छोटीशी सफर साऊथ ईस्ट आशियाची

छोटीशी सफर साऊथ ईस्ट आशियाची

अमक्या तमक्याच्या कुंडलीत परदेशगमन योग आहे हे वाक्य ऐकून किंवा रोजचे राशीभविष्य या सदरात परदेशगमन योग आहे हे वाचून मला गेली कितीतरी वर्षं एक वेगळंच काहीतरी वाटायचं. हा योग माझ्या कुंडलीत कसा आणता येईल हा विचार शेकडो वेळा केला मी ... त्यापूर्वी अनेकदा माझ्या राशिभविष्यात हे भाकीत मी वाचले होते बरं का !! पण मार्च २०१९ मध्ये ग्रहताऱ्यांनी बरेच काही खेळ केले असावेत कारण हा योग आता माझ्या केवळ कुंडलीतच नव्हे तर आयुष्यात आला होता. २०१८ नोव्हेंबरमध्ये मी आदिनाथ टूर्स, रावेतमध्ये वीणा वर्ल्ड कडून सिंगापूर, मलेशिया, थायलंड ही दहा दिवसीय टूर बुक केली आणि ठरवलं गणपती बाप्पा कसा आपल्याकडे दहा दिवस पाहुणा म्हणून मुक्कामी येतो आणि आपले सगळे लाड पुरवून घेतो तसे मी आता माझे स्वतःचे लाड करून घेणार होते. यथोचित शॉपिंग, ट्रीपची मित्रमंडळी- नातेवाईक यांच्यात भरपूर प्रसिद्धी (फक्त बॅनर लावणे बाकी होते) ... रजा मंजूर करून घेणे वगैरे सोपस्कार झाल्यावर अस्मादिकांचे कुटुंब मुंबई इंटरनॅशनल विमानतळावर दाखल झाले, तत्पूर्वी व्हिसा, करन्सी बदलणे कार्यक्रम वीणा वर्ल्डच्या सौजन्याने सहज पार पडला होता. तेव्हा सुहास्य वदनाने आमच्यासारख्या अनेकांचे स्वागत झाले आणि हेच ते आपले दहा दिवसांचे कुटुंब हे माझ्या लक्षात आले. यांच्यासोबत पुढचे दहा दिवस एक वेगळे आयुष्य आपण अनुभवणार आहोत या विचाराने सगळ्यांशी जुजबी ओळख करून घेत आम्ही चेक इन वगैरे गोष्टी केल्या आणि मुंबईचे टर्मिनल 2 बघत असतानाच विमानाची वेळ झाली. निर्धारित वेळेला विमानाने टेक ऑफ केल्यानंतर परदेशगमन योग सुरू झाल्याची पक्की खात्री पटली. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुसऱ्या दिवशी पहाटे साखरझोप चालू असतानाच पाच वाजता (जेव्हा सिंगापूरमध्ये लख्ख उजाडले असून चक्क साडे सात वाजले होते कारण आपल्या दोन देशांच्या प्रमाणवेळेत अडीच तासांचा फरक आहे) सिंगापूरच्या आलिशान चंगी एअरपोर्टवर येऊन पोहोचलो.  आमची सुकन्या चक्क अडीच तास झोप बुडाली ही कटकट न करता आई बघ ना किती भारी वाटतंय बाहेर असं म्हणाली तेव्हाच मला ही ट्रीप मस्त होणार हे मनोमन जाणवलं. एअरपोर्टवरच फ्रेश होऊन सुरू झाला आमच्या या ट्रीपचा पहिला दिवस.
२९ मार्च - इमिग्रेशन अगदी पटकन पार पडले (रांगेचा फायदा सर्वांना या अर्थाच्या वाक्याला चक्क सगळे फॉलो करत होते , एकेकजण रांगेतूनच घुसखोरी न करता भरलेला फॉर्म, पासपोर्ट, बोटांचे ठसे वगैरे गोष्टी व्यवस्थित करत होते) , अर्ध्या तासात फ्रेश होऊन आम्ही बसलो तोच आम्हाला आणायला आलेली बस आणि सिंगापूरचा लोकल गाईड रिचर्डने आमचे स्वागत केले. एअरपोर्टवरून बाहेर पडताना एखाद्या बागेतून तर आपण हिंडत नाहीये ना असा सर्वत्र भास होत होता इतकी छान झाडे होती दुतर्फा. रिचर्ड आणि आमचा टूर मॅनेजर सुनील दादा (जो सगळ्यांचा बेस्ट फ्रेंड झाला होता इतक्या कमी अवधीत) आम्हाला माहिती पुरवत होते की आता आपण कसे कुठे जाणार आहोत वगैरे पण सर्वांचे लक्ष बाहेरच होते, रस्ते - शिस्तबद्ध रहदारी, पॉश बिल्डिंगा, तरीही निसर्गसौंदर्य (भलेही ते कृत्रिम असो, जाणीवपूर्वक तयार करण्यात आलेले पण अतिशय लक्षवेधी आणि सुंदर) बघण्यात आम्ही मग्न होतो. सिंगापूरची सिटी ओरिएंटेशन टूर करताना Suntec City, Fountain of Wealth (ज्याला तीन प्रदक्षिणा घातल्या की मनातील सगळ्या इच्छा म्हणे पूर्ण होतात), City Hall, Orchard road, Swissotel the Stamford - सिंगापूर मधील सगळ्यात उंच हॉटेल, Parliament House बघत असताना, त्याबद्दल माहिती ऐकत असतानाच बस थांबली. पार्क रॉयल हॉटेल - जिथे जनरली अनेक टूरिस्ट गाड्यांचा पिक अप पॉईंट असतो ती जागा लक्षात ठेवा असे सुनील दादा म्हणाला आणि आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये शिरलो. चक्क साऊथ इंडियन ब्रेकफास्ट ! डोसा , इडली, कॉफी अशी भरपेट पोटपूजा झाल्यानंतर आम्ही सिटी टूर करायला तनमनाने सज्ज झालो. आणि जाऊन पोहोचलो बोट राईडसाठी. त्या बोटीतून आम्ही सिंगापूर पाहिले आणि Merlion पार्कपाशी उतरलो. हा Merlion जो सिंगापूरची राष्ट्रीय निशाणी आहे (त्यांचा राष्ट्रीय प्राणी सिंह) त्याचे काम चालू होते. अरेरे !!! आता आपले फोटोग्राफीचे स्वप्न अर्धवट राहणार की काय, हा विचार करत असतानाच Baby Merlion दिसला आणि दुधाची तहान ताकावर भागली (पुढे sentosa सफरीत Papa Merlion देखील पाहिला बरं का) 
