प्रकाशगाणी

प्रकाशगाणी
कोजागिरी पौर्णिमा .... को जागर्ति । असे विचारत लक्ष्मीमाता सर्वत्र संचार करते. सर्वजण संध्याकाळी आटीव दूध चंद्रप्रकाशात ठेवून मध्यरात्री पितात. शरदाचं चांदणं अनुभवतात. कलेची आराधना करतात आदी गोष्टी आपल्याला माहीत आहेतच. हल्ली पावभाजी  वगैरे बेत असतो 😄 😄असो.
यंदाची कोजागिरी वेगळेच रंग घेऊन येणार होती. कारण प्रतिवर्षीप्रमाणे शाळेत चांदण्यांची गाणी सादर करता येणार नव्हती. काय करता येईल हा विचार गणेशोत्सवातच सुरू झाला होता. कोरोनाने मला घरातच कैद केले असल्याने विचार करायला खूप वेळ मिळाला आणि एक ऑनलाईन गीतगायन स्पर्धा घेऊया ज्याचा निकाल असेल कोजागिरी पौर्णिमा संगीत सभा ... ही आयडियाची कल्पना सुचली. 'बा कोरोना ... ही पण गोष्ट शिकवलीस की रे , तुझे आभारच मानायला हवेत की.' झालं. चंद्र - चांदण्यांची गाणी शोधायला सुरुवात केली. मग लक्षात आले की चंद्राची हिंदी गाणी जास्त आहेत. बॉलिवूडला चंद्राचे खूपच आकर्षण. चंद्राने अनेक सिनेमे हिट करायला मदत केलीये. पण पडद्यावरील नायक नायिकांच्या तोंडी असलेली गाणी कितीही छान वाटली तरी शाळकरी मुलांच्या तोंडी ऐकायला फारसे उचित वाटत नाही. मराठीला चंद्राची ऍलर्जी नसली तरी शालेय वयोगटाला शोभतील अशी गीते त्यामानाने कमी. गाण्याची निवड करायला कसा भरपूर साठा असायला हवा नाही का. त्यामुळे चंद्र चांदण्या ही चौकट मोठी करावी असे ठरवले. प्रकाशाचे स्रोत असणारे सूर्य - चंद्र - चांदणे - तारे - दिवा आदी भर घालूया असे वाटून गेले. तेजोवलय निर्माण व्हायला लागले होते आणि कार्यक्रमाचे नाव सुचले .... प्रकाशगाणी
१ सप्टेंबर ... अनंत चतुर्दशीला घाईघाईने स्पर्धा जाहीर केली....
ज्योत तमाला दूर सारते सदैव मनात जाणी । तुम्ही आम्ही सारे मिळूनी गाऊ प्रकाशगाणी ।।
कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून मुक्तिसोपान संगीत विद्यालय आयोजित करत आहे ऑनलाईन गीत गायन स्पर्धा .... प्रकाशगाणी 
विजेत्यांची नावे कोजागिरी विशेष संगीत स्पर्धेत जाहीर करण्यात येतील व विजेत्यांची गीते या संगीत सभेत सादर होतील. पाच विविध वयोगटात ही स्पर्धा घेण्यात येईल व प्रत्येक गटातून प्रथम , द्वितीय व तृतीय असे तीन विजेते घोषित करण्यात येतील. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला ई प्रमाणपत्र देण्यात येईल. चला तर मग लागा तयारीला..... स्पर्धेचे नियम व अटी काळजीपूर्वक वाचा बरं का ... आवर्जून सहभाग नोंदवा.
