लंडनवारी - भाग २

लंडनवारी - भाग २
Autumn आणि Halloween 

विमानतळावरून आम्ही एका स्नेह्यांच्या घरी मार्गस्थ झालो. यथोचित पाहुणचार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच वेगळं काही अनुभवण्याचा योग आला. हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिल्यामुळे कुठलीही ट्रीप न ठरवता माझ्या भाचीकडे जायचं आम्ही ठरवलं. तिच्या घरी भेट देणे एवढाच केवळ उद्देश आज आम्ही मनात ठेवला होता. परंतु दुपारी जरा पाऊस उघडल्याने सहजच फेरफटका मारावा या उद्देशाने आम्ही रस्त्याने फिरत होतो. Amersham ... इथे लंडन महानगरपालिका हद्द संपते, कारण Metropolitan लाईनवरचे हे शेवटचे ट्यूब स्टेशन ... असे आमच्या कन्येचे दृढ मत. इथे काय ग बघायचं असं ती बोलत होती. पण नेहमीची ठिकाणे सोडून बाहेर गेलो की अगदीच लॉटरी लागल्यासारखे काहीतरी बघायला मिळते असा माझा ठाम विश्वास होता आणि तो खराही ठरला. Amersham मधील उच्चभ्रू वसाहतीमधून फिरत असताना निसर्गाचे अनोखे दर्शन आम्हाला घडले. खरं तर तसा हा शिशिर ऋतु अर्थात पानगळ. आपल्याला ज्या गोष्टींचा भार झाला आहे, जे आता जुनं झालं आहे, ज्याचं ओझं झालं आहे अशी सर्व जुनी पाने गळून जातात व पुन्हा एकदा नव्याने बहरण्यासाठी वृक्षलता सज्ज होतात. सृष्टीचा हा किती साधा सोपा नियम... पण त्याची अंमलबजावणी मात्र इमाने इतबारे होते.
आम्ही फिरत असताना जाणवत होती निसर्गाने मुक्तहस्ते केलेली रंगांची उधळण ... प्रत्येक झाडाच्या पानांचा रंग-आकार वेगळा, एकाच पानाला कितीतरी रंगछटा, डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य ... असे भारी चित्र केवळ निसर्गच रेखाटू शकतो. एका चित्रात सर्वच रंग, पण तरीही प्रत्येक रंग स्वतःच वेगळं अस्तित्व दाखवणारा ... पानांचा खाली पडलेला सडासुद्धा किती मनमोहक ... सर्व दृश्य डोळ्यात आणि अर्थातच मोबाईलच्या कॅमेऱ्यात देखील साठवले. नवनवीन आठवणी मी गोळा करत होते, डोळ्यात-मनात साठवत होते. निसर्ग आपल्याला कित्ती भरभरून देतो याबद्दल त्याचे आभार मानत होते. हे सर्व दृश्य दिसायला कितीही सुंदर असले तरी गळालेली पाने म्हणजे शेवटी कचराच ... त्यामुळे सफाई कामगार त्यांचे काम नेमाने करत होते आणि खाली पडलेली सर्व पाने गोळा करून घेऊन जात होते. त्यांच्या कामात अडथळा येऊ नये म्हणून आणि पुन्हा एकदा वरून राजाने कृपा करायला सुरुवात केली म्हणून आम्ही तेथून निघालो. 
घरी आलो तर लक्षात आलं की आज ३१ ऑक्टोबर, महिन्याचा शेवटचा दिवस, हॅलोवीन ... आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवाची सांगता...  मागच्या वर्षीच लेकीने मला या महोत्सवाबद्दल सांगितलं होतं, तिच्या हॉस्टेलमध्ये आयोजित केलेल्या या महोत्सवाचे फोटो देखील तिने पाठवले होते. पण हे काय भुताखेतांचे फोटो जमा करायचे, तसली वेशभूषा करून गावभर हिंडायचं ... माझ्या मनाला ते काही झेपत नव्हतं. हल्ली तर आपल्याकडे पण कॉर्पोरेट जगतात, इंग्रजी शाळांमध्ये हे लोण पसरलं आहे. अशातच भाचीने तिच्या लहानग्या बाळासाठी आणलेला ड्रॅकुलाचा ड्रेस मला