Walkathon : एक आनंदानुभूती

Walkathon : एक आनंदानुभूती

I am a Finisher ... अगदी स्टाईलमध्ये मी फोटो काढला आणि आता बाकी कुठे, काय चाललंय ते बघायला गेले. खरं म्हणजे मी सहा किलोमीटर चालून आले होते, पण बिलकुल दमले नव्हते. उत्साह, आनंद अगदी ओसंडून वाहत होता. त्याचं कारण पण तसंच आहे ... मी हा चालायचा उपक्रम खूप जणांबरोबर एकत्रित केला होता. त्यामुळे अनेकांची सकारात्मक ऊर्जा माझ्यात आली होती. निमित्त होते ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र पालक महासंघ आयोजित Walkathon चं !!! आजचा दिवसच माझ्यासाठी अगदी स्पेशल ठरला होता, तो देखील अगदी सकाळच्या तीन चार तासात. झालं असं की...
पहाटे पाच वाजता गजर वाजला आणि मी उठले ... खरंतर अडथळा आणणारं घरात कोणीही नव्हतं, पण माझीच खूप लगबग चालली होती... का तर Walkathon ला जायचंय म्हणून ... यापूर्वी मी चार-पाच  सायक्लोथॉनला गेले आहे, पण Walkathon ला जायचा हा माझा पहिलाच अनुभव. आणि पहिला अनुभव नेहमीच स्पेशल असतो. तसं बघायला गेलं तर चालायची सवय असल्याने तो भरपूर अनुभव माझ्या गाठीशी आहे, पण Walkathon काहीतरी वेगळं असेल असं माझं मन मला सांगत होतं आणि खरोखर त्याची प्रचिती आलीच ....
सकाळी पावणेसहा वाजताच आम्ही नियोजित स्थळी म्हणजे ज्ञान प्रबोधिनी निगडीच्या मैदानावर दाखल झालो आणि मी अक्षरशः हरवून गेले .... माझी न मी राहिले टाईप ... सगळीकडे स्वयंसेवकांची लगबग होती, ओळखीचे चेहरे हसून हात दाखवत होते, अनोळखी चेहरे चक्क मला ओलांडून पुढे जात होते आणि बरंच काही ... मला माझा टी-शर्ट कलेक्ट करायला जायचं होतं, पण तिथे जाईपर्यंत अनेकांशी गप्पा मारताना वेळ भराभर पुढे सरकत होता आणि मन काही दिवस सोडून मागे पळालं. मागच्या आठवड्यात सहजच एका मैत्रिणीच्या स्टेटसला मी या Walkathon बद्दल बघितलं आणि अगदी ताबडतोब गूगल फॉर्म भरून सहभाग नोंदवला.  माझ्यासाठी सहा किलोमीटर चालणे ही काही विशेष बाब नव्हती, पण हा प्रकार कसा आहे ते बघू याबाबत मात्र उत्सुकता नक्की होती. आणि मागच्या वर्षी माझा हा चान्स हुकल्याने यावर्षी मी अधिकच सतर्क होते आणि हा दिवस कॅलेंडरवर कोरूनच ठेवला होता. डोक्यात विचारचक्र गरगरत होते. Walkathon म्हणजे नक्की काय हा प्रश्न स्वतःला विचारताना त्याचे उत्तरही स्वतः शोधायचा प्रयत्न करत होते. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतो. अशा वेळी Walkathon सारखे उपक्रम आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतात. Walkathon म्हणजे केवळ चालण्याचा कार्यक्रम नसून, तो आरोग्य, एकता आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम आहे. Walkathon मुळे केवळ शारीरिक आरोग्य सुधारत नाही तर मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. एकत्र चालणे, संवाद साधणे आणि चांगल्या उद्देशासाठी कार्यक्रमात सहभागी होणे यामुळे समाज अधिक सशक्त बनतो.
