लंडनवारी - भाग ३
लंडनवारी - भाग ३
विद्यापीठांचे शहर - केंब्रिज
सकाळी आठ वाजायच्या दरम्यानच लेकीने तणतण सुरू केली ... हे लोक अचानक कसे रिहर्सल कॅन्सल करतात, आपण काहीतरी प्लॅन केला असताकी इत्यादी इत्यादी... झालं काय की तिची ठरलेली रिहर्सल एका कलाकाराला ताप आल्याने अचानक रद्द झाली. मग आमच्या बाईसाहेबांचा पारा चढला. नेहमीप्रमाणे नमतं घेत मी म्हणाले की अजूनही जवळच्या जवळ कुठेतरी जाऊ शकतो आपण. परंतु ऐकणं हे तिच्या तत्वात बसत नसल्याने ती म्हणाली की जवळ वगैरे काही नाही, आपण केंब्रिजलाच जाऊया ... जाऊया तर जाऊया, माझं काय जाणार आहे या विचाराने मी होकार भरला आणि अवघ्या वीस मिनिटात खाण्याचा छोटासा डबा भरून आणि जामानिमा करून आम्ही बाहेर पडलो. वाटेतच हिने कधीतरी तिकिटे काढली असावीत. मजल दरमजल करीत आम्ही केंब्रिजला पोहोचलो. आणि डोळ्यासमोर उभं राहिलं एक मोठं विश्व...
विद्यापीठांचं शहर असलेलं केंब्रिज (इथे ३१ महाविद्यालये आहेत म्हणे) आज मी थोड्या स्वरूपात का होईना बघणार होते याचा आनंद मनात दाटून राहिला होता.
रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यावरच आपल्याकडे गाईड कसे गर्दी करत विचारतात की टूर हवी का? तिकडे जायचं का? तसंच इथे देखील अनुभवायला आलं. परंतु फार खर्च करायचा नाहीच आणि मुख्य म्हणजे स्वतः काहीतरी शोधायचं हे मी पक्कं ठरवलं होतं. त्यामुळे आम्ही गूगलभाऊंचा आधार घेत चालत निघालो. इथे दोन चार गोष्टी नक्की बघायच्या आणि दुपारी चारच्या दरम्यान कुठल्याही परिस्थितीत इथून निघायचं असंही ठरवलं होतं. कारण त्या दिवशी लेकीच्या एका मित्राचा वाढदिवस आम्ही आमच्याकडे साजरा करणार होतो.
रस्त्यावरून चालत असतानाच दुतर्फा असणारी छान छान, शिशिर चालू असला तरीही रंगीबेरंगी पानांनी लगडलेली झाडे लक्ष वेधून घेत होती. वेळेचं गणित जुळत नसलं तरीही थोडसं थांबून दोन चार फोटो काढलेच आणि समोरच दिसणाऱ्या एका चर्चमध्ये गेलो. एवढी इथे आले आहे तर ख्रिस्त बांधवांच्या एकातरी प्रार्थना स्थळाला भेट द्यावी ही इच्छा माझ्या मनात होतीच. तिथे गेल्यावर सुद्धा प्रार्थनेसाठी नेहमीप्रमाणेच हात जोडून, वाकून नमस्कार केला. लेक म्हणालीसुद्धा, आई तुझ्याकडे सगळे चमत्कारिक नजरेने बघतील. परंतु मी म्हणाले की परमेश्वराला नमस्कार करायची ही माझी आणि खरं तर आपली पद्धत आहे. त्यामुळे मी असाच नमस्कार करणार आणि जर देव सर्वत्र सारखा असेलच तर तो त्याला मान्य देखील होईल. तिलाही कदाचित ते पटलं असावं कारण त्यानंतर तिने पुन्हा मला टोकलं नाही. तिथल्या लोकांशी हाय-हॅलो करून एक-दोन फोटो काढून आम्ही बाहेर पडलो.
