तर परमेश्वराची इच्छा. पण सुदैवाने कुठलीही अडचण न येता आमची तिसऱ्या दिवशीसुद्धा व्यंकटेश स्तोत्राची २१ आवर्तने छान पार पडली. जेमतेम दीड दोन तास झोप घेऊन आम्ही लड्डू काउंटरच्या ड्युटीसाठी रवाना झालो.
८ जूनला जाणवलं की आता आमची केवळ दोनच दिवस सेवा उरली होती. आम्ही अगदी मनापासून काम करत होतो. तिथे शुक्रवार ते रविवार स्टाफला शक्यतो सुट्टी मिळत नाही, त्यामुळे सोमवारी अनेक जण सुट्टी घेतात व स्टाफ कमी पडतो. त्या लोकांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही आज जास्त वेळ थांबाल का ? आम्ही आनंदाने होकार भरला. त्या दिवशी आम्ही तिघींनी सकाळी ६ ते दुपारी ३.३० अशी ड्युटी केली. शेवटी आमचे सुपरवायझर सांगायला आले की आता तुम्ही जा, तुमची डबल ड्युटी झाली आहे. आमच्याकडे मोबाईल, घड्याळ काहीच नसल्याने आम्हाला वेळेचं गणित जुळवताच येत नव्हतं. त्यांनी आपल्याला अक्षरशः हाकलून दिलं असं म्हणत आम्ही तिघी हसत सुटलो आणि तिथून निघालो ते परस्पर पुष्करिणी स्नानासाठी. स्नानाने तनमन दोन्ही अगदी प्रसन्न झाले. खूप आनंदात आम्ही सेवासदनात पोहोचलो. त्या रात्री मात्र थोडीफार झोप घेतली.
९ जूनला, मंगळवारी सेवेच्या शेवटच्या दिवशी लड्डू काउंटरवर पोहोचलो. आज सेवेचा शेवटचा दिवस म्हणून मन जड होत होतं आणि आज सेवेचं बक्षीस म्हणून बालाजी दर्शन मिळणार हा आनंद ओसंडून वाहत होता. सेवा पूर्ण केली आणि न जेवताच आम्ही दर्शनासाठी पळालो. दर्शन घेताना परमेश्वराकडे खूप काही मागायचं ठरवलं होतं, पण प्रत्यक्ष दर्शन घेताना काही सुचलंच नाही. व्यंकटेशाचे ते मनोहर रूप आम्ही अगदी डोळ्यात साठवून घेतलं. सेवेसाठी पुन्हा बोलव रे अशी मनोमन त्याच्या चरणी प्रार्थना केली.
९ जूनची संध्याकाळ ... अगदीच अविस्मरणीय ... उन्नतीताई आणि मनीषाताई या दोघी भगिनींनी बागेत हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले होते. त्यांनी सगळ्यांसाठी गजरे, बांगड्या, जोडवी, मोत्याच्या माळा, ताट असा सगळा अधिक वाणाचा थाट केला होता. आणि यात त्यांना साथ दिली त्यांच्या यजमानांनी... विद्याधर दादा आणि अनंत दादा यांनी. असाच हळदीकुंकू समारंभ बाकीच्या मैत्रिणींनी पद्मावती देवीच्या दर्शनानंतर केला होता.
आज सेवेच्या सांगतादिनी आम्ही सर्वांनी आपापली ओळख करून दिली आणि नंतर सेवेदरम्यान आलेले अनुभव सांगायला सुरुवात केली. सर्वजण वेगवेगळ्या पार्श्वभूमीमधून आलेले, प्रत्येकाची जीवनशैली वेगळी पण तरीही भाव मात्र अगदी सारखा. विद्याधर दादांसारखा एका मोठ्या MNC चा country head (हे आम्हाला शेवटच्या दिवशी कळलं म्हणा 🙈) आमच्याबरोबर अगदी हसत खेळत वावरत होता. ते अगदी कुठलाच हिशेब न ठेवता सढळ हाताने खर्च करत होते. अनंत दादा कुणालाही कुठलाच ताण येणार नाही अशी खबरदारी घेत अगदी हलक्याफुलक्या संभाषणाने सगळ्यांना आश्वस्त करत होते. प्रत्येक सखी तिची पार्श्वभूमी सांगत होती तेव्हा मनात येत होते ... बाईपण भारी देवा !!! रोज चहाचे/नाश्त्याचे/जेवणाचे बिल कोण देणार याची तर अक्षरशः चढाओढ असायची. कोणाला काही विचारलं तर अधिक महिन्याचं पुण्य कमवत आहोत हे उत्तर ठरलेलं होतं. आमच्या ग्रुपमध्ये आम्ही पिंपरी चिंचवडचे/पुण्याचे तर काही संभाजीनगरचे लोक असल्याने MH14/12 विरुद्ध MH20 हा सामना अनेकदा रंगायचा. अर्थातच त्याने खूपच मज्जा यायची. आपापली ड्युटी सांभाळून ज्याला जसं जमेल तसे ते परमेश्वराची मनोमन सेवा करत होते. आमच्या सगळ्यांमध्ये आता स्नेहबंध तयार झाले आहेत. आम्ही तर सेवासदनमधील परभाषिक मैत्रिणी सुद्धा जमवल्या. पूर्णकला नावाची सखी वैजागहून (विशाखापट्टणम) आपल्या अनेक बहिणी, नणंदांना, भाच्यांना घेऊन आली होती. तिची आमच्याशी खूप दोस्ती झाली. सांगलीची एक युवती तर सांगत होती की त्यांच्या घरात सेवेला यायची परंपरा आहे. आधी तिचे आजोबा, नंतर वडील यायचे आणि आता ही मुलगी ती परंपरा कायम ठेवणार आहे. हल्ली वायरल झालेला मुलगी हाच वंशाचा दिवा हा लेख मला या निमित्ताने आठवला. सेवेचा गणवेश हे आमच्या सगळ्यांच्या मैत्रीचे मूळ होते.
