अकरा पावलांची यात्रा : एक उत्सवी प्रवास
अकरा पावलांची यात्रा : एक उत्सवी प्रवास योग या शब्दावर प्रचंड विश्वास बसावा अशीच ही गोष्ट आहे. तो योगच माझ्या नशिबात होता म्हणून योगायोगाने मी योग्य वेळी, योग्य लोकांबरोबर, योग्य ठिकाणी जाऊन योग्य ते काम केलं आणि माझ्या कुंडलीतल्या योगाला अगदी मनःपूर्वक नमन केले ... खूपच अवघड वाटतंय का हे वाक्य ? जरा सोपं करून सांगते ... तर झालं असं ... की यंदाच्या नवरात्रात एकाच दिवशी अकरा देवींचे दर्शन मी घ्यावं असा योग माझ्या कुंडलीत अचानकच जुळून आला. आमच्या मातोश्री आणि तिच्या मैत्रिणी दरवर्षीच नवरात्रातल्या दुसऱ्या/तिसऱ्या माळेला पुणे परिसरातल्या ११ देवींच्या दर्शनाला गेली कितीतरी वर्षं जात आहेत. सालाबादप्रमाणे त्या सगळ्या जणींनी मला यंदाही तू येणार का असे विचारलं आणि मीही नकारघंटा अगदी जोरजोरात वाजवली. पण अचानक एक गोष्ट घडली (ती मी इथे नमूद करत नाहीये) आणि मी या एक दिवसीय यात्रेत सहभाग घ्यायचं ठरवलं. अगदी एकच जागा शिल्लक होती ... जणू काही ती माझ्यासाठीच ठेवलेली होती... त्या जागेवर मी माझा हक्क सांगितला आणि आज सकाळीच साडेपाच वाजता घरातून प्रस्थान केलं. रात्री वरूण राजाने जोरदार हजेरी लावली...