विश्वविक्रमाची कथा

विश्वविक्रमाची कथा
आईईईई .... शट शट शट ... Oh No ... It's unbelievable .... आपलं approval आलंय, थांब मी सर्टिफिकेट डाऊनलोड करून तुला पाठवतेच ... हे आणि असंच बरंच काही ती फोनवर बोलत राहिली. मला मात्र काहीही ऐकू येत नव्हतं, डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं ... आणि मन मात्र झर्रर्रर्रर्रकन उडून गेलं लंडनला... १८ जानेवारीला लंडनच्या सकाळी १० वाजता मी हिथ्रो विमानतळावर दाखल झाले. इमिग्रेशन वगैरे सोपस्कार करून बाहेर येऊन बघितले तर लेक माझी वाटच बघत होती. मी पोहोचल्यावर तिने मला घट्ट मिठी मारली आणि आई किती बरं झालं ग तू आलीस, मला काही सुचतंच नव्हतं असं म्हणून रडायलाच लागली. लगेचच आम्ही कॅबने घरी गेलो आणि सगळं घर आवरलं. घडून गेलेल्या घटनेचा तिच्या मनावर बराच खोलवर परिणाम झाला होता आणि आता तिला यातून बाहेर काढणं गरजेचं होतं. तिने तिचे ऑफिस नियमित सुरू केले. २० जानेवारीला मी तिला म्हणाले ... चल आजपासून २ फेब्रुवारीची तयारी करायला घेऊया. देवाने तुझी मोठी परीक्षा घेतली आणि त्यात तू पास पण झालेली आहेस. त्यामुळे आता हा दोन तारखेचा इव्हेंट आपण करूयाच. जणू काही ती माझ्या या बोलण्याची वाटच बघत होती. लगेच म्हणाली की आज संध्याकाळी ऑफिसमधून आले की सगळं प्लॅनिंग करून घेऊ. नाही म्हणायला आम्ही फोनवर वगैरे बरंच प्लॅनिंग केलं होतं, तेच सगळं तिच्या मॅकबुकवर सेव्ह होतं. त्या macbook कडे, हार्मोनियमकडे बघताना पुन्हा एकदा तिचे डोळे भरून आले. पण त्याच दिवशी आम्ही ठरवलं की आता बिलकुल रडायचं नाही, काहीतरी मोठं करूनच दाखवायचं. इतक्या मोठ्या घटनेत या दोन वस्तू अगदी जशाच्या तशा आहेत म्हणजे परमेश्वरी इच्छा आहेच की विश्वविक्रम होणारच !!
संध्याकाळी ती घरी आली. संध्याकाळ कुठली काळीमिट्ट रात्रच म्हणा ना ... दुपारी सव्वातीन वाजताच सूर्यास्त झाला होता, तापमान शून्यावर होतं आणि मधून मधून पाऊस सुद्धा पडत होता. अगदी नैराश्य आलंच पाहिजे असं ते वातावरण होतं आणि आम्ही एक नवीन विश्वविक्रम करायची तयारी करत होतो. आमच्या पोरीचं हल्ली chatgpt वर भयंकर प्रेम जडलं आहे. त्याच्याकडून मी पुन्हा एकदा सगळं प्लॅनिंग करून घेते असं ती म्हणाल्यावर मी तिच्या सगळ्या वस्तू उचलून ठेवल्या आणि तिच्या हातात कागद पेन दिले. आता आपण यावर लिहिणार आहोत असं तिला बजावलं. तिने सुद्धा एका आज्ञाधारक मुलीप्रमाणे लगेचच ऐकलं. मी चहा करत होते तोवर तिनं टीव्ही लावला ... तिचा आवडता चित्रपट 83 ... गाणं लागलं होतं लहरा दो लहरा दो ... माझं मन अजून मागे गेलं ... जून २०२४ मधील माझ्या लंडन ट्रीपमध्ये मी तिला सहज म्हणाले ... पुढचं कसं करणार आहेस ग ? इथे किती दिवस राहणार ? घरी परत कधी  येतीयेस ? माझ्या सर्वच प्रश्नांची उत्तरं तिनं शिताफीने टाळली. म्हणजे बहुतेक तिचा इथेच स्थायिक व्हायचा विचार दिसतोय असं मला वाटलं. मी तिला म्हणाले सुद्धा अगं तू इथे शिकायला आलीस आणि इथल्या शिक्षणाचा उपयोग आपल्याकडे काहीतरी करशील असं मला म्हणालीस ना ग ! ती मला सरळच म्हणाली ... परवाच तुला सुधा मूर्ती फाऊंडेशनच्या भारतीय विद्या भवनचे संचालक म्हणाले ना की आम्ही तिच्याकडे भारतीय शास्त्रीय संगीताचं इथलं भविष्य म्हणून बघत आहोत. भारतीय संगीताचा प्रसार आणि प्रचार संपूर्ण युरोपात तुमची मुलगी करणार आहे. तेव्हा तर तुला भारी वाटलं आणि आता मला परत येण्याबाबत काय विचारत आहेस ? मीही मागे हटणाऱ्यांमधली नव्हतेच की. तिला म्हणाले ... निव्वळ जास्त सुखसोयी आहेत, पैसा जास्त मिळतो म्हणून इथे राहू नकोस गं ... असं काहीतरी कर की ज्यामुळे सगळ्यांना तुझा अभिमान वाटेल. ती हसतहसत उद्गारली, एखादा भारी रेकॉर्डच करू का ? मला तिचं तिरकस बोलणं लक्षात आलं आणि मी म्हणाले कर बरं, बघू काय दिवे लावतेस ते. ती ऑफिसला निघून गेली आणि घरी आल्यावर मला म्हणाली आई सलग बराच वेळ हार्मोनियम वाजविण्याचा कुठलाही विश्वविक्रम नाही, मी करू का ? असा विश्वविक्रम नाही हे माझ्यासाठी खूपच धक्कादायक होतं. आपल्याकडे शास्त्रीय संगीतात वापरलं जाणारं हे महत्त्वाचं स्वरवाद्य आणि ते खूप वेळ वाजवण्याचा रेकॉर्ड नाही हे माझ्या पचनी पडतच नव्हतं. मी तिला म्हणाले की, एक दिवस दे. मी पण पुन्हा शोधते आणि मग आपण यावर विचार करू. तिला एक दिवस पण धीर धरवला गेला नाही आणि तिने Guinness World Records मध्ये the longest Marathon playing Harmonium organ ... यासाठी अप्लाय केलं. तिने सहा तास वादनाची परवानगी मागितली. हे अप्रुव्हल यायला २४ आठवडे लागणार होते (जास्त पैसे नव्हे नव्हे पौंड्स भरले असते तर लवकरही आलं असतं म्हणा) ... दरम्यानच्या काळात आम्ही ही गोष्ट विसरूनसुद्धा गेलो. आणि अचानक नोव्हेंबर महिन्यात मेलवर त्यांच्याकडून रिप्लाय आला की तुम्ही हा विश्वविक्रम करू शकता. आम्हाला अगदी आकाश ठेंगणं झालं. पहिली बाजी तर आम्ही मारली होती. ११ एप्रिलला तिच्या वाढदिवशी सलग सहा तास हार्मोनियम वादन करून हा विश्वविक्रम करू असं आम्ही ठरवलं. परंतु आमचे एक हितचिंतक स्नेही मनोज कारखानीस म्हणाले की एक एक दिवस महत्त्वाचा असतो, त्यामुळे शक्य तितक्या लवकर तू ही कामगिरी कर. त्याचवेळी लंडनमधील प्रसिद्ध तबला वादक सलील तांबे म्हणाले की अगं तू शास्त्रीय वादन उत्तम करतेस, केवळ सहा तास हे उद्दिष्ट न धरता दहा-बारा तास तरी वाजवच. या दोन्ही प्रस्तावांना आम्ही होकार भरला. २ फेब्रुवारीला वसंतपंचमीच्या शुभ मुहूर्तावर हा रेकॉर्ड करूया असं आम्ही निश्चित केलं. 
