लंडनवारी - भाग ६ (अंतिम भाग)
लंडनवारी - भाग ६ (अंतिम भाग)
कला क्रीडा संस्कृती
हल्ली आपलं आयुष्य घड्याळाच्या काट्याला बांधलंय असं म्हणतात ते काही खोटं नाही. लंडनमध्ये जागोजागी मोठ-मोठी आणि विविध प्रकारची घड्याळं बघायला मिळतात. ही घड्याळे शहराच्या सौंदर्यात भर तर घालतातच, पण यातून दिसून येतो तो ब्रिटिशांचा वक्तशीरपणा. म्हणजे घरातून माणूस वेळेत निघाला तरी रस्त्यात त्याला उशीर होऊच नये म्हणून कुठेही बघितलं तरी घड्याळ दिसावे अशी सोय करून ठेवली असावी असा समज मी करून घेतलाय. Big Ben ला फोटोस्पॉट जरी मानला तरी इतरत्र, अवतीभवती खूप छान छान घड्याळांचं दर्शन होतं जे खरोखर मनाला भुरळ घालतं.
ब्रिटिश माणूस सकाळी लवकर उठतो, त्याच्या त्याच्या मार्गाने कामाला जातो, संध्याकाळी वेळेत घरी येतो आणि सगळं काही आवरून लवकरच झोपी जातो. इथली बहुतांश सगळीच दुकानं, मॉल्स साधारणपणे आठच्या दरम्यान बंद होतात. याला अपवाद मात्र शुक्रवार आणि शनिवारची संध्याकाळ... हे लोक शुक्रवारी संध्याकाळीच ऐश करायला सुरुवात करतात, मग त्यांना त्यात कसलंही वावडं नाही. सगळेच बार, पब्ज या ठिकाणी रंगतदार पार्ट्या सुरू असतात. त्या अगदी उशिरापर्यंत चालतात, पण रविवारी संध्याकाळी वेळ वाया न घालवता हे लोक सोमवारची तयारी सुरू करतात हेही मला विशेष वाटले.
यांच्या वक्तशीरपणाचं अजून एक कारण असावं असंही वाटतंय. सकाळी साडेसहा ते साडेनऊ आणि दुपारी चार ते सात या वेळात peak hours म्हणून ट्यूबचं तिकीट जास्त असतं. तर हे लोक सकाळी साडेसहाच्या आधीच कार्ड टॅप करतात आणि कामाच्या ठिकाणी वेळेत किंवा वेळेच्या आधीच जाऊन पोहोचतात.
ट्यूब ... या शब्दाबद्दल खूपच ऐकलं होतं मी लेकीकडून ... तर ही ट्यूब म्हणजे आपली मेट्रो हो ... फक्त इथे या ट्यूबच्या विविध लाईन्स आहेत (ज्यांनी कुणी दिल्ली मेट्रो अनुभवली असेल त्यांना हे सहजी झेपेल) ... मेट्रोपॉलिटन लाईन, ज्युबिली लाईन, एलिझाबेथ लाईन, बेकर लू लाईन, डिस्ट्रिक्ट लाईन, पिकॅडिली लाईन अशा विविध मार्गांवरून ही ट्यूब धावते. जरी प्रचंड महाग असली तरी खूप सोयीची आहे. या ट्यूबच्या माध्यमातून आपल्याला कुठूनही कुठेही जाता येते. अक्षरशः ट्यूबचं जाळं आहे लंडनमध्ये. या ट्यूबचं हे एकशे साठावं वर्ष आहे, जागोजागी ते फलक झळकताना आपल्याला दिसतात.
म्हणजे जेव्हा हे लोक आपल्यावर राज्य करत होते तेव्हापासूनच यांच्या देशात ही ट्यूब धावतीये की. आपल्या पैशानेच तर नाही त्यांनी हे सगळं साम्राज्य उभं केलं ... असा विचार माझ्या मनात डोकावून गेलाच. मनातल्या मनात आपल्या मेट्रोचं दहा वर्षांनंतरचं चित्र मी रेखाटलं आणि प्रचंड सुखावले. खरोखरच सार्वजनिक वाहतूक ही जेव्हा अगदी सुरळीत होईल आणि सगळेजण त्याचा पुरेपूर वापर करतील तेव्हा अनेक प्रश्न आपोआप सुटतील हे अगदी खरंय.
