लंडनवारी - भाग १
लंडनवारी - भाग १
शीतल निघाली लंडनला
आमचे येथे विवाहासाठी कुंडली मिलन करून मिळेल ... वास्तुदोष निवारण तसेच पत्रिकेतील विविध योग याबाबत मार्गदर्शन करण्यात येईल ... इत्यादी पाट्या माझ्यासमोर फेर धरून नाचत होत्या. माझ्या स्वतःच्या पत्रिकेतील त्रिकोण, चौकोन, षट्कोन, अष्टकोन मी खूपदा न्याहाळले. पण माझा गणित विषय पक्का असूनदेखील या कुंडलीचे गणित आणि भूमितीही माझ्या लक्षात येत नव्हती. परदेशगमन योग नक्की कसा दिसतो हे विचारावे असे शंभरदा मनात येऊन देखील तो प्रश्न मी सदैव गिळून टाकायची. परंतु साडेचार वर्षांनंतर माझ्या कुंडलीतील हा योग पुन्हा एकदा गडद झाला आणि शीतल निघाली लंडनला ....
मागच्या वेळेस मी परदेशात गेले होते ते एक प्रवासी अर्थात Tourist म्हणून आणि आता जात होते ते Visitor म्हणून. निमित्त होते लेकीचा पदवीदान समारंभ अर्थात Convocation. मागच्या वर्षीच सिद्धी परदेशात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी गेली. तेव्हापासूनच हा योग गडद व्हायला सुरुवात झाली असावी. उन्हाळा हा लंडनमध्ये पर्यटनाला जाण्यासाठी योग्य हे माहीत होते, त्यामुळे संपूर्ण मे महिना आंग्लभूमीत काढूया असा विचार मी मनाशी करत असतानाच मार्च महिन्यात लेकीने सुट्टीसाठी इकडे यायचा बेत आखला आणि अस्मादिकांचे विचार विरघळून गेले. पण ती आल्यावर तिने जाहीरच केले की साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात पदवीदान समारंभ असेल, त्याला तू आणि बाबा नक्की यायचं आहे. आता तर काय आंग्लभूमीत जाण्यावर शिक्कामोर्तबच झालं जणू. आता फक्त पारपत्रावर आंग्लभूमी प्रवेशाचा परवाना दर्शवणारा शिक्का ज्याला बोली भाषेत visa मिळविणे/काढणे असे म्हणतात ते काम शिल्लक होते. त्यासाठी बरीच कागदपत्रे लागणार होती. ती जमवाजमव सुरू झाली. आमच्या घरात पहिल्यापासूनच पतीपत्नी हे दोघे रथाची दोन चाके आहेत, त्यांनी नेहमीच समतोल राखला पाहिजे या वाक्याचे पालन केले जाते. त्यामुळे नियमानुसार आय ही बाजू नवरा व व्यय ही बाजू मी उत्तम प्रकारे सांभाळते. हे सांगायचा उद्देश हा की मला visa मिळविण्यासाठी एकतर दोघांचा एकत्र visa काढणे किंवा त्याचे माझ्या खर्चाला अनुमोदन देणारे अनुमती पत्र मिळविणे हे दोन पर्याय होते. नेमकं त्याला नोव्हेंबर महिन्यात कंपनीत महत्त्वाचे काम असल्याने येता येणार नाही हे समजल्यावर आम्ही मायलेकींनी थयथयाट केला पण लगेचच परिस्थिती मान्य केली. आता अनुमती पत्र हा पर्याय होता, पण आमच्या घराचे नियम मी ठरवले असताना त्यात ढवळाढवळ करणारा दूतावास कोण असा विचार मनात नाचू लागला. पण त्याचा नाच विलंबित लयीत असतानाच तो मीच थांबवला आणि येन केन प्रकारेण visa मिळतोय तर घेऊया असे ठरले. यथावकाश visa फॉर्म आणि आवश्यक शुल्क भरून अँपॉइंटमेंट मिळविली व visa पदरात पाडून घेतला. लगोलग Air Canada या कंपनीच्या विमानाचे तिकीट देखील काढले. ... हे विमान AC असेल असे फुटकळ विनोदसुद्धा करून झाले.
आणि आता लंडनवारीची मौखिक प्रसिद्धी सुरू केली. मग काय विचारता .... हे कर - ते करू नको, असे कपडे घे - त्या रंगाचे बिलकुल घेऊ नको, माझ्या मैत्रिणीच्या बहिणीची नणंद तिकडे गेली तेव्हा काय झाले, इत्यादी इत्यादी संवादांना ऊत आला. मी काढलेल्या तिकिटाचा नेमका baggage allowance थोडा कमी होता, म्हणून मग तिकडे जाणारी तीन चार मंडळी शोधली आणि त्यांच्याकडे सामान देऊन आले.
