अकरा पावलांची यात्रा : एक उत्सवी प्रवास

अकरा पावलांची यात्रा  : एक उत्सवी प्रवास

योग या शब्दावर प्रचंड विश्वास बसावा अशीच ही गोष्ट आहे. तो योगच माझ्या नशिबात होता म्हणून योगायोगाने मी योग्य वेळी, योग्य लोकांबरोबर, योग्य ठिकाणी जाऊन योग्य ते काम केलं आणि माझ्या कुंडलीतल्या योगाला अगदी मनःपूर्वक नमन केले ... खूपच अवघड वाटतंय का हे वाक्य ? जरा सोपं करून सांगते ...
तर झालं असं ... की यंदाच्या नवरात्रात एकाच दिवशी अकरा देवींचे दर्शन मी घ्यावं असा योग माझ्या कुंडलीत अचानकच जुळून आला. आमच्या मातोश्री आणि तिच्या मैत्रिणी दरवर्षीच नवरात्रातल्या दुसऱ्या/तिसऱ्या माळेला पुणे परिसरातल्या ११ देवींच्या दर्शनाला गेली कितीतरी वर्षं जात आहेत. सालाबादप्रमाणे त्या सगळ्या जणींनी मला यंदाही तू येणार का असे विचारलं आणि मीही नकारघंटा अगदी जोरजोरात वाजवली. पण अचानक एक गोष्ट घडली (ती मी इथे नमूद करत नाहीये) आणि मी या एक दिवसीय यात्रेत सहभाग घ्यायचं ठरवलं. अगदी एकच जागा शिल्लक होती ... जणू काही ती माझ्यासाठीच ठेवलेली होती... त्या जागेवर मी माझा हक्क सांगितला आणि आज सकाळीच साडेपाच वाजता घरातून प्रस्थान केलं. रात्री वरूण राजाने जोरदार हजेरी लावली होती त्यामुळे आजची ही सहल कशी होईल याबद्दल मनात साशंकता होती. सकाळी सुद्धा रिमझिम पावसात वेगाने दुचाकी दामटत मी प्राधिकरणात पोहोचले आणि बघते तो काय ... या सगळ्या जणी माझ्या आधीच तिथे तयार होऊन बसलेल्या होत्या. आजच्या दिवसाच्या ठरलेल्या लाल रंगाच्या साड्या बहुतेकींनी नेसल्या होत्या. महाराष्ट्र टाइम्सने साधारणपणे वीसेक वर्षांपूर्वी नवरात्रात महिलांनी विविध नऊ रंगाच्या साड्या परिधान करायच्या असतातच असा एक ट्रेंड सुरू केला आहे, जो अगदी जोरदार चालतो. अनेकांनी देवीच्या शस्त्रास्त्रांकडे लक्ष द्या, तिच्या साड्यांकडे नको असे टोमणे मारायचा असफल प्रयत्नही केला. तो प्रयत्न हाणून पडल्यानंतर नव्या जोमाने नवीन साड्या घेत नवरात्रात ग्रुप फोटो काढायची रीत अगदी शाही पद्धतीने सुरू आहे. असंही साड्या आणि महिला यांचं फारच जिव्हाळ्याचं नातं आहे. वर्षातले अगदी मोजके दिवसच साड्या नेसणाऱ्या आमचेसुद्धा वॉर्डरोब साड्यांनी अगदी दुथडी भरून वाहत असतात. याबद्दलचं बोलणं सुरू असतानाच आमची बस आली आणि सर्वजणी त्यात चढलो. बऱ्याचशा माझ्या ओळखीच्या होत्या, तर काही चेहरे माझ्यासाठी अगदीच नवीन होते. पण सगळ्यांचाच उद्देश देवी दर्शन असल्याने ओळख पाळख असायची विशेष गरज नाही असा माझा समज मी पुन्हा एकदा दृढ केला. गाडी सुटली ... पहिलाच मुक्काम होता चतु:श्रृंगी ... 