या खेरीज यांची बस सेवा सुद्धा खूपच छान आहे जेव्हा काही कारणाने ट्यूब बंद असते तेव्हा त्या मार्गावरील बससेवा फुकट असते आणि हे त्या त्या बसस्टॉपवर लिहून देखील ठेवलेले आहे हेही मला विशेष वाटले. Priority seats आहेतच आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा होते. व्हीलचेअर किंवा बाळाची बग्गी सहजगत्या आपण ट्यूबमधून किंवा बस मधून नेऊ शकतो. अरे हो .... एक सांगायचं राहिलंच की ... इथे पाच वर्षांपर्यंतची मुलं बग्गीत बसून जातात, रस्त्याने चालत नाहीत हे मात्र मला जरा अजबच वाटलं. आईच्या कडेवरचं बाळ क्वचितच दिसलं. सगळी बाळं निवांत बग्गीत झोपलेली, जागी असतीलच तर निवांत इकडे तिकडे बघणारी ... ही पोरं हट्टबिट्ट करत नाहीत की काय ? कशी काय इतकी चुपचाप इकडून तिकडे जातात ? आणि आईच्या बरोबरीने यांचे बाबादेखील बाळाला छान सांभाळतात (हल्ली आपल्याकडे पण हे दिसायला लागलं आहे म्हणा) इत्यादी फुटकळ पण महत्त्वाचे प्रश्न माझ्या मनात डोकावलेच. मी उगाचच काही बाळांकडे बघून हसले, त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. काहींनी प्रतिसाद दिला, काहींनी दिला नाही. एका अत्यंत गोंडस बाळाचा फोटो मी काढला असता त्याच्या वडिलांनी येऊन मला तो फोटो माझ्या मोबाईलमधून त्यांच्यासमोर डिलीट करायला लावला. म्हणजे आपल्या बाळाला उगाच दृष्ट वगैरे लागायला नको असा विचार यांच्या मनात आला असावा, कारण माझ्या चेहऱ्यावरून त्या फोटोचं मी काही वेगळं करेन अशी तर नक्कीच वाटत नाही अशी समजूत मी स्वतःच करून घेतली आणि प्रवासाची मज्जा घ्यायला लागले.
लंडनची डबलडेकर सुद्धा अगदी फेमस ... यामध्ये कंडक्टर नावाचा माणूस नाहीच ... पुढच्या दारातून रांगेत चढायचं आणि आपलं कार्ड टॅप करायचं (जर तुम्ही लंडन शहराच्या बाहेर प्रवास करत असाल तर कार्ड टॅप करून आपल्याला हव्या त्या ठिकाण तिकीट ड्रायव्हरकडेच मागायचं) ... आपल्याला जिथे उतरायचं आहे ते ठिकाण आलं की आपल्या समोरचं बटण दाबायचं, ते दाबलं की ड्रायव्हरला संकेत मिळतो की आता आपण गाडी थांबवायची. तो गाडी थांबवतो आणि आपण मागच्या दाराने उतरायचं. सगळा व्यवहार कॅशलेस, त्यामुळे सुट्टे पैसे देण्याची भानगडच नाही. एकटा ड्रायव्हर सगळी बस व्यवस्थित मॅनेज करतो. ही लंडनची डबलडेकर मला भलतीच आवडली बुवा. रस्त्याने गाडी चालवायचे नियम सुद्धा कडक आहेत आणि चक्क ते सगळे पाळतात देखील. नाही पाळले तर लगेच गाडीच्या नावावर तिकीट येतं आणि भला मोठा दंड आकारला जातो. भीक नको कुत्रा आवर त्यासारखं दंड नको शिस्त पाळू अशी म्हण ब्रिटनमध्ये रूढ असावी बहुतेक. (बसमधला एकही फोटो काढला नाही)