आणि आता केंब्रिज विद्यापीठ बघूया असं ठरवलं. रस्त्यातच टेलिफोन बूथ दिसला. उत्सुकता म्हणून मी आत जाऊन बघितले असता आतील फोन सुरू सुद्धा होता. आधी मला वाटलं होतं की जुन्या वस्तू जपून ठेवायची हौस म्हणून यांनी टेलिफोन बूथ सांभाळले असावेत किंवा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, तसेच इथे फोटो बिटो काढून प्रसिद्धी मिळवण्यासाठी ठेवले असावेत असा अस्मादिकांचा समज होता. अर्थात त्या टेलिफोन बूथजवळ आम्ही फोटो काढलाच हे वेगळं सांगायला नको.
जगभरातल्या विविध ठिकाणहून आलेले विद्यार्थी बघत, त्यांच्या हालचाली टिपत आम्ही चालत होतो. Mathematical Bridge जवळ आम्ही थांबलो आणि उत्सुकतेने बघू लागलो. तिथला एक गाईड पर्यटकांच्या एका कंपूला त्या पुलाबद्दलची स्टोरी समजावून सांगत होता. तिथे म्हणे एक राणी होती, त्या राणीचं हे Queen's College ... ह्या राणीने सात विवाह केले, प्रत्येक वेळी तिच्या पतीचा मृत्यू होत असल्याने ती पुढचा विवाह करत होती. कारण तिच्याकडे असलेली कॉलेजची मालकी तिला टिकवून ठेवायची होती व आपल्याच पुढच्या पिढीत हस्तांतरित करायची होती. ही आख्यायिका मला थोडीशी खोटी तशी चमत्कारिक वाटली खरी पण त्यामागे त्या राणीचा शिक्षणाबद्दल असलेला ध्यास मात्र खूपच भावला.
समोरच River Punting चा बोर्ड दिसला. भयंकर थंडी होती, त्यामुळे अशा थंडीत बोटिंग करण्यात काहीही मतलब नाही, त्यामुळे नको करूया अशी माझ्यातली आई लेकीवर गरजली. परंतु या ride मध्ये केंब्रिज शहरातील जुन्या विद्यापीठांची तसेच जुन्या पुलांची संपूर्ण सफर ४५ मिनिटात पूर्ण होते हे कळल्यावर आम्ही देखील punting करण्यासाठी गेलो. आता खूपच थंडी जाणवत होती पण तरीही खूप छान पण वाटत होते. इथे देखील जाणवली ती चायनीज लोकांची मक्तेदारी. ब्रिटिश लोकांनी ठरवलेल्या किमतीच्या जवळपास ७०% रकमेत ते ही सफर करून देत होते आणि अर्थातच त्यामुळे पर्यटक तिकडे जात होतेच. तिथल्या कॉलेजमध्ये शिकणारे महाविद्यालयीन युवक देखील या कामात गाईडची भूमिका निभावत होते. ते अधिक चांगली माहिती देतील या उद्देशाने आम्ही तिकडेच गेलो ... आणि सुरू झाली ती अप्रतिम सफर. डोळ्यात साठवून ठेवावे असे दृश्य लेक मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपत होती आणि मी नजरेच्या. Queen's College जवळचा मॅथेमॅटिकल ब्रिज आल्यावर गाईड माहिती देऊ लागला की हा ब्रिज अठराव्या शतकाच्या मध्यातला आहे. हा पूल बांधताना कुठेही नट- बोल्ट वापरलेले नाहीत. सरळ लाकडांचा हा कमानदार पूल हे अभियांत्रिकीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. आजही हा पूल अत्यंत मजबूत असून त्यावरून जसजसे लोक जातात, त्यावर जसजसे जास्त वजन पडते तो अधिकाधिक मजबूत होत आहे. खरंतर या पुलाचे कोणतेही असे वेगळे नाव नाही परंतु याच्या संदर्भामुळे हे नाव पडले आहे. या नावामुळेसुद्धा मला बरं वाटलं. खरोखरच गणिताला आपल्या आयुष्यात अद्वितीय स्थान आहे हे बघून मला मनोमन खूप आनंद झाला आणि लेकीला महाभयंकर दुःख ... कारण तिला गणित या शब्दाचासुद्धा राग येतो (तरी बरं बयेला तालाचं गणित फार भारी जमतं) आणि मला कुणाचं गणित पक्क असलं की तो माणूससुद्धा जवळचा वाटतो.
