प्रकाशगाणी
प्रकाशगाणी कोजागिरी पौर्णिमा .... को जागर्ति । असे विचारत लक्ष्मीमाता सर्वत्र संचार करते. सर्वजण संध्याकाळी आटीव दूध चंद्रप्रकाशात ठेवून मध्यरात्री पितात. शरदाचं चांदणं अनुभवतात. कलेची आराधना करतात आदी गोष्टी आपल्याला माहीत आहेतच. हल्ली पावभाजी वगैरे बेत असतो 😄 😄असो. यंदाची कोजागिरी वेगळेच रंग घेऊन येणार होती. कारण प्रतिवर्षीप्रमाणे शाळेत चांदण्यांची गाणी सादर करता येणार नव्हती. काय करता येईल हा विचार गणेशोत्सवातच सुरू झाला होता. कोरोनाने मला घरातच कैद केले असल्याने विचार करायला खूप वेळ मिळाला आणि एक ऑनलाईन गीतगायन स्पर्धा घेऊया ज्याचा निकाल असेल कोजागिरी पौर्णिमा संगीत सभा ... ही आयडियाची कल्पना सुचली. 'बा कोरोना ... ही पण गोष्ट शिकवलीस की रे , तुझे आभारच मानायला हवेत की.' झालं. चंद्र - चांदण्यांची गाणी शोधायला सुरुवात केली. मग लक्षात आले की चंद्राची हिंदी गाणी जास्त आहेत. बॉलिवूडला चंद्राचे खूपच आकर्षण. चंद्राने अनेक सिनेमे हिट करायला मदत केलीये. पण पडद्यावरील नायक नायिकांच्या तोंडी असलेली गाणी कितीही छान वाटली तरी शाळकरी मुलांच्या तोंडी ऐकायला फारसे उचित वाटत नाही. मराठ...