SLO की कमाल
SLO की कमाल
काय आहे हा प्रकार ? सांगते, सांगते ... संपूर्ण ब्लॉग वाचल्यावर तुम्हाला लगेचच कळेल. त्याचं झालं असं ...
बस चुकली ... आता काय करायचं ? थोडं लवकर निघायला हवं होतं मी ... का ऐकते मी कोणाचं ? स्वतःचं एकदा ठरल्यावर तसं करायचं होतं ना मी ... विचारचक्र अगदी जोरजोरात फिरत होतं. काही प्रश्न आणि काही विधानं मी स्वतःच्या मनाशीच करत होते. Finchley Road वरचा तो बस स्टॉप माझ्याकडे तोंड वेंगाडत बघतोय असं वाटलं मला. आता सगळं हे लेकीला सांगणं भाग आहे असं डोक्यात असतानाच फोन वाजला. अपेक्षाप्रमाणे आमच्या बयेचाच होता. तुझी बस चुकली आहे, मी ट्रॅक करत होते. असा राग आला ना या इंटरनेटचा ... काही म्हणता काही गुप्त ठेवता येत नाही ... हम्मम ... एवढंच उच्चारून मी म्हणाले की मी काढते दुसरं तिकीट, तू तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर. जवळच्या O2 शॉपिंग सेंटर मध्ये शिरले आणि आता इथे बसून तिकिटाचं बघूया असा विचार केला ... खरं म्हणजे last minute. com हा माझा पिंड नाहीये, पण आता काय आलिया भोगासी ... आज सकाळीच (माझ्या स्वप्नात बरं का ...) भविष्य वाचलं होतं की दैव १००% तुमच्या बाजूने असेल. आणि ते भविष्य खरं सुद्धा झालं. मला चक्क इतक्या आयत्या वेळी लगेचच दोन तासानंतर तिथूनच सुटणाऱ्या बसचं तिकीट मिळालं. आणि चक्क काहीही न करता/ मन मानेल तसे घालवण्यासारखे दोन तास सुद्धा अचानक पदरात पडले. मी अगदी निवांत बसून राहिले.
उद्या भाचीच्या मुलाचं बारसं असल्याने आजच मी तिच्याकडे नॉटिंगगमला जायला निघाले होते. लेक बिझी असल्याने एकला चालो रे हा एपिसोड सुरू होता. दोन दिवसांपूर्वीच येण्या जाण्याचं रिझर्वेशन झालं असल्याने तशी काळजी खरं म्हणजे नव्हतीच. फक्त घरातून सव्वा अकराला निघण्याऐवजी अंमळ वीस मिनिटे उशिरा निघाले इतकीच काय ती चूक ... पण तीच भोवली ना मंडळी ... स्टेशन पर्यंत जायला जी कॅब केली त्या सदृहस्थाला अचानकच यायला उशीर झाला, Metline severe delay पण नेमका आजच व्हायचा होता, पूर्णपणे कॅबने बस स्टॉप वर पोहोचू शकेल अशी वेळेची श्रीमंती त्या क्षणी माझ्याकडे नव्हती. तरीही मजल दरमजल करत सव्वा बाराला बस स्टॉप वर पोहोचले आणि माझ्यासमोरूनच जाणाऱ्या माझ्या बसचं ओझरतं दर्शन घेतलं. ही नक्की माझीच बस आहे असं माझं मन सांगत होतं, तरीही खात्री करून घेण्यासाठी तिथे उभ्या असलेल्या एका मुलाला ही बस कोणती होती ते विचारलं. त्याला काहीही सांगता आलं नाही. मी इंटरनेटवर हे सगळं तपासतीये, एवढ्यात आमच्या पोरीने फोन करून माझी बस चुकली आहे याची ग्वाही दिली.
पण पण पण ... नशीब तुमच्या बरोबर असलं की कोणीही तुमचं काहीही वाकडं करू शकत नाही हा अनुभव आज मला आला. बस चुकल्याने मिळालेला मिळेल मी चक्क एन्जॉय करत होते.