ती थोडी नाराजीतच पुढचं बघू लागली आणि थोड्याच वेळात तिची आवडती गोष्ट तिला दिसली. हॅरी पॉटरची प्रचंड मोठी फॅन असल्याने King's College आल्यावर (जे Hogwarts College असे दाखवले आहे) ती एकदम भारावून गेली आणि मी सुद्धा. खरंच हवं ते मिळाल्यावर माणसाला किती आनंद होतो हे मला तिच्या डोळ्यात दिसत होते. गेली कितीतरी वर्षं तिला ही जागा पाहायची होती आणि आज तिचे ते स्वप्न पूर्ण होत होते.
केम नदीतली सात ऐतिहासिक महाविद्यालये आणि नऊ अत्यंत पुरातन तरीही मजबूत पुलांची आमची ही सफर पूर्ण झाली. आता गारठ्याने अक्षरशः हुडहुडी भरली होती म्हणून एकेक कॉफी प्यायली आणि पुढचा फेरफटका मारायला आम्ही सिद्ध झालो.
जी महाविद्यालये आम्ही नदीतून मागच्या बाजूने पाहिली तीच सर्व आता रस्त्यावरून चालताना पुढच्या बाजूने बघत होतो. ट्रिनिटी कॉलेज बघताना जाणवलं की आपल्या देशातले दिग्गज जसे की प्रसिद्ध गणिती रामानुजन, पंडित नेहरू, राजीव गांधी ज्यांचं मूळ प्रेम इंजिनिअरिंग, एकेकाळी आपली अर्थव्यवस्था तारणारे डॉ. मनमोहन सिंग आणि बरेच मातब्बर याच विद्यापीठात शिकले. मनोमन त्या ज्ञानमंदिराला नमस्कार केला आणि त्या कॉलेजशेजारी असलेल्या गर्दीकडे वळलो.
तिथे इतकी गर्दी होती याचे कारण म्हणजे तिथले सफरचंदाचे झाड ... आठवली का सफरचंदाची गोष्ट आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध यांचा परस्पर संबंध ? काहीजण म्हणत होते की सर आयझॅक न्यूटन याच झाडाखाली बसले होते आणि इथेच गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला परंतु काही जणांनी सांगितले की हा शोध इथे लागला नसून न्यूटन यांच्या घराजवळील सफरचंदाच्या झाडाखाली लागला परंतु त्याच झाडाच्या फळाच्या बियांपासून हे झाड लावण्यात आले आहे त्यामुळे हे देखील महत्वाचे आहे. काहीही असले तरी हे झाड याची देही याची डोळा बघून मला खूपच आनंद झाला होता. इथे आम्ही फोटो काढणार तितक्यात काही हौशी कलाकार सफरचंद वगैरे घेऊन आलेले आम्हाला दिसले. लेकीची परवानगी वगैरे न काढताच त्यातल्या एका मुलीकडे सफरचंद मागायचे मी ठरवले आणि मागितले सुद्धा. तिने अगदी हसत हसत ते मला दिले आणि माझे फोटो काढून झाल्यानंतर मला विचारले की तू माझा फोटो काढशील का ? म्हणजे तीही फोटो काढणाऱ्या व्यक्तीच्या शोधात होतीच. दोघींनी एकमेकींना धन्यवाद दिले. संवादाने खूप गोष्टी सहज साध्य होतात याची पुन्हा प्रचिती आली.
आता आम्ही गेलो पर्यटकांचं आकर्षण असलेल्या कॉर्पस क्लॉककडे. अहाहा ... अगदी वेगळं शिल्प होतं ते ... या घडाळ्याला तासकाटा, मिनिटकाटा, सेकंदकाटा असा कुठलाही काटा नाही तसेच कुठेही एक ते बारा हे आकडे सुद्धा नाहीत. तरीही आत एक विशिष्ट निळा लाईट आहे ज्याने म्हणे वेळ कळते. या घड्याळाची अनेक गुपिते सुद्धा आहेत. ही माहिती आंतरजालावर उपलब्ध असल्याने मी ती फारशी शोधायच्या किंवा कोणाला विचारायच्या नादी लागले नाही. फोटो काढून आम्ही तिथून मार्गस्थ झालो.