दाखवला. आमची लेक जोरदार खुश झाली, त्या चिटकुल्या बाळाचा आपण भारी मेकअप करूया असा फतवादेखील तिने काढला. मला काही ते फारसे पटले नाही परंतु कोणी उत्साहाने काही करत असल्यावर त्यात सहभागी होणे हा माझा स्वभावधर्मच आहे. शिवाय नवीन काही करून बघायला मला नेहमीच आवडते, आणि देश तसा वेश हे डोक्यात पक्कं असल्याने या मेकअप मोहिमेत मी पण सहभागी झाले. मुलं घरी येतील तर त्यांना देण्यासाठी चॉकलेट्स आणणे हे आवडते काम आम्ही मायलेकींनी स्वतःच्या शिरावर घेतले आणि पटकन टेस्कोमधून विविध प्रकारची चॉकलेट्स आणलीसुद्धा. नाना खटपटी लटपटी करून आमच्या त्या लहानग्या बाळाला आम्ही चौघांनी मिळून तो ड्रेस घातला. अगदी आकांत मांडला त्या छोट्याशा जीवाने, पण त्याला दाद न देता लिपस्टिकने ओठांच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या मोठ्या रेषा ओढायचे काम आमच्या पोरीने व्यवस्थित केले. आता या बाळाला आरसा दाखवू नका, तोच घाबरून जोरदार रडेल असं मी म्हटल्यावर घरात हास्याचा फवारा उडाला आणि त्या बाळाला पण कळलं की काय देव जाणे तेही हसायला लागलं. घरातच थोडंसं फोटोसेशन झालं आणि आम्हा सव्वाचार माणसांची( आम्ही चौघे आणि नऊ महिन्याचं बाळ) परेड घरातून बाहेर पडली. 
बाहेर बघतो तो काय ... लहानग्यांचे थवेच्या थवे भुतं, चेटकिणी, हाडांचे सापळे, vampire आदी वेशात हिंडत होते. कुणी कुणी astronaut, detective यांसारखे फॅन्सी ड्रेस घालून फिरत असल्याचेही दिसत होते. अनेक लहान मुलांबरोबर त्यांचे पालकदेखील हिंडत होते. जवळपास सर्वच मुलांच्या हातात भोपळ्याचे चित्र असलेल्या किंवा भोपळ्याच्या आकाराच्या छोट्या बादल्या दिसत होत्या. अनेक घरांच्या बाहेर भोपळ्यांचे डेकोरेशन पाहून माझ्या मनात आले की या लोकांना भोपळ्याचे पदार्थ जसे की चविष्ट घारगे वगैरे करता येत नसावेत आणि इतकं उदंड आलेले हे भोपळ्याचे पीक काय करावे हा प्रश्न मनात आल्याने त्यांनी त्याचा उपयोग डेकोरेशन साठी केला असावा. त्या नटलेल्या मुलांकडे आम्ही अगदी कुतूहलाने बघत होतो. दोन-तीन छोट्या मुलांना आमच्या कन्येने त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी थांबवले. परंतु त्या मुलांना वाटले की आम्ही ज्यांच्याकडून चॉकलेट मागणार आहोत की काय, त्यामुळे ती मुले पळून गेली. मग आता मात्र मी हा विषय माझ्या हातात घेतला. रस्त्याने जाणाऱ्या एका कुटुंबालाच आम्ही थांबवले आणि त्यांच्याशी सरळ सरळ संवाद करायला सुरुवात केली.
हा महोत्सव म्हणजे नक्की काय या माझ्या प्रश्नावर ती बाई कौतुकाने सांगू लागली .... आजच्या दिवशी सर्व मृतात्मे त्यांचे आत्ताचे वंशज काय करतात हे बघण्यासाठी पृथ्वीवर येतात. त्यांचा काही त्रास होऊ नये म्हणून आत्ताची लहान मुले असे पोशाख परिधान करून सर्वत्र फिरतात.  अर्रर्रर्रर्र ... म्हणजे आपल्याकडे जसा पितृपक्ष असतो तसा यांच्याकडे हा दिवस असावा असे अनुमान अस्मादिकांनी काढले. या कुटुंबाबरोबर एक फोटो काढून आम्ही पुढे मार्गस्थ झालो. 
