लंडनचा नाताळ
झिलमिल सितारों का आंगन होगा
रिमझिम बरसता सावन होगा
ऐसा सुंदर सपना अपना जीवन होगा
या वाक्यांची प्रचिती मी संपूर्ण डिसेंबर महिन्यात अनुभवली. नाताळनिमित्त संपूर्ण महिनाभर लखलखणारे लंडन शहर, वेळी अवेळी कधीही येणार पाऊस आणि हा संपूर्ण महिना इथेच तळ ठोकून असणारी मी ... पण खरंच लंडनचा नाताळ एक अनुभूतीच आहे. अगदी लहानपणीच पुलंनी आमच्या डोक्यात लंडनचा नाताळ हे दोन शब्द अक्षरशः कोरले आणि ते कधी बकेट लिस्ट मध्ये गेले ते कळलंच नाही. लंडनचा नाताळ अनुभवायचं हे स्वप्न २०२५ मध्ये पूर्ण झालं. डिसेंबर महिना उजाडताच लंडन शहर जणू एखाद्या परीकथेतून बाहेर आल्यासारखं दिसू लागतं. थंडीची झुळूक, रस्त्यांवर पसरलेले सोनेरी दिवे, दुकानांच्या सजवलेल्या काचा, ख्रिसमस थीममध्ये आणि सर्वत्र ऐकू येणारी Christmas carols ... यामुळे लंडनचा नाताळ एक वेगळाच अनुभव देतो. डिसेंबरची थंडी अंगावर शहारा आणते आणि त्याचवेळी लंडन शहर अगदी अलगद हसते. संध्याकाळी आकाशात लवकर पसरलेला अंधार रस्त्यांवरच्या झगमगत्या दिव्यांनी पराभूत होतो. जणू काही लंडन स्वतःला आणि आपल्याला सांगत असते ... थंडी असो वा अंधार, आनंद थांबत नाही. लंडनमध्ये नाताळ येतो तोच मुळी पावलांचा आवाज न करता, पण मनावर ठसा उमटवून. चर्चमधून झरणारे कॅरोल्सचे स्वर, दुकानांच्या काचांमधून डोकावणारी स्वप्नं, आणि रस्त्यावरून दरवळणारा गरम मसाल्याचा सुगंध हे सगळं या शहराला एका जिवंत कवितेत बदलून टाकतं... मी या डिसेंबरात चक्क एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर चक्क तीनदा हा सगळा माहोल अनुभवला आणि एकदा पावसामुळे आमच्या सगळ्या बेतावर शब्दशः पाणी पडलं.
सेंट्रल लंडन मधल्या रस्त्यांवरून चालताना कमाल भारी वाटत होतं. सगळीकडे दिसणारा झगमगाट, ओसंडून वाहणारं मार्केट, आपापल्या आईबापाकडे खरेदीचा हट्ट करणारी गोरीगोमटी बालकं, कधी त्यांचा हट्ट पुरवत, तर कधी शिताफीने टाळत तिथून फिरणारे त्यांचे मायबाप, सतत सेल्फीच्या मागे असणारी तरुणाई, खास लंडनचा नाताळ बघायला आलेले पर्यटक, सांताच्या गणवेशात फिरणारी हौशी मंडळी आणि हे सगळं बघणारी मी सतत गुणगुणत होते ...
रंग चमकीले सारे लगते है
राह मे बिखरे तारे लगते है
फूल अब ज़्यादा प्यारे लगते है
महकी हुईसी जैसी हवा है
कुछ तो हुआ है कुछ हो गया है
आम्हीही दे धो फोटो काढलेत हे तुम्ही ओळखलं असेलच.
लंडनमध्ये पिढ्यानुपिढ्या राहणाऱ्या अनेक जणांशी या निमित्ताने बोलण्याचा योग आला, त्यामुळे त्यांनी या सणाबद्दल खूप छान माहिती दिली. लंडनमध्ये नाताळ साजरा होतो तो केवळ कॅलेंडरवरचा सण म्हणून नाही, तर तो एक भावना बनून येतो. हा केवळ धार्मिक सण नाही, तर तो सांस्कृतिक उत्सव आहे. लंडनमध्ये नाताळ साजरा करण्याची परंपरा अनेक शतकांपूर्वीची आहे. Victorian era म्हणजेच व्हिक्टोरिया राणीच्या काळात नाताळ सणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच काळात घर सजवणे, भेटवस्तू देणे, कॅरोल्स गाणे आणि क्रिसमस ट्री उभारणे या परंपरा अधिक लोकप्रिय झाल्या. प्रसिद्ध लेखक चार्ल्स डिकन्स यांच्या A Christmas Carol या कथेने नाताळाला माणुसकी, करुणा आणि प्रेमाचा सण म्हणून ओळख मिळवून दिली.