पावसाने बऱ्यापैकी रंग दाखवायला सुरुवात केली होतीच. आजचा दिवस पावसाच्या पाण्यात वाहून जाईल की काय अशी शंका ही माझ्या मनात तरळून गेली. मजल दरमजल करत आमची वरात छत्र्या, ओटीचे सामान, परडीचं सामान इत्यादी सांभाळत बसमधून उतरली आणि दर्शन रांगेकडे चालू लागली. दुसऱ्यांच्या छत्र्यांमधून पडणारं पाणी स्वतःच्या अंगावर घेताना आपल्या छत्रीतून पडणारं पाणी दुसरीच्या अंगावर पडून तिची साडी/ ड्रेस भिजेल याची पुरेपूर काळजी प्रत्येक जण घेत होती. माझं मन मात्र या चतु:शृंगी गडाचा विचार करत होतं. सेनापती बापट रोडवर असलेलं हे मंदिर पुण्यातील सर्वात प्राचीन व प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. देवीचे मूळ नाव चतु:शृंगी माता म्हणजे चार शिखरांची देवी (कारण मंदिर असलेल्या टेकडीला चार शिखरे आहेत).... अनेकांनी त्याचा अपभ्रंश चतुर्शिंगी असा देखील केला आहे. लहानपणी मला तिथल्या जत्रेचं विशेष आकर्षण होतं. आजही तिथली जत्रा हा अनेकांच्या कुतूहलाचा विषय आहेच. इथला नवरात्र उत्सव पेशवेकालीन विशेष बहरला असे म्हणतात. आता तर मंदिराचं बांधकाम सुरू असून मोठी जागा उपलब्ध झाली आहे आणि त्यामुळे खूप छान दर्शन घेता येते. तसे दर्शन घेऊन, प्रसाद खाऊन आम्ही पायऱ्या उतरलो. उतरताना टोचलेल्या खड्यांमुळे अगदी ॲक्युप्रेशर जाणवत होते. कदाचित हल्ली वहाणेशिवाय चालायची सवयच नाही, त्यामुळेही ते जास्त जाणवत असेल. लवकरच हे मंदिर अजूनच छान दिसेल असा आशावाद बाळगून आम्ही आमच्या बसकडे मार्गस्थ झालो. तिथे आम्हाला गरमागरम साबुदाण्याची खिचडी तीही स्टीलच्या ताटलीत खायला मिळाली. पेपर डिश न वापरल्याने कचराही वाचला होता आणि ताटली हातात घेऊन खाणे सोपेही झाले होते. मनातल्या मनात आणि जाहीरपणे सुद्धा Sky Tourism ला आम्ही मोठी शाबासकी दिली. आणि आता आम्ही निघालो तांबडी जोगेश्वरीकडे....
तांबडी जोगेश्वरी, पिवळी जोगेश्वरी, काळी जोगेश्वरी यापैकी ही जोगेश्वरी म्हणजेच योगेश्वरी. कोकणातील श्रीवर्धन येथील योगेश्वरी हे पेशव्यांचे कुलदैवत, परंतु त्यांचं वास्तव्य पुण्यात असल्याने ते याच जोगेश्वरीला मनापासून मानू लागले आणि लढाईपूर्वी तिचाच आशीर्वाद घेऊ लागले. ही मूर्ती स्वयंभू असून पुण्याची ग्रामदेवता समजली जाते. ही मूर्ती उभी असून चतुर्भुज आहे. जोगेश्वरी, माहेश्वरी, सावित्री आणि चामुंडा या सर्व देवींचे एकत्रित असे स्वरूप या मूर्तीमध्ये बघायला मिळते. ही ताम्रवर्णी म्हणजेच तांबड्या रंगाची असल्याने तिला तांबडी जोगेश्वरी असे म्हणतात किंवा ताम्रासुराचा वध करणारी पराक्रमी देवता म्हणून तिचे नाव तसे पडले आहे अशीही आख्यायिका आहे. या ठिकाणी दर्शनाला खूप वेळ लागणार हे आम्ही गृहीत धरले होते परंतु अवघ्या पंधरा मिनिटात दर्शन झाल्याने आम्हाला सुखद धक्का मिळाला. देवीला जाता जाताच पटकन आम्ही बालाजीचे दर्शन देखील घेतले. सध्या बालाजीचे देखील नवरात्र सुरू आहे आणि आमचे कुलदैवत तेच असल्याने अचानक झालेल्या दर्शनाचा आनंद व एक वेगळेच सुख मिळाले. दर्शनाला वेळ कमी लागला त्यामुळे तिथेच फक्कडसा चहा पीत आम्ही तो वेळ भरून काढला आणि भवानी पेठेकडे निघालो....