आता मी माझी तयारी सुरू करणारच होते, तर भावाने दोन बॅगा घरपोच आणून दिल्या तर त्याच्या बायकोने तिकडच्या थंडीत उपयोग होतील असे जॅकेट्स वगैरे कपडे आणून दिले. एक मोठं काम झालं आणि त्याचबरोबर पैसे वाचल्याचा आनंद एका डोळ्यात होता तर शॉपिंग करायची संधी हुकल्याचे दुःख दुसऱ्या डोळ्यात होते. मला शॉपिंग मॅनिया आहे हे वाचकांना माहित आहेच. म्हणजे एखादा आजार झाला तर लोक स्पेशालिस्ट डॉक्टरला भेट देतात तर मी शॉपिंग मॉलला भेट देते. शॉपिंग करून झाल्यावर माझं कुठलंही दुखणं आल्या पावली पळून जातं.
असो .... मुद्दा हा की आता फक्त बॅगा भरायच्या होत्या. वजन वगैरे करून all set ... आणि आता चलो मुंबई ... इथेही भावानेच सोडले. आणि सुरू झाला आगळा प्रवास ... स्वतःला सांगितले ... जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी ...
नवीन देश ... (थंडीमुळे) नवीन वेश, नवीन भाषा, नवीन नाती, नवीन बघणं, नव्याने जगणं, नवीन सृष्टी, त्यामुळे नवीन दृष्टी आणि बरंच काही नवीन ... अगदी एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी या वाक्याची प्रचिती घेत मी एक महिना अनुभवणार होते. एकटीने प्रवास तोही दूरदेशी करणार होते. अवघी वीस वर्षाची माझी लेक जर मागच्या वर्षी एकटी इतक्या लांब गेली तर मी का नाही ? मी तर तिची जन्मदात्री आईच की, पण या बाबतीत ती मला शिकविणारी ठरली होती. चेक इन, इमिग्रेशन, सिक्युरिटी चेक, फोटोसेशन इत्यादी प्रक्रिया यथास्थित झाल्यानंतर समस्त लोकांनी बजावल्यामुळे अस्मादिकांची स्वारी lounge कडे वळली. क्रेडिट कार्ड वगैरे वापरून फुकट ऐश करा अशा आशयाचे गाजर दाखवणारा हा लाउंज ... क्रेडिट कार्ड टॅप करून आत जाऊन बघते तो काय ... गर्दीचा महापूर. देवा, केवळ मलाच माहित आहे असं वाटणारे सगळेच आत गर्दी करून जमले होते. अस्मादिकांनी तेथून लगेचच काढता पाय घेतला. आणि आता मुंबई विमानतळावर सगळीकडे जो झगमगाट होता त्या झगमगटात स्वतःला उजळावे असा विचार करत मी इकडून तिकडे सर्वत्र फेऱ्या मारत राहिले. पैशाला किंमत राहिली नाही असे आपण रोजच म्हणतो पण इथे तर रुपयांना देखील राहिली नाही हे प्रकर्षाने जाणवले. डोळ्यांना साधा दिसणारा ड्रेस इथे नऊ हजार रुपयाला होता. फक्त डोळ्यांनी मनसोक्त शॉपिंग करून मी फलाट क्रमांक ४८ कडे प्रस्थान केले. इथून आम्हा सगळ्यांना आंग्लभूमीत नेणारे विमान सुटणार होते. विविध प्रकारच्या माणसांनी फलाट अगदी फुलून गेला होता. रात्रीचे अडीच वाजले असल्याने सर्वजण शांत बसले होते, फारसे कोणी सेल्फी काढत नव्हते. एका छोट्याशा बाळाला घेऊन आलेली नवीन माता आणि या नवमातेसह आलेली तिची माता यांचे चेहरे अगदी सहज वाचता येण्याजोगे होते. इतक्या थंडीत बाळ राहील ना तिकडे ? पण काय करणार ? पोटासाठी, नवीन उन्नतीसाठी परदेशात त्याचा बाबा गेलाय म्हटल्यावर आम्हाला जाणे क्रमप्राप्तच आहे. असा तिचा चेहरा स्पष्ट सांगत होता. एक जण नव्याने आजी होणार होती म्हणून आत्ताच लेकीच्या कोडकौतुकासाठी कॅनडाला निघाली होती. गृहिणी असल्याने एकटी कधी ट्रेनने सुद्धा कुठेही न गेलेली