पुढे एक स्थानिक बाजार भरलेला दिसला, त्यात अगदी भाज्या-फळांपासून ते कपड्यांपर्यंत सर्व काही मिळत होते. हा केंब्रिजचा आठवडी बाजार असावा असं मी विनोदाने म्हटलेसुद्धा.
एकंदरीत सर्व बघितल्यानंतर केंब्रिज हे विद्यापीठांचे शहर असावे असं मला वाटलं. परंतु नंतर तिथल्या एका ब्रिटिश व्यक्तीशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की पूर्वी ऑक्सफर्ड शहरात सर्व विद्यापीठे होती पण नंतर तेथील जागा कमी पडल्याने केंब्रिज शहरात अनेक विद्यापीठांची स्थापना झाली आणि आता केंब्रिज की ऑक्सफर्ड यापैकी कोणाला विद्यापीठांची नगरी म्हणायचे याबाबत वाद चालू आहेत.
पण काहीही असो आज ही भारी महाविद्यालये बघून मला खूप छान वाटत होते. मनातल्या मनात मी केंब्रिजला इंग्लंडची शैक्षणिक राजधानी करून टाकले. महागड्या दुकानांमध्ये यथेच्छ विंडो शॉपिंग केले. काही विकत घेण्याची हिंमत मात्र केली नाही कारण किंमत पौंडात बघितली तरी मी त्या आकड्याला शंभराने गुणायची आणि मग ती किंमत माझ्या खिशाला परवडत नसल्याचे लक्षात यायचे. ते त्या दुकानदाराच्या लक्षात येण्यापूर्वी आम्ही तिथून पसार व्हायचो. अशा गमतीजमती करत आम्ही रेल्वेस्टेशनच्या दिशेने निघालो.
शाळा सुटायच्या वेळेला मी तिथे असल्याने शाळकरी पोरांची सायकलवरून घरी जाण्याची गडबड बघितली आणि यावेळी बसवाले- कारवाले किती सबुरीने घेतात, मुलांना व्यवस्थित जाऊ देतात, रस्ता क्रॉस करू देतात हेही अनुभवले. कला, अभियांत्रिकी, कायदा, वैद्यकीय, व्यवस्थापन सर्वच क्षेत्रातील दर्जेदार आणि उच्च शिक्षण देणाऱ्या काही महाविद्यालयांचे बाहेरून का होईना दर्शन घेता आले हे समाधान मनात साठवून आम्ही लंडनला जाणाऱ्या गाडीत बसलो .... शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे वाक्य मनात, कानात, डोक्यात वारंवार घुमत होते. केंब्रिजमध्ये बघितलेले सगळे दृश्य मनात साठवून मी शांतपणे डोळे मिटले आणि त्याचवेळी मला संध्याकाळच्या स्वयंपाकाचे वेध लागले ....
क्रमशः
# विद्यापीठ
# River Punting
शीतल कापशीकर
१८ नोव्हेंबर २०२३
(वरील ब्लॉगमधील दिवस हा ७ नोव्हेंबर २०२३ असून दिवाळीच्या धामधुमीत लेखन झाले नाही ते आज पूर्ण केले)
अप्रतिम
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteसविस्तर आणि हुबेहूब लिखाण खूपच छान वाटले वाचून प्रत्यक्षात केंब्रिज अनुभवले आम्ही वाट बघतच होतो लंडन वारीच्या पुढच्या भागाची धन्यवाद शीतल 🥰🥰
ReplyDeleteमी खरं तर स्वान्त सुखाय लिहिते ... पण कुणाला आवडतंय असं वाटलं तर आवर्जून लिहिते. धन्यवाद 🙏
Delete