या श्री भवानी देवी मंदिराची स्थापना पेशवाईच्या शेवटच्या काळात झाली, असे म्हटले जाते. हे मंदिर साडेतीनशे वर्षांपेक्षा जास्त जुने आहे. पुण्यातील भवानी पेठ ही लाकूड बाजार पेठ म्हणून अनेक वर्षांपासून ओळखली जाते. या ठिकाणी तुळजापूरच्या तुळजाभवानी माता मंदिरासारखेच प्रतिभवानी माता मंदिर उभारण्यात आले. तुळजापूरमधील देवीच्या दर्शनाला सर्वांना जाणे शक्य होत नसल्याने या मंदिराची उभारणी करण्यात आली असल्याचे म्हटले जाते. मंदिराला पूर्ण दगडी बांधकाम करण्यात आले आहे. मंदिरातील काळ्या पाषाणातील देवीची मूर्ती सुमारे अडीच फूट उंच आहे. इथे आम्ही अगदी आरतीच्या वेळेस पोहोचलो होतो त्यामुळे दर्शन बंद होते, परंतु तो वाद्यांचा गजर मात्र अगदी मन मोहून टाकत होता. यथावकाश दर्शन घेतले आणि मोर्चा वळवला समोरच असलेल्या लक्ष्मीनारायण दुकान कम मॉलमध्ये. तिथे मनसोक्त खरेदी करून आम्ही आमच्या बसकडे जाणार तेवढ्यात आम्हाला एका बोळातून बाहेर येणाऱ्या काही बायका दिसल्या आणि आम्ही देखील त्या बोळात घुसलो. आणि तिथे आम्हाला दर्शन घडलं काळुबाईचं. अचानक झालेल्या या दर्शनाने आम्ही अगदी सुखावलो. ते दर्शन डोळ्यात साठवत आम्ही तेथून निघालो सारस बागे समोरच्या महालक्ष्मी मंदिराकडे ...
हे मंदिर संगमरवरी असून त्यावर सुंदर कोरीवकाम केलेले आहे, ज्यामुळे ते अगदी लक्षवेधी ठरते. या मंदिरात श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली आणि श्री विष्णू यांच्या मूर्ती पाहायला मिळतात. ठायी ठायी मंदिराच्या श्रीमंतीची प्रचिती येते पण त्याचबरोबर भक्तीभाव देखील जाणवतो. मंदिरात होम हवन, अभिषेक अगदी मोठ्या प्रमाणात सुरू होतं. सुरुवातीला खूप गर्दी आहे असं वाटून मुखदर्शन घेऊया का असा विचार झाला, परंतु वेळ लागला तरी हरकत नाही पण देवीच्या पायावर डोकं ठेवायलाच हवं या बाजूने जास्त मते पडली. त्यामुळे आम्ही सगळ्या रांगेत जाऊन उभ्या राहिलो. मंदिरात पाऊल टाकल्यानंतर मात्र सगळे श्रम अगदी गळून पडले. आणि हो ... या मंदिरात चक्क फोटो काढायचीही परवानगी होती. फक्त सरस्वती मातेचा फोटो मात्र काढायचा राहून गेला. मनसोक्त दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि निघालो सहकार नगरच्या लक्ष्मी माता मंदिराकडे ....
पुण्यातील सहकारनगर येथील लक्ष्मी माता मंदिर हे एक प्रसिद्ध आणि नवसाला पावणारे मंदिर आहे, जेथे अनेक वर्षांपासून नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या मंदिराशी संबंधित आख्यायिका अशी आहे की, आबा बागुल यांना एका स्वप्नात एका पत्र्याच्या खोपट्यातील देवळातून हिरे, माणिक, मोती आणि सुवर्णकलश बाहेर येताना दिसले होते. या दृष्टांतामुळे बागुल यांनी परिसराची स्वच्छता केली, ज्यामुळे देवीचा मूळ गाभारा सापडला आणि तेथे लक्ष्मीमातेच्या साक्षात रूपाची अनुभूती आली. हे मंदिर नवसाला पावणारी लक्ष्मी माता म्हणून देखील प्रसिद्ध आहे. तिथे गेल्यावर मीनाक्षी मंदिराची प्रतिकृती बघून अगदी मदुराईला गेल्याचा भास झाला. भव्य दिव्य या मंदिरात सगळ्यांचेच भान अगदी हरपून गेले होते. आणि त्याच भारावलेल्या अवस्थेत आम्ही प्रस्थान केले पद्मावतीकडे ... 
पद्मावती मंदिर हे पुणे-सातारा रस्त्यावर असलेले एक प्रसिद्ध श्रद्धास्थान आहे, जिथे देवी पद्मावतीची तांदळा स्वरूपातील स्वयंभू मूर्ती आहे. पद्मावती म्हणजे श्री बालाजीची पत्नी. हे मंदिर पेशवेकाळापासून प्रसिद्ध असून, नवरात्रात येथे भाविकांची मोठी गर्दी होते. मंदिराच्या परिसरात गणपती, मारुती आणि शंकराचीही छोटी मंदिरे आहेत, तसेच पिंपळ व वडाचे मोठे वृक्ष आहेत. या मंदिरात आम्ही दर्शनाच्या रांगेत असतानाच श्री सूक्त पठण सुरू होते. त्यानिमित्ताने आम्ही सुद्धा तेथील महिलांबरोबर श्री सूक्त पठण केले. आणि आता आम्ही निघालो तळजाईकडे ....
