लंडनवारी - भाग ४
लंडनवारी - भाग ४
आजि सोनियाचा दिनु
सिद्धी कापशीकर ... व्यासपीठावरून ब्रिटिश पद्धतीने उच्चारलेले हे शब्द ऐकू आले ... केवळ अठरा ते वीस सेकंद ती दिसली ... पण यामागे होते अनेकांचे आशीर्वाद, कैक लोकांच्या शुभेच्छा, तिची अपार मेहनत, खूप कष्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परमेश्वरी इच्छा !!!
२४ नोव्हेंबरची पहाट उजाडली तीच मुळी उत्साहात, आनंदात ... याचसाठी केला होता अट्टाहास या वाक्याची प्रचिती आज मला येणार होती. ज्या कारणासाठी मी लंडनला आले ते पूर्ण होणार होते. आज सकाळी आम्ही सत्यनारायण पूजेचे आयोजन घरी केले होते. घर म्हणजे खरंतर तिच्या मालकीची एकच खोली, पण स्वयंपाकघर आणि भला मोठा दिवाणखाना यात घरातले सर्वजण मुक्त वावर करू शकतात. ही स्वयंपाकघरात बिलकुल फिरकत नाही पण दिवाणखान्यात मात्र सतत जाते. कारण तिथे खूप छान छान, अगदी जुन्या, ज्याला अँटिक म्हणता येईल अशा भारी भारी गोष्टी आहेत, परमेश्वराचे खूप फोटो आहेत. मनूचं सगळं छान चालू आहे यामागे अनेकांचे आशीर्वाद, शुभेच्छा तर आहेतच पण जगद्नियंता परमेश्वर जो आपला सगळ्यांचा पाठीराखा आहे, त्याच्याच इच्छेने हे सगळं होतंय अशी माझी दृढ समजूत आहे. या परमेश्वराचे मला आभार मानायचे होते. अनंत हस्ते, कमलावराने तू माझ्या पदरात इतकं टाकलं आहेस, तर माझे दोन हात आणि तिसरं मस्तक या माझ्या पूजेचा तू स्वीकार कर असं मला त्याला सांगायचं होतं.
आपल्याकडे कुठल्याही शुभकार्यानंतर सत्यनारायण पूजा करायची प्रथा आहेच की. एका शैक्षणिक वर्षाची सांगता आणि त्यानंतर मिळणारी पदवी हेही एक शुभकार्यच म्हणायला हवं ... हेच औचित्य साधून सकाळी घरी ही सार्थ पूजा केली. मंत्रोच्चाराने घर पवित्र होते हे जितकं खरं तितकंच पूजा करणाऱ्याला जर तो अर्थ समजला तर ती पूजा खऱ्या अर्थाने परमेश्वराला पोहोचते असं मला वाटतं. कारण त्यात पूजा करणाऱ्याचे भावसुद्धा उमटतात. सत्यनारायण पूजेतील सर्व जुन्या कथा आजच्या काळाची सांगड घालत, नवीन घटनांच्या संदर्भाने ऐकताना खरंच खूप छान वाटलं. आज आपण कसं वागायला हवं ? आपला धर्म आपल्याला काय सांगतो ? कशी पूजा परमेश्वराला अर्पण करावी ? कुठले व्रत सातत्याने पाळावे ? इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे अलगद उलगडत होती. मनू मनोमन खुश होती हे बघून मीही समाधानी होते. खरोखरच आदित्यकडून ज्ञान प्रबोधिनी पद्धतीने सत्यनारायणाची पूजा करायची हे गेली कितीतरी वर्षं मी ठरवत असताना आज लंडनमध्ये ती इच्छा पूर्ण होत होती, हाही एक योगायोगच म्हणावा लागेल. मृदुभाषी आदित्यने पौरोहित्य जबाबदारी स्वतःहून स्वीकारली होती. पौरोहित्य केल्यानंतर मिळालेली दक्षिणा तो स्वतःजवळ कधीही ठेवत नाही, विद्यादान निधीत अर्पण करतो. अगदी सात्त्विक, भावपूर्ण, सार्थ अशी ही पूजा खरोखरच मन प्रसन्न करणारी होती.