हे सगळे डोळ्यात, मनात साठवून आम्ही हॉटेलच्या दिशेने प्रस्थान केले (तत्पूर्वी जेवलो - आज ब्रेकफास्ट आणि जेवणात दोन देशातल्या time difference मुळे फार कमी अंतर होते, असो.) Orchard Rendezvous मध्ये आम्ही प्रवेशलो आणि थोडासा आराम करून, फ्रेश होऊन नाईट सफारीसाठी निघालो. ही सफारी म्हणजे जंगलातून एक भन्नाट ट्राम राईड होती. आरामात ट्राममधून आम्ही दोन्ही बाजूंना वेगवेगळे प्राणी बघत होतो. त्यानंतर Ulu Ulu या जंगलातीलच रेस्टॉरंटमध्ये बढिया डिनर झाल्यानंतर आम्ही एक प्राण्यांनी केलेला show बघितला ज्यात recycling चे महत्व प्राण्यांनी पटवून दिले. पहिला दिवस मस्त पार पडला आणि सगळे हॉटेलवर गेल्या गेल्या निद्रादेवीच्या आधीन झाले. तत्पूर्वी सगळे फोटो व्हाट्सएप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर अपलोड केले हे ओघाने आलेच. शास्त्र असतं ते !!!
३० मार्च - दुसरा दिवस उजाडला तोच मुळी वेक अप कॉलने. आज sentosa theme park ला जायला सगळे अगदी सुनील दादाने सांगितलेल्या वेळेत हॉटेलच्या लॉबीत हजर झाले होते. सगळ्यांनी ट्रीपसाठी स्पेशल शॉपिंग केले होते हे एव्हाना जाणवायला लागले होते आणि मी केलेल्या शॉपिंगवर नवऱ्याचे टोमणे बंद देखील झाले होते. भरपेट ब्रेकफास्ट करून (शाकाहारी असल्याने फळांवर अक्षरशः ताव मारून) आम्ही गाडीत बसलो. रस्त्याने जाताना सगळे लोक सिग्नल पाळतात, लेनच्या शिस्तीचे जरादेखील उल्लंघन करत नाहीत, झेब्रा क्रॉसिंगवर पादचाऱ्यांना खूपच मान देत क्रॉस करू देतात इथपर्यंत ठीक आहे पण जेव्हा दोन गाड्यांमधील समान अंतर ( मध्ये एक पूर्ण गाडी मावेल इतके - जेव्हा मी गाडी शिकले तेव्हा मला शिकविणाऱ्या माणसाने सांगितले होते तितके) बघून मला वेडच लागले आणि मनोमन मी सिंगापूर सरकारला सलाम ठोकला. आपल्याकडे पण काही वर्षात हे अपेक्षित आहेच त्यामुळे क्वचित देखील सिग्नल न पाळण्याची चूक करायची नाही हे मी मनोमन पक्के केले (तसेही चारचाकी चालवत असल्याने दुचाकीस्वार जेव्हा गाडी मध्ये घालतो तेव्हा होणारा सात्विक संताप लक्षात घेत मी दुचाकीसुद्धा व्यवस्थितच चालवते हो ) आणि एवढयात आमची आजची मंजिल समोर ठाकली. Sentosa Theme Park - मस्तपैकी cable car ride घेत आम्ही मंजिलपर्यंत पोहोचलो. तिथे छानपैकी luge ride चे थ्रिल अनुभवत पुन्हा एकदा open sky ride घेतली आणि पोहोचलो Madame Tussads wax museam मध्ये. तिथे विविध पुतळ्यांबरोबर (जे खरे आहेत असा आभास निर्माण होतो) खूप सारे फोटो काढून सुनील दादाने तीनदा बोलावल्यावर बाहेर पडलो आणि मस्त जेवण केले. नंतर आमची स्वारी निघाली Marina bay sands च्या Observation Deck कडे. त्या इमारतीच्या छप्पन्नाव्या मजल्यावर आम्ही काही क्षणात दाखल झालो.ओहोहो !! काय सुंदर सिंगापूरचा नजारा दिसत होता इथून. अगदी हलत्या डुलत्या चित्रसारखे सगळे दिसत होते (लेकीच्या भाषेत सांगायचे झाले तर वरून सगळ्या गाड्या विडिओ गेम मधील छोट्या गाड्यांसारख्या धावत होत्या) इतक्यात मला एक गोड जपानी मुलगा दिसला. मी त्याला छान hello, how r u वगैरे म्हणाले, तर पठ्ठा हसला देखील नाही, मी काय लेकराची जात म्हणून सोडून दिले तर त्याचे आई बाबा तीन तीनदा मला वाकून सॉरी म्हणाले. अजबच कारभार म्हणायचा हा. आम्हाला नाही हो झेपणार इतका गोडपणा. पुन्हा एकदा फोटोसेशन झाल्यानंतर आमचा मोर्चा Gardens by the bay - Flower dome कडे वळला. नेत्रदीपक अशी फुलांची सजावट, जपानी पद्धतीने केलेली रचना वगैरे गोष्टी लक्षवेधी होत्या. हे सगळे बघून आम्ही मुस्तफा दरबार या शॉपिंग मॉल मध्ये गेलो. आता आपल्याकडे मॉल संस्कृती वाढीस लागली आहे (दहा एक वर्षांपूर्वी मुस्तफा दरबार हे भारतीयांसाठी आकर्षणाची गोष्ट होती म्हणे) हा मुस्तफा दरबार म्हणजे आपल्याकडील D Mart, Big Bazzar चा मोठ्ठा भाऊच. विशेष शॉपिंग न करता आम्ही गुपचूप जेवलो आणि हॉटेलवर जाऊन झोपलो (त्याआधी फोटो सोशल मीडियावर अपलोड केले हे वेगळे सांगायला नकोच)