आता तयारी सुरू करायची होती. हातात फारच कमी वेळ होता, पण तिला दोन तीन तास सलग हार्मोनियम वादनाची सवय होती त्यामुळे फारसं टेन्शन नव्हतं. आम्ही सतत फोनवर बोलून काही ना काही प्लॅनिंग करत होतो. पण मला त्यातून फारसं समाधान मिळत नव्हतं. फोनवर तिला जास्त काही बोलण्यात अर्थच नव्हता. त्यामुळे मी ठरवलं की मी तिकडे गेल्यावरच तिच्याकडे बघते. तोवर तिच्या कलाकलाने घेण्यातच शहाणपणा होता. शिवाय तिच्या राहत्या घरी मेजर प्रॉब्लेम झाल्याने तिला अचानकच घर शिफ्ट करावं लागलं. घराची शोधाशोध करण्यातच बराच वेळ गेला. नवीन घरी राहायला गेली तर हा Robbery attempt वाला एपिसोड झाला. विचारांच्या नादात मी हरवले असतानाच लहरा दो गाणं संपलं होतं. ती म्हणाली, अगं चहा उकळतोय, गॅस बंद कर की ... चहा घेता घेता आम्ही ठरवलं की आता जे काही करायचं ते पटकन आणि अगदी नियोजनबद्ध करायचं. तिला मी म्हणाले की तू तांत्रिक गोष्टींमध्ये लक्ष सुद्धा घालू नकोस, ते सगळं मी बघते. तू फक्त तुझ्या वादनावर लक्ष केंद्रित कर आणि ते शंभर टक्के कसं बरोबर होईल ते बघ. फक्त आज ऑफिसला जाताना मला ज्या गाईडलाईन्स त्या लोकांनी पाठवल्या आहेत ना त्याची प्रिंट मात्र देऊन जा बाई. हे काम तिने इमाने इतबारे केले आणि दिवसभर मी त्या गाईडलाईन्सचे पारायण केले. खूपशा गोष्टी त्यातून उलगडल्या. 
प्रत्यक्ष त्यांच्या माणसाला रेकॉर्डच्या दिवशी बघायला बोलावले तर तो सगळं तपासून प्रमाणपत्र लगेच देतो, पण ते काम भयंकर खर्चिक ... म्हणजे ८५०० पौंड्स (साधारणपणे साडेनऊ लाख रुपये) खर्च येतो, जो करणे आम्हाला शक्य नव्हते. दुसरा पर्याय म्हणजे evidence अपलोड करणे. अर्थात संपूर्ण कार्यक्रम रेकॉर्ड करून अपलोड करणे, साक्षीदारांकडून sheets भरून त्यांना देणे. साक्षीदार सुद्धा एका वेळी दोन असायला हवेत आणि त्यांचे एकमेकांचे आपापसात कुठल्याच पद्धतीचे काहीच नाते नसले पाहिजे. शिवाय ते समाजातील महत्त्वाच्या ठिकाणी काम करणारे असावेत. म्हणजे रिकामटेकड्यांना बोलवून उपयोग होणार नाही असं मनू म्हणाली आणि आम्ही दोघी खूप हसलो. कोणतंही, कितीही अवघड काम असो.. ते हसत खेळतच झालं पाहिजे असा आमच्या आयुष्याचा अलिखित नियम आहे. आता ओळखीचे खूप लोक डोळ्यासमोर आणले आणि त्यांना फोन करून बोलवायला सुरुवात केली. पण दिवसभर सगळे लोक येऊन काय करणार आणि एवढे लोक मावतील इतकं घरही मोठं नाही त्यामुळे लोकांना टप्प्याटप्प्यात बोलवूया असं मी म्हणाले आणि तितक्यात गाईडलाईन्समध्ये वाचले की एक साक्षीदार चार तासांपर्यंतच काम करू शकतो. बापरे !! म्हणजे आता बारा तासांसाठी आम्हाला किमान सहा साक्षीदार हवे होते जे एकमेकांच्या संपर्कातले नसतील पण समाजातले प्रतिष्ठित लोक असतील. या खेरीज दोन जण सुरुवातीपासून शेवटपर्यंत Time mapper म्हणून हवे होते.  २ musicians त्यापैकी १ संगीत शिक्षक, १ इमिग्रेशन सॉलिसिटर (वकील), २ NHS मध्ये काम करणारे, २ सॉफ्टवेअर डेव्हलपर, १ स्क्रम मास्टर, १ इव्हेंट अरेंजर, १ एम्ब्रॉयडरी आर्टिस्ट, १ पब्लिक सेक्टर मधून निवृत्त झालेली व्यक्ती, १ उद्योजक, १ नेत्रतज्ञ (डॉक्टर ) असे वेगवेगळे लोक बोलवले. यांना प्रत्येकांना त्यांची वेळ सांगितली. संपूर्ण कार्यक्रमाचा आम्हाला व्हिडिओ करून गिनीजच्या पोर्टलवर अपलोड करायचा होता.
सलग एक तास वादन केल्यानंतर पाच मिनिटांचा ब्रेक घेता येईल, तुम्ही दोन तास सलग वाजवले तर तुम्ही दहा मिनिटांचा ब्रेक घेऊ शकता. या ब्रेकमध्ये काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवायचं. स्वच्छतागृहात जा, झोपा, खात-पीत बसा किंवा अन्य काही करा तो सर्वस्वी तुमचा प्रश्न असतो. कन्यका म्हणाली चांगला आहे की ब्रेक ... त्यावर मी म्हणाले की पाच मिनिटांचा ब्रेक हा खरं म्हणजे तीनच मिनिटांचा धरावा लागेल. वादन बंद केल्यानंतर ते पुन्हा सुरू होईपर्यंत पाचच मिनिट थांबू शकतो. तू पेटी बंद करणार, तिथून उठणार, थोडं बाहेर येणार आणि पुन्हा तिथे जाऊन बसणार आणि मग वादन सुरू करणार. म्हणजे उठताना आणि बसतानाचा एक एक मिनिट धरूच नकोस. ही गोष्ट आम्ही अक्षरशः कागदावर लिहून ठेवली. पुढची त्यांची मोठी अट होती की improvisation चालणार नाही. अरे देवा !! या जीवावरच तर आमच्या सगळ्या उड्या होत्या की ! एक एक राग ती सहज अर्धा पाऊण तास वाजवू शकेल या विचाराने आम्ही निर्धास्त होतो. आता आम्हाला वेगळा विचार करावा लागणार होता. अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम डोळ्यासमोर आणला आणि त्यानुसार नियोजन करायला घेतलं. विशारद परीक्षेपर्यंतचे जवळपास पन्नास राग आणि अलंकार परीक्षेचे सात-आठ राग ती सहजच वाजवू शकत होती. अचानक तिच्या डोक्यात कल्पना आली की आत्ताच भारतीय प्रजासत्ताकाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत तर आपण ७५ रागांचं वादन करूया. तिला मी अगदी जाहीर शाब्बासकी दिली. पोरगी लंडनमध्ये राहतीये तरी मनाने मात्र आपलाच विचार करतीये या विचाराने मी मनोमन सुखावले. कर्नाटकी संगीतातले अनेक राग ती शिकलेली होती त्याची थोडी तयारी करून ते वाजवूया असं ठरलं. तिचं शास्त्रीय संगीतावर मनापासून प्रेम असलं तरी आलेल्या सर्व साक्षीदारांना शास्त्रीय संगीत कळत होतंच असं नाही. त्यांना कार्यक्रम कदाचित बोअर होऊ शकला असता. तसे होऊ नये याची काळजी घेणं आवश्यक होतं. काही साक्षीदार केवळ तांत्रिकदृष्ट्या ती बरोबर आहे ना ?? म्हणजेच वाजवताना कुठे थांबली नाही ना हे बघणार होते.  त्यामुळे आता शास्त्रीय संगीताशिवाय गीत रामायणातील काही गीते, काही बॉलीवूड सॉंग्स, काही अभंग, भक्तीगीते, प्रार्थना, नाट्यगीते, विविध प्रकारची लोकगीते जसं की फटका, पोवाडा, जोगवा, गोंधळ, गवळण इत्यादी असे अनेक गीतप्रकार पण वाजवूया असा विचार झाला. आता यातही एक गंमत आहे बरं का! कोणतंच गाणं पूर्ण वाजवता येणार नव्हतं. कारण repeation not allowed अशी महत्त्वाची सूचना त्या गाईडलाईन्स मध्ये आम्ही वाचली होती. उदा. लग जा गले हे गीत वाजवायला सुरुवात केलं तर फक्त ध्रुवपद आणि एखादं कडवंच वाजवता येणार होतं. देवा देवा देवा ... आखूडशिंगी, बहुदुधी, पांढऱ्या रंगाची, कमी चारा खाणारी, लाथा न मारणारी अशी म्हैस आम्हाला शोधायची होती. मोठं शिवधनुष्य उचलायचं होतं, पण असं काही आव्हान पेलण्यातच तर खरी मजा असते. शेवटी भूप रागापासून सुरुवात करून भैरवीने शेवट करूया, मध्ये मध्ये हे सर्व गीत प्रकार घालूया यावर शिक्कामोर्तब झालं. साधारणपणे सात सत्रांमध्ये मध्ये आम्ही या पूर्ण कार्यक्रमाची विभागणी केली. अगदी ब्रेक वगैरे सगळं धरून साधारणपणे १२ तास ती वादन करेल असं नियोजन केलं. सगळं कागदावर सुद्धा उतरवलं आणि त्याची पीडीएफ बनवून ठेवली. सगळं थोडं थोडं वाजवून बघ ग बाई असं मी तिला सतत म्हणत होते. आणि तीही हो हो म्हणून मला टोलवत होती. तरी क्लासेसमुळे रोज काही ना काही वादन चालूच होते. २९ जानेवारीपासून मात्र मी तिला सुट्टीच घ्यायला लावली. आणि आता खरी सुरुवात झाली ...
