आजि सोनियाचा दिनु

यश हे अमृत झाले !!!
वंदे मातरम्
आजि सोनियाचा दिनु

सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!! आजपासून बरोब्बर वर्षांपूर्वी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडे पाच वाजायच्या सुमारास गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् मधून औपचारिक रित्या कळविण्यात आले की सिद्धी कापशीकर हिने जवळपास साडेदहा तास सलग संवादिनी वाजविण्याचा जो प्रयत्न केला त्याला यश आले आहे. 
तिच्या या प्रयत्नाची दखल घेत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स ने तिची नोंद घेतली आणि तिला मान्यतेचे प्रमाणपत्र दिले. 
मग काय विचारता ... आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे ... भराभर तिच्या या कामगिरीचा मेसेज टायपून सर्वत्र धाडून दिला आणि अक्षरशः शून्य मिनिटात सुरू झाला अभिनंदनचा, कौतुकाचा वर्षाव !! आजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु । आजि सोनियाचा दिनु । माझी ही लंडनवारी अगदी सार्थकी लागली हा विचार मनात चालू होता. आलेल्या प्रत्येक मेसेजला प्रतिसाद देईपर्यंत फोनची रीघ लागली. प्रत्येकाशी अगदी थोडंच बोलणं शक्य होतं, कारण त्याचवेळी बरेचसे कॉल्स वेटिंगवर होते. अर्थातच सगळ्यांनी ते समजून घेतलंही. खूप जणांनी हात आखडता न घेता अगदी मनमोकळेपणाने मेसेज पाठवले. सगळ्याचे स्क्रीनशॉट घेऊन स्टेटसला अपडेटायचं कामही सुरू झालं. ज्या परमेश्वरी कृपेमुळे हे शक्य झालं त्याच्यासमोर नतमस्तक होण्यासाठी मी लगेचच मोरया गोसावी मंदिराकडे धाव घेतली. पेढ्यांचा नैवेद्य दाखवला आणि घरी परतले. एव्हाना जवळपासच्या स्नेहीमंडळींचं घरी येणं सुरू झालं होतं. अगदी चहापाण्याची सुद्धा अपेक्षा न करता केवळ माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी हे सगळे माझ्या घरी आले होते, तेही स्वतः काहीतरी खाऊ किंवा पेढे घेऊनच. अनेकांशी व्हिडिओ कॉल सुरू होते. प्रत्यक्ष भेटीचा आनंद या कॉलद्वारे अगदी सहजी मिळत असल्याने टेक्नॉलॉजीला मनोमन सलाम ठोकला. सगळ्यांशी बोलता बोलता फोनची बॅटरी आणि दिवस संपलासुद्धा, पण तिकडे लंडनमध्ये अजूनही संध्याकाळच होती की ... आता तिथल्या लोकांशी बोलणं सुरू झालं. इथल्या तुलनेने माझ्या तिथे ओळखी बऱ्याच कमी असल्याने त्यांच्याशी अधिक वेळ मी बोलत होते, तेही फोन चार्जिंगला असताना बोलू नये या नियमाचे उल्लंघन करत. आता तिथलाही दिवस संपला पण आपल्याकडे सकाळ झाली आणि माझी सकाळची गडबडही सुरू झाली. शाळेत पोहोचले तर तिथेही सगळे जण मला भेटायला अगदी आतुरलेलेच होते. एकदम सेलिब्रेटी फिलिंग ... मी अगदी एन्जॉय करत होते. एव्हाना ही बातमी वायरल झाली होती. मराठी भाषा गौरव दिनी एका मराठी मुलीने विश्वविक्रम करत महाराष्ट्राच्याच नव्हे तर समस्त भारतीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला ही आता अनेकांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट होती. मावळचे खासदार मा. आप्पा बारणे यांच्या स्वीय सचिवांनी (बोली भाषेत PA) माझ्या स्टेटसला फोटो बघून खासदारांना ही बातमी कळवली. लगोलग त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलवलं. पुष्पगुच्छ वगैरे देऊन सत्कार केला आणि तिच्याबद्दल एक अभिमानाची, कौतुकाची थाप देणारी बातमी त्यांच्या औपचारिक अकाऊंटवरून सोशल मीडियावर पोस्ट केली. मग तर काय ... आपल्या अनेक नगरसेवकांनी तर तिची दखल घेतलीच परंतु महाराष्ट्रातल्या अनेक आमदारांनी सोशल मीडियावर तिचे कौतुक केले. विविध वृत्तपत्रांमधून ही बातमी झळकली. मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री ऍड. आशिष शेलार यांच्यासह अनेकांनी तिचे सोशल मीडियावर अभिनंदन केले. या सगळ्यात दिवस अक्षरशः वाऱ्याच्या वेगाने पळत होते. तेवढ्यात पटकन दोन दिवसात शेगावला जाऊन महाराजांचे दर्शन, श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करून आलो. वसंतपंचमीच्या दिवशी एका सखीने या ग्रंथाचे अकरा अध्याय वाचले होते या आठवणीने मन भरून आले. 
