लंडनवारी - भाग ५

लंडनवारी - भाग ५
लंडन देखा

ये नही देखा तो लंडन मे क्या देखा ? यही तो है असली लंडन ... असं जर कुणी तुम्हाला म्हणत असेल तर नक्की समजायचं की ती व्यक्ती सेंट्रल लंडन बाबत बोलत आहे. मुळातच लंडन हे शहर तसं महागेस्ट शहर (अर्थात त्याच्याही वर पॅरिस आहे म्हणा)  .. तरीही तिथे जायचा मोह आवरता येत नाहीच. 
Trafalgar Square ... Westminster city मधला एक सार्वजनिक चौक ... चौकासारखा चौक त्यात काय एवढं ? असा प्रश्न मनात येतो न येतो तोच त्याचं उत्तर मिळालं ... पूर्वी ह्या चौकाचं नाव charing cross असं होतं. फ्रान्स आणि स्पेन यांच्या विरुद्ध खूप मोठी लढाई इंग्लंड देशाने लढली (जवळपास ३०० वर्ष म्हणे) आणि अर्थातच त्यात इंग्लंडचा विजय झाला त्या विजयाप्रीत्यर्थ या चौकाच नाव Trafalgar Square ठेवण्यात आलं अशी आख्यायिका आहे. गेल्या सहस्रकाहून काही काळ इंग्लंड देश अपराजित राहिला आहे. दुसरं कुणी आपल्यावर राज्य करेल आणि मग आपण त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळवू यापेक्षा आपणच इतरांवर राज्य करत राहू म्हणजे आपण कधी पारतंत्र्यात जाणारच नाही अशी त्यांची राजनीती आहे असंही कळलं. त्यांच्या या राजनीतीचं कौतुक करावं की लबाड वृत्तीचा राग यावा या संभ्रमात मी असतानाच त्या चौकाच्या सौंदर्याने मात्र माझं लक्ष वेधून घेतलं होतं. अगदी भर वस्तीत हा चौक दिमाखात उभा होता. थुई थुई नाचणारं  कारंजं, त्याच्या मागची शानदार इमारत, खाऊगल्ली, खूप सारे पर्यटक यांनी तो परिसर फुललेला होता. लवकरच फोटोसेशन करायचं शास्त्र उरकलं आणि Westminster Bridge कडे मार्गस्थ झालो.
इथे फोटो काढावाच लागतो, त्याशिवाय तुम्हाला जाताच येत नाही अशी ही जागा ... एका बाजूला Big Ben ... अत्यंत मोठे घडयाळ ... तासागणिक टोल देणारे ... तिथूनच दिसणारं ब्रिटिश पार्लमेंट (यात आतमध्ये जाऊन देखील बघता येते परंतु मी बघितले नाही), लंडनची गंगा थेम्स (Thames) ... जी लंडन मधली सगळ्यात मोठी तर UK मधली दुसऱ्या क्रमांकाची मोठी नदी समजली जाते. या नदीवरचे हे प्रेक्षणीय पूल बघून मस्त वाटलं. बिग बेनला मागे ठेवत फोटोसेशन देखील झालं. तिथेच दिसलं ते लंडन आय (London Eye) ... हे जगातील सर्वात मोठे cantilevered observation wheel आहे. यात बसून निवांतपणे लंडनचा नजारा अनुभवता येतो. आपला जत्रेतला राजपाळणा ज्याला हल्ली Giant Wheel असे म्हणतात त्याचेच हे भव्य स्वरूप. अत्यंत हळूहळू फिरणारे हे चक्र आपल्याला संपूर्ण लंडनची डोळ्यांनी सफर घडवते. त्यातून लंडन कसे दिसते याचं वर्णन मी केलं नाही त्याअर्थी ही सफर मी पुढच्या वारीसाठी राखून ठेवली आहे हे चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच.
नोव्हेंबर महिन्यात लंडनमध्ये दुपारी चारनंतरच अंधार पडतो त्यामुळे आणि दोन चार वेळा लंडन आयचे दर्शन माझ्या आईजना घडल्यामुळे मला हे चक्र दोन्ही वेळी म्हणजे दिवसा आणि रात्री देखील बघता आले. अत्यंत नयनरम्य असे दृश्य मी डोळ्यांच्या आणि मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपले आहे. तसं बघायला गेलं तर लंडन आय, स्काय गार्डन आणि शार्ड या तीन ठिकाणाहून आपल्याला वरून लंडन साजिरे असा देखावा बघता येतो. पैकी मी फक्त स्काय गार्डनवरूनच बघितले. स्काय गार्डनला देखील आधी आपल्याला रेस्टॉरंटचे ब्रेकफास्ट किंवा लंचसाठीचे बुकिंग करावे लागते आणि मग ब्रिटिश पद्धतीचा खाना खाऊनच लंडनचे