नंदित इव्हेंट अरेंजर असल्याने त्याने आनंदाने व्हिडिओ करणे ही जबाबदारी स्वीकारली आणि व्हिडिओ करता करता टाईम मॅपिंग पण करतो म्हणाला. तो स्वतः इव्हेंट अरेंजर असल्याने काम उत्तमच करणार होता. अमोलदादा देवकर हे तिच्या जुन्या घरातलेच स्नेही. ते म्हणाले की मी सुद्धा टाईम मॅपिंग छान पद्धतीने करू शकेन. बाकी सगळ्यांनाच आम्ही चार चार तास या असं सांगितलं (पण सगळे एकदा जे आले ते अगदी कार्यक्रम संपल्यावरच गेले हा भाग वेगळा) आम्ही या विश्वविक्रमाबाबत कुठेही वाच्यता केली नव्हती. एकतर हे काम अशक्य नसलं तरी अवघड नक्की होतं आणि दुसरं म्हणजे जर अपयश आलं असतं तर ??? तो विचार सुद्धा आम्हाला करवत नव्हता. स्वतः काहीही न करता दुसऱ्यांना नावं ठेवणं हा अनेक लोकांचा अत्यंत आवडता छंद असतो. सगळ्यांना सांगत बसलो असतो तर याबाबत आम्हाला अनेक प्रश्न विचारून त्यांनी केवळ भंडावून सोडलं असतं म्हणून कोणालाही न सांगायचा निर्णय आम्ही घेतला होता. पण हा पब्लिक इव्हेंटच असायला हवा हे गाईडलाईन्समध्ये लिहिलेलं होतं. आता कसं करायचं ? चारचौघात गुपचूप न्यायचा पुतळा असंच काहीसं काम आम्हाला करावं लागणार होतं. त्यामुळे Youtube Live करायचं पण ती लिंक कोणालाच द्यायची नाही, व्हिडिओ पब्लिक न करता प्रायव्हेट ठेवायचा असं ठरवलं. अगदी आवश्यक तेवढ्याच लोकांना सांगून बाकी अळीमिळी गुपचिळी असं सावध धोरण आम्ही स्वीकारलं
बघता बघता फेब्रुवारी महिना उजाडला. आता आदल्या दिवशी एक ट्रायल घेणं आवश्यक होतं. नंदितने सगळा सेटअप लावला आणि सिद्धीने youtube live पण करून बघितलं. या कॅमेराला काही प्रश्न आला तर दुसरा कॅमेरा सुद्धा स्टॅन्डबाय म्हणून ठेवला होताच. एका आयपॅडवर तिने stopwatch लावायचं ठरवलं तर दुसऱ्या आयपॅडवर ती तानपुरा व तबला लावणार होती. त्या दिवशी तर अगदी मैफिलच जमली होती. प्रत्येक जण तिला फर्माईश देत होता आणि ती ते वाजवत होती. हळूच हुशारी करून मी तेही सर्व एका कागदावर टिपून ठेवलं आणि गरज पडलीच तर हे वाजवूया असं निश्चित केलं. अनेकांच्या निरनिराळ्या बॉलीवूड गीतांच्या फर्माईशी होत्या पण हिला त्यातली बरीचशी गाणी माहितीच नव्हती. मी अचानक तिला म्हणाले रखुमाई रुसली वाजव ग. आता हे गाणं बाकीच्यांना माहित नव्हतं, पण हे गीत म्हणजे माझ्या मनूचा स्टेपिंग स्टोन आहे. अवघ्या सव्वा दोन वर्षाची असताना (२००४ मध्ये) तिने हे गीत स्टेजवर गायलं होतं आणि आत्ताचे मावळचे खासदार मा. श्रीरंग आप्पा बारणे (हे त्या वेळी नगरसेवक होते) यांनी तिचं कौतुक केलं होतं. मी ही गोष्ट सगळ्यांना सांगितल्यावर अचानकच वातावरण एकदम इमोशनल झालं आणि हे गीत वाजवच असा सगळ्यांनी तिच्यावर दबाव टाकला. तिनेही एकदम खुशीने ते गीत वाजवत गाऊनसुद्धा दाखवले.
सर्व तयारी करून, जेवण झाल्यावर सगळेजण दहा वाजता आपापल्या घरी गेले आणि आम्ही दोघी झोपायला गेलो. दोघींनाही झोप येणं शक्यच नव्हतं, पण तरीही थोडी झोप घेऊयात असं दोघींनीही एकमेकींना सांगितलं. २ फेब्रुवारीचा दिवस उजाडला. आम्ही पहाटे पाचलाच उठलो आणि सहापर्यंत आवरून तयार झालो. सकाळी सात वाजता कार्यक्रम सुरू करायचा होता. दुपारी लवकरच अंधार पडत असल्याने जितका करता येईल तेवढा कार्यक्रम आम्हाला उजेडात करायचा होता. आधी आम्ही त्या दिवशी वातावरण कसं असेल हे बघितलं होतं तर थोडा पाऊस दिसत होता. पण प्रत्यक्षात त्या दिवशी मात्र लख्ख ऊन पडलं. थंडी खूप होती यात वादच नाही पण किमान पाऊस तरी नव्हता. तापमान शून्य ते दोनच्या दरम्यानच होतं. ती पटकन बोलून गेली आई आज आपण संगीत यज्ञच करणार आहोत गं ... गेली तीन वर्षे मी आमच्या शाळेत सूर्योदय ते सूर्यास्त ... अखंड संगीत यज्ञ ही संकल्पना राबवतीये. यंदाच्या वर्षी काही अपरिहार्य कारणामुळे तो यज्ञ होऊ शकला नाही, पण आज माझी लेक म्हणत होती की आई आपण संगीत यज्ञ करतोय. मला खूपच आनंद झाला. आजचा दिवस सुद्धा होता वसंतपंचमी... ही माता सरस्वतीची जयंती असून, या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते. वसंत पंचमीला श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी असेही म्हणतात. आज ही सरस्वतीची लेक सरस्वती मातेच्या चरणी तिला जे काही येतंय ते ज्ञान अर्पण करणार होती, तेही तिच्याच आशीर्वादाने. सकाळी साडेसहा वाजताच दोन साक्षीदार आणि दोन टाईम मॅपर, याशिवाय भूषण वगैरे मंडळी आलेच. सिद्धीला आता खरं म्हणजे काहीच सुचत नव्हतं. तिचं संपूर्ण वादन होईपर्यंत आम्ही अखंड दिवा तेवत ठेवणार होतो. तिथे माझ्याकडे तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावण्याची सोय नव्हती म्हणून आम्ही एक सुवासिक मेणबत्ती लावली. शेवटी भाव महत्त्वाचा ... आता तो मंद सुगंध संपूर्ण वातावरणात दरवळत होता. तिने पटकन तिच्या बाबांना, काका - काकूला व्हिडिओ कॉल केला. तिला यश मिळावे म्हणून तिच्या काका काकूंनी घरात मोठी पूजा केली होती. आमच्याकडे मुख्य देव आहेत. त्यांची पूजा फक्त मार्गशीर्ष महिन्यातील पारणं, गुढीपाडवा, दसरा आणि दिवाळीतील पाडव्यालाच आम्ही करतो, एरवी ते देव्हाऱ्यात डब्यात बंद करून ठेवलेले असतात. पण तिच्या काकांनी आज ते देव बाहेर काढले होते आणि काकूने देवाला सांगितलेच होते की तुम्हाला तिच्याकडून हे सगळं पूर्ण करून घ्यावंच लागेल. आता तिची काकू सरस्वतीचा जप करायला बसली होती. व्यंकटेशाचे आशीर्वाद घेऊन सिद्धीने आता इथल्या घरातील देवाला आणि उपस्थित सर्वांना नमस्कार केला तेव्हा मला ती थोडीशी अपसेट वाटली. मी तिला सांगितलं तू जिथे वादन करायला बसणार आहेस त्या मागच्याच भिंतीवर माता सरस्वती आहे. ती तुला सतत आशीर्वाद देईलच पण तरीही समजा काही प्रॉब्लेम आलाच तर ती तिच्या हातातली वीणा खाली ठेवेल आणि तुझी हार्मोनियम वाजवेल. काय वाजवायचं ते तिला आपण सांगायची आवश्यकता नाहीये, ती छानच वाजवेल. हे ऐकल्यावर मात्र ती एकदम खुश झाली, तिच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले आणि मोठ्या आत्मविश्वासाने ती तिच्या आसनावर जाऊन बसली.