१० जूनला म्हणजे काल आम्ही तिरुपतीला येऊन बकुळा माता मंदिर, कल्याण बालाजी, श्रीकालहस्ती यांचे दर्शन घेतले आणि रात्री मनसोक्त शॉपिंग करत सालाबादचे rituals पूर्ण केले. रात्री खूप झोप आलेली असताना सुद्धा आता आपण सर्वजणी पुन्हा केव्हा भेटणार या विचाराने खूप गप्पा मारल्या. आता परतीचा प्रवास सुरु आहे....
तिरुपती बालाजीच्या चरणी लाभलेले सात दिवस ... आयुष्यभर जपून ठेवावा असा अनुभव... काही अनुभव शब्दांत मांडणे खूप कठीण असते, कारण ते हृदयाच्या इतक्या जवळचे असतात की ते व्यक्त करताना डोळे आपोआप ओलावतात. बालाजीच्या चरणी सेवा करण्याची संधी मिळाली आणि सेवासदनमध्ये राहून सात दिवस सेवा करण्याचा जो अनुभव मिळाला, तो माझ्या आयुष्यातील अत्यंत सुंदर आणि अविस्मरणीय अध्याय आहे. तिरुमलाच्या पवित्र भूमीवर पाऊल ठेवताच मनात एक विलक्षण आनंद आणि समाधान निर्माण झाले होते. सभोवताली घुमणारा गोविंदा...गोsssविंदाचा जयघोष, भक्तांच्या चेहऱ्यांवरील श्रद्धा आणि बालाजीच्या दर्शनाची आस पाहून मन भक्तिरसात पूर्णपणे बुडून गेले होते. सेवासदनमध्ये राहण्याचा अनुभव देखील अत्यंत शिस्तबद्ध, साधा आणि आध्यात्मिक होता. TTD संस्थानच्या सर्व व्यवहारात सेवेकरी आहेत, यावरून त्यातील पारदर्शकता लक्षात येते. अत्याधुनिक सुसज्ज यंत्रणा आणि त्याचबरोबर पारंपरिक श्रद्धा यांचा अनोखा मेळ इथे बघायला मिळतो. त्या सात दिवसांत रोजची दिनचर्या देवाच्या सेवाकार्याने सुरू व्हायची आणि नामजपाने संपायची. विविध राज्यांतून आलेल्या सेवकांबरोबर राहून एक वेगळेच बंध निर्माण झाले. भाषा, प्रदेश, संस्कृती वेगळी असली तरी सर्वांना जोडणारा धागा एकच होता... श्री वेंकटेश्वरावरील अपार श्रद्धा. सेवा करताना मनात कधीही अहंकार आला नाही, उलट प्रत्येक क्षणी नम्रतेची जाणीव अधिक दृढ होत गेली. भक्तांची मदत करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, मंदिर परिसरातील विविध सेवांमध्ये सहभागी होणे या सर्व कामांमधून एक अनोखे समाधान मिळाले. शरीराला थकवा जाणवत होता, पण मन मात्र आनंदाने आणि भक्तीने भरून गेले होते. त्या सात दिवसांत पाळलेली शिस्त, वेळेचे महत्त्व, सहकार्याची भावना आणि निःस्वार्थ सेवेचे मूल्य हे आयुष्यभरासाठी लक्षात राहील. सेवासदनमधील वातावरण इतके सकारात्मक होते की बाहेरील जगातील चिंता, ताणतणाव आणि धावपळ यांचा पूर्णपणे विसर पडला. तिथलं वास्तव्य, सहकारी सेवकांचे प्रेम, भक्तांची सेवा आणि श्री बालाजीचे दर्शन ... हे सर्व क्षण माझ्या हृदयात कायमचे कोरले गेले आहेत. तिरुपती बालाजींच्या चरणी केलेली ही सात दिवसांची सेवा माझ्यासाठी केवळ एक धार्मिक कार्य नव्हते, तर आत्मशांती, नम्रता, भक्ती आणि मानवसेवेचा अर्थ शिकवणारी एक दिव्य अनुभूती होती. अखिल विश्वाचे कल्याण व्हावे यासाठी परमेश्वर चरणी प्रार्थना !!!
वेंकटरमणा गोविंदा ... गोsssविंदा
शीतल कापशीकर
गुरुवार, ११ जून २०२६, रात्रौ ८.३०
खरच एक अविस्मरणीय अनुभव 😊🙏😇
ReplyDeleteखरोखर अविस्मरणीय अनुभव भक्तिरसातला, वाचताना डोळे सुखाने, आनंदाने पाणावले, त्या वेंकटेश्वराचे रूप डोळ्यासमोर येत होते,अहो भाग्यच म्हणावं लागेल खूपच छान सेवाकार्य धन्य तू आणि तुझा लेख वाचून आम्ही ही धन्य झालो
ReplyDeleteखुप छान शितल ताई, लेख वाचतांना असं वाटतं होतं की, प्रत्यक्षात मी पण तुझ्या बरोबर आहे, इतकं भारी वाटतं होतं ना की शब्दात सांगताच येणार नाही, अधिक महिन्यात तु तिथे असणं, आणि सेवा प्रदान करणं हा ईश्वरी संकेतचं म्हणावा लागेल, तुझ्या सर्व टिम ला माझा मानाचा मुजरा 😊 गोविंदा गोविंदा गो.....विंदा 🌷
ReplyDelete