क्रिसमस ट्री हा लंडनच्या नाताळाचा जणू आत्माच... शहरातील चौक, राजवाडे, बाजारपेठा आणि घरोघरी सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारचे क्रिसमस ट्री पाहायला मिळतात. Trafalgar Square येथील क्रिसमस ट्री हा लंडनमधील सर्वात मानाचा आणि ऐतिहासिक वृक्ष आहे. हा वृक्ष दरवर्षी नॉर्वेमधून खास पाठवला जातो. १९४७ साली, दुसऱ्या महायुद्धानंतर, ब्रिटनने नॉर्वेला केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नॉर्वे सरकारने लंडनला पहिला क्रिसमस ट्री भेट दिला. तेव्हापासून आजतागायत ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. हा वृक्ष साधारणतः ५०/६० वर्षांचा Norwegian spruce असतो. त्याची सजावट अतिशय साधी, उभी पांढऱ्या दिव्यांची माळ लावून केली जाते, जी नॉर्वेजियन परंपरेचे प्रतीक आहे. हा वृक्ष केवळ नाताळ साजरा करत नाही, तर दोन राष्ट्रांमधील मैत्री, शांतता आणि कृतज्ञतेची आठवण करून देतो.
या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी आम्ही बॉण्ड स्ट्रीट, ऑक्सफर्ड स्ट्रीट आणि रीजंट स्ट्रीटवरील रोषणाई बघितली. ही रोषणाई उगाचच डोळ्यांना त्रास देणारी नव्हती, तर मन अधिक प्रसन्न करणारी होती.
मनसोक्त विंडो शॉपिंग करताना अगदी धमाल आली. आधुनिक डिझाइन, बदलत्या थीम्स आणि मोठ्या ब्रँड्सच्या सजावटीमुळे लंडनची आधुनिक ओळख ठायीठायी दिसत होती.
Leicester square चे क्रिसमस मार्केट तर केवळ लाजवाब ... आणि तिथे नुकताच उभारला गेलेला DDLJ फेम शाहरुख खान काजोलचा पुतळा ...
लंडनमधल्या इतक्या मुख्य ठिकाणी आपल्या बॉलीवूडने नाव कोरणे ही खरोखरच मोठी गोष्ट आहे. शाहरुख खान बरोबर फोटो काढायचं शास्त्र देखील उरकलं आणि आम्ही Piccadilly सर्कसकडे मार्गस्थ झालो. अफाट गर्दीचा हा चौक उत्साहाने अगदी ओसंडून वाहत होता. अनेक क्रिसमस ट्री बघितले पण मनात कोरलं ते मात्र Trafalgar Square चं क्रिसमस ट्री .. दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी एक मोठा समारंभ केला जातो आणि त्या समारंभात हे झाड उजळते. Westminster चे विद्यार्थी दरवर्षी नवनवीन कविता सादर करतात. फार मोठी परंपरा लाभलेले हे झाड बघून अक्षरशः मन भारावून गेले. बाकीचं सगळं पुन्हा कधीतरी बघू, आज ही सजावट डोळ्यात साठवून घरी जाऊ असा विचार करून तिथे कितीतरी वेळ आम्ही नि:शब्द बसून होतो. अखेर थंडीचा कडाका खूपच जाणवायला लागल्याने charing cross या स्टेशनवरून घरी जायला निघालो.
पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा आम्ही हे सगळं बघायला बाहेर पडलो आणि यावेळी गेलो इन्स्टाग्रामवर लंडनमधला जो नाताळ अतिशय प्रसिद्ध आहे त्या कॉव्हेंट गार्डनला. हा भाग लंडनमधील सांस्कृतिक केंद्र मानला जातो. येथे उभारला जाणारा क्रिसमस ट्री अत्यंत भव्य आणि कलात्मक असतो. हजारो झगमगते दिवे, रंगीबेरंगी सजावट आणि आजूबाजूला होणारे लाईव्ह संगीत कार्यक्रम यामुळे हा परिसर नाताळात विशेष आकर्षक दिसतो.