३१ मार्च - तिसरा दिवस उजाडला तोच मुळी स्वप्नपूर्तीसाठी. युनिव्हर्सल स्टुडिओ भेट (याचसाठी केला होता अट्टाहास !) लेकीच्या मनातील या ट्रीपमधील सगळ्यात मोठ्ठं आकर्षण. कालच सुनील दादाने sentosa हून निघताना उद्या सकाळी पुन्हा याच पार्किंगमध्ये यायचं आहे असं सांगितलं होतं तेव्हा जाम खुश झाली होती बया. आज तिचे हे स्वप्न पूर्ण होणार होते आणि तिचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्याचे तिच्या बाबाचे स्वप्न देखील. रिचर्ड तिकीट काढून आणेपर्यंत आम्ही मनसोक्त फोटोग्राफी केली आणि मग आत प्रवेशलो. भारी ! एक नंबर ! एकदम कडsssक  वगैरे शब्दांचा महापूर वाहत होता. सुनील दादाने कुठली ride आधी करा , कुठले show किती वाजता वगैरे मार्गदर्शन केल्यानंतर आम्ही आता एकेक ride साठी निघालो. Revenge of Mummy, Transformer Ride, Flyer, human  व cylon असे दोन रोलर कोस्टर, Madagascar, Seasame ride, water show, 4 D show, hollywood show, ज्युरासिक पार्क मधील विविध rides करत (मध्ये मध्ये खात पीत) आम्ही मजा करत होतो. मिनियन वर्ल्ड तर निव्वळ धमाल. त्यातून त्या सीसेम का कोणाचा पन्नासाव्या वाढदिवसाचे जोरदार सेलिब्रेशन चालू होते. खूप मजा आली. अकरा वाजयच्या सुमारास धुव्वाधार पाऊस पडला पण आमच्याकडे पोंचो/ पोंचू (आवडेल तसे उच्चारावे) असल्याने आम्ही ते घालून मस्त हिंडलो. पाऊस थांबल्यावर रस्ते चकाचक. कुठेही चिखल नाही, पाणी साचले नाही. चार वाजण्याच्या आसपास आम्ही S E A aquarium मध्ये गेलो आणि इतक्या प्रकारचे जलचर प्राणी पाहून अक्षरशः भान हरपले. या aquarium मध्ये प्रवेश केल्याबरोबर सिंगापूरचे जुन्या काळातील आठवणींचे छोटे संग्रहालय बघत एका show पाशी जाऊन पोहोचलो (हा show न बघता डायरेक्ट aquarium बघायला जाऊ असं लेक म्हणत असतानाच आलो आहोत तर हे पण बघूनच जाऊ असं नवरा म्हणाला आणि त्याचा निर्णय योग्य ठरला. खरंच तो show अगदी अफलातून होता. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे आपण खूप खोल समुद्रात पोहोचलो आहोत असा भास निर्माण केला गेला आणि पूर्ण प्लॅटफॉर्म खरोखरच खाली गेला. दार उघडले तर बाहेर aquarium. निव्वळ अप्रतिम. आईस्क्रीमची मजा लुटत आम्ही aquarium पाहिले. बाहेर आलो तर आता मोनोरेलची राईड आमची वाट बघत होती. आम्ही पोहोचलो बीच स्टेशनला. आणि इथे पाहिला Spectacular light & water show - 'Wings of Time'. कमाल होता हा show तर. डोळ्याचे पारणे फिटले अक्षरशः. या आठवणी मनात आणि मोबाईल, कॅमेऱ्यात साठवत जेवून हॉटेलवर परतलो. राहून राहून मनात विचार येत होता की इतका छोटुकला देश पण कमालीची शिस्त, स्वछता. याचे कारण आमच्या स्थानिक गाईड रिचर्डने दिले, ते म्हणजे इथे जरा चूक झाली की मोठा दंड वसूल करतात. त्यामुळे दंड होऊ नये यासाठी सगळे जण खबरदारी घेतात. इथल्या सर्व नागरिकांना सैन्याचे दोन वर्षे प्रशिक्षण दिले जाते (त्यामुळे आपोआप स्वयंशिस्त लागते) व नंतर ते ठरवू शकतात की सैन्यात भरती व्हायचे की अन्य नोकरी-धंदा करायचा ते. मला खूपच भावले हे. त्यामुळे देशाबद्दलची अस्मिता जागी होते व आपोआप शिस्तपालन होते. खरं तर या देशाकडे स्वतःची शेती नाही, पाणी नाही. ते त्यांना मलेशियाकडून घ्यावे लागते. पण विचारांची झेप जबरदस्त ! सतत तंत्रज्ञान अद्ययावत कसे राहील ह्यावर लक्ष. मलेशियापासून वेगळे झालो आहोत तर स्वतःचे अस्तित्व टिकवायची धडपड, प्रगत देशांशी स्पर्धा करत स्वतःची प्रगती कशी होईल याचा अभ्यास यामुळेच हा देश आज या स्थानावर आहे. सिंगापूरच्या पासपोर्ट