त्रिवार ओंकारानंतर तिच्या पेटीवर स्वर उमटले .... सरस्वती नमोस्तुते या सरस्वती रागातील वंदनेने सुरुवात झाली आणि त्यानंतर सलग पावणे दोन तास तिची हार्मोनियम वाजतच राहिली. पुढे भूप, यमन, देस, बागेश्री, भीमपलास, काफी, दुर्गा, खमाज यातील वेगवेगळ्या बंदिशी, लक्षणगीते, सरगमगीते ऐकण्यात आम्ही अगदी रमून गेलो. भूप रागातच तिने अबीर गुलाल हे गीत वाजवलं तेव्हा तर वातावरण अगदी भक्तीमय झालं.
पहिलं सत्र अगदी ठरलेल्या वेळात म्हणजे पावणे दोन तासात पार पडलं होतं. पुढच्या पाच मिनिटाच्या ब्रेकमध्ये ती खूपच आनंदी होती, त्या आनंदातच तिने दुसऱ्या सत्राला सुरुवात केली. वृंदावनी सारंग, बिहाग, तिलक कामोद, केदार, बिलावल, भैरव, पिलू, पटदीप, पुरिया धनश्री, मालकंस या रागांनी तर अगदी माहोल बन गया । सत्र एकदम शानदार झालं पण आमच्या अपेक्षेप्रमाणे दोन तास न चालता दीड तासाच्या आधीच संपलं. आणि आम्ही खूप मागे पडलो. पण तिला हे कळू देण्यात काहीच अर्थ नव्हता हे सगळं मनातच ठेवलं आणि तिला मात्र खुशीत म्हणलं चल आता रामाची आळवणी सुरू कर गीत रामायण ... कुश लव रामायण गाती ते गा बाळांनो श्री रामायण ... १७/१८ गाणी तिने लीलया वाजवली. प्रत्यक्ष रामप्रभू येऊन ऐकत आहेत असं वाटल्याने आमच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मन भारावून गेलं होतं पण माझी बुद्धी व्यवस्थित काम करत होती. चार तास संपल्यानंतर आम्ही साक्षीदार बदलले. पहिल्या साक्षीदारांचे फोटो वगैरे नंदितने अगदी व्यवस्थित काढले होते. त्यांनी काढलेल्या नोट्स, भरलेले शीट्स भूषणने जमा करून घेतले. गीतरामायणाला जोडूनच तिने हनुमान चालीसा वाजवली. माझ्याकडे बघतानाच आम्हाला दोघींना एकदमच तो robbery वाला कटू प्रसंग आठवला. माझ्या डोळ्यातलं पाणी तिने बघायला नको म्हणून मी पटकन तिथून निघून गेले. आणि इतक्यात ती तिने स्वतः स्वरबद्ध केलेले श्री गजानन महाराजांचे २१ नमस्कार वाजवू लागली. तेव्हा महाराजांना नमन करण्यासाठी मी पुन्हा एकदा त्या मैफिलीत सामील झाले. ते झाल्यावर जयजयवंती, हमीर, शंकरा, कामोद, गौडसारंग, छायानट, मुलतानी या रागांनी मैफिल सजली. हे सत्र संपताना आम्ही नियोजित वेळेच्या जवळपास तासभर मागे पडलो होतो. हा विक्रम होईल ना अशी शंकेची पाल मनात चुकचुकली. या पोरीने एकही पूर्ण सराव केला नाही, माझं ऐकलं असतं तर किती बरं झालं असतं वगैरे विचार मनात फेर धरून भुतासारखे नाचायला लागले. पण आता त्याचा काहीही उपयोग नव्हता. चेहऱ्यावर हास्याचा मुखवटा चढवला आणि सगळ्यांशी केवळ गोड आणि गोडच बोलत राहिले. पुढे पंचतुंड, नमन नटवरा, जयोस्तुते, दिल की तपीश, मर्मबंधातली ठेव ही, हे सुरांनो चंद्र व्हा ही अगदी ठेवणीतली पदं वाजली आणि या पोरीच्या बोटांमध्ये जादू आहे असं सगळेजण म्हणायला लागले. मला काहीही सुचत नव्हते. गजानना श्री गणराया, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, प्रथम तुला वंदितो, तुज मागतो मी आता, रांजणगावाला आदी गणेश गीते सुरू झाली आणि मी घड्याळ बघितले. अवघ्या पंधरा मिनिटात सहा तास पूर्ण होऊन वर्ल्ड रेकॉर्ड सेट होणार होता. गणेश कृपेने सहा तास पार पडले आणि अर्ज दिल्याप्रमाणे सहा तासांचा सलग हार्मोनियम वादनाचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला. आम्ही सर्वांनी लगेचच टाळ्यांचा कडकडाट केला. आता पुढे आपण किती करतोय तेवढे फक्त बघायचे होते.
पुढे तिने कितीतरी मंत्रांच्या धून, कितीतरी इंग्लिश ट्यून्स, विविध चालींमधील आरत्या, काही गीते वाजवली आणि सगळ्यांच्या कौतुकाचा स्वीकार केला. पुढचं सेशनसुद्धा तिच्या आवडीचं होतं. मियामल्हार, बहार, मारू बिहाग, बिभास, बसंत, सोहनी, हिंडोल, मारवा, तोडी, शुद्ध कल्याण, पुरीया कल्याण, जोग, शुद्ध सारंग, किरवाणी, चारूकेशी, हंसध्वनी, अहिरभैरव, धनश्री इत्यादी राग वाजवल्यानंतर छानपैकी रागमाला वाजवली. अगदी आडा चौताल, अष्ट झपताल अशा रागात तिने कौशल्य पणाला लावत जाणकारांची वाहवा मिळवली.
Meanwhile सगळ्यांची जेवणं पार पडली. मी घरी केलेला गाजराचा हलवा आणि बाहेरून मागवलेले पोळी भाजी, दाल - भात, सॅलड असं सर्व जेवण सगळ्यांनाच खूप आवडलं. फक्त ती काहीच खात नसताना आम्ही तिच्यासमोर बसून खायचं कसं असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. आणि तिने काही खाल्लं नसल्याने मी काही खाणं शक्यच नव्हतं. पण यावेळी सोनाली आणि आतिशाने सगळ्यांना आग्रह करून खायलाच लावलं आणि माझं काम सोपं केलं.
आता साक्षीदारांची दुसरी टीम सुद्धा उठली आणि तिथे तिसरी टीम जाऊन बसली होती. तब्बल आठ तास होऊन गेले होते आणि मनू पूर्ण कंटाळली होती. पण बॉलीवूडची गाणी सुरू झाली आणि मग मात्र मज्जा यायला लागली. अभी ना जाओ छोडकर,  ये शाम मस्तानी प्यार दिवाना होता है, छूकर मेरे मन को, एक प्यार का नगमा है इत्यादी गाणी ती वाजवत होती आणि सर्वजण हलक्या आवाजात गुणगुणत होते. आणि इकडे वेगळीच मजा झाली. मी सतत मनूला दिसणं आवश्यक आहे म्हणून तिच्या अवतीभवती राहत होते. बाकी मंडळींनी हिशेब मांडायला सुरुवात केली. तिने घेतलेला ब्रेक आणि हार्मोनियम वादनाचा वेळ यांचा ताळमेळ जुळेना. मी पटकन खोलीत गेले पुन्हा एकदा गाईडलाईन्स वाचल्या आणि मी बरोबर आहे हा माझ्या मनाने कौल दिला. ती बिनधास्त दहा मिनिटांचा ब्रेक घेऊ शकते हे गणित मी मांडलं आणि तिने तो ब्रेक घेतला. आता ती माझ्या मांडीवर हात पाय पसरून बसली होती आणि आतिशा व सोनाली तिचे दोन्ही हात दाबत होत्या. भूषण लगेच तिला चिडवायला लागला की वर्ल्ड रेकॉर्ड करायला निघाली आहे आणि बाळासारखं आईच्या मांडीवर बसतीये. तो असं बोलला रे बोलला की सगळेजण एकदम त्याच्या अंगावर ओरडले .. ए असं काय रे बोलतोस ? तू वर्ल्ड रेकॉर्ड होल्डरशी बोलतो आहेस हे तुला माहितीये ना ? वातावरणातला ताण कुठच्या कुठे पळाला. लहानपणी तिची खोडी काढल्यावर तिच्या काकांना आणि बाबांना तिचे आजोबा ओरडायचे ती आठवण मला आली आणि मी ती लोकांना सांगणार इतक्यात साडेआठ मिनिटातच अमोलदादांनी ब्रेक संपलाय असं जाहीर केलं. आता ती पुन्हा वादनासाठी सज्ज झाली होती. दरबारी कानडा राग वाजवायचा राहिला आहे याची मी तिला आठवण केली आणि तिने अगदी सहज त्या सुरावटी वाजवल्या. आता मी कॅमेऱ्याच्या मागून तिला काय वाजवायचं ते कागदावर लिहून देत होते. पण दिवसभराचा इतका शिणवटा तिला आला होता की काही गाणी तिला आठवतच नव्हती. आणि इतक्यातच दहा तास पूर्ण झाले. सगळ्यांनी खूपच टाळ्या वाजवल्या. आत्ताही खरं म्हणजे थांबून चाललं असतं पण म्हणतात ना ये दिल मांगे मोर ... 83 मधला कपिल देवच्या तोंडी असलेला आमचा आवडता डायलॉग मी म्हणायला सुरुवात केली ... Taste the success once, tongue wants more ... तिनेही माझ्या म्हणण्याला वादनाने दुजोरा दिला. पण अखेर ती कंटाळली आणि भैरवीचे सूर आमच्या कानावर पडले. पण भैरवीतील गीतेसुद्धा तिने जवळपास पंधरा मिनिटे वाजवली आणि अखेर १० तास २३ मिनिटे २२ सेकंदाने ती थांबली.
