क्षणभर विश्रांती ....

 क्षणभर विश्रांती


भर एप्रिल महिन्यातली उन्हाची रखरख , पण लोककला संमेलनातली प्रचंड मोठी शोभायात्रा. उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी नेहमीप्रमाणे गप्पांना ऊत आला होता. आणि नेहमीच्या (गेली १० वर्षं ज्या वाक्यांमध्ये आपण सातत्य राखले आहे ) त्या वाक्यांची पखरण झाली. आपण एकदा ट्रीपला जाऊया , कार्यक्रमांच्या निमित्ताने इतकं हिंडतो , खरं तर ते सगळं ट्रीप या प्रकारांत मोडायला हरकत नाही पण तरीही ट्रीपची मजा वेगळी वगैरे वगैरे (किमान दीडशे वेळा उच्चारून देखील ही वाक्ये जराही गुळमुळीत अथवा बोथट झाली नाहीत हे त्यांचे वैशिष्ट्यच 😀😀) आणि नेहमीप्रमाणे अनेक काल्पनिक बेत आखले आणि घरी गेलो. पण या वेळी या सर्व वाक्यांचं नशीब जोरदार होतं कारण ती खरी होणार होती (अर्थात त्या वेळी याची जरादेखील कल्पना नव्हती म्हणा ). काही दिवसांनी हर्षदाचा फोन आला आणि नेहमीप्रमाणे मी तुला थोड्या वेळाने फोन करते असं म्हणून ठेवून देखील दिला. दुसऱ्या दिवशी तिचा पुन्हा फोन. मी ही जराही कमी नाही , या दिवशी तर उचललाच नाही फोन. पण तिने चिकाटी न सोडता माझा पिच्छाच पुरवला आणि अस्मादिकांशी संवाद साधलाच. कधी येताय ग गिरीवनला ? आज आपण बुकिंग करूनच टाकू फायनल असं तिने म्हणताच मी टुणदिशी उडी मारली (मोबाईल पडता पडता वाचला हातातून) आणि वाचाळ स्वभावानुसार बडबडायला सुरुवात केली. मुग्धाला आठवड्यातून फक्त गुरुवारी शक्य होते आहे हे लक्षात घेऊन १६ व १७ मे या तारखा निश्चित केल्या (तेव्हा अधिक महिन्याच्या पहिल्याच दिवशी आपण अधिक आनंद मिळवायला चाललो आहोत हे माझ्या गावीही नव्हते)

पथकाच्या व्हाट्सअप्प ग्रुपवर मेसेज टाकला....

"मैत्रिणींनो आपण ट्रीपला जाऊया असे कितीतरी दिवस ठरवतो आहोत पण हर्षदाने ही ट्रिप ठरवली सुद्धा.

१६ मे ला संध्याकाळी इथून गिरीवनला जाऊया. जेवण वगैरे झाल्यानंतर मनसोक्त गप्पा , हसणे खिदळणे कार्यक्रम करूया. रात्र उरलीच तर थोडेफार झोपू. सकाळी टॅन्कमध्ये मनसोक्त डुंबूया. पोहता येत नसेल तरी घाबरू नका , swimming champion मुग्धा आपल्या बरोबर आहे. त्यानंतर न्याहरी , निसर्गात भटकंती करू. दुपारनंतर निघून पुनश्च आपापल्या घरी परत १७ तारखेला.काय म्हणता ?

Book ur dates now (16 & 17 April 2018)

मुग्धाला गुरुवार शिवाय वेळ नाहीये आणि मे महिन्यातला एवढा एकच गुरूवार जमतोय त्यामुळे ही तारीख निश्चित केली.

आपापली उपस्थिती नोंदवा."