आज मी मस्तपैकी पावभाजी केली होती. तो फोटो स्टेटसला टाकत असतानाच तिथे एक ग्रुप आला आणि त्यांनी आम्हा सगळ्यांना तिथून उठायची विनंती केली. मी उठून समोरच जाऊन बसले आणि आता हा चमू काय करतोय ते बघायचं ठरवलं. त्यांनी पटापट खुर्च्यांची रचना त्यांना हवी तशी लावली. आणि अचानक असंख्य वाद्यं बाहेर आली. Oho !!! मला मोठी लॉटरीच लागली होती. तिथे आता एक सुंदर ऑर्केस्ट्रा सुरू होणार होता आणि त्याचीच लगबग चालू होती हे माझ्या क्षणार्धात लक्षात आलं. त्यातल्या काही जणांना त्यांची वाद्य बाहेर काढून त्या वाद्यांच्या bags बाहेर व्यवस्थित रचून ठेवायला मी थोडी मदत केली हे बघून त्यांनाही खूप छान वाटलं... अनेक वर्षं या प्रोफेशन मध्ये काढली असल्याने सेट लावायला कोणी मदत केली तर अगदी देव भेटल्याचा भास होतो हे मला स्वानुभवाने माहित आहे.
सगळी तयारी झाल्यावर त्यांच्या conductor ने सुरू करायची आज्ञा दिली आणि सुरेल संगीत सगळ्यांच्या कानावर पडलं. सगळेजण त्यांच्या संगीतात अगदी हरवून गेले. SLO ... अर्थात सोशल लंडन ऑर्केस्ट्रा. हा लंडनमधील एक हौशी ऑर्केस्ट्रा आहे जो ग्रेड ७+ च्या वादकांना (musicians) एकत्र आणतो. यात संवादात्मक (interactive) परफॉर्मन्सवर भर दिला जातो, जेणेकरून शास्त्रीय संगीत सर्वांसाठी खुले आणि आनंददायक ठरेल. हे सर्व लोक दर दोन आठवड्यांनी सराव करतात. इथे सर्व वादकांना संधी आहे, अनुभव महत्त्वाचा नाही. फक्त किमान Grade ७+ संगीत येणे आवश्यक आहे. त्यांच्या कॉन्सर्ट्स (performances) सर्वांसाठी खुल्या आणि विनामूल्य असतात. अर्थात आपण स्वेच्छेने तिथे ठेवलेल्या डब्यात देणगीमूल्य देऊ शकतो, पण ते स्वतः मागत नाहीत. पारंपारिक कॉन्सर्ट्सपेक्षा हे shows वेगळे असतात, यात प्रेक्षकांनाही सामील करून घेतले जाते. संगीताच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणणे हा मुख्य उद्देश आहे. ज्यांना संगीताची आवड आहे आणि ग्रेड ७+ पातळीचे वादन करता येते, ज्यांना लंडनमध्ये संगीताच्या माध्यमातून नवीन मित्र बनवायचे आहेत किंवा ज्यांना शास्त्रीय संगीताचा आनंद घ्यायचा आहे, पण औपचारिक वातावरणाची भीती वाटते अशा सगळ्यांसाठी हा ऑर्केस्ट्रा म्हणजे तर अगदी पर्वणीच म्हणता येईल. त्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये अनेक जाता येता हा ऑर्केस्ट्रा बघायला आवर्जून थांबत होते, टाळ्या वाजवत होते, सर्व वादकांना प्रोत्साहन देत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ... अगदी खुल्या दिलानं त्या डब्यात पैसे (इथल्या भाषेत पाऊंड) टाकत होते. मी ही अर्धा तास अगदी मनसोक्तपणे त्या ऑर्केस्ट्राचा आनंद घेतला आणि तेवढ्यात मी ज्या नवीन तिकीट काढलंय त्या बसची वेळसुद्धा जवळ आली... मलाही खरं म्हणजे देणगी मूल्य द्यायचं होतं, पण माझ्याकडे रोख स्वरूपात इथली करन्सी बिलकुल नव्हती आणि QR कोड देखील मी स्कॅन करू शकत नव्हते. मी काहीही देऊ शकत नाही परंतु तुमचं खूप खूप कौतुक असं मी त्यांच्यातल्या एका मुलीला म्हणाले आणि माझ्या बस स्टॉप कडे निघाले ...