घरोघरी बाहेर भोपळे ठेवलेले होते व त्या भोपळ्यांमध्ये दिवे लावून ते प्रकाशित केले होते. हे दृश्य खूपच सुंदर दिसत होतं. दोन-चार घरांच्या जवळ थांबून आम्ही फोटोसेशन केलं. आमच्या सोबत छोटा ड्रॅक्युला असल्याने लोक आम्हाला छान प्रतिसाद देत होते असा आम्ही समज करून घेतला होता. ही प्रथा कधी बरं सुरू झाली असावी हा प्रश्न मात्र माझ्या मनाला छळत होता. याचे उत्तरही लवकरच मिळाले. एका घराबाहेर खूपच छान डेकोरेशन केलेले होते आणि खूपच लोकांची तिथे ये-जा होती. म्हणजे या घरातील गृहिणी बरी असावी असा विचार करून मी तिला या महोत्सवाबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केली. माझ्या मदतीला अर्थातच फाडफाड इंग्लिश बोलणारी माझी लेक होती. मी जरी फाडत फाडत इंग्लिश बोलत होते तरी ये हृदयीचे ते हृदयी पोहोचले असावे. त्या भोपळ्यांच्या सजावटीबद्दल विचारले असता ती बाई म्हणाली... या भोपळ्यांमध्ये लावलेले दिवे हे नकारात्मक शक्तीला दूर ठेवतात. आजूबाजूची सर्व नकारात्मक ऊर्जा त्या भोपळ्यात येते व ते दिवे त्या नकारात्मक गोष्टी जाळून टाकतात. या उत्सवाची सुरुवात एकोणिसाव्या शतकात ब्रिटन आणि आयर्लंडमध्ये झाली. ३१ ऑक्टोबरला हा दिवस साजरा केला जातो. परंतु हल्ली त्या संपूर्ण आठवड्यात अनेकांच्या घराबाहेर हे डेकोरेशन असते. शेवटच्या दिवशी बालगोपाळ भोपळेवाल्या बादल्या घेऊन सर्वत्र फिरतात आणि चॉकलेट्स जमा करतात. ज्या ज्या घराबाहेर हे डेकोरेशन असते त्या घरातील यजमान या बालगोपाळांसाठी आधीच चॉकलेट्स आणून ठेवतात. माझ्या मनात नकळतच मी याची तुलना आपल्या दहीहंडी उत्सवाशी केली. हल्ली जरी या उत्सवाचे व्यावसायिकीकरण झाले असले तरी पूर्वी लहान मुले दहीहंडीचा काला करायला लागणारे सर्व पदार्थ घरोघर जाऊन जमा करायचे आणि हंडी फोडून तो प्रसाद म्हणून सर्वांना वाटायचे. इथल्या या उत्सवात मुलं जाऊन विचारतात की Trick or Treat ... म्हणजे मुलं विचारतील त्या काही प्रश्नांची उत्तरं द्यायची, एखादा गेम खेळायचा आणि हे जर जमणार नसेल तर त्या मुलांना काहीतरी खाऊ अर्थात चॉकलेट्स द्यायचे. पण हल्ली हे काही राहिलेले नाही केवळ दारी आलेल्या मुलांचं हसून स्वागत करायचं आणि त्यांना चॉकलेट द्यायचं ही अमेरिकची प्रथा सर्वत्र रूढ झाली आहे. अमेरिकेत तर हा दिवस सुट्टीचा आहे म्हणे. तरीही ब्रिटनच्या काही भागात अजूनही पूर्वीची प्रथा चालू आहे असे त्या बाईंच्या बोलण्यात आले. हल्ली तर Pumkin carving चे worksops देखील होतात, त्यानंतर स्पर्धासुद्धा घेतल्या जातात. म्हणजे थोड्याफार अर्थकारणाशी पण हा उत्सव जोडला गेला आहे.
धन्यवाद देत आम्ही त्या कुटुंबाचा  निरोप घेतला आणि रस्त्याने चालताना माझं विचारचक्र जोरात फिरू लागलं.... किती सहजपणे मी यांच्या प्रथांची टिंगल केली याचा माझा मलाच खेद वाटला. तसा युरोपियन देशांना स्वतःचा इतिहास आहे, स्वतःची एक वेगळी संस्कृती सुद्धा आहे. आपण तो समजून न घेताच त्यांच्यावर ताशेरे ओढतो आणि मोकळे होतो. पण तसं बघायला गेलं तर मानवी भावभावना, श्रद्धा - अंधश्रद्धा हे यत्र तत्र सर्वत्र सारखेच आहे की .... आपल्याला पूर्वज असतात आणि त्यांचं आता आपल्याकडे लक्ष असतं हे सर्वांनाच मान्य आहे. आणि ते खुश राहावेत म्हणून जो तो आपापल्या परीने प्रयत्न देखील करतो. फक्त ते करायची प्रत्येकाची प्रथा वेगळी, दिवस वेगळा.