वनिता , प्रचिती , स्मिता , अलकाताई सगळ्यांनी लग्गेच प्रतिसाद कळवला. देशपांडे काकू सध्या विहान आणि विवान समवेत गोकुळात खूपच रमल्या असल्याने , कीर्ती लेक जावयाच्या कोडकौतुकात मग्न असल्याने , शुभांगीची घरगुती अडचण असल्याने तर शोभा एका पूर्वनियोजित कार्यक्रमा मुळे उपस्थित राहू शकत नव्हत्या. त्यामुळे काय करूया याबद्दल वनिताशी बोलले पण आता जाऊयाच या विचाराने सगळ्या बाकीच्या विचारांवर मात करत शिक्कामोर्तब केले. आधी आपापल्या गाड्या घेऊन जाऊया असं ठरत होतं पण हर्षदानेच पुढाकार घेऊन टेम्पो ट्रॅव्हलर ठरवली तीही अगदी कमी बजेटमध्ये. मधल्या काळात सहजच प्रतिभाला विचारलं की येतेस का गिरीवनला ? तिने बोलता बोलता होकारसुद्धा दिला. शुभांगीला म्हणाले की अग तनिष्क येतेच आहे तर चल की तू पण. बघते म्हणणाऱ्या शुभांगीला पण खरं तर तिच्या हेक्टिक शेड्युल मधून बदल गरजेचा होताच. बघता बघता १६ तारीख उजाडली. दुपारी दोन वाजता स्मिताकडे सगळ्या जणी जमून मार्गस्थ होऊ असे ठरले पण अगदी १२.३० वाजता मला ड्रायव्हरचा फोन आला की कुठे येऊ ? प्राधिकरण हे नाव ऐकल्यावर मला प्राधिकरणातले काहीही माहीत नाही हे धक्कादायक उत्तर मला मिळाले. इतक्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरातले काही माहीत नाही हा न झेपणारा विचार मी बाजूला सारला कारण आता हेच चक्रधर आम्हाला गिरीवनला नेणार होते. बरोबर दोन वाजता लोकमान्य चिंचवडला अलकाताई , मी आणि सिद्धी गाडीत बसलो आणि ट्रीप सुरू झाली. स्मिताकडे सगळे गाडीची वाट बघत होतेच. पटापट सगळ्या जणी गाडीत चढल्या आणि मी चक्रधरांना हर्षदाच्या घरी जाण्यासाठी रस्ता दाखवू लागले. तिथे हर्षदा , मुग्धा , शुभांगी आणि तनिष्क चढल्या आणि गणपती बाप्पा मोरया असा नेहमीप्रमाणे जयघोष करून बास्केट ब्रिज वरून आम्ही मार्गस्थ झालो. 

गप्पांच्या नादात गिरीवनच्या एन्ट्री गेट वर कधी पोहोचलो ते कळले देखील नाही.