Walkathon चा मुख्य उद्देश लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. नियमित चालणे हे व्यायामाचे सर्वात सोपे आणि अतिशय प्रभावी साधन आहे. या बरोबरच अनेक walkathon कार्यक्रम विशिष्ट सामाजिक विषयांवर आधारित असतात ... जसे की पर्यावरण संरक्षण, महिलांचे आरोग्य, कर्करोग जनजागृती किंवा फिट इंडिया मोहिम.... आमचं Walkathon वाचनाबाबत जनजागृती करणारं होतं. ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्राचा यंदाचा वार्षिक विषय वाचन संस्कृती असल्याने वर्षभर विविध उपक्रम सुरू आहेतच. आणि आजचा हा भव्य इव्हेंट आमच्या पालक महासंघाने विशेष पुढाकार घेऊन आयोजित केला होता. मार्गदर्शन करायला आमच्या शाळेची समिती सज्ज होतीच.
विचारांच्या आणि गप्पांच्या नादात मी काउंटरपर्यंत पोहोचले सुद्धा ... पटकन काउंटरवर जाऊन माझा BIB (ज्यावर तुमचे नाव, नंबर आदी तपशील लिहिलेला असतो तो Badge) दाखवून मी टी-शर्ट घेतला आणि BIB त्यावर लावलासुद्धा ... कपाट कपड्यांनी ओसंडून वाहत असताना खरं म्हणजे हा टी-शर्ट ठेवायलाही त्यात जागा नाहीये, पण या टी-शर्टचा आनंद काही आगळाच आहे त्यामुळे मी तो अगदी जपून ठेवणार आहे. वाचनाविषयी लिहिलेले वेगवेगळे सुविचार देखील आम्ही पाठीवर लावले आणि आता सज्ज झालो चालायला ....
मातृमंदिरातली उपासना संपली आणि इकडे स्टेजवरचा माईक सुरू झाला. साधारणपणे नियोजन कसं असेल ते संयोजकांनी सांगितलं, तोवर मैदान अगदी गर्दीनं फुलून गेलं होतं. विद्यार्थी, पालक, अध्यापक, माजी विद्यार्थी, युवक-युवती, परिसरातील नागरिक असे कितीतरी जण चालण्यासाठी म्हणून एकत्र जमले होते ... वय वर्ष दोन ते ऐंशी अशी मोठी रेंज मैदानावर वावरत होती.  सर्वजण रांगेत उभे राहिले आणि त्यानंतर थोड्याशा पूरक हालचाली आमच्याकडून करून घेतल्या. थोड्याच वेळात पाहुण्यांचं आगमन झालं. त्यांचं स्वागत वगैरे झाल्यानंतर सर्वांनी एकसुरात राष्ट्रगीत गात देशाला मानवंदना दिली आणि सुरू झाला एक अनोखा प्रयोग ... झूम्बा 
आता तुम्ही म्हणाल झूम्बा करण्यात वेगळं ते काय ? ते क्लासेस तर यत्र तत्र सर्वत्र आहेतच की ... पण मंडळी आम्हाला झूम्बा करायचा होता अभंगांच्या तालावर. हालचाली त्याच, फक्त कानावर विठू माऊलीचा जयघोष पडत होता. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा ... हे गायन-वादन सगळं Live चालू होतं. मुक्तिसोपान विभागाने विद्यार्थ्यांकडून छानच तयारी करून घेतली होती.मळलेल्या वाटेने चालायला आम्हाला मुळी आवडतच नाही, आम्ही स्वतःची वेगळी पायवाट निर्माण करतो. आम्ही सनातन्यातले सनातनी आणि आधुनिकातले आधुनिक ... त्यामुळे हा बदल तर असायलाच हवा की !! हा बदल करणाऱ्याच्या बुद्धीला मनोमन सलाम ठोकला आणि झूम्बात रंगून गेले. अहाहा !! झूम्बा करताना अगदी बहार आली. भान हरपून, जसं जमेल तसं, शरीराला फार कष्ट न देता सगळेजण झूम्बा करत होते. मन अगदी प्रसन्न झालं होतं. आणि तेवढ्यात घोषणा झाली ६ किमी चालणाऱ्यांच्या flag ची ...