जाहीर तर केले आता खरी कामाला सुरुवात होणार होती. विभागप्रमुखांना हा मेसेज पाठवला , त्यांनी त्यांच्या विभागात पाठवला. ज्या ज्या वर्गांना आम्ही गायन शिकवतो त्यांच्याशी तासाला संवाद साधला. मुक्तिसोपानच्या नावे एक मेल आयडी बनवला ज्यावर स्पर्धक विडिओ पाठवणार होते. शिशुवर्ग ते दुसरी , तिसरी - चौथी , पाचवी ते सातवी , आठवी ते दहावी व खुला गट (पालक , शिक्षक , युुवक युवती , माजी विद्यार्थी ) असे गट केले व मुक्तिसोपानच्या अध्यापकांकडे एकेक गट देऊया असे ठरले. अनघाताई , कीर्तीताई , स्नेहलताई , स्वरेशाताई व विष्णुपंत अनुक्रमे वरील गटांचे नेतृत्व करणार असे ठरले.
जेमतेम एक महिना हातात होता आणि आम्ही सगळेच तितकेसे टेक्नोसॅव्ही नाही त्यामुळे जरा टेन्शन आले होते. पण परमेश्वराने पेच सोडवला. अधिक महिना आल्याने कोजागिरी तब्बल महिन्याने पुढे गेली होती आणि हाताशी बराच वेळ मिळणार होता. विभागातील बैठक वारंवारता वाढली होती आणि आपापसतले फोन कॉल्स देखील. गेल्या दोन वर्षात शतगानवंदना , संतवाणी या स्पर्धांच्या दरम्यान विभागातले उत्साही वातावरण मी अनुभवले होते. तसाच माहोल बनायला लागला होता. यंदा दोन ऑनलाईन गीते (मराठी अभिमान गीत व सावरकर भारतात अवतरो पुन्हा) व दोन ऑनलाईन संगीत सभा (भक्तिरंग व कृष्णसखा) सादर झाल्या होत्या त्यामुळे तो अनुभव गाठीशी होता. पण हे सर्व अध्यापकांनी केलेले सादरीकरण होते. विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष सहभाग त्यात नव्हताच. त्यामुळे ही संगीत सभा वेगळी असणार हे निश्चित होते. फक्त विजेत्यांची म्हणजे ३ x ५ अशी एकंदरीत १५ गीते सादर होणार होती.
आमच्यासमोर मुख्य आव्हान होते स्पर्धक जमवणे. प्रवेश स्वीकारण्याची अंतिम तारीख तर वाढवणार होतोच कारण असंही कार्यक्रम अंदाजापेक्षा महिनाभर पुढे गेला होता. सतत मेसेज , मागील यादीतील लोकांना फोन सुरु होते. ८ सप्टेंबरला पहिला प्रवेश नोंदवला गेला आणि हायसे वाटले. मग प्रवेश वाढत गेले. स्पर्धा ऑनलाईन घेण्याचा अचानक एक फायदा झाला. परदेशस्थ माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. आता आम्ही प्रवेश स्वीकारण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर केली होती. दररोज रात्री ८ वाजता हे काम सुरू व्हायचे. दिवसभरातील मेल तपासणे , नाव - व्हाट्सअप्प क्रमांक - इयत्ता - तुकडी व विडिओ असे तांत्रिकदृष्ट्या पूर्ण मेल मी संबंधित गटप्रमुख अध्यापकांना फॉरवर्ड करत होते.अपूर्ण मेलना पूर्तता करावी असा प्रतिसाद देत होते. यानंतर मिळालेले मेल जे तांत्रिकदृष्ट्या पूर्ण होते ते अध्यापक तपासायचे. ज्यात नियमाप्रमाणे विडिओ आडवा शूट केलेला आहे ना , एडिट केलेला नाही ना , कराओके ट्रॅक वर नाही ना , तीन मिनिटांत पूर्ण झालाय ना हे तपासून स्पर्धकांच्या व्हाट्सअप्प क्रमांकावर त्याबाबत मेसेज करायचे. विडिओ अटी पूर्ण करणारा असेल तर प्रवेश नोंदवल्याचा मेसेज व काही त्रुटी असतील तर तसा मेसेज.