वरून दर्शन घेता येते. आम्हाला ते देखील झाले नाही कारण त्या दिवशी हवामान थोडे ढगाळ होते आणि तिथे काही काम देखील चालू होते. The Shard ... लंडन मधली सर्वात उंच बिल्डिंग ... टॉवर ब्रिजच्या समोरच्या या इमारतीत भारी भारी ऑफिस, हॉटेल्स आहेत. अर्थातच महागडी ... हे देखील बाहेरून बघून, बाहेरूनच फोटो काढून आम्ही निघालो. टॉवर ब्रिज ... ज्याला सगळे लंडन ब्रिज असे म्हणतात ... त्याचे नाव लंडन ब्रिज नसून टॉवर ब्रिज आहे. मोठे जहाज आले की हा ब्रिज उघडतो. त्याचे वेळापत्रक ठरलेले असते. त्यादरम्यान दोन्ही बाजूंची रहदारी थांबवली जाते. हे जहाज गेल्यानंतरच पुन्हा पूल पूर्ववत होतो, म्हणजेच बंद होतो आणि त्यानंतर रहदारी सुरू होते. आम्ही टॉवर ब्रिज बघितला पण पूल उघडताना बघणे जमले नाही. या पुलाबद्दल काही कथा देखील प्रसिद्ध आहेत. तिथे एका हौशी वैमानिकाने स्वतःच्या हौसेखातर प्रत्यक्ष पूल आणि पुलाची वरची कमान याच्यामधून विमान नेले होते, तर त्याला भरपूर दंड पडला होता. एकदा एक डबल डेकर बस सिग्नल न मिळाल्याने पूल उघडत असतानाच पुलावर चढली आणि तरी देखील चालकाने ती व्यवस्थित पलीकडच्या बाजूला उतरवली, एकाही प्रवाशाला काहीही धक्का पोहोचला नाही, याबद्दल त्या चालकाचा सन्मान देखील करण्यात आला होता. अशा सुरस आणि साहसी कथा ऐकून मला खूप मजा आली.
Buckingham Palace ... राजाचा राजवाडा ... जहाँ तक नजर जाती है सब हमारा ही है। असं वाटणारं साम्राज्य ... याच ठिकाणाहून १४ ऑगस्ट १९४७ पर्यंत आपल्या देशाचा राज्यकारभार चालायचा... विचार मनात आला आणि मन विषण्ण झालं. आपण केवळ प्रवासी नजरेने लंडन बघत आहोत हे पुन्हा पुन्हा स्वतःच्या मनाला बजावलं आणि मग पुन्हा एकदा ते सगळं मला छान वाटायला लागलं. तिथे चालणारी परेड बघितली. त्या सैनिकांची टोपी तर मला खूपच आवडली. ज्याने ती बनवली त्याबाबतची कथा ऐकल्यावर तर मला जाम मजा आली. तो म्हणे बुटका होता आणि उंच दिसण्यासाठी त्याने साधारणपणे फूटभर उंचीची ही टोपी घातली आणि नंतर तीच प्रथा पडली. जेव्हा कोणाच्या स्वागतासाठी किंवा अन्य कुठल्या समारंभासाठी परेड असते त्यावेळेस ही टोपी वापरली जाते.
Downing street वरचा ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे निवासस्थान बघण्याचा आणि तिथे फोटो काढायचा मोह आवरता येतच नाही. ते जरी ब्रिटिश नागरिक असले तरी मूळ भारतीय वंशाचे आहेत या विचाराने देखील छान वाटलं. अर्थातच पंतप्रधान म्हणून ते ब्रिटनच्या हिताचेच निर्णय घेणार हे मान्य असूनही एक हिंदू व्यक्ती ख्रिश्चन राष्ट्राची पंतप्रधान होते म्हणजे जात-धर्म-प्रांत या पलीकडे बुद्धी-शिक्षण-ज्ञान-अनुभव या गोष्टींना नक्कीच जास्त महत्त्व आहे या विचाराने मन सुखावले.
 रस्त्यांवरून फिरताना जाणवली ती कमालीची स्वच्छता आणि शिस्त... एकदा आमची बस लेट आहे हे आम्हाला कळले. आता काय होतंय बघूया, चला हे पण आपल्याला बघायला मिळणार या विचाराने मला बस लेट झाल्याच्या दुःखात देखील सुख सापडले. बघते तो काय ... वाट्टेल ते होऊ दे, हे लोक उतरनेवाले यात्रीयोंको पहले उतरने देतातच आणि मगच चढणारे चढतात. चढताना धक्काबुक्की करत नाहीत. बस/ट्यूब लेट आली किंवा रद्द झाली तर निवांत पुढची येण्याची वाट बघतात. हे बघून बरं वाटलं पण समजा एखादे दिवशी तासभर बस लेट झाली तर यांची काय भंबेरी उडेल/हवालदिल होतील लेकाचे ... या विचाराने मलाच हसू आले. अशी डेंजर सिच्युएशन हॅण्डल करावी तर आपणच अशी आत्मप्रौढी मनातल्या मनात मी मिरवली सुद्धा. पण खरंच ... सार्वजनिक वाहतुकीचा उत्तम अनुभव महिनाभरात मी घेतला. सार्वजनिक वाहतूक प्रचंड महाग आहे पण अत्यंत सोयीची आहे. लंडनमध्ये कुठूनही कुठेही जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक वापरता येते. 