तळजाई मंदिर हे पुण्यातील तळजाई टेकडीवर असलेले एक लोकप्रिय धार्मिक स्थळ आहे. हे मंदिर निसर्गरम्य आणि हिरव्यागार परिसरासाठी ओळखले जाते, जे ट्रेकिंग, पिकनिक आणि शांत वातावरणासाठी उत्तम आहे. असे मानले जाते की या टेकडीवर देवीच्या मूर्ती सापडल्याने या टेकडीचे नाव तळजाई पडले. देवीने जमिनीवरच ठाण मांडले आणि वेळेत जागा न मिळाल्याने तिला तळजाई म्हटले गेले. पद्मावती, तळजाई आणि भवानी अशा तीन देवी तिथे एकत्र आहेत. या दर्शनानंतर आम्ही तिथल्याच निसर्गरम्य परिसरात भोजनाचा आनंद घेतला. सगळीकडेच अपेक्षेपेक्षा कमी गर्दी असल्याने आम्ही before time होतो. आता आम्ही कोंढणपूरला निघणे अपेक्षित होते परंतु भरपूर वेळ हातात आहे हे लक्षात घेऊन आम्ही PICT समोरच्या सच्चिया माता मंदिरात जाऊया का असा प्रस्ताव ठेवला आणि तो चक्क मान्यसुद्धा झाला....
सच्चिया माता मंदिरात आम्ही जाऊन पोहोचलो आणि डोळे अक्षरशः दिपले. काय ती भव्यता, काय तो झगमगाट ... केवळ अहाहा हाच एक शब्द तोंडातून उमटला. देवीची पूजा राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर भारतामध्ये केली जाते. सच्चिया मातेच्या चरणावर डोके टेकवून झाल्यानंतर आम्ही कोंढणपूरकडे निघालो ...
वाटेत चहापानसाठी छोटासा ब्रेक घेत आम्ही कोंढणपूरला जाऊन पोहोचलो. इथली तुकाई माता हे पुणे जिल्ह्यातील एक प्राचीन आणि पवित्र देवस्थान आहे. हे मंदिर सिंहगड (पूर्वीचा कोंढाणा) किल्ल्याच्या परिसरात आहे आणि ते तुळजाभवानीचेच एक रूप मानले जाते. या मंदिराची स्थापना रामायण काळातील असून, देवीचे नाव तुक्क (शुक्र) या द्रविड शब्दावरून आले आहे, ज्याचा अर्थ शुक्रवारची देवी असा होतो. कोंढणपूरच्या तुकाई मातेच्या मंदिराला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे आणि अनेक भक्त येथे दर्शनासाठी येतात. स्थानिक परंपरेनुसार, तुळजाभवानीची मोठी बहीण असलेल्या तुकाई मातेचा कोंढणपूरला मुक्काम आहे.... भवानी पेठेतल्या भवानी मातेच्या मंदिरात तुकाई मातेची मूर्ती दिसली होती हे मला आत्ता पटकन लक्षात आलं आणि मनोमन भवानी आणि तुकाई या दोघी बहिणींना मी नमन केलं. एव्हाना संध्याकाळ झाली होती आणि आभाळात ढगसुद्धा दाटून आले होते. आणि आम्ही निघालो अमरजाईकडे ...
देहूरोडच्या पुढे शेलारवाडी येथे असलेले अमरजाई (अमरदेवी) मंदिर हे पुणे-मुंबई रस्त्यालगत घोरावडेश्वर येथे असलेले एक स्वयंभू देवस्थान आहे, जे शेलारवाडीची ग्रामदेवता म्हणून ओळखले जाते. अज्ञातवासाच्या काळात पांडव काही काळ इथे राहिले होते अशी आख्यायिका देखील प्रसिद्ध आहे. या मंदिरात आम्ही पोहोचलो तेव्हा आरती संपत आली होती. पुन्हा एकदा वाद्य गजर कानात घुमत होता. सकाळी भवानी मातेच्या मंदिरातील आरती आणि आत्ता अमरजाईच्या मंदिरातील आरती ... कान अगदी तृप्त झाले होते. दर्शनही कमी वेळात छान झालं आणि आम्ही परतीच्या मार्गाला लागलो...