रोज नवीन अपडेट्स आम्ही एकमेकांना देत होतो. प्रत्येक स्पर्धेत होते त्याचप्रमाणे याही स्पर्धेत शेवटच्या दिवशी मेलचा महापूर. रात्री १२ पर्यंत पण काम उरकले नाही अक्षरशः .... मग पुढे दुरुस्ती सांगणे. ५ ऑक्टोबर पर्यंत दुरुस्ती करून विडिओ आला नाही तर प्रवेश रद्द करूया असे ठरवले. पण केवळ एकच प्रवेश तोही खुल्या गटातील रद्द करावा लागला कारण तीन वेळा संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही. मध्ये  म्हणजे १ ऑक्टोबरला माझी मा. संचालकांबरोबर वैयक्तिक भेट होती तेव्हा ऑनलाईन स्पर्धा परीक्षणाचा ... विडीयो बघून गुण देण्याचा आपल्याला अनुभव आहेच की , मातृमंदिर  विश्वस्त संस्थेच्या समूह्गायन स्पर्धा पूर्वी अशाच व्हायच्या असे सांगून मा. गिरीशरावांनी माझे मनोधैर्य उंचावले होते.
६ ऑक्टोबरला मी गटावर अंतिम संख्या जाहीर केली. 
शिशुवर्ग ते दुसरी - ४१ स्पर्धक
तिसरी व चौथी - ३६ स्पर्धक
पाचवी ते सातवी - ४० स्पर्धक
आठवी ते दहावी - १९ स्पर्धक
खुला गट - ३१ स्पर्धक
एकूण १६७ स्पर्धक .... दीड शतकी मजल मारली की आपण. मस्त वाटलं.
आता सर्वांना सहभाग प्रमाणपत्राचे वेध लागले. मदतीला संगणक विभाग धावून आला. दरवर्षी आपण असे प्रमाणपत्र देतोच पण ते बाहेरून बनवून घेतो. यंदा ते शक्य नाही ही अडचण संगणक विभागाने नुसती ओळ्खलीच नाही तर सोडवली सुद्धा. दोन दिवसात प्रमाणपत्राचा फॉरमॅट माझ्या कायप्पा (whatsapp) वर हजर .... एरवी मी प्रमाणपत्र हातात पडले असे म्हटले असते हे सूज्ञ वाचकांनी ओळखले असेलच.
लगेच एक छोटीशी झूम मीटिंग. मी आणि अनुजाताई. हे प्रमाणपत्र एडिट कसे करायचे ते त्यांनी मला शिकवले. लगेच अस्मादिकांनी हे ज्ञान दुसरी झूम मीटिंग घेऊन विभागात संक्रमित केले. आणि इथेच गंमत झाली. मी लॅपटॉप वर दाखवले होते आणि सर्वजणांनी मोबाईलवर काम करायला घेतले. अडचणी यायला लागल्या. पण हल्ली माझे मोबाईलचे व्यसन वाढल्याने त्यावर प्रमाणपत्र कसे करावे हे शोधून काढणे फारसे जड गेले नाही.
आता सर्व गटप्रमुख  अध्यापकांवर परीक्षणाची जबाबदारी होती. आता मी मात्र जरा निवांत झाले होते कारण मी कुठल्याच गटाचे परीक्षण करणार नव्हते. त्यामुळे दिवाळी पहाट ठरवायला सुचत होते - वेळ मिळत होता. सुरेलता , तालज्ञान , शब्दोच्चार , गीतातील भाव आणि एकंदर प्रभाव असे पाच निकष लावून प्रत्येकी १० याप्रमाणे ५० गुण द्यावेत असे ठरले. याच वेळी केवळ आपणच परीक्षण करणे उचित नाही त्यामुळे बाहेरचे परीक्षक व आपल्या विभागातील एक परीक्षक अशी दोन्हीची बेरीज करून अंतिम निकाल जाहीर करावा असा प्रस्ताव मी मांडला. अर्थातच संपूर्ण विभागाने त्याला अनुमोदन दिले.