ब्रिटिश म्युझियम ... थोडक्यात सांगायचं तर सर्व जगात काय आहे याची सफर या जागी आपण करू शकतो. कुणी जर आपल्या घरापासून लांब लंडनमध्ये राहत असेल, त्याला एकटं वाटत असेल तर त्याने खुशाल ब्रिटिश म्युझियमला भेट द्यावी, त्याच्या देशातल्या वस्तू त्याला तिथं नक्की बघायला मिळतील असं विनोदाने म्हटलं देखील जातं. सगळ्या देशातल्या अगदी खूप जुन्या वस्तू इथे जतन करून ठेवल्या आहेत.
या लोकांनी सगळ्या जुन्या इमारतीसुद्धा अगदी छान जतन करून ठेवल्या आहेत (आणि तेच बघायचे पैसे मिळवत आहेत हा विचार पण माझ्या हिशेबी मनात डोकावलाच)
सेंट्रल लंडनमध्ये जागोजागी दिसतं ते स्ट्रीट म्युझिक ... हौशी कलाकार आपली गायन वादन कला शब्दशः रस्त्यावर सादर करतात आणि हे बघण्यासाठी रसिकांचा मेळा जमतो. ते रसिक आपल्या खुशीने त्या कलाकाराला पैसे ... सॉरी सॉरी पाउंड देतात. हे कलाकार गरजू असतात असं नव्हे तर ते संगीताने भारावलेले, अक्षरशः वेडे कलाकार असतात. त्यांचा तो मोठा सेटअप घेऊन ते सेंट्रल लंडनमध्ये जागोजागी आपली कला सादर करतात. भलेही त्यांचं ते पाश्चात्य संगीत असू दे, परंतु संगीताबद्दलची त्यांची आस्था, प्रेम, जिव्हाळा यात तसूभरही कमतरता नाही. अगदी पॅशनेट असलेल्या या कलाकारांची कलासुद्धा अगदी डोळे भरून पाहिली. 
ब्रिटिश रंगभूमी ... मला स्वतःला मुळातच नाटकाची खूप आवड आहे. फारा वर्षांपूर्वी अस्मादिकांनी अभिनयाचं थोडंफार काम देखील केलंय हे सर्व वाचकांना माहित आहेच. या रंगमंचावर काही बघण्याचा योग आला नाही परंतु रंगभूमीच्या बाहेर उभे राहून फोटो मात्र काढला पुढच्या वेळी गेल्यावर एक नाटक नक्की बघायचं हा विचार म्हणून मनोमन पक्कासुद्धा केला.
नोव्हेंबर महिना असल्याने रस्त्यावर जागोजागी नाताळचे दिवे लागलेले होते. मुळात लंडनचा नाताळ प्रसिद्ध आहेच. पण हल्ली हा सण नोव्हेंबर पासूनच साजरा करायला सुरुवात होते. सर्वत्र उजळलेले रस्ते, रोषणाई बघताना डोळे सुखावत होते.
Leicester square, China Town, Camden Town, piccadilly circus(ज्याला लंडनचा Time Square असं देखील म्हणतात) या गोष्टी सगळेच बघतात म्हणून आम्ही पण बघितल्या आणि नेप्र फोटो काढले.
तरी अत्यंत सुप्रसिद्ध बेकर्स स्ट्रीट बघायचा राहिलाच आहे अजून ... त्या स्टेशनवर अनेकदा उतरले, तिथून कुठे कुठे गेले, पण हा रस्ता मात्र बघायचा राहून गेला. फेमस गुप्तहेर शेरलॉकच्या घरी चहाचं आमंत्रण नाही अशी मनाची समजूत घातली मी.
महिनाभरात किती बघणार, कुठे कुठे फिरणार ? तरी बर सेंट्रल लंडनला पाच-सहा वेळा तरी गेले मी. जेवढं बघून झालं तेवढं मनात साठवून घेतलं आणि जे राहिले ते पुढच्या भेटीत नक्की नक्की बघूया असं ठरवलं....

क्रमश:

शीतल कापशीकर
७ डिसेंबर २०२३

# लंडन देखा
#  फेमस लंडन

(घरी येऊन आठवडा झाल्यावर आठवून आठवून हा भाग लिहिलाय. यातली काही ठिकाणे तीन-चार वेळेस तर काही अगदी उडत उडत बघितली. काही ठिकाणी अनेकदा फोटोसेशन झाले तर काही ठिकाणी फोटोच काढले नाहीत.)

Comments

Popular posts from this blog

Walkathon : एक आनंदानुभूती

गूंजे बनकर देस राग 🇮🇳

सेवा परमो धर्म: ।