मुग्धाने एन्ट्री केली क्षितिज . सगळ्या जणी अचंबित की गिरीवनला येणार होतो तर क्षितिजला कुठे चाललोय ? तेव्हा हर्षदा म्हणाली की आपल्या प्लॉटचे नाव क्षितिज आहे. तिथले बांधकाम सुरू असताना नाव काय असावे ह्या विचारात ती होती आणि एके दिवशी फोनवर बोलत असताना आकाश जमिनीवर जेथे टेकल्यासारखे दिसते त्या काल्पनिक रेषेला क्षितिज असे म्हणतात ही व्याख्या तिने प्रत्यक्ष अनुभवली आणि नाव ठरले या तिच्या स्पष्टीकरणावर मी मनातून एकदम खुश झाले. (हर्षदाशी मैत्रीच्या या दशकपूर्ती वर्षात हे सेलिब्रेशन होते आहे हा आनंद पण मनाला स्पर्श करून गेला). वळणं वळणं पार करून क्षितिजवर पोहोचलो आणि तिथलं दृश्य पाहून प्रवासाचा शीणच नाहीसा झाला. हिरव्यागार वनराईने आमचे स्वागत केले. वाऱ्याच्या वेगाने आम्ही गाडीतून उतरलो आणि क्षितिजमध्ये धूम ठोकली. एव्हाना गप्पांचा पुढचा सेशन सुरू झाला होता. हात पाय पसरून चटई टाकायची वाट देखील न बघता सगळ्या जणी बसल्या. मुलींनी खेळायला काय काय आहे ते धुंडाळायला सुरुवात केली होती. त्यासाठी मुग्धा आणि यापूर्वी इथे येऊन गेलेली तनिष्क या दोघीजणी मार्गदर्शक म्हणून जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडत होत्या. दहा वगैरे मिनिटांनी हर्षदा कुठे आहे असा प्रश्न पडला (गाडीतच राहिली का वगैरे बालिश विनोद करून हास्यस्फोट देखील झाला). तेवढ्यात ती सर्वांसाठी मस्त पन्हं घेऊन आली आणि मे महिन्यात गारवा निर्माण झाला. पटदिशी पन्हं पिऊन ताज्यातवान्या झालेल्या सगळ्यांना आता प्लॉट पूर्ण बघण्याची उत्सुकता निर्माण झाली होती. एव्हाना बच्चेकंपनीने बॉल काढून विविध खेळ सुरू केले होते. शलाका , प्राजक्ता ,सिमरन हे त्रिकूट वेगळ्या विश्वात वावरत होते. आम्ही मात्र आता झाडीत हरवून गेलो होतो. आयुष्यात पहिल्यांदाच अननसाच्या झाडाला अननस लगडलेला पाहिला आणि अगदी सचिन तेंडुलकरला पहिली सेंच्युरी केल्यावर जेवढा आनंद झाला होता तेवढाच आम्हाला आत्ता झाला. लगेच सेल्फी विथ अननस ऑन झाड ही कन्सेप्ट उदयास आली आणि ताबडतोब त्याची अंमलबजावणी देखील झाली. रांगत्या बाळाच्या पण हाताला लागतील किंवा झोपून पण तोडता येतील असे आंबे बघून स्वर्गसुख याहून निराळे नसावे हे मनोमन पक्के देखील केले. (त्या आंब्यांबरोबर अस्मादिकांनी झोपून फोटो काढला हे सूज्ञ वाचकांनी ओळखलं असेलच 😅). आपल्या उंचीएवढ्या ठिकाणी आंबे दिसल्यावर मुंडावळीसारखे आंबे दोन्ही बाजूला धरून फोटोसेशन करण्याचे काम प्रत्येकीने इमाने इतबारे केले. मग पोहोचलो औषधी वनस्पती आणि नक्षत्रवनात. दरवर्षी मनपाच्या वृक्ष संवर्धन विषयक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या हर्षदाची मेहेनत ठायी ठायी दिसत होती. लाजाळूच्या रोपट्यामागे तर सगळ्या जणी हात धुवून लागल्या. लाजून लाजून दमलं बिचारं रोपटं इतक्या वेळा सगळ्या जणींनी स्पर्श केला त्याला. हर्षदाचा अजून एक वाखाणण्यासारखा गुण म्हणजे प्रत्येकीच्या प्रश्नाला अत्यंत शांत स्वरात ती उत्तर देत होती ते पण न कंटाळता. पेरू , चिकू , आवळा , केळी , बांबू वगैरे झाडांची वनराई बघताना अचंबित व्हायला होत होतं. आंब्याची अनेक झाडे बघून याला तू आमराई असं नाव का नाही दिलंस असा प्रश्न शुभांगीने विचारला सुध्दा. झाडविषयक ज्ञानात पुरेशी भर पडल्यावर  आम्ही गेलो hemock  वर. इथे प्रत्येकीने बसून , झोपून मनसोक्त फोटो काढले. एव्हाना तिकडे क्रिकेटची जोरात तयारी सुरू झाली होती ( नियम वगैरे ठरवणे , टीम पडणे) खेळ सुरू होणार इतक्यात ओल्या भेळेची घोषणा झाली आणि हातातले आहे-नाही ते सोडून सगळ्यांनी पुन्हा dining hall कडे धाव घेतली. भेळेचा यथेच्छ समाचार घेतल्यानंतर शीण घालवणाऱ्या चहाचा पण आस्वाद घेतला आणि अजून थोडी भटकंती करावी म्हणून बाहेर पडलो. बाहेर करवंदाची जाळी दिसली. या रानमेव्याचा जागेवरच फडशा पाडला आणि आता अधिक मासात खरोखरच अधिक मास वाढतंय ते रोखायला हवं या आरोग्यविषयक जाणिवेने आम्ही एक फेरफटका मारत आम्ही आजूबाजूच्या प्लॉटधारकांच्या गोष्टी हर्षदकडून ऐकत होतो. संधिकाल उलटून आता रात्र होत होती आणि इकडे आता क्रिकेट पण रंगात आले होते. एका बॉलवर पळून ६-७ रन्स काढता येतात हा BCCI ला ना झालेला साक्षात्कार आम्हाला झाला. इतक्यात बॉल झाडीत हरवल्याने एका विश्वविक्रमाला भारत मुकला. मग लहान मोठ्या सर्वांचे एकत्रीकरण होऊन डॉज बॉल , दुसऱ्या बाजूला पत्ते ,UNO हे खेळ रंगात आले. तो आनंद यथेच्छ लुटल्यावर पुन्हा एकदा पोटपूजा. मस्त खान्देशी मेनू होता. भरीत ,पिठलं -भाकरी, ठेचा, भात , पोळ्या , पापड- लोणची वगैरे. रात्रीचे जेवण अगदी कमी घ्यावे या उक्तीला शिस्तीत विसरत त्या जेवणावर यथेच्छ ताव मारल्यानंतर मुलांना झोपा असं सांगून गप्पांचा फड रंगला. अर्ध्या तासाने लक्षात आले की आपली आज्ञा नेहमीप्रमाणे धुडकावून सगळी मुलं भुताच्या गोष्टी ,पत्ते यांत रंगली आहेत. आम्ही सर्वांनी देखील संभाजी , गांधीजी , सावरकर , राजकारण ,संस्कृती , द्रौपदी , नातेसंबंध , शैक्षणिक परिवर्तन वगैरे सर्व प्रकारच्या विषयांवर अक्षरशः परिसंवाद रंगवले . नेहमीप्रमाणे निष्पन्न काही झाले नाही हा भाग अलाहिदा. अर्थात आपल्या गप्पा काही निष्पत्तीसाठी नसतातच याची पूर्ण जाणीव ठेवूनच आपण त्या मारत असतो. मात्र त्या गप्पा इतक्या प्रभावी होत्या की थोड्या वेळाने मुलांनी त्यांचे खेळ सोडून आमच्यात सहभाग घेतला. इतकंच काय तर श्वान आणि मार्जार देखील आमचे विचार ऐकायला धडपडत आहेत हे लक्षात आल्यावर आम्ही झोपायला जाण्याचा निर्णय घेतला ( खरं तर संतोष दादांना खालचे सगळे बंद करायचे होते म्हणून आम्हाला त्यांनी वर पाठवले ही युक्ती आमच्या लक्षात कशी आली नाही याचे अजूनपर्यंत आश्चर्य वाटते आहे)