सगळ्यात छोट्या गटाचे परीक्षण कु. नादमयी पोरे - माजलगाव .. ज्यांनी आपल्याकडे गतवर्षी दिवाळी पहाट सादर केली होती यांनी करावे असे ठरले. त्यापुढील दोन गटांचे परीक्षण चिंचवड मधील संगीत तज्ज्ञ श्री. भालचंद्र नातु यांनी तसेच शालेय मोठा व खुल्या गटाचे परीक्षण माजलगावचे प. प्राणेश पोरे यांनी करावे हे निश्चित केले. या तिघांपैकी कुणालाही मी संपर्क केला नाही ... अगदी ठरवूनच. सर्व गटप्रमुखांनीच या मान्यवरांना फोनवर संपर्क करावा , त्यांना मेसेज/मेलवर पत्र पाठवावे , त्यांच्याकडे सर्व विडिओ पाठवावेत व निकाल मागवावा असे ठरले. एकप्रकारे हे नेतृत्व प्रशिक्षणच होते की. आणि मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतोय की हे सर्व काम पाचही जणांनी अगदी चोख पार पाडले. स्वतःचे गुण व परीक्षकांचे गुण अशी बेरीज करून अंतिम निकाल २० ऑक्टोबरला माझ्या कायप्पावर दाखल. मला खूप समाधान वाटत होते त्या दिवशी. गेली दोन वर्षे ही सगळी मंडळी अशा स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण एकेक गट हाताळत होतीच पण यंदा ऑनलाईन असूनही त्यांनी चोख काम केले होते. यातूनच आम्ही नवनवीन काही ना काही शिकत होतो.
निकाल व प्रमाणपत्रे तयार होती. २४ ऑक्टोबरला सहभाग प्रमाणपत्र प्रत्येक स्पर्धकाला पाठवले आणि ३० ऑक्टोबरला रात्री ८ वाजता निकाल बघा असे जाहीर केले. आता माझे काम सुरू होणार होते. २८ तारखेला मला संपूर्ण विडिओ नरेंद्र जाधव यांच्याकडे द्यायचा होता. आणि आपल्याकडे आता खूपच कमी वेळ आहे हा साक्षात्कार मला झाला. आपला फाजील आत्मविश्वास नडणार तर नाही अशी शंकासुद्धा मी घेतली ... माझ्यावरच. दसऱ्याच्या दिवशी विडिओ कसा असावा याबद्दल मांडलेले चार आराखडे मी स्वतःच खोडले. माझ्या सहकाऱ्यांनी त्यांचे काम अत्यंत व्यवस्थित पार पाडले होते. आता माझी जबाबदारी होती. विजेती गीते मी तीनतीनदा बघितली - ऐकली होती पण अद्याप मला संगीत सभेचा मूड सापडत नव्हता. आणि सोमवारी मी विभागाची बैठक रद्द करून प्रत्येक सदस्याला व्यक्तिगत फोन केला. अगदी १०-१५ मिनिटे बोलले प्रत्येकाशी याबाबत. शेवटचा फोन विष्णुपंतांना  केला .... मंगळवारी माझ्या घरी या. सगळ्या गाण्यांना तुम्हाला तबला साथ करायची आहे. कोरोनाचा रंग आता जरा फिकट होतोय तर या बिनधास्त ..... पण मास्क लावूनच या हं . त्यांनी लगेच होकार भरला. सिद्धीला मंगळवारी कॉलेजला जाऊ नकोस असे सांगितले (ऑनलाईन असले तरी जावे लागतेच की हो) आईच्या अशा आज्ञा पाळण्यात समस्त लेकरे पटाईत असतातच. त्या दिवशी काम फत्ते करूया असे ठरले. 
आणि डोळ्यासमोर या संगीत सभेचे स्पष्ट चित्र उमटले. पटापट ते कागदावर रेखाटले. किती विडिओ असतील आणि ते कुठे जोडायचे हे निश्चित झाले.