धारकांना कित्येक देशात जाण्यासाठी व्हिसा लागत नाही हे त्यांनी मिळविलेले मोठे यशच. सिंगापूरच्या पंतप्रधानांनी स्वतःला बारा दिवस एका खोलीत कोंडून घेतले होते. केवळ विचार, विचार आणि फक्त विचार. आणि त्यातूनच निर्मिती झाली एका अत्यंत प्रगत राष्ट्राची .... हे सांगताना रिचर्डचा ऊर अभिमानाने भरून आला होता. जसा आपल्या पंतप्रधानांचे नाव जरी घेतले तरी आपला येतो तसा. इथे accidents चे प्रमाण कमी आहे, पण अगदीच होत नाहीत असे नाही. पण जागोजागी कॅमेरे बसवले असल्याने मदत ताबडतोब मिळते व जीव वाचू शकतो. सिंगापूर सरकारचे कायदे कानून फारच स्ट्रिक्ट बाबा. रस्त्यावरच्या गाड्या (इतकेच काय गाड्यांची चाके देखील) इतक्या स्वच्छ आणि चकाचक कशा हे पण एक कोडेच (उत्तर आपले नेहमीचेच - गाडी किंवा गाडीचे चाक अस्वच्छ असेल तर मोठा दंड पडतो) स्वतःचे वाहन घ्यायचे असेल तर नव्वद हजार सिंगापूर डॉलर (रुपयांमध्ये मोजायचे झाले तर साधारणपणे पन्नास रुपये म्हणजे एक सिंगापूर डॉलर)भरून परवाना काढावा लागतो जो केवळ दहा वर्षांसाठी मिळतो, कायमस्वरूपी नाही. वाटल्यास दहा वर्षांनी renew करावा, या शिवाय गाडीची कॉस्ट वेगळी आणि तीही भरभक्कम... कारण सगळ्या पॉश गाड्या. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट देखील वापरतात. या देशाला सलाम ठोकून माझ्या देशात पुढच्या काही वर्षात हे होणार याची खात्री बाळगत झोपून गेलो कारण उद्या पहाटे लवकर उठून मलेशियाला रवाना व्हायचे होते.
१ एप्रिल - सकाळी सकाळी ब्रेकफास्ट करून आम्ही मलेशियाला रवाना झालो. जाताना गाडीत झोपूया असे मनात ठरवले असून सुद्धा नजर मात्र सतत बाहेर होती. समृद्ध सिंगापूर सोडून जाववत नव्हते. Residential Area सोडून हमरस्त्याला लागलो तरीही तीच शिस्त होती. दुतर्फा आद्योगिक वसाहती होत्या त्यादेखील खूप मोठमोठ्या. तरीही कमालीच्या स्वच्छ, मालवाहतूक करणारे मोठे ट्रक पण खूप दिमाखात वावरून सिंगापूरची श्रीमंती दाखवत होते. हे सगळे डोळ्यात साठवत असतानाच निरोपाचा क्षण आला.... सिंगापूरमध्ये आमची साथ करणाऱ्या बस आणि गाईड रिचर्डला बाय बाय म्हणण्याचा. इथली इमिग्रेशन प्रक्रिया पार करून मधला केवळ एक पूल ओलांडून आम्ही मलेशियामध्ये प्रवेशलो. तिथले इमिग्रेशन झाल्यावर आम्हाला दुसरी बस आणि इथली लोकल गाईड ईश्वरी सुब्रमण्यम भेटली. ही मूळची दक्षिण भारतीय मुलगी पण आता मलेशियावासी. मलेशियामधील तिची ही चौथी पिढी. तिने आता तिच्या देशाबद्दलची माहिती पुरवणे सुरू केले. भारत आणि मलेशिया देशात बरेच साम्य आहे असे ती म्हणाली. दोन्ही देशांना ऑगस्टमध्ये स्वातंत्र्य मिळाले ते देखील ब्रिटिशांपासूनच. फक्त भारताला १९४७ मध्ये तर मलेशियाला १९५७ मध्ये. पुढे सिंगापूरने स्वतःला १९६५ मध्ये स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले. पण नैसर्गिक सुविधांसाठी सिंगापूर आजही मलेशियावर अवलंबून आहे. मलेशियातून नोकरीसाठी दररोज अनेक जण सिंगापूरला जातात तर सिंगापूरचे अनेक जण वीकएंड साजरा करायला मलेशियात येतात. मलेशियात मुख्यत्वे करून मुस्लिम लोकसंख्या जास्त आढळून येते. तरीही हा देश मुस्लिम नाही कारण या समाजाला मान्य नसणाऱ्या कॅसिनो वगैरे गोष्टी मलेशियात प्रचंड प्रमाणात आढळतात. अशी विविध प्रकारची माहिती घेत, थोडी झोप घेत, थोडेसे विविध गुणदर्शन सादर करत आम्ही पुत्रजया सिटीत येऊन पोहोचलो. मध्ये ब्रेकफास्ट व दुपारचे जेवण झाले होते. पुत्रजया सिटी ही kuala lumpur या मलेशियाच्या राजधानीत झालेल्या overload मुळे निर्माण केलेली सिटी. सगळी administrative offices केवळ पार्लमेंट वगळता पुत्रजया सिटीत ट्रान्सफर केली आहेत. तिथे I T Park जोरदार असल्याने या सिटीला सायबरजय सिटी असे पण म्हणतात. इथे अडकित्ता, कमळ, साप इत्यादी विविध आकाराचे स्ट्रीट लाईट रस्त्याची शोभा वाढवतात. पुत्रजया सिटी बघून आम्ही राजधानीत येऊन पोहोचलो. मस्त kuala lumpur सिटी टूर एन्जॉय केली. ट्विन टॉवर जवळ फोटोग्राफी करून आम्ही KL टॉवरवर गेलो. 