आम्ही लगेचच चालायला सुरुवात केली. जे तीन किलोमीटर चालणार होते ते मैदानावरच थांबले. त्यांच्यासाठी तिथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज चालू होत्या. आम्ही अनेक जण चालत होतो. चालायला सुरुवात झाली तेव्हा प्रत्येक पाऊल जणू काही मला स्वतःशीच बोलायला लावत होतं. धावपळीत हरवलेलं माझं आरोग्य, दुर्लक्षित झालेलं मन, संसारातल्या अनेकविध चिंता या सगळ्याचा थोडासा ताण आला. पण आजूबाजूच्या लोकांचा उत्साह आणि सकारात्मक वातावरणामुळे तो लगेचच नाहीसा झाला आणि मी नेहमीचे शीतल स्पेशल बेअरिंग पकडले. हवा थंड असल्यामुळे तुला लंडनमध्येच चालल्यासारखं वाटत असेल, तिथे चालायची सवय असल्याने एवढे चालायचं काहीच वाटत नसेल, तिथला नाताळाचा अनुभव सांग की वगैरे गोष्टी लोक माझ्याशी बोलत होते आणि मग तर काय माझी टकळी अखंड चालूच. जे लोक माझे ब्लॉग नियमित वाचतात त्यांनी आवर्जून आजही लिही बरं का ग ! असा आग्रहसुद्धा केला. तू इतकी बोलत आहेस की त्यामुळे तुझे सहा ऐवजी १२ किलोमीटर पकडले जाणार असा विनोदसुद्धा एक दोघांनी केला. एकंदरीत काय सगळं मस्त सुरू होतं. वाटेत स्वयंसेवकांचे मार्गदर्शन, पाण्याची सोय छानच होती. आम्हा पादचार्‍यांना रस्ता देण्यासाठी थांबलेली वाहने बघून तर केवळ झीट यायचे बाकी राहिले होते. काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर ती हाताळण्यासाठी डॉक्टरांचा एक मोठा ताफा आणि तीन-चार ॲम्बुलन्स सज्ज होते. पोलीस बंदोबस्तसुद्धा होताच. कार्यक्रम खूपच शिस्तबद्ध आणि आनंददायी वाटत होता. काहीजण मध्येच थोडे थकल्यासारखे जाणवले, पण बाजूने चालणाऱ्या अनोळखी माणसाचं हसू आणि स्वयंसेवकांचा उत्साह त्यांना पुढे चालत राहायला बळ देत होता. चले चलो गाणं म्हणत, सगळ्यांशी गप्पागोष्टी करता करता सहा किलोमीटर कसे संपले ते मला कळलंच नाही. मध्ये कितीतरी सेल्फी काढले, हास्याचे फवारे उडले, गप्पांच्या मैफिली झडल्या ... रोजचाच रस्ता आज मात्र नव्याने उमगत होता, रोजचेच चेहरे आज नव्याने उजळले होते. कारण इथे कुठलीच स्पर्धा नव्हती. प्रत्येकाची गती वेगळी, प्रत्येकाची क्षमता वेगळी ... पण ते कुणीही जज करत नव्हतं. सगळेजण एकमेकांना केवळ प्रोत्साहन देत होते आणि हीच गोष्ट विशेष होती. मजल दरमजल करत आम्ही मैदानावर येऊन पोहोचलोसुद्धा. आणि तिथे तर काय फोटोसाठी दाही दिशा ...