सगळ्यांनी आपापल्या कॅमेरात तिचे फोटो काढायला सुरुवात केली. मला तर काय करावे ते कळतच नव्हतं म्हणून सगळ्यांसाठी चहा करायचं कारण काढून मी किचनमध्ये गेले. इकडे तिला तिच्या काकूचा फोन आला. खरं तर तेव्हा भारतात रात्रीचे ११ वाजलेले होते. पण त्यांनी आणून ठेवलेल्या पेढ्यांचा नैवेद्य देवाला दाखवला आणि फोन मधूनच तो पेढा मनूला भरवला. आता सगळेजण तिच्याबरोबर सेल्फी घ्यायला लागले, गप्पांना अगदी ऊत आला होता. मी इथे पेढे कुठून वाटणार ? आणायला तरी जाणार कशी ? म्हणून मी भारतातूनच करून नेलेले तिळगुळाचे लाडू सगळ्यांना वाटले. सगळ्यांना ते खूपच आवडले आणि चहा घेऊन, एक ग्रुप फोटो काढून, तिला शुभेच्छा देत एकेक जण निघू लागले.
रेवा धोतकर या सकाळी सात वाजताच येणार होत्या पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे दुपारी एकच्या दरम्यान आल्या. आणि त्यांनी श्री गजानन महाराजांचे पारायण तिथेच बसून करायला सुरुवात केली. त्यांचे अकराव्या अध्यायाचे वाचन सुरू असतानाच अकराव्या तासालाच  हिचे वादन थांबले. हाही एक योगायोगच म्हणावा लागेल. शास्त्रीय संगीत - त्यातलेही अवघड ताल, बॉलीवूडची गाणी, आपल्या मंत्रांच्या धून इंग्लिश ट्यून्स, अभंग,  भक्तीगीत, विविध प्रकारची लोकगीते, गीतरामायण, गणेशगीते असे सर्व समावेशक वादन असलेला कार्यक्रम मी पहिल्यांदाच बघितला असं मत UK मधील प्रख्यात तबलावादक सलील तांबे यांनी व्यक्त केले. मेरी समझ में कुछ नही आ रहा था, पर मुझे बहुत अच्छा लगा । असं सोनाली आवर्जून म्हणाली. मैने सिद्धी को कभी पहले हार्मोनियम बजाते हुए नही देखा था और पहली बार देखा तो उसका विश्वविक्रम .. या शब्दांत आतिशा व्यक्त झाली. बाळ आता मोठं झालंय, रेकॉर्ड बनवतंय .. भूषण त्याच्या नेहमीच्या शैलीत म्हणाला. Siddhiie, you r just amazing ... मुझे व्हिडिओ बनाने का सौभाग्य मिला, Thank you so much ... नंदितने भावना व्यक्त केल्या. यावेळी अमोलदादा मात्र लॅपटॉपवर दिवसभराच्या तिच्या वेळेच्या गणिताचा ग्राफ बनवत बसले होते. तो बनवून झाल्यावरच ते उठले. नि:शब्द हा एकच शब्द दीपा तांबे यांनी उच्चारला. सचिन सावंत यांनी थोडा थोडा व्हिडिओ शूट करून त्यांच्या यूट्यूब चॅनलवरून प्रसारित केला. त्यात त्यांनी अक्षरश: जाहीरच केलं की आत्ता इथे एक वर्ल्ड रेकॉर्ड बनत आहे. सुशील रापटवार मात्र फार कुणाशी न बोलता निवांत कार्यक्रमाचा आस्वाद घेत होते. सतीशजी तिच्याकडे किती सहज ही मुलगी वादन करते असं म्हणत कौतुकाने बघत होते. राहुल चिंबाळकर यांना खरं म्हणजे बाहेर जायचं होतं पण सरळ त्यांनी ती अपॉइंटमेंट कॅन्सल केली आणि तिला moral सपोर्ट देण्यासाठी थांबले.
आठच्या दरम्यान जवळपास सगळेच गेल्यानंतर आम्ही core मेम्बर्सनी पोटपूजा केली आणि मुख्य काम करायला बसलो. सगळ्या शीट्स वेळेनुसार भरणे हे महत्त्वाचे काम होते. प्रत्येक साक्षीदाराने आपापले शीट तर भरले होते, पण आता हे सगळं एकत्रीकरण करायचं होतं. ते बघताना लक्षात आलं की एखाद्याची सही राहिली आहे, एखाद्याने स्वतःचं स्टेटमेंट लिहिलं नाही, एखाद्याने तर तो फॉर्मच भरला नाही. आता फोनाफोनी सुरू झाली. एकाच्या घरी भूषण सही आणायला गेला तर एकाला आम्ही घरी बोलावून घेतले. एक जण खूपच लांब राहतात म्हणून त्यांना इथून फॉर्म मेल केला, त्यांनी त्याची प्रिंट काढली. तो हाताने भरला आणि पुन्हा आम्हाला मेल केला. आम्ही त्याची इकडे प्रिंट काढली. हो नाही करता करता सगळे कागद तयार झाले आणि आता उरलेले सर्व लोक सुद्धा घरी गेले. आम्ही दोघी मात्र सर्व अपलोड करूनच झोपणार होतो. व्हिडिओ जवळपास 60 GB चा बनला होता. सिद्धीने पोर्टल ओपन करून त्याच्यावर एक एक गोष्ट भरायला सुरुवात केली. सर्वप्रथम तिने अगदी छान कव्हरिंग लेटर लिहिले आणि अपलोड केले. साक्षीदारांच्या तसेच टाईम मॅपर्सच्या शीट्स अपलोड केल्या. Youtube ची लिंक त्यांना दिली. आणि आता हा मोठा व्हिडिओ अपलोड करायचा होता. पण इतका मोठा व्हिडिओ अपलोड करणे शक्यच नव्हते. आणि Guinness वाल्यांनी सांगितले सुद्धा होते की आम्हाला छोटे छोटे व्हिडिओ कट करून पाठवा. फक्त प्रत्येक व्हिडिओत आधीच्या व्हिडिओतली 20 सेकंद overlap झालेली असावीत. हे प्रकरण तसे वेळखाऊच होते पण इलाज नव्हता. आम्ही आता हा व्हिडिओ डाऊनलोड करायला लावला आणि डाउनलोड झाल्यावर ड्राईव्हवर अपलोड केला. सर्वांनीच तिला असा सल्ला दिला की तू ती ड्राईव्हची लिंकच अपलोड कर. हल्ली सगळे असंच करतात. मी तिला म्हणत होते की त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे छोटे छोटे व्हिडिओ करून टाक. पण बाकीची मंडळी बरीच दिग्गज आणि त्यातून परदेशात राहणारी ... त्यामुळे आमच्या सुकन्येला आपल्या आईपेक्षा या लोकांना जास्त कळतंय असं वाटल्याने तिने लिंक अपलोड केली. आम्ही Guinness वाल्यांना priority charges भरून निकाल लवकर देण्याची विनंती केली. नाहीतर निकाल यायला पंधरा-वीस आठवडे लागतात. तोपर्यंत डोक्यावर टांगती तलवार ठेवणं शक्यच नव्हतं.
