Walkathon : एक आनंदानुभूती
Walkathon : एक आनंदानुभूती I am a Finisher ... अगदी स्टाईलमध्ये मी फोटो काढला आणि आता बाकी कुठे, काय चाललंय ते बघायला गेले. खरं म्हणजे मी सहा किलोमीटर चालून आले होते, पण बिलकुल दमले नव्हते. उत्साह, आनंद अगदी ओसंडून वाहत होता. त्याचं कारण पण तसंच आहे ... मी हा चालायचा उपक्रम खूप जणांबरोबर एकत्रित केला होता. त्यामुळे अनेकांची सकारात्मक ऊर्जा माझ्यात आली होती. निमित्त होते ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र पालक महासंघ आयोजित Walkathon चं !!! आजचा दिवसच माझ्यासाठी अगदी स्पेशल ठरला होता, तो देखील अगदी सकाळच्या तीन चार तासात. झालं असं की... पहाटे पाच वाजता गजर वाजला आणि मी उठले ... खरंतर अडथळा आणणारं घरात कोणीही नव्हतं, पण माझीच खूप लगबग चालली होती... का तर Walkathon ला जायचंय म्हणून ... यापूर्वी मी चार-पाच सायक्लोथॉनला गेले आहे, पण Walkathon ला जायचा हा माझा पहिलाच अनुभव. आणि पहिला अनुभव नेहमीच स्पेशल असतो. तसं बघायला गेलं तर चालायची सवय असल्याने तो भरपूर अनुभव माझ्या गाठीशी आहे, पण Walkathon काहीतरी वेगळं असेल असं माझं मन मला सांगत होतं आणि खरोखर त्याची प्रचिती आलीच...