अजून एक सांगायचं राहिलंच की ... कालच तिला एक फोन आला, नेहमीप्रमाणे तिने तो चालत चालत आणि बाहेर जाऊन घेतला. मी तिला रागवणार इतक्यात अत्यंत खुशीत येऊन ती म्हणाली आई तुला एक सांगायचंय ... सांग बापडी ... हो, हल्ली आईला काही सांगणे हे मागासपणाचे लक्षण समजतात म्हणे ... असं असताना ही आपणहून काही सांगते तर आधी ऐकू आणि नंतर आपला ओरडण्याचा कोटा पूर्ण करू असं मी ठरवलं. अत्यंत तोंड पाडून ती म्हणाली की मला नोकरी लागली आणि मग हसत सुटली. अगदी चित्रपटात शोभावा असा हा प्रसंग मला खूपच आवडला ... कारण तो माझ्या बाबतीत खरोखर घडत होता. आता उद्याचा पदवीदान समारंभ पार पडला की ही बातमी सगळ्यांना सांगूया असं आम्ही ठरवलं आणि एका मैत्रिणीच्या भावाकडे जायचं नियोजन केलं होतं तिकडे गेलो. Indian Essence by Atul Kocchar या रेस्टॉरंटमध्ये जिग्नेश मॅनेजर आहे. त्याने आम्हाला जेवायला बोलवलं होतं. या निमित्ताने नवीन ओळखी होतील असं डोक्यात ठेवून सिद्धीला बरोबर नेलं होतं. जेवण तर खूप रुचकर होतंच पण त्याहीपेक्षा रुचलं जिग्नेशचं आदरातिथ्य ... सिंगापूर, दुबई सारख्या देशांमध्ये कामाचा अनुभव घेतल्यानंतर आता हा लंडनमध्ये काम करत होता. अगदी तुडुंब जेवण झाल्यानंतर, म्हणजे जेव्हा उठायचीसुद्धा शक्ती उरली नव्हती तेव्हा तीन खूप भारी deserts आमच्या टेबलवर आले ज्यात सिद्धीच्या यशाचं सेलिब्रेशन लिहिलं होतं. आनंदाने त्याहीपेक्षा खरं तर जिग्नेशने दाखवलेल्या प्रेमळ पाहुणचाराने माझे डोळे पाणावले.
माझ्या लेकीचं इतकं कौतुक कुणी करतंय हा आनंद माझ्या पोटात, डोळ्यात, मनात मावत नव्हता. देवा ... कित्ती छान माणसांना माझ्या आयुष्यात पाठवतोस रे तू आणि मी जेवढा विचार पण करू शकत नाही त्याहीपेक्षा जास्त देतोस मला ... ही बया मात्र उत्साहाने, आनंदाने वेडी झाली. मला extreme खुशी झाली आहे... असं तिन्ही भाषा मिक्स करत ती बोलली आणि आम्ही हास्यकल्लोळात बुडालो.
आज अशी सगळी माणसं आमच्या आयुष्यात सतत पाठवणाऱ्या देवाला, कितीही संकट आली तरी त्यातून मार्ग दाखवणाऱ्या परमेश्वराला मी धन्यवाद म्हणत होते. पूजा, आरती झाल्यानंतर गायत्री मंत्राच्या उच्चारणाने सगळं वातावरण भरून आणि भारून गेलं.
इतक्यात घड्याळाचे काटे पुढे सरकले आणि आम्ही भराभर आवरून पदवीदान समारंभ जिथे होणार होता त्या दिशेने निघालो.