मी लिहिलेला विश्वविक्रमाची कथा हा ब्लॉग देखील अनेकांनी वाचून त्यावर प्रतिसाद दिले होते. ते सगळं पुन्हा वाचताना खरोखर हे सगळं किती अवघड होतं, कसं साध्य झालं ते देवच जाणे असं मला राहून राहून वाटत होतं. परमेश्वरी कृपा एवढं एकच उत्तर मला या सगळ्यावर मिळत होतं. आता महिला दिन जवळ आला होता. अनेक ठिकाणी सिद्धीच्या वतीने मलाच सत्कारासाठी बोलवले. त्यातल्या काही ठिकाणी मी गेले सुद्धा, पण अनेक ठिकाणी वेळेच्या अभावी नकार कळवावा लागला. माझ्या आईची मैत्रीण उल्का खळदकर (खळदकर काकू) यांनी तर या निमित्ताने आम्हा दोघींवर चक्क एक लेख लिहिला आणि तो खूप प्रमाणात वायरल झाला. महाराष्ट्र शाहीर परिषद आणि संजीवनी महिला शाहिरी पथकाच्या वतीने तुकाराम बीजेच्या दिवशी सिद्धीचा सत्कार (जो तिच्या वतीने मी स्वीकारला) करण्यात आला. माझ्या कितीतरी मैत्रिणींनी यानिमित्ताने छोटेखानी पार्ट्यांचे आयोजन केले आणि त्यात उत्सवमूर्ती मीच कारण ही बया तिकडे दूरदेशी, सायबाच्या आंग्लभूमीत. अर्थात तिथेही तिचे विविध ग्रुप्सबरोबर सेलिब्रेशन चालूच होते. OMPEG अर्थात Overseas Maharashtrian Professionals and Entrepreneurs Group या युनायटेड किंगडम (UK) मधील महाराष्ट्रीयन समुदायात उद्योजकतेची भावना वाढवण्यासाठी स्थापन केलेल्या एक नेटवर्किंग गटाने सुद्धा बोलवून तिचे विशेष कौतुक केले.  लंडन येथील महाराष्ट्र मंडळ हे देशाबाहेर स्थापन झालेले पहिले महाराष्ट्र मंडळ ज्याची वाटचाल लवकरच शंभरीकडे सुरू होईल. तिथे ती सगळ्यांचीच अत्यंत लाडकी असल्याने तिथला सत्कार तर अगदीच कौतुकात पार पडला. याच दरम्यान आपले परराष्ट्रमंत्री डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर यांनी इंग्लंडला भेट दिली असता त्यांच्याकडूनही आशीर्वाद मिळविण्याचा योग आला. त्यांनी तर फारच कौतुक केले. 
