देव तारी त्याला ...
देव तारी त्याला ... आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात, ज्यांची कधी आपण अपेक्षा तर सोडाच पण विचारही केलेला नसतो. आपण चारचौघांसारखे मध्यमवर्गीय आहोत, त्यामुळे आपल्या बाबतीत असं काही वेगळं, सनसनाटी, विचित्र, खरं म्हणजे थोडं भयंकर घडणार नाहीच हे आपण पक्कं गृहीत धरलेलं असतं. आणि या विश्वासावरच आपण अगदी बिनधास्त जगत असतो. पण या विश्वासालाच जर तडा गेला तर ? आपल्याच बाबतीत एखादी अनाकलनीय, एखाद्या चित्रपटात शोभेल अशी घटना घडली तर ? ती घटना जर आनंददायी असेल तर निश्चितच आपण हुरळून जाऊ पण भीतीदायक असेल तर ? असाच एक कठीण प्रसंग माझ्या लेकीवर ओढवला होता, परंतु परमेश्वर कृपेने तिची त्यातून सुटका झाली... नव्हे नव्हे तर प्रत्यक्ष परमेश्वराने येऊन तिची सुटका केली असं म्हणणं अधिक योग्य ठरेलं. झालं असं की .... माझा १४ जानेवारीचा दिवस अगदी छान गेला. गूळपोळी, तिळाचे लाडू, एक दोन ठिकाणी हळदीकुंकू वगैरे गोष्टी अगदी मस्त पार पडल्यानंतर मी दुसऱ्या दिवशीची तयारी करून झोपी गेले. १५ तारखेला माझं schedule अगदीच व्यस्त असणार याची कल्पना तर होतीच पण आगाऊ काम/पूर्वतयारी करणे हा माझा स्थायीभाव असल्याने ...