इथे केवळ वृक्षच नाही, तर संपूर्ण परिसरच नाताळाच्या आनंदाने भरलेला असतो. कलाकारांचे सादरीकरण, रस्त्यावरची गाणी आणि हसतमुख लोक वातावरण अधिकच जिवंत करतात. संध्याकाळी सहा वाजता तिथे कृत्रिम स्नो फॉल असतो हे ऐकल्यामुळे आम्ही अगदी पावणेसहालाच तिथे जाऊन पोहोचलो आणि तब्बल ३० सेकंद अत्यंत हलक्या स्वरूपात जी कृत्रिम बर्फवृष्टी झाली त्याने पोटभर हसलो. विनोदाचा भाग जाऊ दे, पण खरोखरच एक वेगळीच दुनिया अनुभवली आम्ही तिथे. पुढे वेगवेगळ्या रस्त्यांनी चालत जाताना आनंदाची अनुभूती घेतली आणि पोहोचलो टॉवर ब्रिजपाशी. असंही हे माझं लंडनमधील अत्यंत लाडकं ठिकाण. माझ्या प्रत्येक लंडनवारीत मी या ठिकाणी भेट देतेच. टॉवर ब्रिज नही देखा तो आप लंडन मे आयेही क्यू ?? असं माझं मत आहे. इथली गर्दी, ख्रिसमस मार्केट, खाऊगल्ली केवळ लाजवाब ...
हा जागतिक पर्यटन स्पॉट असल्याने देशोदेशीच्या खाद्यपदार्थांचा अगदी मेळाच इथे भरला होता. सगळ्याच खाद्यपदार्थांनी जणू आसमंत गंधाळला होता, खरेदी विक्रीला ऊत आला होता, प्रकाशाने टॉवर ब्रिज उजळला होता आणि हे सगळं बघण्यात मी अगदी हरवून गेले होते. शांत वाहणारी थेम्स नदी, गर्दीने फुलून गेलेला परिसर, कितीतरी भाषा एकत्र येऊन तयार होणारा गोंगाट आणि त्यातच सूर मिसळणारं मंद संगीत ... दिल खुश होगया असं म्हणत त्याही दिवशी तृप्त डोळ्यांनी घरी परतलो.
आणि पुढच्या वेळी पोहोचलो हाईड पार्कला ... इथला क्रिसमस ट्री म्हणजे स्वप्नांचा राजा... आजूबाजूला फिरती खेळणी, गरम चॉकलेटचे कप, आणि हसणाऱ्या मुलांचा गोंगाट ... या सगळ्याच्या मध्यभागी तो उभा असतो, स्वप्नं सांभाळत. हा वृक्ष आठवण करून देतो की, नाताळ म्हणजे लहानपणाला पुन्हा भेट देणं, पुन्हा एकदा आपल्यातलं लहानपण जपणं. Hyde Park Winter Wonderland हे लंडनमधील नाताळाचे सर्वात मोठे आकर्षण आहे.
इथले पर्यावरणपूरक दिवे, वेगवेगळ्या थीम्स आणि मोठ्या प्रमाणावर होणारे कार्यक्रम हे याचे वैशिष्ट्य म्हणता येईल. हा भाग कुटुंबांसाठी, मुलांसाठी आणि पर्यटकांसाठी खास आनंददायी असतो. हे विंटर वंडरलॅण्ड म्हणजे तर लंडनची जत्राच जणू ... आपल्याकडे कुठल्याही उत्सवात जत्रा किंवा उरूस असतो ना तसंच इथल्या नाताळ सणाचा विंटर वंडरलॅण्डचा हा उरूस असं तुम्ही म्हणू शकता. तसं बघायला गेलं तर इंग्लंडच्या विविध भागात विंटर वंडरलॅण्ड असतं, पण लंडनकी बात ही कुछ और है । तीही मज्जा मनसोक्त अनुभवली आणि मी वाट बघू लागले प्रत्यक्ष नाताळाच्या दिवसाची...
मी कल्पनाही केली नव्हती असा होता तो दिवस... मी विचार करत होते... संपूर्ण डिसेंबर महिना लंडन धावत राहतं. दिवे अधिक तेजस्वी होतात, गाणी अधिक मोठ्याने वाजतात, आणि आनंद जणू रस्त्यांवर सांडतो. हा नाताळ बाहेरचा असतो ... दिसणारा, ऐकू येणारा, फोटोमध्ये पकडता येणारा.
पण … पण २५ डिसेंबरची सकाळ उजाडते आणि शहर थांबतं. कालपर्यंत गजबजलेलं लंडन आज शांत असतं. दुकानं बंद, रस्ते मोकळे, आणि हवेत एक गूढ निवांतपणा. अगदी पब्लिक ट्रान्सपोर्ट सुद्धा बंद बरं का !!!