तिथे अठ्ठ्याऐंशीव्या
मजल्यावरून मलेशियाचे रुपडे न्याहाळले. रात्री VIVATEL हॉटेलवर परतून दोन देशांमध्ये उगाचच तुलना करत राहिलो. आकाराने सिंगापूरच्या पाचपट मलेशिया पण दोन्ही देशांची अदा निराळी... मलेशियाला निसर्गाचे अमाप वरदान तर सिंगापूर स्वकर्तृत्वाने प्रगत झालेला वगैरे वगैरे. दुसऱ्या दिवशी काय बघायला मिळणार ही उत्सुकता मनात घेऊन झोपून गेलो.
 एप्रिल - आज मोठ्या केबल कारने गेंटिंग हायलँड ला जायचे आहे हे पक्के लक्षात होते. तिकडे जाता जाता एका चॉकलेट outlet मध्ये गेलो (फॅक्टरी नव्हे बरं का मंडळी) आणि विविध चवी अनुभवल्या. शुद्ध शाकाहारी, अल्कोहोल विरहित परंतु जरा महाग असे चॉकलेट्स बघून मन आनंदित झाले. ज्याला जशी हवी होती तशी बऱ्यापैकी चॉकलेट खरेदी पण झाली. 
समोरच खास मलेशियामध्ये बनणाऱ्या बाटीकचे ड्रेस, टॉप्स, शर्ट्स, मटेरियल वगैरे बघितले. महाग असल्याने घेतले नाही. आणि गेंटिंग हायलँडच्या दिशेने निघालो. आज वातावरणात उष्मा होता पण तिथे थंडी असणार असे सुनील दादाने सांगितले होते. ६००० फूट उंचीवर जिथे जायला केवळ १५ मिनिटे लागतात कारण एवढया उंचीवरचे ३.५ किलोमीटर हे अंतर कापायला साऊथ ईस्ट आशिया मधील सगळ्यात longest आणि fastest cable car. आम्ही सगळे या केबल कार सफरीसाठी सज्ज झालो. पंधरा मिनिटांचा तो प्रवास... इतका वेळ हवेत तरंगल्याचा अनुभव... केवळ amazing. पाऊस असल्याने ढग खाली उतरले होते. एका चायनीज माणसाने केलेल्या या निर्मितीमागील गोष्ट तर खूपच स्फूर्तीदायी. इतक्या उंचीवर असे काही करता येऊ शकतो हा विचारच किती हटके. केवळ छत्तीस खोल्यांपासून सुरू झालेल्या आणि आता तब्बल सहा हजार पेक्षा जास्त खोल्या असणाऱ्या या फर्स्ट वर्ल्ड हॉटेलची नोंद विश्वविक्रम नोंदवणाऱ्या गिनेस बुक मध्ये आहे. अशी पाचेक हॉटेल्स आता या फॅमिलीची आहेत. तिथे खूपच व्हरायटी असणारे लंच घेऊन आम्ही कॅसिनो बघायला गेलो. अवाढव्य असा हा कॅसिनो चोवीस तास सुरू असतो. चायनीज लोकांना या कॅसिनोचे वेड जबरदस्त. या शिवाय ते राहूच शकत नाहीत. त्यांचे भविष्याबाबतचे अनेक ठोकताळे या जुगारातील हार जीत वर अवलंबून असतात म्हणे. अस्मादिकांच्या ज्ञानात खूपच भर पडली होती. ते सगळे एन्जॉय करून पुन्हा पंधरा मिनिटे केबल कार सफर अनुभवत खाली आलो आणि बटू केव्हसच्या दिशेने मार्गस्थ झालो. अत्यंत सुंदर असे कार्तिक स्वामींचे मंदिर (ज्याला दक्षिण भारतात मुरुगन म्हणतात) परदेशात बघून तृप्त झालो. व्यंकटेश, शंकर, गणपती आदी देवांची देखील मोठाली मंदिरे आसपास पाहिली. आता इथून आम्ही निघणार होतो. फक्त आजचीच रात्र मलेशियात, उद्या थायलंडला रवाना व्हायचे होते ना....