इतके सगळेजण कौतुक करत आहेत तर आपण एखादा स्नेहमेळावा आयोजित करायला हवाच असा विचार आमच्या दोघांच्याही मनात येत होता, पण ही पोरगी इथे नसताना आपणच काय सत्कार समारंभ करायचा असंही वाटत होतं. पण परमेश्वरानेच हा पेच सोडवला. कोलकाता येतील ऑटिझम सेंटरचे एक पदाधिकारी तिला एकदा लंडनमध्ये भेटले आणि त्यांनी तिला त्यांच्या सेंटरला भेट देण्यासाठी निमंत्रित केलं. हे तिने मला जेव्हा सांगितलं तेव्हा मी लगेचच नक्की ये आणि त्याला जोडून अजून आठ दिवसाची सुट्टी पण घे म्हणजे आपण तुझा कौतुक समारंभ चिंचवड मध्ये करूया असा आग्रह धरला. विश्वविक्रम झाल्याचं कळल्यानंतर पद्मविभूषण डॉ. एल् सुब्रमण्यम् यांनी सुद्धा तिला त्यांच्या घरी बोलवलं होतंच. 
त्यामुळे बंगलोर, कोलकाता, पुणे  अशा किमान तीन शहरांची भेट निश्चित करत तिने एअर इंडियाची तिकिटं बुक केली. आता माझी धावपळ सुरू ... कार्यक्रम कधी करायचा ? कुठे करायचा ? कसा करायचा ? कुणाला बोलवायचं ? जेवायचा मेन्यू काय ठरवायचा ? ऑर्डर कुणाला  द्यायची ? रिटर्न गिफ्ट काय देऊया ? वगैरे प्रश्नांचा अक्षरशः काहूर आणि हातात वेळ अत्यंत कमी.
कधी करायचा यावर एकमेव उत्तर होतं १९ एप्रिल २०२५ कारण ती अत्यंत कमी दिवसांसाठी येणार होती आणि त्यात हाच एकमेव वीकेंड होता. कुठे करायचा यावर ज्ञानप्रबोधिनी निगडी मधील मनोहर सभागृह हे माझ्या डोक्यात निश्चित होतं. याच रंगमंचावर तिने तिच्या सांगीतिक कारकिर्दीची पहिली सलामी दिली होती त्यामुळे या सभागृहाचं वैशिष्ट्य, पावित्र्य, महत्व माझ्या दृष्टीने खूपच होतं. शाळेत केंद्रप्रमुख मा. देवळेकर सरांना भेटले, त्यांनी आनंदाने होकार तर भरलाच पण वर सांगितलं की कार्यक्रम संपूर्ण शाळेच्या वतीने होईल, तुम्ही घरचे फक्त स्नेहभोजनाची व्यवस्था करा. डोळ्यातल्या पाण्याला कसंबसं थोपवत मी त्यांचे आभार मानले. नंतर बघितलं तर त्या दिवशी तिथे ऑलरेडी एक कार्यक्रम ठरला होता, पण आमच्यासाठी तो नियोजित कार्यक्रम रद्द करण्याची विनंती सभागृह व्यवस्थापनाने त्या संयोजकांना केली आणि तिथेच हा कार्यक्रम करण्यावर शिक्कामोर्तब झालं. कार्यक्रम कसा करायचा यावर शाळेत जोरदार नियोजन सुरू झालं. जेवायला काय असावं हे आम्ही घरात ठरवलं आणि ते जसच्या तसं सद्गुरू केटरर्सचे श्री. विभूते यांनी देण्याचं मान्य केलं. काही पदार्थांची तर आधी मी चव बघून त्यात बदलसुद्धा सुचवले आणि त्यांनी ते आनंदाने केले. इतक्या कमी कालावधीत पटकन माझी ऑर्डर स्वीकारली याबद्दल मी आभार मानायचे तर दूरच पण इतक्या मोठ्या कार्यक्रमाची जबाबदारी त्यांना दिली याबद्दल त्यांनीच माझे आभार मानले. रिटर्न गिफ्टचा विचार करताना सगळ्यांना विश्वविक्रमाची आठवण म्हणून बुकमार्क