 मंगळवारी अभिरुची बैठक झाल्यावर विष्णुपंत व अनघाताई दोघेही आले. त्यांनी वेगवेगळ्या पट्ट्यांमधील तबले आणले होते. मी कागद पेन घेऊन सज्ज होतेच. प्रत्येक गीताची पट्टी सांगायची , त्या पट्टीतला तबला बाहेर यायचा , हेडफोन घालून त्या गीतावर विष्णुपंत तबला वाजवायचे व सिद्धी हा ऑडिओ रेकॉर्ड करायची . नंतर हे सगळे तबला रेकॉर्डिंग मूळ विडिओला sync करायचे. संध्याकाळचे सात वाजले या सगळ्यात. मी पटकन आवरून आले व निवेदन वन टेक ओके केले. केले कुठले करावेच लागले. जर फार चुका झाल्या असत्या , सारखे टेक पडले असते तर सिद्धीने काम सोडून द्यायची धमकीच दिली होती. (लहानपणी आई मला धमकी द्यायची , आता लेक देते इतकाच काय तो फरक 😝) आता पेटीवादन कार्यक्रम ... सिद्धीने एकेका गाण्याला पेटी साथ करायला सुरुवात केली आणि मी सुरुवात , शेवट , मधल्या स्लाईड्स मध्ये काय मजकूर असावा ते लिहायला. मी फक्त जोडणी करणार , कुठे काय जोडायचे ते तू सांगायचे हा सिद्धीचा नेहमीचा खाक्या. ती एडिटरच्या भूमिकेत आणि मी दिग्दर्शकाच्या.
आता सगळ्या गाण्यांना पेटी साथ करून झाली. पुन्हा एकदा सिंकिंग कार्यक्रम. रात्री साडे बारा वाजता झोपूया आणि सकाळी लवकर काम सुरू करू असा विचार झाला. त्याप्रमाणे सकाळी फ्रेश मूडने सात वाजता काम सुरू. तिला एकेक विडिओ मी टेलिग्रामवर पाठवत होते व ती तो आधीची - नंतरची मोकळी जागा काढून , फ्रेम ऍडजस्ट करून जोडत होती. सलग काम केल्याने संध्याकाळी ६ वाजता विडिओ तयार 👏🏻👏🏻👏🏻
लगेचच ड्राईव्हवर अपलोड करून नरेंद्र सरांना पाठवला व ३० तारखेला रात्री ८ वाजता प्रीमियर करूया असे सांगितले. त्यांनी आनंदाने होकार भरला व दुसऱ्या दिवशी काम झाले सुद्धा. आता खरं तर निश्चिन्त असायला हरकत नव्हती पण जोवर ही संगीत सभा पार पडत नाही तोवर एक अनामिक टेन्शन होते. सरतेशेवटी ही संगीत सभा उत्तम पार पडली व आता हुश्श !!
या निमित्ताने कित्ती गोष्टी नव्याने जाणवल्या. प्रत्येक अध्यापकाची काम करायची पद्धत वेगळी पण उद्दिष्ट सारखेच असल्याने एकमेकांचा आधार घेत व एकमेकांना आधार देतच पुढे जाता येते हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. सर्वांना नेतृत्व करायची संधी मिळाल्याने आत्मविश्वास वाढला. विद्यार्थ्यांनी नवनवीन गीते शोधावीत , त्याच्या चाली माहीत करून घ्याव्यात , ती गीते बसवावीत , विडिओ करण्याच्या निमित्ताने त्यांनी व्यवस्थित आवरून आनंद घ्यावा असे बरेच उद्देश ही स्पर्धा घेण्यामागे  होते. सतत काहीतरी चालू राहिले पाहिजे हा ध्यास होता. आपल्याला अजून खूप काही शिकायचे आहे ही जाणीव होती. या निमित्ताने संगणक विभागाशी असलेली मैत्री अजूनच घट्ट झाली. रागिणीताई , भाग्यश्रीताई यांनी मला किती पटकन प्रमाणपत्र फॉरमॅट बनवून दिला. ते देखील संगणक अभिरुचीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेला लोगो वापरून. दोन विभागातील असा समन्वय खूप मोलाचा आहे ... स्वतःच्या , विभागाच्या व निगडी केंद्राच्या प्रगतीसाठीसुद्धा. 