फोटोबूथ उभारून संयोजकांनी आम्हाला खूप मोठी मेजवानीच दिली की ... अत्यंत उत्साहात रांगेत उभे राहून आम्ही फोटो काढले आणि काही जणांना काढूनसुद्धा दिले. इकडे स्टेजवर कार्यक्रम अगदी रंगात आला होता. सर्वात जास्त म्हणजे वयाची ८० वर्षे पूर्ण करणाऱ्या आजींचा सन्मान झाला. एकीकडे सर्वजण चहापान, न्याहारीचा आस्वाद घेत होते. सर्व वातावरण प्रसन्नतेने भरून आणि भारून गेले होते. 
आता तुम्ही म्हणाल की एक दिवसाच्या Walkathon ने काय होणार ? नियमितपणे व्यायाम हवा, तरच आरोग्य उत्तम राहील. हे अगदीच बरोबर आहे. पण कदाचित काही जणांसाठी ही व्यायामाची सुरुवात सुद्धा असू शकते. हल्ली बरेच जण जागरूक होत आहेत, त्यामुळे सकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. तरीही Walkathon हा इव्हेंट आपली स्वतःची एक शान घेऊन डौलात उभा आहे. कारण Walkathon हा एक दिवसाचा कार्यक्रम असला तरी त्याचा संदेश दीर्घकाळ लक्षात राहतो. त्या काही किलोमीटरच्या प्रवासात प्रत्येक जण स्वतःशी एक नवं नातं जोडतो, आरोग्यासाठी व्यायाम करायचं वचन स्वतःलाच देतो, आपले अनुभव दुसऱ्यांना सांगतो आणि त्यायोगे पुढच्या वर्षी अधिक जण कसे येतील यासाठी प्रयत्नशील राहतो. मंजिलसे खूबसूरत तो सफर होता है ... Walkathon चा finishing पॉईंट, जिथे आपण फोटो काढतो तो मस्तच असतो, पण ज्या संपूर्ण रस्त्याने आपण फिरून येतो तो माहोल अगदीच खास असतो. चालताना शरीराबरोबरच विचारांनाही गती मिळते, पण आश्चर्य असं की या गतीमुळे मन मात्र शांत होतं. आपल्या भोवताली इतकी गर्दी असली तरी तिथे गोंगाट/कोलाहल मात्र नसतो. आपण सगळेजण आज शर्यतीत अक्षरशः धावतोय, अनेकदा आपली इच्छा नसतानाही ... तेव्हा थोडं थांबून, अनेकांना बरोबर घेऊन, सामाजिक जाणिवेच्या भावनेने एखादा उपक्रम केला तर त्याचा आनंद काही औरच...
आपल्या सगळ्यांना ससा कासव शर्यतीची गोष्ट तर माहित आहेच. हो हो तीच ... ज्यात ससा गवत खाऊन झोपून राहतो आणि कासव हळू हळू पुढे जात शर्यत जिंकते. या कथेपेक्षा ससा कासव शर्यतीची एक थोडीशी वेगळी कथा माझ्या मनाला खूप भावली आहे. 