वरच्या मजल्यावर सर्वांसाठी झोपायची छान व्यवस्था होती पण गप्पांचा मोह आवरता येत नसल्याने सगळ्या जणी दाटीवाटीने एका बाल्कनीत बसलो होतो. थोड्या वेळाने एका फळीवर निद्रादेवीने अंमल गाजवला आणि ते तिच्या आधीन झाले. आम्ही ५-६ जणी मात्र या अंमलाखाली न येता गप्पांचे अखंड व्रत पूर्ण करत राहिलो. पण इतक्यात दुसऱ्या एका मोहाने आमच्या या व्रतात आडकाठी आणली. सकाळी ६ वाजता स्विमिंग पूल मध्ये उतरायचे आहे आणि आत्ता रात्रीचे २ वाजले आहेत. किमान चार तास तरी झोपावे या उद्देशाने आम्ही झोपलो खऱ्या पण इतक्यात शुभांगीला काजवा दिसला. मग काय तो सगळ्यांना दाखविण्यासाठी त्यांना झोपेतून उठवण्याचे पाप देखील मी माथी घेतले. मग आम्हाला जवळजवळ ६-७ काजवे दिसले व त्यांच्याबद्दल आमची चर्चा सुरू झाली. थोड्या वेळाने सगळेच झोपले पण सगळे जण झोपले तरी आपण दोघी जागायचेच या घेतलेल्या शपथेला वनिता आणि मी जागलो. पुन्हा गप्पा सुरु. थोड्या वेळाने बाल्कनीत चांदण्यांची दुलई पांघरून आम्ही दोघी पण झोपलो.