ही माऊली आता विमानाने एवढा मोठा टप्पा पार करून जाणार होती, केवळ लेकीच्या प्रेमापोटी, काळजीपोटी. काहीजण शिक्षणासाठी निघाले होते तर काहीजण एखाद्या प्रोजेक्टवर. काही वृद्ध माता-पिता तर व्हील चेअरचा आधार घेत तिथे स्थायिक झालेल्या पोटच्या गोळ्याला, नातवंडांना भेटण्यासाठी आतुर झाले होते तर काही हौशी मंडळी पर्यटनासाठी निघाली होती. काहीजण दिवाळीसाठी फराळ घेऊन निघाले होते तर काहीजण निव्वळ हौस म्हणून फिरायला. असे माणसांचे चेहरे वाचता वाचता वेळ भुरकन उडून गेला आणि हवाईसुंदरीने सर्वांना अगदी गोड शब्दात चला आता, प्रस्थान ठेवूया असं म्हणायला सुरुवात केली. लहानपणी मला हवाईसुंदरी ही व्यक्ती फारच सुंदर असते, अगदी ते अप्सरा का काय म्हणतात ना तिच्यासारखी असं वाटायचं. पण नंतर कळालं की हेही एक प्रोफेशन आहे, ज्यात व्यक्तिमत्त्वाला जितके महत्त्व आहे, त्याबरोबरच सेवा भाव देखील असावा. बोलणं गोड असावं, चेहरा हसतमुख ठेवावा. जास्त काम करायची तयारी असावी, हजरजबाबीपणा देखील तितकाच महत्त्वाचा कारण कोण काय प्रश्न विचारेल याचा भरोसाच नाही. सगळे विचार डोक्यात घेत एकदाचे विमानात बसलो. विमान हे वाहतुकीचे किती महत्त्वाचे साधन आहे हे सतत जाणवत होते. ठरलेल्या वेळेवर विमानाने उड्डाण केले, परमेश्वराचे नाव घेत मातृभूमीला राम राम केला. पंधरा मिनिटांपूर्वीच भ्रमणध्वनी फ्लाईट मोडवर घेताना विमानात चढल्याचा मेसेज सगळ्यांना केलेला होताच. आता निश्चिंत मनाने मी डोळे बंद केले आणि स्वप्नात हरवून गेले ... महिनाभर आता काय करायचं, कुठे जायचं, काय खायचं, काय बघायचं, कोणासाठी काय आणायचं एक ना अनेक विचार आता मूर्त स्वरूपात येणार होते. मधून मधून विमानात चकरा मारत, खात पीत, सहप्रवाशांशी गप्पा मारत लंडन कधी आले ते कळलेसुद्धा नाही. हवाईसुंदरीकडून धन्यवाद स्वीकारले आणि विमानातून खाली उतरले. प्रथेप्रमाणे इथेही इमिग्रेशन करून बॅगा ताब्यात घेतल्या आणि Terminal 2 - The Queen's Terminal ला माझी वाट बघत असलेल्या लेकीच्या दिशेने मार्गस्थ झाले ... आंग्लभूमीत माझी पावले पडली आणि ...
# लंडनवारी
# लेक लाडकी
शीतल कापशीकर
३० ऑक्टोबर २०२३
मस्त.. तुझ्यासोबत लंडनला पोहचली सुद्धा.. पुढील blog च्या प्रतीक्षेत..
ReplyDeleteलेखनाचा उद्देश सुफळ संपूर्ण ...
Deleteचला !! आम्ही पण आलो ग तुझ्या सोबत.
ReplyDeleteआता लंडन चे दर्शन😊😊 यासाठी पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत👍👍👍
Yessss .... दोन तीन दिवसात लवकरच 👍
Deleteभारी.लेखन मस्त.आम्ही पण लंडन पाहू तुमच्या बरोबर. तुम्हाला आणि लेखी ला खूप खूप शुभेच्छा
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteउत्सुकता ताणून धरली आहे अगदी.. पुढच्या लेखाच्या प्रतीक्षेत आहोत. जगताना प्रत्येक दिवस सोहळा करणाऱ्या व्यक्तीसमोर यावेळी क्षणांची स्वतःची कसरत होणार असं दिसतंय. बघुयात ते बॅगा भरून सोहळ्यात कशी हजेरी लावतायत ते.
ReplyDeleteअगदी खरंय सखे ... थोडक्या रात्रीत अनेक सोंगं घ्यायची आहेत. ... स्वतःला भेटायचं आहे नव्याने
Delete