मुक्तिसोपान विभागात तर आता आनंदाला उधाण आलंय. आम्ही अपेक्षा - कल्पना केली त्यापेक्षा जास्त यशस्वी झाली प्रकाशगाणी ही संगीत सभा. कितीतरी गीतांत तोच तो पणा असूनसुद्धा सगळ्यांनी चिकाटी बाळगली , न कंटाळता परीक्षण केले.काम सांगितले की पटकन करून मोकळी होणारी स्नेहलताई , प्रत्येक वेळी बघ ग असे करू का ? तू म्हणत असशील तर करते असे म्हणणाऱ्या आणि सगळ्याच गोष्टीत जीव अडकवून घेणाऱ्या कीर्तीताई , नवीन असूनही सगळं समजून उमजून करणारी स्वरेशाताई , माझ्या गटातल्या सगळ्यांनाच नंबर देऊया ग ... छोटी आहेत ती असं म्हणणाऱ्या अनघाताई , अंतिम वर्षाच्या परीक्षेमुळे कशात नसल्याने हळहळणारी प्रतिक्षा , ताई काही लागलं तर सांगा म्हणणाऱ्या सुनीताताई , या उपक्रमात तब्येतीच्या कारणाने सहभागी नसले तरी चौकशी करणारे पुराणिक सर आणि जिथे कमी तिथे आम्ही ही भूमिका बजावणारे विष्णुपंत .... इतका  सहकाऱ्यांचा पाठिंबा असताना कार्यक्रम यशस्वी न होईल तर नवल.
केंद्रप्रमुख मा. देवळेकर सरांनी कुठल्याही उपक्रमाला होकार भरणे म्हणजेच विभागाला मिळालेली संजीवनी , ऊर्जा. 
अशा उपक्रमांमुळे विभागात सकारात्मकता  वाढतीये , सदस्यांचे पैलू उलगडतायंत , कौशल्यांची भर पडतीये , नेतृत्व गुण विकसित होतोय आणि बरंच काही......
हे सगळे जरी खरे असले तरी प्रकाशगाणीच्या यशाचे खरे शिल्पकार आहेत आपले सगळे स्पर्धक. या सगळ्यांनी प्रवेश नोंदवून ही स्पर्धा यशस्वी केली. सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक आभार आणि विजेत्यांचे अभिनंदन !!!
https://youtu.be/RcuFSrws410  या लिंकवर आपण पूर्ण कार्यक्रम बघू शकता.
स्पर्धा अगदी अटीतटीची झाली ... इति परीक्षक. 
सहभाग प्रमाणपत्र मिळाल्याने मी खुश झालो ... एका न जिंकलेल्या स्पर्धकाची प्रतिक्रिया.
असे उपक्रम सारखे सारखे घ्या बरं का ... पालकांनी मांडलेला विचार. 
काय म्हणतोय स्पर्धेचा प्रतिसाद .... मा. देवळेकर सरांनी केलेली चौकशी 
अग आपण एकमेकांना इतकं सहकार्य करायला हवंच की ... संगणक विभागप्रमुख अनुजाताईंचे उद्गार.
ताई एकदा बघून घ्या नोटिफिकेशन आलंय का ते .. नरेंद्र सरांचा फोन.
कित्ती आणि काय आणि कसं आणि कोणाकोणाबद्दल लिहू अजून .... इति मी ..... कृतार्थ भावनेतून ....
आणि प्रकाशगाणी अध्याय सुफळ संपूर्ण ..... 🙏🙏

शीतल कापशीकर
मुक्तिसोपान संगीत विद्यालय

 अंतिम निकाल 








Comments