३ एप्रिल - आज भल्या पहाटे साडे चार वाजता उठून साडे पाच वाजता आम्ही एअरपोर्टला निघालो सुद्धा. सर्व फॉर्मलिटीज पूर्ण करून ईश्वरीला बाय म्हणत बँकॉकला जाणाऱ्या विमानात बसलो आणि दोन तासात बँकॉकला पोहोचलो. आता सिंगापूरला कमी झालेल्या अडीच तासांपैकी एक तास भरून निघाला.(भारत थायलंड प्रमाणवेळेत दीड तास फरक आहे) इथे आम्हाला खूपच गोड बोलणारी नॅटी भेटली. तिचे खरे नाव तिने सांगितले पण ते इतके मोठे आणि अवघड होते की नॅटी सोपे म्हणून तेच म्हणूया असे आम्ही पक्के केले. बसमध्ये बसून पटायाच्या दिशेने निघालो. इथे रस्त्याच्या दुतर्फा वायरांचे अक्षरशः जंजाळ होते. सिंगापूरच्या मानाने शिस्त पंचवीस टक्क्यांवर आली होती. वाटेतच प्रसिद्ध थाई फूड एन्जॉय करत आम्ही ग्रँड बेला या आमच्या निवासस्थानी येऊन पोहोचलो. आणि भर दुपारी आमचा उन्हाळ्याचा शीण घालवायला स्विमिंग पूल आमच्या मदतीला आला. समस्त पब्लिक (बच्चेकंपनी व त्यांचे मायबाप) पूलमध्ये उतरून उन्हाळा शीतल करत सिंगापूर, मलेशिया मधील राहिलेली स्विमिंग पुलाची हौस भागवून घेत होते. ती भागल्यानंतर पुन्हा रूमवर फ्रेश होऊन पटायातील फेमस Alcazar show बघायला निघालो. हा show म्हणजे एक इंटरनॅशनल कॅब्रे. खूप ढ्यांचीक... खरं तर मला बिलकुल आवडत नाही हे असं काही, पण हे काय आहे ते बघूया तरी असाही मोह आवरत नव्हता. हा एक थाई कल्चरल शो होता. ठीकठाक वाटला. सर्व मुली एकदम स्लिम ट्रिम, उत्तम मेकअप, music अप्रतिम, नेपथ्य लाजवाब. शो संपल्यावर सुनील दादाने या शोचे गुपित उघड केले. त्यात एकही मुलगी नव्हती. होते ते सगळे लेडी बॉय. बापरे ! इथे मुलींचे प्रमाण व त्यांना मिळणाऱ्या रोजगार संधी जास्त असल्याने अनेक मुले सर्जरी करून स्वतःचे रूपांतर मुलीत करून घेतात व अशा शो मध्ये भाग घेतात. गेली तीस वर्षे हा शो प्रचंड हिट आहे. सीझनमध्ये दिवसाला पाच पाच प्रयोग होतात. पटायामध्ये नाईट लाईफचे प्रमाण खूपच जास्त. दिवसा शांत वाटणारे रस्ते रात्री मात्र ओसंडून वाहतात. वॉकिंग स्ट्रीट या एरियात तर गर्दी लोटते. निव्वळ लोकांची, प्रवाशांची करमणूक करणे हे इथल्या लोकांचे उत्पन्नाचे साधन. विविध हॉटेल्स - रेस्टॉरंटमध्ये नोकरी करून, थाई मसाज, कल्चरल शो मध्ये भाग घेणे असेच उद्योग म्हणजे इथले उपजीविकेचे साधन. इथे इंग्रजांचे राज्य नव्हते त्यामुळे इथल्या लोकांचे english पण सो सो च. थाई भाषाच सर्वत्र बोलली जाते. इंग्लिश बोलले तरी थाई स्टाईलने. हेल काढून, हलकासा सूर लावून. जेव्हा व्हिएतनाम - अमेरिका युद्ध झाले होते तेव्हा हा देश तटस्थ होता पण अमेरिकन छावणीचा मुक्काम पटायामध्ये असताना इथले स्थानिक लोक सैनिकांचे मनोरंजन करत असत. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपण आपल्यातील हा कला गुणच रोजगारासाठी वापरू शकतो. व तिथून पुढे अनेक रोजगार संधी उपलब्ध करून घेतल्या. आता english ही universal भाषा असल्याने ती देखील शिक्षणात प्रचलित झाली आहे. काहीसे विषण्णपणे  समाजातील असे रूप देखील बघून आम्ही हॉटेलवर परतलो. थाई लोक कुठलेही काम असू द्या ते फारच झोकून देऊन करतात ही वृत्ती आठवत आजचा दिवस संपला.
एप्रिल - आजचा दिवस साहसी दिवस असणार हे सुनील दादाने कालच सांगितले होते. सकाळीच ब्रेकफास्ट करून आम्ही कोरल आयलंडकडे निघालो. किनाऱ्यावर एक स्पीड बोट आमची वाट बघत होती. तिच्यात सवार होऊन आम्ही एका बोटीवर गेलो जिथून आम्ही parasailing करणार होतो. लाईफ जॅकेट , कुठले कुठले पट्टे बांधून एका मागोमाग एक सगळ्यांनी हे धाडस केले. आम्ही बहुतेकांनी फक्त हवेतून पॅराशूटच्या साहाय्याने उडण्याचा आनंद लुटला पण आमच्यातील काही शूरवीरांनी deep sea हा प्रकार निवडला होता... यात हवेतून उडवताना मधूनच समुद्रात पूर्णपणे बुडवून आणतात. या शूरवीरांमध्ये माझा नवरा पण होताच. माझ्याशी लग्न करण्याचे साहस केल्यानंतर अशी छोटी मोठी साहसे त्याच्या दृष्टीने काहीच नाहीत म्हणे.