खूपच छान दर्शन झालं, दरवर्षी येत जाऊ, अवघ्या चौदा तासात अकरा देवींचे दर्शन झालं हे काही सोपं काम नाही असं सगळ्याजणी म्हणत होत्या. पुढच्या वर्षी मला जमेल न जमेल माहित नाही, पण यंदाचे दर्शन मात्र मनात अगदी खोलवर ठसलं आहे हे अगदी नक्की. आजचा दिवस माझ्यासाठी खरोखरच खास ठरला. पुण्याच्या पवित्र भूमीत मला अकरा देवींचं दर्शन घेण्याचं सौभाग्य लाभलं. पायऱ्या चढताना जाणवलेली भक्तिभावाची अनुभूती, मंदिराच्या गाभाऱ्यातील दिव्य शांतता, आणि देवीच्या आरती दरम्यानचा गजर या सगळ्याने मन भारावून गेलं. हा प्रवास फक्त दर्शनापुरता मर्यादित नव्हता; तर श्रद्धा, अध्यात्म आणि अंतर्मनातील समाधान यांचा एक सुंदर संगम होता. प्रत्येक मंदिरात दर्शन घेताना गर्दीत, कोलाहलातही एक शांतता जाणवत होती. अत्तर, परफ्युम्स, गजरे, फुले, धूप, उदबत्त्या या सगळ्यांच्या एकत्रित गंधाने मन अजूनच सुगंधित झालं होतं. अचानकपणे समोर आलेलं जेवण खूपच रुचकर वाटलं होतं. अनोळखी लोकांशी बोलताना सुद्धा भक्तीचा एक समान धागा जाणवला होता. देवीला अर्पण केलेली ओटी, परडीत घातलेलं पीठ मीठ, मंदिरा बाहेर कोणाच्यातरी हातावर टेकवलेला रुपया हे सगळं बघून काहीतरी दिल्यावर माणूस किती छान दिसतो याचा अनुभव आला होता. आणि .... एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली ... ती म्हणजे स्वच्छतेचा अभाव. ही गोष्ट म्हणजे बाकी सगळ्या उत्तम गोष्टीवर लागलेला डागच म्हणावा लागेल. अशा उत्सवी दिवसांमध्ये जागोजागी स्वच्छतागृहे, भले ती सशुल्क का असेनात पण असलीच पाहिजेत. आपले काम झाल्यावर कचरा रस्त्यातच टाकण्याची आपली जगप्रसिद्ध सवय आपल्याला सोडायलाच हवी. रांगेचा फायदा सर्वांना हे केवळ लिखित न राहता प्रत्येकाने त्याचा अवलंब केला, तर सगळ्याच गोष्टी सुरळीत होतील आणि देवाच्या दारात जाऊन भांडायची वेळ कोणावरच येणार नाही. हौशे, नवशे, गवशे सर्वत्र आढळणारच, पण त्यात आपण कुठे बसतो हा विचार देखील प्रत्येकाने करायला हवा. 
पण एकंदरीतच हा उत्सव केवळ आनंद आणि रंगांचा अनुभव नसून, भक्तीचा प्रवास सुरू करण्याचं एक सुंदर माध्यम आहे. आणि या भक्तीमार्गावर चालण्यासाठी वय, जात, रंग, वर्ण, उंची, बांधा या कशाचेही मोजमाप करण्याची गरज नाही. यात कुठेही, कोणाचीही, कोणाशीही स्पर्धा नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा अनुभव ज्याचा त्याने घ्यायचा, कारण ... 
प्रत्येकाचं मागणं आगळं। जगणं वेगळं प्रत्येकाचं ।
प्रत्येकाची वाट वेगळी । साद निराळी प्रत्येकाची ।।
प्रत्येकाचे स्वप्न वेगळे। विश्व निराळे प्रत्येकाचे ।
प्रत्येकाचं गाणं वेगळं । जिणं निराळं प्रत्येकाचं ।।
प्रत्येकाची आस वेगळी । ध्येय वेगळे प्रत्येकाचे ।
असे असूनही आपण सारे । सहप्रवासी या आनंदाचे ।।

शीतल कापशीकर
२३ सप्टेंबर २०२५
नवरात्रातली दुसरी माळ
(रात्रौ २.१५)

Comments

Popular posts from this blog

Walkathon : एक आनंदानुभूती

गूंजे बनकर देस राग 🇮🇳

सेवा परमो धर्म: ।