रॉयल फेस्टिवल हॉलला येऊन पोहोचलो आणि बघतो तर सर्वत्र उत्साहाचे झरे वाहात होते. पहिलं सेशन नुकतंच संपलं असल्याने त्यांचं फोटोसेशन सुरू होतं तर पुढच्या विद्यार्थ्यांची लगबग सुरू होती. मनू तर उड्याच मारायला लागली ... कारण तिला समोर दिसले तिचे काका काकू ... प्रसिद्ध व्हायोलिन वादक बालू रघुरामन आणि कर्नाटकी गायिका/वीणा वादक सुभद्रा रघुरामन ... तिचे लंडनमधील आप्पा-अम्मा ... हे दाम्पत्य म्हणजे विधात्याने तिच्या आयुष्यात लिहिलेलं प्रेमाचं पान ... प्रति आई बाबाच जणू ... स्वतःचं आजचं सगळं नियोजन रद्द करून त्यांच्या या मानसकन्येसाठी आले होते. अगदी ठरवूनसुद्धा डोळ्यातलं पाणी मला आवरेना ... पाणी पिण्यासाठी म्हणून मी तिथून बाहेर पडले. तरीही भूषणने बघितलंच ... हा भूषण तर मागच्या जन्मी कुणीतरी असावाच बहुतेक आमचा, इतका मिसळून गेला होता आमच्यात. मनू त्याला दादा म्हणत असली तरी त्याने सर्व लंडनभर तिची ओळख स्वतःची भाची/पुतणी अशीच सांगितली आहे, वडीलकीच्या अधिकाराने तो तिला रागावतोसुद्धा ... पण माझी पोरगी लाडाने वेडी झालीये ती या माणसामुळेच बरं का ... असो तर आज हा सद्गृहस्थ ऑफिसला सिक लिव्ह टाकून इथे उपस्थित होता, सगळ्यांना भरपूर हसवत, शेकड्याने फोटो काढत होता.
आणि घटिका जवळ येऊ लागली. ब्रिटिशांच्या शिस्तीप्रमाणे कार्यक्रम अगदी वेळेत सुरू झाला. आमच्या घरची सगळी मंडळी हातातलं काम सोडून टीव्हीवर लिंक सुरू करून बघत होते, मधूनमधून मेसेज/फोन सुरू होतेच. आता हे इंग्रज आपल्याला रागावतील या भीतीने मी फोनच बंद करून ठेवला. आणि
Choir Group व्यासपीठावर अवतरला ... त्या संगीताने अगदी माहोल बन गया ... ही मानवंदना सुरू असतानाच विद्यापीठाच्या मान्यवरांचे आगमन झाले. सर्व प्रेक्षकांनी उभं राहून त्यांचं स्वागत केलं ... निवेदन सुरू झालं... सर्व विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर कुठून यायचं, येऊन काय करायचं आणि कुठून खाली जायचं याचा एक डेमो झाला आणि समारंभ खऱ्या अर्थाने सुरू झाला. नाव पुकारल्यावर एकेक विद्यार्थी The Vice-Chancellor अर्थात The principal academic and administrative officer of the University यांच्याशी हस्तांदोलन करून पुढे जात होते. त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचे, केलेल्या मेहनतीचे आज कौतुक होत होते. इकडे भूषण आणि आदित्य दोघे मिळून मनूला काहीतरी सरप्राईज देऊया असं ठरवत होते. सिद्धी कापशीकर असं नाव पुकारल्यावर मनू आली, तिने The Vice-Chancellor यांच्याशी हस्तांदोलन करताच आम्ही जयघोष केला ... गणपती बाप्पा मोरया । मंगलमूर्ती मोरया ।। ... जे जे मराठी लोक तिथे उपस्थित होते त्यांनी आमच्या आवाजात त्यांचा आवाज मिसळला. मनूने आपल्या संस्कृतीनुसार सर्वांना हात जोडून नमस्कारसुद्धा केला... तेव्हा खूपच छान वाटलं मला. पुढचा सगळा कार्यक्रम बघत वेळ कुठे गेला ते कळलंही नाही. Vice Chancellor यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून केलेलं भाषण मनाला खूप भावलं. विद्यार्थ्यांनी कसं वागावं, जगाला कसं सामोरं जावं अशा अनेक गोष्टी त्यांनी सहजरित्या सांगितल्या तेव्हा धर्म, प्रांत, भाषा, बोली या सगळ्यापलीकडे चांगले विचार आणि माणुसकी या गोष्टींचे असणारे अबाधित स्थान जाणवले. कार्यक्रम संपवून बाहेर आलो आणि एक छोटेसे फोटोसेशन झालं. आता मोबाईल सुरू केला आणि भूषणने काढलेला मनूचा विडिओ मी स्टेटसला ठेवला. आणि बघते तो काय ... मी सकाळी स्टेटसला ठेवलेली लिंक अनेकांनी बघितली होती आणि त्यावर मला खूप प्रतिक्रिया दिल्या होत्या. अनेक जणांनी फोन करून अभिनंदन केले तेव्हा खरंच मन भरून आलं. लेकीच्या कौतुकाच्या महापुरात मी न्हाऊन निघत होते.