सकाळी ५.३० वाजताच उजाडल्यामुळे आणि पक्षांच्या मंजुळ किलबिलाटामुळे डोळे उघडलेच. पुन्हा फेरफटका सुरू. आता टेरेसवर हिंडून आलो , दव पडलेल्या गवतावरून चाललो , वनिताने तर सकाळी सकाळी घसरगुंडीवरून घसरण्याचा अयशस्वी प्रयत्न केला (दव पडलं होतं त्यामुळे घसरले जात नव्हते). आम्ही घरचेच त्यामुळे यजमानीण बाईंना न विचारताच चहाची ऑर्डर देण्याचा भोचकपणा केला आणि चहाग्रहण झाल्यानंतर स्विमिंग पुलाकडे प्रस्थान केले. एक एक करून सगळेच जण (हर्षदा सोडून)आता पाण्यात उतरलो होतो. ती बिचारी तिथल्या कामामध्ये गढून गेली होती. मुग्धाला पोहताना बघणे ही खरंच एक आनंददायी गोष्ट आहे. अद्वैतच्या खोड्या पाण्यात पण चालू होत्याच. इशाच्या पोहताना बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे तर आर्किमिडीजला तो महत्वपूर्ण शोध लागला नसेल हा विचार पण मनाला चाटून गेला.प्रतिभा मस्त पोहत होती (तीची वर्ष दीड वर्षाची मेहनत त्यात दिसत होती) . शलाका तर आधी छोट्या चिनूला आणि नंतर खुद्द आईला (वनिताला) उचलून पोहायला शिकवत होती. घरून निघताना स्मिताचे BP वाढलेले होते तेव्हा शुभांगी खरी डॉक्टर (MBBS)आहे हा तिला (खरं तर स्वतःला) दिलासा दिला होता पण इथल्या वातावरणात ती एकदम फ्रेश वाटत होती. पाण्यात तर अगदीच खुश होती. मनसोक्त जलविहारानंतर जलक्रीडा सुरू झाली. पाण्यातला डॉज बॉल. साधारण दोन तास डुंबल्यावर पोटात कावळे ओरडायला लागले. मग मात्र पटापट एकेक जण शॉवर घेऊन dining hall कडे प्रस्थान करत होते. तिथे कांदेपोहे पोटभर (थोडं वर) खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा चहाचा समाचार घेतला. आता दमल्यामुळे झोप येत होती. प्रतिभा आणि शुभांगी दोघी संतोष दादांना घेऊन शेजारच्या प्लॉटवर गोटी आंबे तोडण्यासाठी गेल्या. वनिता , प्रचिती वगैरेंनी करवंदांकडे मोर्चा वळवला. तोडून आणलेल्या कैऱ्या कापायचे काम प्रचितीने गृहकृत्यदक्ष गृहिणीच्या भूमिकेतून केले आणि त्याचा फडशा पाडायला प्रत्येकीने हातभार लावला. आपल्या पोटात इतकं मावतं हा अजून एक झालेला साक्षात्कार. आता एक वाजला होता. पुन्हा एकदा फोटोसेशन पार पडले(कारण आजचा ड्रेस वेगळा होता) आणि सगळ्यांनी सुग्रास जेवणाचा आस्वाद घेतला (आजचा मेनू : शेवभाजी , बटाटा भाजी , पोळ्या , भात , ताक वगैरे ). आता बॅग पॅक करून परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार होती. माहेराहून निघताना होते तशी अवस्था प्रत्येकीची होती (इतकं मनसोक्त हुंदडलो , भटकलो , चरलो , बडबडलो होतो सगळ्या जणी) .