Winter Wonderland ... बोली भाषेत सांगायचं तर लंडनची जत्रा ... Hyde Park मध्ये भरलेली ही प्रचंड मोठी आणि महाग जत्रा बघितल्याशिवाय तुमचा नोव्हेंबर- डिसेंबर महिना संपूच शकत नाही. मग आम्ही तरी या नियमाला अपवाद कसे बरे ठरावे ? एके दुपारी, जेव्हा संध्याकाळ सारखे वातावरण होते तेव्हा आमची स्वारी या जत्रेसाठी रवाना झाली. नियमानुसार सर्वत्र बघितल्यानंतर एक-दोन खेळांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन झाला. पोटोबा आणि फोटोबा सुद्धा झाला. ही जत्रा बघताना स्पष्ट जाणवत होतं की माणूस जगाच्या पाठीवर कुठेही राहू दे, त्याला करमणूक ही आवडतेच आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायची त्याची तयारीसुद्धा असते. वारेमाप पाउंड खर्च करून आम्ही ही जत्रा अनुभवली आणि एक गिफ्ट घेऊन घरी आलो. नोव्हेंबर महिन्यात अजून भयंकर थंडी पडत नसल्याने आम्ही हा अनुभव घेतला असा माझा गोड गैरसमज होता कारण डिसेंबरात थंडीची तमा न बाळगता माझी लेक तिच्या वेगळ्या दोन ग्रुप्स बरोबर पुन्हा इथे जाऊन आली. पुन्हा मनातल्या मनात दोन संस्कृतींची तुलना केली गेलीच आणि त्यात प्रचंड साम्य आढळले. विविध स्टॉल्स, वेगवेगळी खेळणी, आनंद, उत्साह, मनाला आकर्षून घेणाऱ्या दिव्यांचा झगमगाट, मेलेमे खो जाना वगैरे गोष्टी अगदी जशाच्या तशा वाटल्या. मानवी स्वभाव यत्र तत्र सर्वत्र सारखाच ही भावना मनाला चाटून गेली.
विम्बल्डन ... ज्या मॅचेस टीव्हीवर बघत आपण लहानाचे मोठे झालो ते ठिकाण प्रत्यक्ष बघायला मिळणार ही कल्पनाच मुळी अत्यंत सुखावह होती. सेंटर कोर्ट बघितल्यानंतर तर डोळ्याचं अक्षरशः पारणं फिटलं. लंडनमध्ये स्टेडियमची टूर करणे हा अत्यंत छान अनुभव असतो. जुन्या प्रसिद्ध खेळाडूंच्या विविध चित्रफिती येथे जपून ठेवलेल्या आहेत. हे खेळाडू कुठले कपडे घालायचे, कुठले बूट वापरायचे ते देखील प्रदर्शनात मांडलेलं आहे. भान हरपून ते सगळं आम्ही बघितलं. यावेळी केवळ विम्बल्डनची टूर केली. पुढच्या वेळी गेल्यावर वेम्बलीमधलं फुटबॉल स्टेडियम, क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स या टूर करायचा मानस आहे.
कार्डिफ ... लेकीच्या एका कॉन्सर्टच्या निमित्ताने कार्डिफला जाण्याचा योग आला आणि त्यामुळेच एक सुंदर प्रवासही घडला. रेल्वेतून गाडीतला उतरल्यावरच तिथल्या निसर्गरम्य वातावरणाने मनाला भुरळ घातली पण रेल्वे स्थानकावरचे बोर्ड इंग्रजीखेरीज अजून एका वेगळ्या भाषेत लिहिल्याचे जाणवले.