रात्री साधारणपणे दोन अडीचच्या दरम्यान सगळं अपलोड केल्यानंतर आम्ही झोपलो. सोमवारी पण तिने सुट्टीच घेतली होती. आणि एका जणांचा आम्हाला फोन आला, त्यांचे एक स्नेही याबाबत आमच्याशी मार्गदर्शनपर बोलू इच्छित होते. त्यांनी आम्हाला सांगितले की टाईम मॅपिंग करणारा कुणीतरी Athlete लागतो म्हणे. अरे देवा !! आम्ही तर कोणाही Athlete ला बोलावलेच नव्हते. आता काय करायचं ? तेच पुढे म्हणाले की मग ते सुशील रापटवार का आले होते ? मला वाटलं की ते Athlete आहेत म्हणूनच तुम्ही बोलावले. अजूनही त्यांच्याकडून फॉर्म भरता येईल का हा विचार आम्ही केला. भरून तर ठेवूयात म्हणून त्यांच्याकडून फॉर्म भरून आणला. आता खरं म्हणजे Guinness वाल्यांकडून query येते का ते बघायला हवं, तर आमच्या पोरीने स्वतःच्या मनानेच ते पोर्टल पुन्हा ओपन करायची विनंती केली आणि हे टाईम मॅपिंगवाले शीट त्यावर अपलोड केले.
Priority charges भरल्यानंतर साधारणपणे पाच दिवसात निकाल हाती येतो. तो का येत नाहीये असं बघितल्यावर लक्षात आलं की हिने पोर्टल ओपन केल्यामुळे reset बसला आहे. आता पुन्हा पाच दिवस वाट बघायची होती. पाच दिवस म्हणजे एक आठवडा... 5 working days ... आणि बरोबर पाच दिवसांनी त्यांनी मागणी केली की छोटे छोटे व्हिडिओ करून पाठवा. आमचे दोन आठवडे असेच वाया गेले होते. आता तिने सगळे व्हिडिओ तुकड्या तुकड्यात करून अपलोड केले. आणि पुन्हा एकदा काम जोरात सुरू झाले. अजून एका ठिकाणहून आम्हाला कळलं की रेकॉर्ड मोडला जात असेल तर लवकर निकाल येतो पण एखादा रेकॉर्ड सेट होताना जास्त वेळ घेतो. अर्थात तेही बरोबरच आहे म्हणा. हा काही गल्लीतला रेकॉर्ड नव्हता, हा होता विश्वविक्रम !! आता आम्ही फक्त वाट बघायचं ठरवलं होतं. महाशिवरात्रीच्या दिवशी आम्ही उपवास केला होता आणि देवाला साकडच घातलं की निकाल येऊ दे रे बाबा !!
दुसऱ्याच दिवशी म्हणजे २७ फेब्रुवारीला दुपारी दीडच्या दरम्यान लेकीचा फोन ... आई काय करतीयेस ? मी शाळेत आहे असं सांगितलं. नंतर बोलू असं म्हणून तिने फोन ठेवला. अर्ध्या तासात पुन्हा फोन ... घरी कधी जाणार आहेस ? तिचं काहीतरी बिनसलंय हे मला कळलं आणि मी वाऱ्याच्या वेगाने घरी गेले. घरी जाऊन तिला फोन केला तर म्हणाली, आई आपला रेकॉर्ड रिजेक्ट झाला आहे. किमान २४ तास सलग वादन करणे अपेक्षित आहे असं ते म्हणत आहेत. खरं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली पण अगदीच शांत स्वरात मी तिला म्हणाले, काही हरकत नाही आपण प्रयत्न केला हे जास्त महत्त्वाचं आहे. तिला ते बिलकुल पटत नव्हतं. तू मला सांगतेस हनुमान चालीसा म्हण, मारुतीराया सतत तुझ्याबरोबर आहे. आता मी काही काही करणार नाहीये. मी तिला समजावत होते की आपण अपील करूया. तिच्याशी बोलत असतानाच दुसऱ्या बाजूला लॅपटॉपवर आम्ही दोघींनीही गाईडलाईन्स पुन्हा एकदा वाचायला सुरुवात केली. त्यात कुठेही २४ तासांबाबत उल्लेखही नव्हता. शिवाय तिने approval तर केवळ सहा तासांसाठीच घेतले होते. त्यामुळे सलग सहा तास हार्मोनियम वाजवल्यानंतरही विश्वविक्रम प्रस्थापित होणार होता. आणि इथे तर तिने जवळपास साडेदहा तास वादन केले होते. आपण त्यांना मेल लिहूया असा आमचा संवाद चालू असतानाच तिने एकीकडे मेलमध्ये सर्व लिहून पाठवून सुद्धा दिले. आणि पुढच्याच मिनिटाला Guinness कडून मेल ... तुमचा रेकॉर्ड सेट झाला आहे.
आनंदी आनंद गडे । जिकडे तिकडे चोहीकडे । ... काय करू नि काय नको असं आम्हाला झालं होतं. लगेचच देवाला हात जोडले, देवाबद्दल मनात शंका घेतली म्हणून तिने देवाची माफीसुद्धा मागितली. नंतर पटापट जवळच्या लोकांना मेसेज करून कळवलं... आणि सुरू झाला फोन/ मेसेजचा अखंडित प्रवाह ... अनेकांना तर काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजेना. आपल्या ओळखीत कुणी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्थान मिळवेल ही कल्पनाही कोणी केली नव्हती. कधीही जे स्वप्नात सुद्धा बघू शकणार नाही ते सत्यात उतरले होते. एका मराठी मुलीने मराठी दिनाच्या दिवशी जागतिक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्थान मिळवले.
हे कसं काय जमलं? असं सगळेजण विचारत होते. लवकरच याबद्दल सविस्तर लिहिते असं आश्वासन मी सगळ्यांना दिलं आणि त्यानुसार आज लिहायला घेतलंच. विश्वविक्रम आधी मनात तयार झाला आणि नंतर प्रत्यक्षात उतरला. तिचा हा विक्रम कदाचित लगेचच मोडला जाईल. मी तर म्हणते मोडला जावाच, कारण तो मोडणारा नक्की एक भारतीय आणि सच्चा संगीतप्रेमी असेल. मोडला तरी हरकत नाही, पण हा विक्रम प्रस्थापित करणारी माझी लेक सिद्धी पहिली ठरली याचा मला निश्चित अभिमान आहे. मुळात असा विश्वविक्रम करावा हे तिच्या डोक्यात आलं हीच फार महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे. आता भविष्यात ती जगाच्या पाठीवर कुठेही राहिली तरी माझी काहीही हरकत नाही. एक भारतीय म्हणून तिने तिचे कर्तव्य केले आहे. प्रत्येक जण सीमेवर लढायला जाऊ शकत नाही. आपल्या क्षेत्रात उत्तम काम करून देशाचे नाव उज्ज्वल करणे ही देखील एक प्रकारची देशसेवाच आहे. हल्ली मानसिक आरोग्यासाठी देखील संगीतोपचाराचा बराच वापर केला जातो. त्या दृष्टीने देखील तिचा हा विश्वविक्रम म्हणजे एक प्रकारची समाजसेवाच म्हणावी लागेल.
आज एक आई म्हणून मला खूपच भारी वाटतंय. मला काय वाटतंय ते मी सांगूच शकत नाही. 
आम्हाला अत्यंत आनंद, कौतुक आणि अभिमान वाटतोय की परमेश्वर कृपेने आमची लेक सिद्धी कापशीकर हिने नामांकित Guinness World Records मध्ये स्थान पटकावले. वसंतपंचमीच्या दिवशी (२ फेब्रुवारी २०२५) सलग १० तास २३ मिनिटे २२ सेकंद हार्मोनियम वाजवत तिने हा विश्वविक्रम केला. तिने यात २५ विविध गीत प्रकारांसह भारतीय शास्त्रीय संगीतातील  ७५+ राग वाजवत आपल्या प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव साजरा केला. हा विश्वविक्रम करताना तिने आमच्या कुळाचे नाव तर उज्वल केलेच पण तिच्या गुरूंना, भारतीय शास्त्रीय संगीताला,  तिच्या लाडक्या वाद्याला (हार्मोनियम) आणि आपल्या भारत देशाला मानवंदना दिली आहे... विश्वविक्रमाच्या दिवशी तिचं वय केवळ २२ वर्षे २९७ दिवस... या विश्वविक्रमामागे तिच्या मेहनतीबरोबरच परमेश्वरी कृपा, गुरूंचे आशीर्वाद, तुमच्यासारख्या हितचिंतकांच्या शुभेच्छा देखील आहेत. अशाच शुभेच्छा पाठीशी असू द्या. अखिल विश्वाचे मनःपूर्वक आभार ... धन्यवाद !!!