अनेकांनी इन्स्टाग्रामवर तिची स्टोरी टाकल्याने ती एकदम खुश झाली होती. फेसबुकवर प्रोफाईल पिक्चर बदलताना एकदम वेळ बघितली आणि The Bhavan या ठिकाणी एका संगीत सभेला जायला आम्ही निघालो. या कार्यक्रमाला सिद्धी हार्मोनियम साथ करणार होती. ह्या संस्थेचं हे पन्नासावं वर्ष ... इथे भारतीय संगीत शिकवले जाते. तबला, मृदंगम्, कथक, भरतनाट्यम, शास्त्रीय गायन, व्हायोलिन आदी कला इथे शिकवल्या जातात, दर्जेदार सांगीतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
ठुमरीचा बहारदार कार्यक्रम संपल्यावर या संस्थेचे विद्यमान संचालक श्री. नंदकुमार माथूर यांनी तर तिचे खूपच कौतुक केले. मला distinction मिळालं असं तिने सांगताच no wonder या दोन शब्दांत त्यांनी तिला शाबासकी दिली. असं सर्व कौतुक झेलत आम्ही तिथून बाहेर पडलो. येताना tube मध्ये ही अखंड बोलत होती, पण मी निःशब्द ... विचारात गढलेली ... एक साधी, सरळ मुलगी सिद्धी उर्फ मनू उर्फ तनु ... अगदी साधीभोळी, निरागस, हट्टी ... लहानपणी काहीही केलं तरी बक्षीस मागणारी आज स्वतःच्या हिमतीवर कौतुक कमवत होती. रात्रीच्या अंधारात दुसऱ्या खोलीत जायलासुद्धा घाबरणारी माझी छकुली आज दुसऱ्या देशात एकटी राहून, स्वतःचं सगळं manage करून, स्वतःची संगीत कला जोपासत-वाढवत छोटेमोठे कार्यक्रम करतीये. आता तर तिला तिने ज्या क्षेत्रात शिक्षण घेतलं त्याच क्षेत्रातली नोकरी लागली आहे. मला माझ्याच भाग्याचा हेवा वाटतोय. लेकीची दृष्ट काढ ग, पोरीच्या कौतुकाने डोळ्यात पाणी आलं अगदी, अशी मुलगी मिळायला भाग्य लागतं इत्यादी इत्यादी प्रतिक्रिया मैत्रिणींनी दिल्या त्या आठवून धन्य वाटतंय. घरच्या जवळपास सर्व नातेवाईकांनी केलेलं कौतुक बघून भारी वाटतंय... अगदी आजि सोनियाचा दिनु ...
# सत्यनारायण पूजा
# convocation
# लेक लाडकी
# कौतुकसोहळा
शीतल कापशीकर
२४ नोव्हेंबर २०२३
अभिनंदन कौतुक शाबासकी 👍सुंदर लिखाण आमचेही डोळे पानावले
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteखूप छान.सर्वांचे अभिनंदन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठी पार्टी पाहिजे.
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteअभिनंदन मनू बेटा
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Delete