दिव्यामध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करायची शक्ती आहे हेही सगळ्यांनाच मान्य आहे. आपल्याकडे तर तिन्हीसांजेला देवासमोर दिवा लावण्याची, दिव्याची प्रार्थना करून शुभशक्तींना आमंत्रण देण्याची अगदी प्राचीन प्रथा आहे आणि आजकाल आपण मात्र पाश्चात्यांचं अंधानुकरण करताना दिवे लावणे वगैरे खुळचट कल्पना आहेत असं म्हणत बसतो. त्यावेळी आपल्या हे लक्षात येत नाही की ही खुळचट कल्पना नसून याला खरोखरच भावनेबरोबरच शास्त्राधार सुद्धा आहे आणि तो संपूर्ण जगाला मान्य आहे. आपल्या प्रथांचा सन्मान करणे, त्या पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित करणे हे आपले कर्तव्य आपण करायलाच हवे.
अतिथीचे स्वागत करण्याची ब्रिटिशांची पद्धत सुद्धा मला खूपच आवडली. एका घराच्या बाहेर तर चॉकलेट्स संपली आहेत म्हणून त्या बाईने चक्क माझी माफी मागितली. हे तर अगदीच अति झालं बुवा. मी ब्रिटिश नाही हे माझा चेहरा आणि बोलण्याच्या पद्धतीवरून स्पष्ट कळत असताना सुद्धा ते माझ्याशी छान वागत होते. इथे रेसिजम कुठेही जाणवला नाही. आता पुन्हा हलका हलका पाऊस यायला लागल्याने आम्ही घरी परतत होतो. पण हे बालगोपाळ, घराबाहेर ठेवलेले भोपळे, त्यात उजळलेले दिवे, भुताखेतांच्या प्रतिकृती, घरी आलेल्यांचं स्वागत करताना त्यांना दिलेला खाऊ, प्रेमळ बोलणं हे सगळंच माझ्या मनाला खूपच भावलं. इंग्रजांनी आपल्यावर दीडशे वर्ष केलेले राज्य, सध्याचे इंग्लंड आणि आपल्या देशाचे व्यावसायिक संबंध, इथली शिक्षण पद्धती, आपण त्यांचं करत असलेलं अनुकरण या सगळ्यांच्या पलीकडचे आजचे माझे हे अनुभव होते. एक सामान्य ब्रिटिश व्यक्ती आणि माझ्यासारखी एक सामान्य पाहुणी यांच्यातलं हे अनोखं नातं होतं. कदाचित आम्ही पुन्हा कधीही भेटणार नाही पण हॅलोवीनच्या दिवशीचं ते स्वागत मात्र मी कधीच विसरू शकणार नाही.
जगातली सगळी नकारात्मक शक्ती नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा सर्वत्र भरून राहावी यासाठी मनोमन परमेश्वराकडे प्रार्थना करून आम्ही पोटपूजेच्या तयारीला लागलो आणि ... घरात मुबलक भोपळे असल्याने भोपळ्याचे घारगे, भोपळ्याचे रायते आणि भोपळ्याचीच भाजी करूया ग असं भाची म्हणाली आणि आम्ही हास्यकल्लोळात बुडालो ....

क्रमश:

# भोपळा
# हॅलोवीन
# ऑटम

शीतल कापशीकर
१ नोव्हेंबर २०२३

Comments

  1. खूपच सुंदर लिखाण, असेच लिहित रहा आम्हालाही तिथला आनंद उपभोगण्याच समाधान पहिलाही ब्लॉग वाचला
    मुबलक शब्दसंपत्ती, लिखाणाची शैली उत्तम 👍🏼👏🏻👏🏻

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ताई 🙏 ... वाचक दर्दी असतील तर लेखकालाही मजा येते लिहिताना

      Delete
  2. खूपच छान लिहिले आहेस ग...☺️

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Walkathon : एक आनंदानुभूती

गूंजे बनकर देस राग 🇮🇳

सेवा परमो धर्म: ।