खरंच... संगीत कला हे अभिव्यक्तीचे मोठे माध्यम आहे. कितीतरी भावना या माध्यमातून व्यक्त करता येतात. आता हेच बघा ना भारत आणि इंग्लड ... दोन्ही संस्कृतीत किती फरक आहे पण या संगीताच्या माध्यमातून अगदी ओळखीचा वाटला मला हा चमू ... उगीचच कुठलीही फॉर्मॅलिटी पाळायचं ओझं न बाळगता अगदी दिल से दिल तक पोहोचल्या भावना. आपण सप्तक मानतो तर हे लोक Octave ... पण त्याने असा काय फरक पडतो ? कानाला ऐकू येणारे सूर तर मनाला मोहिनी घालतातच ना ? थेट आपल्या हृदयापर्यंत जाऊन मन प्रसन्न करतातच ना ? संगीत हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही, तर तो आपल्या आनंदाचा ठेवा आहे. आयुष्यात आनंद असेल तर अजून काय हवं ? आजकाल संगीतोपचार (Music Therapy) तर अगदी प्रचलितच आहे की.... आज तिथे येणारे कितीतरी जण कितीतरी वेगळे मूड, वेगळे टेन्शन घेऊन आले असतील पण हे संगीत ऐकल्यावर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता हे मात्र नक्की.... सा रे ग म प ध नि ... हे सात वर इतकी जादू करू शकतात ? होय ... नक्की करू शकतात. आज अचानकच माझ्या आयुष्यात जे अडीच तास आले, ते या स्वरांनी अगदी सोनेरी करून टाकले. मला तर खरं म्हणजे ती बस चुकल्याचा आनंदच झाला... हो नाहीतर मला हा अपार आनंद कसा मिळाला असता ?
संगीत हे आपलं सांस्कृतिक वैभव आहे, माझ्या लेकीने या संगीतातच गिनीज विश्वविक्रम केला आहे, आपल्या संगीताचा प्रसार आणि प्रचार ती करतीये, तिच्या या संगीताने अनेकांच्या आयुष्यात ती आनंद पसरवतीये या आनंदी भावनेनेच मी माझ्या बस मध्ये चढले आणि हे सर्व लिहायला घेतलं ....
शीतल कापशीकर (लंडन ते नॉटिंगम बस)
६ डिसेंबर २०२५
१६.३० GMT उर्फ २२.०० (IST)
अरे व्वा ! भारीच की, म्हणतात ना आनंदाचे डोही आनंद तरंग खरंच तुझी बस चुकली म्हणून तुला तो SLO बघायला मिळाला आणि तुझ्या या लिखाण प्रपंच्यामुळे आम्ही तो अनुभवला तू केलेलं वर्णन वाचून तो शो डोळ्यासमोर उभा राहिला पण प्रत्यक्षात त्याची उंची बघण्याचा सुवर्णयोग तुझ्या भाग्यात होत त्यात तू संगीत शिक्षिका सोने पे सुहागा... चला, लंडनवाल्या नावाचा नामकरण विधी या सुखद अनुभवाची कायम आठवण करून देणारा ठरला म्हणायचा ♥️
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद मधुराताई ... तुम्ही नेहमीच आवर्जून प्रतिसाद देता त्यामुळे छान वाटतं ❤️
Delete*नातवाचा
ReplyDeleteतुम्हाला नवीन काही बघायला, ऐकायला मिळाले .... आणि आम्हाला तुमच्या लेखनातून ते अनुभवायला मिळाले.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद ग ❤️
ReplyDelete