देऊया हे ठरलं आणि रेनबो प्रिंटर्सला शरण गेले. प्रमोददादाने सुद्धा अगदी आनंदाने आणि मुख्य म्हणजे वेळेत सगळं देण्याचं मान्य केलं. मला रोज नवनवीन काहीतरी सुचत होतं आणि त्यात मदत करणारा मला कोणीतरी भेटतच होता. तिचा लहानपणापासून आत्तापर्यंतचा प्रवास दाखवणारं एखादं छोटंसं फोटोबुक करूया असं मनात यायचा अवकाश की आमच्या घराजवळ राहणारा रोहन लगेचच माझ्या मदतीला आला आणि आम्ही दोघांनी ते पुस्तक तीन तासात बनवून छापायला सुद्धा दिलं. आता नुसतं पुस्तक बनवून माझ्या जीवाला चैन पडेना, एखादा फ्लेक्स बनवावा असं डोक्यात आलं. लगेचच आमचा हरहुन्नरी सागर आठवला आणि त्याला मी मेसेज धाडला. अगदीच खुशीत येऊन त्याने मला फ्लेक्स बनवायला मदत तर केलीच, पण तो बनवता बनवता माझ्या सुपीक डोक्यात जो धनादेश बनवायचा विचार आला त्यालाही या गड्याने मूर्तरूप दिले. फोटोबूथ करूचया हेही मनाने घेतलं आणि त्यासाठी फोटोंची जमवाजमव सुरू झाली. चितळे बंधूंकडे जाऊन पेढ्याची ऑर्डर देऊन आले. घरातल्या सगळ्यांशी सतत चर्चा सुरू होतीच. कार्यक्रमाला कोणाला बोलवायचं हा प्रश्न मात्र मी चुटकीसरशी सोडवला. घरात सगळ्यांना सांगितलं की प्रत्येकाने आपल्याला जी जी नाव सुचतील, ज्यांना ज्यांना बोलवावं असं वाटेल त्यांना सरळ आमंत्रण करावं, मी मेसेज लिखित स्वरूपात देईन तो त्यांना पाठवावा आणि मला फक्त प्रत्येकाकडून किती जण आहेत तो आकडा सांगावा. सगळी बेरीज करून आपण त्या केटररला तो आकडा सांगून टाकू. यावर माझी आई, बहीण, दीर, जाऊ, नवरा, पुतण्या सगळे कामाला लागले. प्रत्येकाला फक्त आपापली यादी करायची होती, त्यामुळे काम बरंच सोपं झालं होतं. सतत काही ना काही आठवत होतं, नवीन काही सुचत होतं आणि माझं काहीतरी आणायच्या निमित्ताने दुचाकी दामटत गावभर भटकणं सुरूच होतं. अगं बये किती दमशील, पोरगी आल्यावर तिचं करायला एनर्जी ठेव अशी आईची प्रेमळ दटावणी सुरू होतीच. हे सगळं दिवसा चालू असायचं आणि रात्री याबद्दलचे अपडेट्स फोनवर पोरीला कळवायचे यात कुठेही खंड पडत नव्हता. अर्थात मी बऱ्याचशा गोष्टी गुपित सुद्धा ठेवल्या होत्या. 
Meanwhile तिने तिचा तेविसावा वाढदिवस अगदी झोकात साजरा केला आणि ती बंगलोरला येणाऱ्या विमानात बसली. सुरक्षा तपासणीतच तिचे हे गिनीज प्रमाणपत्र अडवण्यात आले. पण मुख्य अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासणीनंतर तिला अगदी विमानउड्डाणाच्या गेट जवळ जाऊन सोडले. विमानतळावरच ती सेलिब्रिटी झाली होती. विमानात क्रू मेंबर्सनी तिचे स्वागत केले, ते सर्टिफिकेट सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि तिला एक छोटेसे भेटपत्र सुद्धा दिले, ते देखील जमिनीपासून ३५००० फूट उंचीवर ... 