नंतर काहीजणांनी स्कुबा डायविंग - पाण्याखाली समुद्रात चालण्याचा आनंद अनुभवला (ऑक्सिजन नळ्यांच्या साहाय्याने) त्यानंतर आम्ही दुसऱ्या बोटीने कोरल आयलंडवर पोहोचलो. अहाहा ! काय ते पारदर्शक पाणी ! स्फटिकासारखे स्वच्छ ! तळ दिसत होता अगदी. असाच माणसाच्या मनाचा तळ दिसला तर .... उगाचच हा विचार मनात चमकून गेला. बनाना बोट राईड सारखे वॉटर स्पोर्ट्स बघत मनसोक्त पाण्यात डुंबण्याचा आनंद उपभोगला. एकेकाला धरून आणता आणता बिचाऱ्या सुनील दादाची दमछाक झाली. पुन्हा स्पीड बोटीत बसून आम्ही परतलो. हॉटेलवर येऊन मस्त झोपू हा मनातला विचार लेकीला कसा काय कळला कोण जाणे. ती लग्गेच उद्गारली ... आई आपण स्विमिंगला जायचे ग. इतक्या मोठ्या आयलंडवरून पूलमध्ये स्विमिंग बकवास वाटेल वगैरे सल्ले धुडकावून बच्चेकंपनी पुन्हा पाण्यात. संध्याकाळी आम्ही पटाया टॉवरकडे निघालो.  पंचावन्नाव्या मजल्यावरून पटाया बघत पटकन वरच्या मजल्यावर जम्पिंगसाठी गेलो. तीनपैकी कुठलाही प्रकार आपण निवडू शकता. केवळ रोपच्या साहाय्याने, दोघांच्या स्पीड शटलच्या साहाय्याने किंवा आठ जणांच्या ट्रॉलीच्या (केबल कार म्हणू शकतो) साहाय्याने आपण खाली येऊ शकतो. ती मजा घेत आम्ही खाली उतरलो. आज खूपच दमलो होतो. त्यामुळे आज आम्हाला थाई मसाज मिळणार होता. तब्बल एक तास ड्राय मसाज घेतल्यावर खरंच खूप बरं वाटलं. नंतर थोडा वेळ शॉपिंग साठी मिळाला. रात्री झोपताना नॅटीने शिकवलेल्या शब्दांची मनातल्या मनात उजळणी केली ... सवादीखा, सवादीखप, कोपनखा, कोपनखप इत्यादी... नमस्ते आणि धन्यवाद म्हणण्यासाठी थायलंडमध्ये असेपर्यंत हेच शब्द वापरायचे आम्ही नक्की केले होते आणि तसे वागलो देखील.
५ एप्रिल - आज सकाळी आम्ही पटायाला बाय बाय करत बँकॉककडे निघालो. जाताना वर्ल्ड फेमस जेम्स गॅलरी बघितली. डोळे दिपले इतकी रत्नं बघून. ती रत्नं घडविण्याची प्रक्रिया पण खूप भारी वाटली. यथोचित खरेदी करून आम्ही बाहेर पडलो. तिथून गेलो Nongnooch garden ला. तिथल्या स्पेशल थाई डिश म्हणजे तर मांसाहारी खवय्यांसाठी मेजवानीच. तिथे वाघासोबत फोटो काढण्यासाठी झुंबड उडाली होती. या वाघांना इंजेक्शन देऊन गुंगवले जाते आणि नंतर त्याच्यासोबत आपण फोटो काढू शकतो. थोडक्यात काय तर वाघाचं वाघपण संपवून त्याला फोटोसाठी सजीव दिसणारे निर्जीव मॉडेल बनवले जाते. तिथेच Elephant show , cultural show बघून ती गार्डन फिरलो. हत्ती हा इथला राष्ट्रीय प्राणी ... त्यामुळे त्याची शान आणि त्याला मिळणारा मान काही औरच.
आपण व्हाट्सएपवर जे स्माईली वापरतो ते सगळे पॉटरी गार्डनमध्ये होते. याखेरीज विविध आकार देखील होतेच. मनसोक्त फोटोग्राफी करून (वर्षभर dp ठेवायला पुरतील इतकी बेगमी करून) आम्ही आमच्या नियोजित हॉटेलवर म्हणजे Avani atrium कडे निघालो. तिथे जाऊन बरेचसे फोटो व्हाट्सएप स्टेटसला अपलोड करून उद्या काय असणार हा विचार करत झोपलो.
६ एप्रिल -  आज आमची बँकॉक सिटी टूर . सकाळी सकाळी हॉटेलच्या लॉबीत आलो आणि पाहिले तर आमच्या स्वागताला गुढी. आपला मराठमोळा नववर्ष सोहळा - गुढीपाडवा वीणा वर्ल्डने खूप छान साजरा केला. हळदी कुंकू - अक्षता वाहून, मनोभावे पूजा करून आम्ही आजच्या टूरसाठी सज्ज झालो. 
इथे अनेक बुद्धाची मंदिरे आहेत. इथला मुख्य धर्म बौद्ध. सोन्याची बुद्धमूर्ती असलेले मंदिर - Golden Buddha Temple एकदम भारी - साडे पाच टन सोन्याची भरीव मूर्ती. तिचे आपण फोटो काढू शकतो आणि चक्क कुठलीही सिक्युरिटी नाही. 