शीतल कापशीकर
५ मार्च २०२५ 

Comments

  1. प्रिय सिद्धी, खरंच तुझं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे !बापरे !तुझ्या मध्ये किती संयम आहे हे पाहायला मिळालं, तसंच तू ज्या संस्कारातून घडली आहेस ते प्रबोधिनी संस्कारही आईच्या लेखनातून अनुभवले .खूपच छान अनुभव तू आमच्यापर्यंत पोहोचवला आहेस. खूप खूप धन्यवाद असेच विश्वविक्रम करण्यासाठी तुला खूप खूप सदिच्छा आणि शुभेच्छा आता आमच्या कानाला तुझे असे विक्रम ऐकण्याची सवय व्हायला हवी आहे आणि ती आमची इच्छा तू नक्की पूर्ण करणार आहेस याचा विश्वास पण आहे अनेक शुभाशीर्वाद.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी मनःपूर्वक धन्यवाद ताई 🙏
      अशाच शुभेच्छा आणि आशीर्वाद सदैव पाठीशी असू द्या ❤️

      Delete
  2. येर्या गबाळ्याचे काम नव्हे.विश्व विक्रम करायचं सोपं नाही.किती ती तयारी!!!!
    अगं बाई!!! खरंच शीतल तुम्हा दोघींना दंडवत.एक सलग वाजवणं,काय वाजवायचं याचं परफेक्ट नियोजन करणं, सर्व टीम बोलवणं ती पण लंडन ला बोचरी थंडी असताना, खरंच तुमच्या दोघींच्या जिद्दीला कडक सलाम.इंडियात काका काकूंनी जी ताई साठी ईश्वर सेवा केली हे तू जपलेल्या प्रेमाचं प्रतिकच. आजी ,दोन्ही मावशा यांचे वलय सिद्धी भोवती होतेच.सर्वात महत्त्वाचे म्हणजे साक्षात गजानन माऊली या सिद्धी बरोबर होत्याच.तुझ्या घरादाराची नितांत श्रद्धा महाराजांवर आहे.श्रद्धाच तर देश प्रेम पण वाखाणण्याजोगे स्वातंत्र्याला ७५वर्षे पूर्ण म्हणून ७५ रागांची निवड केली.कलेची उपासक म्हणून सरस्वती चा वाढदिवसाच्या दिवस म्हणून वसंत पंचमीचा दिवस निवडला.साडेनवू लाख खर्च करायला नको म्हणून माय लेकींनी जी मेहनत घेतली त्याचं कौतुक शब्दातीत आहे.एवढी वाकबगार माणसं जमवणे व अगत्याने त्यांनी सर्व करणं हे ईश्वरी कृपेशिवाय अशक्यच.
    शीतल तू विश्व रेकॉर्ड ची इतकी सुंदर माहिती शेअर केलं त्यामुळे अंगी नुसते गुणवत्ता असूनही उपयोग शून्य कारण या सर्व खटपटी पण जिद्द, चिकाटी व हुशारी अंगी असल्या शिवाय होऊ शकत नाहीत.सर्वात महत्त्वाचे म्हणजे ईश्वरी कृपेशिवाय सर्वच अशक्य.
    बोला श्री गजानन महाराज की जय.🙏🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद काकू 🙏
      अगदी तुमच्या मनात आलं ते जसंच्या तसं उतरवलं आहे ❤️