या सेलिब्रेशनने ती तर अगदीच खुश झाली. पुढे कोलकाताला नियोजित भेट देऊन, तिथलं सेलिब्रेशन एन्जॉय करून ती पुण्याला रात्री जवळपास बाराच्या सुमारास पोहोचली. आम्ही सर्वजण तिच्या स्वागताला गेलो होतो. 
हे सगळं संपायला रात्रीचे तीन वाजले आणि तरीही सकाळी वेळेतच उठून आम्ही दहा वाजता रामकृष्ण मोरे सभागृहात दाखल झालो. तिथेही विविध मान्यवरांच्या भेटी, त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र हातात धरून फोटो वगैरे झाल्यानंतर स्टेजवर मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत तिचं कौतुक/ सत्कार झाला. मावळचे खासदार मा. आप्पा बारणे यांनी तो घडवून आणला. 
हे सगळं उरकून आम्ही आता उद्याची फायनल तयारी करूया म्हणून घरी गेलो.
पण घरी गेल्यावर तयारीपेक्षा गप्पागोष्टीच जास्त चालू होत्या. 
अखेर १९ एप्रिलचा दिवस उजाडला. कौतुक समारंभ ... यश हे अमृत झाले !!! 
शिस्तीत तरीही कौतुकात, वेळेत तरीही अत्यंत उत्साहात, प्रबोधिनी परंपरेला साजेसा आणि सगळ्यांना आवडणारा, कायमस्वरूपी मनात घर करून राहणारा कार्यक्रम व्हायला हवा यासाठी शाळेत सगळेजण झटत होते. तिच्यासाठी भावनांनी ओथंबलेल्या कौतुकपत्राचं लेखन पालक महासंघाच्या माधवीताईंनी केलं आणि आणि प्रत्यक्ष कार्यक्रमात मयुरीताईने अगदी भाव ओतून त्याचं वाचन केलं. सरांनी स्वतः लक्ष घालत तिच्यासाठी सन्मानचिन्ह, आम्हा तिघांना भेटवस्तू काय असावी याबाबत मार्गदर्शन केलं. सूत्रसंचालनाची जबाबदारी पूर्व माध्यमिकच्या स्वातीताईंनी खूप प्रेमाने स्वीकारली आणि त्यासाठी खरोखरच खूप मेहनत घेतली. माझा मुक्तिसोपान संगीत विभाग तर घरचं कार्य असल्यासारखं झटत होता. औपचारिक शिक्षण प्रमुख शिवराज पिंपुडे यांनी प्रास्ताविक करण्याची तर केंद्र व्यवस्थापक आदित्य शिंदे यांनी कौतुकपर मनोगत व्यक्त करण्याची जबाबदारी आनंदाने स्वीकारली. पुणे प्रबोधिनीतून संगीततज्ज्ञ श्री. मिलिंद संत यांनीसुद्धा कार्यक्रमात खूप छान मार्गदर्शन केले. स्नेहलताई - स्वरेशाताई यांनी गायलेल्या उतरले आकाशपक्षी या गीताने तर कार्यक्रमाला अगदी सोनेरी झळाळी दिली. कोमलच्या संवादिनी आणि मिलिंददादांच्या तबला साथीने या गीतात रंग भरले. विद्याताई जोशी यांनी बनवलेले साखरेचे औक्षणाचे ताट तर अगदी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. Rainbow printers च्या प्रमोददादाने तर तिचा कर्तृत्वआलेख दाखवणारा फ्लेक्स, तिच्यासाठी मी बनवलेला विशेष धनादेश, सगळ्यांना देण्यासाठीचे बुकमार्क्स हे सगळं अक्षरशः रात्रीचा दिवस करून छापून दिलं होतं. हे सगळं एका टेबलवर सजवून ठेवलं होतं. मनूची मंजूकाकू आणि स्वप्नामावशी या दोघींनी तिच्याबद्दल बोललेले कौतुकाचे शब्द तर सगळ्यांना खूपच आवडले. प्राधिकरण व चिंचवड येथील अनेक नगरसेवक, आमदार मा. उमाताई खापरे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे पिंपरी चिंचवडचे आयुक्त मा. शेखर सिंह यांची कार्यक्रमातील संपूर्ण वेळ उपस्थिती. 