बापरे ! खूप भारी असे हे मंदिर बघून Reclining buddha बघायला गेलो. आडवी झोपलेली म्हणजे आराम करत असलेली ही बुद्ध मूर्ती खरंच खूप सुंदर होती. तिथून बाहेर पडल्यावर टुक टुक नावाचे (थांबलेले) वाहन आत बसून पाहिले. हे वाहन म्हणजे एक प्रकारची रिक्षा. चार्जेस फिक्स नसल्याने भरपूर बार्गेनिंग होते. तिथून गेलो शॉपिंगला. खरं तर आपल्याकडे सगळं काही मिळतं हे माहीत असताना देखील सगळ्यांनी भरपूर खरेदी केली. आज दुपारी चार वाजताच आम्ही हॉटेलवर परतलो होतो. दोनेक तासांनी क्रूझ पार्टीसाठी जायचे होते. मस्त तयार होऊन सगळे निघालो. क्रूझवर चेक इन केल्यानंतर वेगळा माहोल बनला होता. एक वेगळे विश्व सगळे जण अनुभवत होतो. हलक्या आवाजात सुरू असणारे संगीत सुरू असताना एकीकडे जेवण घेत होतो. आणि त्यानंतर रंगली झिंगाट पार्टी. हौशी कलाकारांनी आपली नाचण्याची हौस भागवून घेतली. ही आमची या टूरमधील शेवटची रात्र असल्याने वीणा वर्ल्डच्या वतीने केक कापून स्पेशल सेलिब्रेशन झाले. 
हे सगळे मनात साठवत असतानाच टूर संपायच्या कल्पनेने सगळ्यांचाच गळा दाटून आला होता. कोण कोण कुठून कुठून आले होते आमच्या ग्रुपमध्ये. मुंबई, पुणे, बडोदा, नागपूर, नाशिक. सगळ्यांचे routine वेगळे पण वीणा वर्ल्डने एका धाग्यात सगळ्यांना छान गुंफले होते. बरेचदा बोलताना सुनील दादा वीणाताईंबद्दल अभिमानाने सांगायचा. वीणाताई प्रोत्साहन देतात, सपोर्ट करतात त्यामुळे आम्ही टूर मॅनेजर उत्साहाने काम करतो वगैरे वगैरे. त्याने युरोप, जपान, चायना, दुबई वगैरे टूरची माहिती दिली तेव्हा या टूरसुद्धा करण्याची उत्सुकता मनाला लागून राहिली. ह्या आठवणी मनात साठवत असतानाच रात्र संपून टूरचा शेवटचा दिवस उजाडायला लागला होता.
७ एप्रिल - आज टूरचा शेवटचा दिवस. आज सफारी वर्ल्ड, सफारी झू एवढाच प्लॅन होता. सफारी वर्ल्डमध्ये डॉल्फिन शो, ओरांगउतान शो, सी लायन शो वगैरे बघत, अनेक पक्षी अंगावर घेऊन फिरत आम्ही ही दुनिया अनुभवली. 
झूमध्ये आम्ही गाडीत व सर्व प्राणी रस्त्यात (खरं तर जंगलात) हे ही खूप भारी वाटले. इथे तर वाघाच्या छोट्या बछड्याला आपण मांडीवर घेऊन बाटलीने दूध पाजू शकतो. हे आम्ही फक्त बघितले, try केले नाही. आता सगळ्यांना वेध लागले होते एअरपोर्ट जायचे. बँकॉकच्या सुवर्णभूमी एअरपोर्टकडे जात असतानाच सुनील दादाने झालेल्या ट्रीपची उजळणी घेतली. काही प्रश्न विचारून विजेत्यांना बक्षिसे दिली. मजा आली. एअरपोर्टवर पोहोचलो. नॅटीने सगळ्यांसाठी packed स्नॅक्स आणले. तिला बाय म्हणताना मन भरून आले होते, इतका जीव लावला तिने सगळ्यांना. एअरपोर्टवरील सर्व सोपस्कार पार पाडून एकदाचे विमानात बसलो आणि रात्री १२ वाजता मुंबई एअरपोर्टवर अवतरलो. आता प्रत्येकाला घरचे वेध लागले होते. सिंगापूरमध्ये आपल्याकडे हे नाही, ते नाही, इथे कसलं भारी आहे राव इत्यादी गप्पा मारणाऱ्यांच्या नजरेत आता वेगळीच चमक होती. ती होती आपल्या देशात परत आल्याची. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसी । या वाक्याची प्रचिती येत होती. टाटा बाय बाय करत आम्ही एकमेकांना निरोप दिला आणि आपापल्या कॅबच्या दिशेने पळालो.
खरंच ही ट्रीप म्हणजे एक प्रसन्न अनुभव. रोजच्या कामातून वेळ काढून अशी पूरा पैसा वसूल ट्रीप वीणा वर्ल्ड सोबत नक्की करायला हवीच. राहण्याची उत्तम सोय, त्याहीपेक्षा खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था, काळजी घेणारा टूर मॅनेजर, घराबाहेर घरपण जपत दुनियेची सफर घडविणाऱ्या वीणा वर्ल्डला सलाम !! तो चलो, बॅग भरो और निकल पडो ।

शीतल कापशीकर

Comments

Popular posts from this blog

Walkathon : एक आनंदानुभूती

गूंजे बनकर देस राग 🇮🇳

सेवा परमो धर्म: ।