दिवे अजूनही असतात, पण ते आता चमकत नाहीत, ते फक्त उजळत राहतात. आज आनंद साजरा केला जात नाही, तर तो अनुभवला जातो.
ऑक्सफर्ड स्ट्रीट, बॉण्ड स्ट्रीट स्वतःशीच बोलत असतात. ट्रॅफल्गर स्क्वेअरमधला क्रिसमस ट्री शांत उभा असतो. जणू तोही म्हणतो, आज काही सिद्ध करायचं नाही. चर्चमधून घंटानाद होतो आणि मनाला थांबायला शिकवतो.
मेणबत्त्यांचा मंद प्रकाश, कॅरोल्सची संथ लय आणि डोळे मिटून बसलेली माणसं. कुणी आनंदी, कुणी थकलेलं, कुणी आठवणीत हरवलेलं .. पण त्या क्षणी सगळे समान. नाताळ त्या दिवशी आनंदाची सक्ती करत नाही, तो माणसाला माणूस म्हणून राहू देतो. बाहेरचा नाताळ दिव्यांचा, आतला नाताळ नात्यांचा.
दुपारी रस्ते अजूनही शांतच असतात. घराघरांत कुटुंबं एकत्र येतात. खिडक्यांतून दिसणारा उबदार प्रकाश सांगतो ... खरा उत्सव इथे आहे. छोट्या क्रिसमस ट्रीभोवती बसलेली माणसं, हळू बोलणं, हसणं, आठवणी सांगणं... महिनाभर धावलेलं लंडन आज स्वतःला विसावतं. संपूर्ण डिसेंबर शिकवतो साजरं करायला तर नाताळचा दिवस शिकवतो सावरायला. लंडनचा नाताळ हा एक दिवस नाही ... तो धावणं आणि थांबणं यामधला एक सुंदर क्षण आहे. स्वतःला स्वतःशी भेटण्याची एक सुंदर अनुभूती आहे.
लहानपणापासूनच लंडनचा नाताळ बघायची तीव्र इच्छा असलेली मी खरोखरच तृप्त झाले होते. तसं बघायला गेलं तर हल्ली भारतात सुद्धा फारच मोठ्या प्रमाणावर नाताळ साजरा होतो हे सोशल मीडियावर सगळ्यांनी बघितलं असेलच. पण मला तरी तिथे जाणवला तो केवळ झगमगाट, गोंगाट आणि एक प्रकारची कृत्रिमता... पण लंडनमध्ये जाणवला तो एक संस्कृतीचा अविष्कार. अशा रम्य आठवणी मनात घेऊन रात्री लंडन झोपी जातं आणि दुसऱ्या दिवशी खरेदीसाठी म्हणून उठतं ... Yesssss ... बॉक्सिंग डे ... पूर्वी श्रीमंत लोक आपल्या नोकरांना, कामगारांना किंवा गरिबांना भेटवस्तू/देणग्या बॉक्समध्ये देत असत, त्यावरूनच Boxing Day हे नाव पडले. हल्ली या निमित्ताने सर्व मोठ्या दुकानात खूप मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट्स लागलेले असतात, त्यामुळे जोरदार खरेदी होते. अनेक लोक या दिवशी दानधर्म सुद्धा करतात. या दिवशी फुटबॉलचे सामने रंगतात, कौटुंबिक संमेलनांना ऊत येतो. सर्वजण सरत्या वर्षाला निरोप देण्याची आणि नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू करतात.
त्यामुळेच लंडनमध्ये नाताळ हा केवळ धार्मिक सण नाही, तर तो आहे एक सांस्कृतिक उत्सव ... प्रत्येकासाठी संपूर्ण वर्षभर लागणारी ऊर्जा मिळवून देणारं एक चार्जिंग स्टेशन ...
शीतल कापशीकर (लंडन)
५ जानेवारी २०२६
रात्रौ १०.३० GMT
आजच सकाळी तुमचा हा लेख वाचला, अप्रतिम लेखन,अगदी आमचीच लंडन ख्रिसमस ट्रिप झाल्याचा feel आला.
ReplyDeleteतुमचा शब्दसंग्रह, मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि ओघवती भाषा सगळं प्रभावी आहे...अजून लिहत रहा.👏🏻👏🏻👌🏻👌🏻👍🏻
आम्हाला वाचण्याचा योग आला ही आमच्यासाठी एक पर्वणीच.❤️🥰
मी स्वान्त सुखाय लिहिते हे जरी खरं असलं, तरीही असा प्रतिसाद मिळाला की लेखनाचा उत्साह अजूनच वाढतो.
Deleteमनःपूर्वक धन्यवाद 🙏