तब्बल दोन तास चाललेला हा कार्यक्रम त्यांनी अटेंड तर केलाच पण अत्यंत प्रभावी असे मार्गदर्शन देखील केले. इतकी मोठी व्यक्ती आपल्या कार्यक्रमाला आली याबद्दल मला खूप कृतकृत्य वाटत होतं. सिद्धीने १० मिनिटे संवादिनी वादन करत कौशल्य प्रदर्शन केले आणि आपला राष्ट्रीय राग ... देश राग वाजवून सगळ्यांची मनं जिंकली. ती खरं म्हणजे स्टेजवर पहिल्यांदाच भाषण करण्यासाठी उभी राहिली पण काहीही ठरवलेलं नसताना अगदी उत्स्फूर्तपणे उत्तम बोलली. मला मात्र हा कार्यक्रम बघताना सतत अगदी भरून येत होतं, त्यामुळे स्टेजवर इतकं बोलायची सवय असताना देखील काय बोलू हा संभ्रम पडला. त्यावेळी जे सुचेल ते बोलले खरं, पण मला सर्वांचे फक्त आभार मानायचे होते एवढी एकच भावना माझ्या मनात पक्की होती. मा. देवळेकर सरांनी कार्यक्रमाचा समारोप केला आणि मग नंतर आमची सगळ्यांशी गाठभेट सुरू झाली. कार्यक्रमाला जवळपास ६०० लोकांची उपस्थिती होती (तरीही अनेकांना बोलवायचं राहून गेलं ही खंत आहेच) त्यामुळे प्रत्येकाशी जसं जमेल तसं दोन शब्द आम्ही बोलत होतो. खाली जेवणं सुरू होती आणि भोजनाचा स्वाद अप्रतिम आहे अशी पावती प्रत्येक जण देत होते. 
मी अगदी भरून पावले. दुपारी साडेतीनच्या आसपास सगळा कार्यक्रम संपला आणि आम्ही घरी गेलो. खरं म्हणजे खूप दमलो होतो, पण दोनच दिवसांनी ही पोरगी परत जाणार त्यामुळे सगळेजण तिच्याशी अखंड गप्पा मारत होते. एकंदरीत हा कार्यक्रम अगदीच अविस्मरणीय झाला असं म्हणायला हरकत नाही.
पुढे गणेशोत्सवा दरम्यान महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री ऍड. आशिष शेलार यांनी देखील त्यांच्या इंग्लंड भेटीतील एका कार्यक्रमात सत्कार केला. सप्टेंबर महिन्यात तिचे नाव Guinness Book of World Records मध्ये आल्याची औपचारिक बातमी आली आणि आता ती खऱ्या अर्थाने जगप्रसिद्ध झाली. इतके दिवस तिचे नाव फक्त गिनीजच्या साइटवर होते पण आता ते पुस्तकात आल्याने तिचा आनंद गगनात मावेना. तिने ताबडतोब स्वतःचे नाव मुखपृष्ठावर आणि केलेला विक्रम मलपृष्ठावर असेल असे पुस्तक कस्टमाईज करून घेतले. 
सप्टेंबर महिन्यात विकसित भारत रन ह्या लंडनमधील इव्हेंटसाठी आपली ही हौशी बया गेली होती आणि तिथे उच्चायुक्त श्री. विक्रम दोरायस्वामी यांना भेटली. गिनीज विश्वविक्रमाबद्दल त्यांच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या. पुढे ७ नोव्हेंबरला बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (चॅटर्जी) लिखित आपले राष्ट्रीय गीत वंदे मातरम् ला १५० वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने भारतीय उच्च आयोगाकडून इंडिया हाऊस, लंडन या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तिथे हिला संपूर्ण वंदे मातरम गाण्यासाठी निमंत्रित केले होते. मीही तिच्याबरोबर तिथे गेले होते. तिच्या देश रागातील वंदे मातरम् सादरीकरणाने तिथले वातावरण एकदम भरून आणि भारून गेले . स्वतः विक्रम सरांनी तिच्या गायनाचे आणि तिच्या भारतीय संस्कारांचे खूप कौतुक केले. मला अगदी धन्य धन्य वाटलं.  याचसाठी केला होता अट्टाहास हीच भावना मनात होती.