      Delete
  3. शितल आणि सिद्धी तुम्हा दोघींचे मनःपूर्वक अभिनंदन
    फक्त विश्वविक्रम केला एवढ्याच बातमीने जे आकलन झाले नाही ते या लेखनाने झाले.
    नुसती गुणवत्ता किंवा इच्छा पुरेशी नसते तर कुठलाही विक्रम करण्यासाठी ... कुठलेही आव्हान घेण्यासाठी मानसिक तयारी, जिद्द आणि चिकाटी लागते.... त्यासाठी सततचे परिश्रम लागतात हे सगळे या लेखनातून उतरले आहे...
    त्याचबरोबर संगीताचे प्रेम, आपल्या देशाविषयीचा अभिमान आणि तुम्ही गोळा केलेला जिवलगांचा गोतावळा सुद्धा जाणवतो आहे.
    काही वाक्य वाचताना सुद्धा माझा अंगावर अगदी काटा आला. कारण त्या प्रसंगाचे अनुभव घेताना तुमची मनस्थिती काय झाली असेल याची पुसटशी कल्पना या ओघवत्या लेखनामुळे आली.
    सिद्धीचे खूप खूप कौतुक!! नव्या पिढीची ती प्रतिनिधी आहेच.. नवीन टेक्नॉलॉजी आणि आपले भारतीय संगीत यांना विश्वविक्रमापर्यंत नेणारी सिद्धी तुझ्या हातून असेच नवनवीन विक्रम सिद्ध व्हावेत ही शुभकामना.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद स्मिता ... कष्टेविना फळ नाही 🙏

      Delete
  4. शीतल आणि सिद्धी, तुम्हा दोघींचे अभिनंदन...
    विश्वविक्रमाची कथा वाचून निःशब्द झाले असून काय प्रतिक्रिया द्यावी हे सुचतच नाही. मनापासून काहीतरी करण्याची जिद्द, चिकाटी, मेहनत, तयारी, कलेची उपासना, थोरांचे आशीर्वाद, आप्तस्वकीयांचे पाठबळ, त्यांनी केलेली मदत या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे हा विक्रम. तुझ्या लिखाणाने अनेक नवीन गोष्टी माहित झाल्या. त्या दिवशीचे तेथील उत्साही वातावरण, लगबग, तुमच्या मनातील संमिश्र भावना आमच्यापर्यंत मनापासून पोहोचल्या.
    सिद्धीला पुढील वाचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद मंजुषा ...

      Delete
  5. प्रिय सिद्धी,
    सर्वप्रथम तुझे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन. विश्वविक्रम करून तुझे, तुझ्या आई-वडिलांचे व गुरूंचे आणि देशाचे नाव जगात प्रसिद्ध केलेस.
    तुझ्या प्रामाणिक मेहनतीला मनःपूर्वक सलाम.
    अशीच संगीत क्षेत्रातील सेवा तुझ्या हातून घडो यासाठी शुभेच्छा.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद विद्याताई ... तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत त्यामुळेच यशाचा मार्ग सुकर झाला आहे . अशाच शुभेच्छा आणि आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏

      Delete
  6. निशब्द.. तुझ्या लेखणीला खरंच सलाम 👏👏 विश्वविक्रमाचा प्रपंच वाचून आम्ही धन्य झालो एव्हढी सगळी धडपड करायला खरोखर जिद्द, चिकाटी, अणि मेहनत लागते पण त्याचं फळ म्हणजे यश आणि ते सिद्धी ने मिळवलं हे तिचं तर शंभर टक्के आहेच पण आई म्हणून तुझाही तेव्हढाच वाटा आहे आणि अर्थातच it's team work सगळ्यांसाठी पुन्हा एकदा जोरदार 👏👏 सिद्धी तुला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 🌹💐

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद ताई ... तुम्ही नेहमीच अगदी मनापासून आमचं कौतुक करत असता ... असंच प्रेम सदैव राहू द्या 🙏

      Delete
  7. केवळ अप्रतिम! सिद्धीला मिळालेले यश म्हणजे तिचे कष्ट आणि तिच्या आईबाबांचे योग्य मार्गदर्शन ह्याचे प्रशस्तिपत्रक आहे. सिद्धीचे खूप कौतुक, लहानपणापासून तिचे सातत्य आणि चिकाटी ह्यामुळे आज देशाबाहेरही तिने स्वतः चे एक स्थान निर्माण करून स्वतः बरोबर देशाचे नावही उंचावले आहे. लेखही अगदी विस्तृत वर्णन केला आहे, त्यामुळे संपूर्ण चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद ग ... तू तिला अगदी जन्मापासून बघितलं, वाढवलं आहेस त्यामुळे तुला वाटणारा आनंद, कौतुक हे निश्चितच खूप जास्त आहे.❤️🙏

      Delete
  8. संगीताच्या सुरांमध्ये गुंफली होती एक कथा,
    दहा तासांच्या वादनाने पार केली होती सीमा
    रामायण, राग, गाणी, पद्य, चालीसा
    वादन प्रयत्नात, हरवली काळाची रेषा

    धृव गडगडून गाण्याच्या धारा,
    मेहनतीचे ते व्रत, विश्वासाची लहर
    दुःखाच्या छायेतून, हसरे चेहरे फुलले,
    संगीताच्या कलेत, सर्वजण उंचावले

    विक्रमासाठी अपील करण्यात, नवीन आशा जणू फुलवली,
    विश्वासाच्या नव्या सुरात, एक दिशा मिळाली
    संगीतसिद्धीच्या वाटेवर सिद्धी चालत गेली
    आशेच्या धारा, आई मनात सदैव प्रकट करत राहिली

    संगीताच्या सुरांनी मन धरलं,
    आसमंत वाद्यांनी धुंद भरलं
    एक सुंदर महोत्सव, काही तासांचा
    शब्दांनी, स्वरांनी त्याला जिंकलं।

    साक्षीदारांच्या सहवासाने, व्हिडिओचा तुकड्यांत समावेश,
    अनेक प्रश्नांची मनी होती गर्दी, परंतुउत्तर मिळाले मोहीमेस।
    प्रयत्नाने गाठले विश्वविक्रम, जो बहरला दृष्टीत
    संगीत आहे एकमेव साधना जणू सर्व सृष्टीत


    साक्षीदार, कागदपत्र, व्हिडिओ आणि फोटो जणू बोलत होता
    सर्वांनी दिलं योगदान, श्रमांचा नवा प्रवाह वाहत होता
    गाणी वाजली, रागांची वर्तुळं साधत गेली
    प्रयत्नांच्या पावलांवर प्रगतीची एक रेखा ठरली


    विश्वविक्रमाचा संकल्प केला
    संकल्पाने दिली ती जिद्द, आशा, प्रेरणा
    खूप शुभेच्छा, यश मिळत राहो ही भावना
    संगीताच्या आवाजात सत्याची एक लय भेटली
    शीतलताई च्या मेहनतीने सिद्धी विश्वविक्रम करू शकली....

    ReplyDelete
    Replies
    1. अग कित्ती छान लिहिलं आहेस सिद्धाली ... तुझ्या लेखणीला आणि आमच्यावरच्या प्रेमाला सलाम 🙏
      मनःपूर्वक धन्यवाद

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

Walkathon : एक आनंदानुभूती

गूंजे बनकर देस राग 🇮🇳

सेवा परमो धर्म: ।