विचार सुरू होता तोवरच आम्हाला घ्यायला नियोजित गाडी आली आणि तिच्यात बसून आम्ही मार्गस्थ झालो. तिथे गेल्यावर लगेचच सगळा उलगडा झाला आणि गुगल गुरूंशी तपासून बघता हे सगळं खरं असल्याचं हे जाणवलं. कार्डिफ नावाचं शहर म्हणजे युनायटेड किंगडम मधल्या वेल्स नावाच्या देशाची राजधानी आणि इथे वेल्श नावाची भाषा बोलली जाते, स्थानिक अभ्यासक्रमात ती शिकवली देखील जाते. तिथला मुख्य खेळ रग्बी. याच्या विविध मॅचेस तिथे खेळवल्या जातात. माझ्या ओळखीचे काही जण कार्डिफमध्ये राहतात, त्यांनी मागच्या वर्षी आम्ही लंडनला जातोय असं सांगितलं होतं. ते आठवून सहजच मनात आलं की मँचेस्टरवाले लंडनमध्ये राहतो म्हणतात इतपत ठीक आहे, इथे तर वेल्स या देशाची राजधानी असलेल्या कार्डिमध्ये राहणारे लोक सांगतात की आम्ही लंडनमध्ये राहतो. इंग्लंड, वेल्स, स्कॉटलंड, नॉर्दन आयर्लंड या चार देशांनी मिळून बनते ते युनायटेड किंगडम. पूर्वी हा देखील युरोपाचा हिस्सा होता. सध्या त्यांचा ब्रेक्झिट झालाय. आता भूखंड तर उचलून बाजूला ठेवता येत नाही त्यामुळे केवळ नियमच बदलले त्यामुळे ब्रेक्झिट हा शब्द अस्तित्वात आला असावा. ब्रेकअप आणि एक्झिट या दोन्हीचा हा मिलाफ. हा ब्रेक्झिट होण्यामागची अनेक कारणं स्थानिक लोक सांगतात. याआधी म्हणे युरोपातून अनेक लोक इंग्लंडमध्ये यायचे आणि तळ ठोकून राहायचे. इथे येण्यासाठी त्यांना व्हिसा लागत नसल्याने ते सहज येऊ शकायचे आणि थोडे दिवस राहिल्यानंतर ब्रिटनच्या नियमाप्रमाणे त्यांना पेन्शन सुरू व्हायची. याने म्हणे ब्रिटनची आर्थिक स्थिती नंतर खालावली आणि त्यांनी ब्रेक्झिटचा निर्णय घेतला. आता या निर्णयाचा तोटा असा झालाय की जी मालवाहतूक पूर्वी सहज शक्य होती, आता त्यासाठी देखील वेगळे नियम आणि कर लागू झालेत. ब्रिटन मधला माणूस अगदी हाकेच्या अंतरावर फ्रान्स किंवा इटली असताना तिथे फिरायला सहजी जाऊ शकत नाही, तर त्यासाठी त्याला व्हिसा काढावा लागतो. चालायचंच ... एखादा निर्णय घेतला की त्याचे फायदे तोटे बघून तो निर्णय बरोबर होता की चूक हे कळायला पाच पंचवीस वर्षे तर जावी लागतीलच ना ... घालवोत बापडे त्यांची वर्षं ... आपण काय पाहुणे म्हणून आलो, चार दिवस पाहुण्यासारखं राहू, इकडे तिकडे फिरू, मौजमजा करू आणि निघून जाऊ .... असा विचार करता करता माझ्या लंडनच्या निवासातले दिवस संपत आले आणि निरोपाचा क्षण आलाच ... लेकीला घरीच निरोप दिला आणि कॅबने विमानतळाकडे मार्गस्थ झाले. लंडनला जाताना मी एकटी असतानाही विमानातसुद्धा बरीच मजा केली होती पण आत्ता येतानाचा प्रवास मला खूप कंटाळवाणा होत होता. वेळ संपता संपत नव्हता. घड्याळ जणू थांबले होते. मी विचार करत होते की असं का होत असेल बरं ? उत्तर मिळालं.... मला घरचे वेध लागले होते. मुंबई विमानतळावर उतरले आणि तो वारासुद्धा माझं स्वागत करतोय असं वाटलं. गड्या आपला गाव बरा हेच खरं .... पण माझी लेक तिकडे असल्याने मी पुन्हा लंडनला जाणार आहे, जे जे बघायचं राहिलं ते बघणार आहे, भरपूर फोटो काढणार आहे आणि हो असेच ब्लॉगसुद्धा लिहिणार आहे ... सर्व वाचकांचे मनापासून आभार ... हा ब्लॉग लिहायला तब्बल महिनाभर उशीर झाला आहे, तरी गोड मानून घ्या. आठवेल तसं तसं लिहायचा प्रयत्न केला आहे ... सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार आणि ही लंडनवारी सुफळ संपूर्ण .... धन्यवाद 🙏
समाप्त
# कला क्रीडा
# जत्रा
# वेळ
शीतल कापशीकर
२८ डिसेंबर २०२३
Comments
Post a Comment