२२ जानेवारीला श्रीराम मंदिर - अयोध्या वर्धापन दिन, माघी गणेश जयंती आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नेहरू सेंटर, लंडन या ठिकाणी तिने तिच्या Sirtth Musicals च्या विद्यार्थ्यांना घेऊन अप्रतिम सादरीकरण केले आणि पुन्हा एकदा कौतुकाची मानकरी ठरली. या ना अशा कितीतरी घटना आज माझ्या डोळ्यासमोर अगदी चित्रपटासारख्या स्पष्ट दिसत आहेत.  
आज तिच्या गिनीज विश्वविक्रमाच्या नोंदीला एक वर्ष पूर्ण होतंय. वर्षभर खूप काही घडलंय. मी विचार करतीये कुठला बरं दिवस सोनियाचा ? विश्वविक्रम घडला तो वसंत पंचमीचा की विश्वविक्रम नोंदवला गेला तो मराठी भाषा गौरव दिनाचा ? OMPEG या उद्योजकांच्या टीमने केलेलं सेलिब्रेशन की महाराष्ट्र मंडळ लंडन इथलं मराठमोळं कौतुक ? ३५००० फूट उंचीवर एअर इंडियाने दिलेली सलामी की यश हे अमृत झाले या कार्यक्रमात घरच्यांनी दिलेली कौतुकाची थाप ? भारतीय उच्च आयोग आयोजित कार्यक्रमात स्वतः केलेले वंदे मातरम् सादरीकरण जास्त भारी की स्वतःच्या विद्यार्थ्यांना नेहरू सेंटर लंडन या ठिकाणी दिलेली संधी जास्त मोठी ?
मनाने कौल दिला ... सगळेच दिवस सोनियाचे, कौतुकाचे, अमृताचे, अभिमानाचे,आनंदाचे, पराक्रमाचे, वैभवाचे ... प्रत्येक दिवसाची पद्धत वेगळी पण भावना/ अनुभूती मात्र अगदी तीच ... संगीताची जादू, देशकार्यात नोंदवलेला अल्पसा सहभाग, त्यामुळे वाटणारं धन्यपण ... हे सगळं अगदी अनविसरणेबल आहे. परमेश्वरी कृपा, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद, हितचिंतकांच्या शुभेच्छा या सगळ्याला जर मेहनतीची, जिद्दीची, कष्टाची जोड दिली तर काहीही अशक्य नोहे हे मात्र आम्ही यातून नक्की शिकलोय ... आत्ताशी एका स्वप्नपूर्तीची वर्षपूर्ती झालीये ... ही तर फक्त सुरुवात आहे, अजून खूप काही करायचंय .... Sky is the beginning ... पराक्रमाला माथ्यावरचे अथांग नभ अपुरे ... ही सगळी स्फूर्ती देणाऱ्या अखिल विश्वाचे मनःपूर्वक आभार .... धन्यवाद 🙏

शीतल कापशीकर
२७ फेब्रुवारी २०२६

Comments

  1. सुरेल आणि अभिमानास्पद अशा वर्षपूर्तीच्या खूप खूप शुभेच्छा.अशी बातमी आणि गोड आठवण जी कितीही वेळा ऐकली, पाहिली तरी प्रत्येकवेळी अभिमान अधिकच वाढतो आणि त्यानंतर सिद्धीची परप्रांतातील कारकिर्दीची मातृभाषेला पुढे नेत चाललेली घोडदौड पाहून आपण महाराष्ट्रीय असल्याचा हेवा वाटतो...👏🏻👏🏻💐💐❤️🥰

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Walkathon : एक आनंदानुभूती

गूंजे बनकर देस राग 🇮🇳

सेवा परमो धर्म: ।