Phone - a - friend ... भाग २ (अंतिम)
# सेवावाहिनी १५
Phone - a - friend ... भाग २ (अंतिम)
आता कोरोनाची ही लाट ओसरतीये. रुग्णसंख्या कमी होतेय , हळूहळू कोविड सेंटर बंद होतायंत. पण आपल्या सेवावाहिनीचे काम अविरत चालू आहेच. फक्त आता कामाचं स्वरूप जरा बदलतंय. आपण आता फिटनेसवर भर देतोय. त्यासाठी पाच वेगवेगळ्या वयोगटात , सकाळी व संध्याकाळी तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून ट्रेनिंगची व्यवस्था केली आहे. आपला हा फोन करणारा गट ही माहिती देखील सर्वांपर्यंत पोहोचवत आहे.
पालक संघातल्या ज्योतीताई पांडे , अमृताताई देशपांडे आणि माधवीताई सरपोतदार सांगत होत्या.... स्वतःच्या कामाचं schedule सांभाळून फोन करताना खूप बरं वाटलं. नकळत आपण समाजातील एक दुवा बनत आहोत ही भावनाच खूप छान होती. एका ताईंना फोन केला तर त्या दवाखान्यात ऍडमिट होत्या. घरच्यांची त्यांना काळजी वाटत होती पण कुणाजवळ बोलणार ? आपल्या फोनवर त्यांनी मन मोकळं केलं. याही परिस्थितीत प्रबोधिनी आपल्या सोबत आहे ही भावनाच त्यांच्यासाठी खूप आनंददायी होती. पुढे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी आपणहून फोन करून लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले. एका ताईंची आई व्हेंटिलेटरवर होती. अशा वेळी खरं तर माणूस भीतीनेच निम्मा खचतो. पण आरतीताई रोज फोन करून त्यांचे मनोधैर्य वाढवत होत्या हे सांगताना त्या अगदी भावूक झाल्या होत्या.
एका दादांनी तर सांगितले की त्यांचे पूर्ण कुटुंब कोविड पॉझिटिव्ह होते. मदतीची खूप आवश्यकता होती. दुर्दैवाने त्यांना मदत मिळाली नाही , शेवटी ते गावी निघून गेले. आपली सेवावाहिनी तेव्हा सुरू नव्हती , असती तर ही वेळ आली नसती ही खंत त्यांनी बोलून दाखवली.
एक छोटा व्यवसाय करणाऱ्यांनी सध्या व्यवसाय चालत नसल्याबद्दल सांगितले. तेव्हा आपण त्यांना आपल्या सेवावाहिनीच्या माध्यमातून त्यांचा संपर्क क्रमांक अनेक जणांना देऊन थोडाफार व्यवसाय कसा चालेल याबद्दल काम करण्याचे आश्वासन दिले. त्यांना हे खूप भारी वाटले.
आपली माजी विद्यार्थिनी मैत्रेयी हातवळणे सांगत होती की या फोनच्या निमित्ताने ती अनेक तिला शिकवणाऱ्या शिक्षकांशी बोलली. ज्यांनी आपल्याला घडवले त्यांची विचारपूस करताना , त्यांच्याशी पुन्हा नव्याने नातं जोडताना तिला खूप छान वाटले.
आपला फोन आल्यावर त्याबद्दल सर्व माहिती असल्याचे देखील अनेकांनी सांगितले तसेच अनेकांनी मदतीचा हात पुढे केल्याचे ओंकारदादा कुलकर्णी या पालकांनी आवर्जून सांगितले.
संदीपदादा आर्णीकर सांगत होते की फोन केल्यावर अनेक जण अगदी अपेक्षेप्रमाणे तुमचा फोन आला. प्रबोधिनी असा काही वेगळा स्टॅण्ड घेणार ही आम्हाला खात्रीच होती. तर काही जण म्हणाले आम्ही इथे आहोत पण आईवडील पुण्याजवळच्या खेड्यात राहतात. तिथे मदत मिळेल न मिळेल याबद्दल साशंक असल्याने सेवावाहिनीला फोन केला नाही. आपण टेलीमेडिसिन किंवा मानसोपचार कुठेही देऊ शकतो हे कळल्यावर त्यांना आनंद झाला व त्यांनी सेवावाहिनीला संपर्क देखील केला. एका घरी तर पतिपत्नी पॉझिटिव्ह , घरी लहान मूल ... आपला डबा तिथे जात होता पण मुलाला तो डबा आवडत नव्हता - त्याला खाऊ हवा होता. तो मिळाला असता तर बरे झाले असते ही अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. वरकरणी ही अपेक्षा अवाजवी वाटली तरी ते आपल्याला किती जवळचे - हक्काचे - घरातले समजतात ही भावना सुखावणारी होती असे संदीप दादांनी आवर्जून नमूद केले.
असे हे सगळ्यांचे विविध अनुभव. पण सगळ्याचे सार एकच. सेवावाहिनीबद्दल वाटणारी कृतज्ञता. प्रबोधिनी आपल्यासोबत आहे त्यामुळे वाढलेला विश्वास. शाळेप्रति वाटणारी आपुलकी , अभिमान. हे तर झाले ज्यांना फोन केला त्यांच्याबद्दल.
पण ज्यांनी फोन केला त्या सगळ्यांना पण खूप छान वाटतंय. आपण या सेवावाहिनीचा एक भाग आहोत , प्रबोधिनी परिवारातील जबाबदार सदस्य आहोत ही जाणीव त्यांना सुखावत आहे. या निमित्ताने संभाषण कौशल्य वाढले , समोरच्याचे मनोधैर्य वाढवताना आपोआपच स्वतःचे मनोबल वाढले. दररोज अनेक वेगवेगळ्या व्यक्तींशी फोनवर बोलताना एक वेगळा आनंद मिळाला .
आज आपण एकमेकांकडे जाऊ शकत नाही. एकत्र भेटू शकत नाही. पण त्यामुळे दुरावा वाढता कामा नये. फोनवर का होईना संपर्कात राहिले पाहिजे. रोज आपण किमान एकाला तरी फोन केला पाहिजे. एका तरी मित्राला , मैत्रिणीला , मावशी - काकू - आत्याला , काका - मामांना , आजी आजोबांना , दूर राहत असतील तर आई वडिलांना फोन करून पोटभर गप्पा मारल्या पाहिजेत. ह्या गप्पा म्हणजे फॅबीफ्लू पेक्षा भारी गोळी , रेमडेसीवीरपेक्षा प्रभावी इंजेक्शन आणि कोविशील्डपेक्षा भारी लस ठरू शकतात. (ही तुलना गमतीत घ्या बरं का 😉) .... तर महत्वाचा मुद्दा असा की बोलत राहा. Phone - a - friend ..... आयुष्य समृद्ध करणारी लाईफलाईन ....
शब्दांकन : शीतल कापशीकर
सेवावाहिनी : 8390458155
Comments
Post a Comment