ससा आणि कासव शर्यत लावतात की दूरच्या डोंगरावर जे झाड आहे तिथे जो आधी पोहोचेल तो जिंकला. सशाने यावेळी मनात ठरवलेलं असतंच की काहीही झालं तरी तो हरणार नाहीच्चे. मग काय ... तो धूम ठोकतो आणि पळत राहतो. वाटेत त्याला एक फुलपाखरू भेटतं, ते म्हणत माझे रंग बघ किती छान आहेत !! ससा म्हणतो की मला तुझ्याकडे बघायला वेळ नाही, मला शर्यत जिंकायची आहे. पुढे त्याला एक छोटा मुलगा भेटतो, ज्याच्या दप्तरातून सगळं काही खाली सांडलेलं असतं. तो म्हणतो ... ससुल्या, मला दप्तर भरायला मदत करतोस का ? पण आपला ससा कुठला ऐकायला ... तो म्हणतो.. छे रे !! तुझं दप्तर भरत बसलो तर मी लवकर पोहोचणार कसा ? आणि सरळ तिथून निघून जातो. वाटेत आलेल्या कुठल्याही अडथळ्याला हा ससा बधत नाही आणि दूरच्या डोंगरावर त्या झाडाखाली जाऊन पोहोचतोच. मस्त सेल्फी काढतो, स्टेटसला टाकतो आणि कासवाची वाट बघत बसतो. कासवाला यायला खूप वेळ लागणार आहे हे माहीत असूनही या सशाला बिलकुल झोप लागत नाही. तो फक्त इकडून तिकडे येरझाऱ्या घालत बसतो. आणि इकडे आपलं हे कासव त्याच्या गतीनं चालत असतं. त्याला तेच फुलपाखरू भेटतं. कासव त्याच्या रंगांचं अगदी कौतुक करतं, त्यानंतर आनंदित होऊन ते फुलपाखरू उडून जातं. पुढे तो छोटा मुलगा ज्याच्या दप्तरातून सगळं काही सांडलं आहे तो रडताना कासव बघतं. त्याला दप्तर भरायला मदत करून, त्याचं दप्तर थोडा वेळ स्वतःच्या पाठीवर घेऊन, त्याचं ओझं हलकं करायला कासव मदत करतं आणि त्याला टाटा बाय-बाय करून पुढे मार्गस्थ होतं. इकडे ससा अगदी कंटाळून बसलेला असतो आणि डिप्रेशन का काय ते त्याला यायला लागलेलं असतं. पण आपलं हे कासव मात्र अत्यंत आनंदात त्या झाडाखाली पोहोचतं आणि चक्क सशाचं अभिनंदन करतं. सशाला हे बिलकुल अपेक्षित नसतं. तो म्हणतो अरे मी जिंकलो आणि तू हरलास, पण तरीही मी दुःखी आणि तू आनंदी हे कसं बरं ? यावर कासव म्हणतं मित्रा तू या जीवनाच्या शर्यतीत फक्त धावत राहिलास आणि मी मात्र हे जीवन जगत राहिलो. तू या समाजाला मागे टाकत पुढे जाण्यावर भर दिलास आणि मी आजूबाजूच्या समाजाशी जुळवून घेण्यावर. सशाला आता ही जीवघेणी शर्यत नकोशी वाटते आणि तो ठरवतो की पुढच्या वेळी आपण दोघांनी एकत्र चालायचं आणि आयुष्याची मज्जा लुटायची ... जीवन जगायचं, आनंदी राहायचं ... 
आवडली ना ही गोष्ट ? मनात खोलवर कुठेतरी पटलीसुद्धा असेल. आज Walkathon च्या निमित्ताने ही संधी मला मिळाली. पहाटेच्या थंडीत कार्यक्रम स्थळी पोहोचणे, आपापल्या वस्तू कलेक्ट करणे, प्रसन्न सूर्योदय वेगळ्याच नजरेने बघणे, विठूनामाच्या जयघोषात झूम्बा, ओळखी/अनोळखी चेहऱ्यांबरोबर चालत राहणे, गप्पा गोष्टींमधून केवळ आनंदाची देवाणघेवाण, स्वतःला शाबासकीची थाप देणे, आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे ही जाणीव होणे ... अशा कितीतरी गोष्टी आज मी मिळवल्या. इतका वारेमाप आनंद मला मिळवून देणाऱ्या ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र पालक संघाचे खूप खूप आभार !! उत्कृष्ट, नेटक्या नियोजनाबद्दल सर्वांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन !! आता प्रतीक्षा पुढच्या वर्षीच्या Walkathon ची ....

शीतल कापशीकर
१८ जानेवारी २०२६
दुपारी ३.३०

Comments

Popular posts from this blog

गूंजे बनकर देस राग 🇮🇳

सेवा परमो धर्म: ।