संतोष दादा व त्यांच्या कुटुंबाला निरोप देताना पुन्हा यायचे आश्वासन देखील दिले. देवराज आणि गुड्डी मुलांचे मित्र मैत्रीण झाले होते तेव्हा त्यांनाही टाटा , बाय बाय झाले. (केअर टेकर ची फॅमिली हर्षदाचे अगदी सख्खे नातेवाईक असल्यासारखे वागत होते) हर्षदाने सुरुवातीला उच्चारलेला आपला प्लॉट हा शब्द खरंच मनात घर करून राहिला होता आणि खरंच हा प्लॉट आपला वाटायला लागला होता. आता अधिक थांबलो तर पाय निघणार नाही हे जाणवल्याने पटकन गाडीत जाऊन बसलो आणि गाडी निघाली.

आता फारशा गप्पा होत नव्हत्या पण मूक संवाद साधला जात होता. खरंच मैत्रीण हे नातं कसं आहे ना ! यात सख्खी , चुलत , मावस , मामे वगैरे प्रकार नसतात. मैत्रीण ही फक्त मैत्रीण असते. ते नातं लादलेलं नसतं तर आपण स्वतः निवडलेलं असतं. आणि या नात्याची आपल्या मानसिक आरोग्यासाठी प्रचंड गरज असते. तीच गरज यथेच्छ पूर्ण करण्यासाठी आखलेली ही छोटीशी गिरीवनची ट्रीप पुढील काही काळासाठी भरभक्कम शिदोरी ठरेल. पुन्हा एकदा बास्केट ब्रिज ओलांडला पण यावेळी विरुद्ध दिशेने आणि आता प्रत्येक जण पुन्हा आपापल्या जगात परत जाणार हे जाणवलं. ऊन तर जाणवत होतेच पण त्याहीपेक्षा आता ही ट्रीप संपतीये हा त्रास जास्त जाणवत होता. हे दोन्ही कमी केलं वनिताने. पुढच्या दिवशी (१८ मे) तिचा वाढदिवस म्हणून या पूर्वसंध्येला तिने सगळ्यांना गारेगार कुल्फी दिली. आणि त्या गोड चवीबरोबरोबरच ट्रीपच्या गोड आठवणी मनात साठवत सर्वजणी घरी परतलो.

(हर्षदाला आभार मानले तर राग येईल म्हणून तिच्याप्रति आनंद व्यक्त करते आणि तिला या ट्रीप आयोजनाचे पुरेपूर पुण्य या अधिक मासानिमित्त  मिळो ही सदिच्छा देते आणि थांबते)


शीतल कापशीकर

१८ मे २०१८

Comments

  1. अप्रतिम....👌👌👌👌
    अक्षरशः मी सगळी मज्जा अनुभवली....
    फोटोसेशन ते कुल्फी सगळीच😊😊😊

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Walkathon : एक आनंदानुभूती

गूंजे बनकर देस राग 🇮🇳

सेवा परमो धर्म: ।