रक्तदान यज्ञ
धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे .... मातृमंदिरातून गीत ऐकू येत होते. आधी कार्यालयात जायचे आहे हे ठरवूनसुद्धा पावले नकळत मातृमंदिरात वळली. वातावरणात प्रसन्नता भरून उरली होती. शांततेत पण इतका उत्साह असू शकतो हे बघून मन सुखावले. आज सर्वत्र तरुणाई विहरत होती. मुक्तपणे पण तरीही शिस्तीत सगळी कामे सुरू होती. ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्राच्या युवक विभागाने आजच्या या रक्तदान यज्ञाची जबाबदारी पेलली होती. आईने "जेवायचं ताट वाढते" असं सांगितल्यावर सुद्धा मित्राचा फोन आला म्हणून वाऱ्याच्या वेगाने बाईक पळवत जाणारी .... काहीशी बेपर्वाईचे द्योतक असणारी ही तरूण मुले आज सामाजिक भान , जाणीव जपत धडाडीने काम करत होती. कुठेही कोरोनाच्या निर्बंधांचे उल्लंघन नाही. वाह ! मस्त वाटलं एकदम ... इतक्यात एक मुलगी आली आणि म्हणाली "माझा ब्लड ग्रुप ओ निगेटीव्ह आहे , चालेल का ?" निगेटीव्ह रक्त स्टोअर होत नसतं इतकंच माझं तुटपुंजं ज्ञान त्यामुळे डॉक्टरांना विचारूया असा विचार करत असतानाच एक युवक आला आणि तिला म्हणाला " ताई तुम्ही बसा , मी डॉक्टरांना विचारून येतो" असे म्हणत लगेच पळालासुद्धा. असे रक्त फार काळ स्टोअर करता येत नाही पण आत्ता त्याची तातडीने गरज असू शकते असे उत्तर डॉक्टरांकडून त्याने मिळवले आणि त्या मुलीला बसायला सांगितले. एव्हाना मी त्या वातावरणात स्थिरावले होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि YCM रुग्णालय तसेच डी वाय पाटील रक्तपेढी यांच्या वतीने सुसज्ज व्यवस्था होती. मदतीला आपली युवक सेना होतीच. एकदम झोकात काम सुरू होतं. डॉ. अविनाश वैद्य आपल्या सहकाऱ्यांसह जातीने सर्व व्यवस्था बघत होते. येणाऱ्या अडचणी सोडवत होते.
आज आदरणीय भाऊंचा जन्मदिवस.... कॅलेंडरनुसार हो , त्यांनी सदैव शंकराचार्य जयंती हाच मानला.... सकाळी नऊ वाजता संपूर्ण निगडी केंद्राने ऑनलाईन उपासना केली , मा. देवळेकर सरांनी भाऊंच्या आठवणी जागवून आता आपले दायित्व खूप मोठे आहे ही जाणीव करून दिली. आणि इकडे हे रक्तदान शिबिर सुरू झाले. सध्याच्या परिस्थितीत रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे , मागच्या वर्षी अवतरलेल्या कोरोना साहेबांमुळे रक्तदान शिबिरांची संख्या देखील खूप कमी झाली आहे. आजपासून सुरू होणारे व्यापक लसीकरण ... जे अत्यंत गरजेचे आहेच पण एकदा लस घेतली की नंतर साधारण दोन महिने रक्तदान करता येत नाही (४५ दिवस की ६० दिवस यात मतमतांतरे आहेत 😉) त्यामुळे पुढचे काही महिने जरा अवघड जाऊ शकतात हे लक्षात घेऊन गेले ८-१० दिवस अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन होत आहे. प्रथेप्रमाणे कायप्पा (whatsapp) चेहरापुस्तिका (facebook), इन्स्टाग्रामवर या उपक्रमाची यथोचित प्रसिद्धी तर झाली होतीच. सळसळणाऱ्या रक्ताचा उसळणारा प्रतिसाद ... तब्बल ४०० जणांनी नोंद केली त्यामुळे कालच रजिस्ट्रेशन लिंकसुद्धा बंद केली. सकाळी ९ वाजताच जवळपास १०० जण शाळेच्या प्रांगणात दाखल झाले. कोरोनाच्या नियमानुसार अंतरा अंतरावर खुर्च्या मांडलेल्या होत्या. बाकीच्यांना एकेका वर्गात १० जण असे पाठवून दिले..... एक युवक भरभरून बोलत होता. त्याचं ऐकून घेतल्यावर मी सहजच प्रश्न केला ... किती जणांचं करून झालं रक्तदान ? आता त्याचा चेहरा थोडा उतरलेला वाटला. म्हणाला.... ताई काय सांगू ... आत्तापर्यंत म्हणजे जेमतेम दीड तासात ४३ जणांना हिमोग्लोबिन कमी आहे म्हणून परत पाठवलं. आम्ही ४०० पैकी १०% लोक या कारणामुळे परत जातील म्हणजे ४० जण रिजेक्ट होतील हे गृहीत धरलं होतंच पण आत्तापर्यंतच ४३ जणांना परत पाठवलं आहे. मी त्याला म्हणाले अरे चालायचंच .. बऱ्याच मुली - महिलांचं कमी असतं. त्यावर तो म्हणाला ... ताई , खूप मुलांचं पण कमी भरलं हिमोग्लोबिन. आता मात्र मला पण धक्का बसला आणि वाईट वाटलं. महिलांचं डिलिव्हरीनंतर , मुलींचं विनाकारण डोक्यात असलेल्या बारीक राहण्याच्या फॅडापायी हिमोग्लोबिन कमी असतं हे मी आता स्वीकारलं होतंच. पण तरूण मुलांचं हिमोग्लोबिन कमी असणे ही धोक्याची घंटा आहे का ? आजकाल आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलत आहेत , फास्टफूडचे वर्चस्व वाढत आहे या सगळ्याचा हा परिणाम असेल का ? आता आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. हा कोरोना निघून जाणार आहे त्यामुळे केवळ या दिवसांपुरता हा विचार नाही तर आरोग्याबाबत आपण कायमच सजग , सतर्क राहायला हवे. आरोग्यम धनसंपदा ही केवळ उक्ती न राहता तो स्थायीभाव बनायला हवा असे राहून राहून मनात येत होते.
इतक्यात मला सेल्फी पॉईंट दिसला. फोटोसाठी दाही दिशा । आम्हा फिरविसी जगदीशा । अशा या काळात तो पॉईंट ओस पडलेला बघून मी अवाक. याबाबत विचारले तर एक युवक मला पुन्हा मातृमंदिरात घेऊन गेला आणि त्याने मला दाखवले. सर्वत्र बेड लावलेले होते. डॉक्टर्स , मेडिकल ताफा आसपास होता. शांतपणे सर्वजण रक्तदान करत होते. कुणीही फोटो काढत नव्हते. नेहमी ओठाचा चंबू करून सेल्फी काढणारी तरुणाई आज विचारमग्न होऊन दान करत होते. हे स्थलमहात्म्य असावं असं वाटलं. प्रत्येकाला अखंड मातृभूमीची चित्रप्रतिमा दिसत होती आणि जणू निज रुधिराची आण वाहूनि रूप पालटू देशाचे । असं आश्वासन सगळेजण देत होते. कानावर प्रबोधन गीते , स्फूर्तीगीते पडत होती. त्यातून तयार होणारी सकारात्मक ऊर्जा वातावरण उल्हसित करत होती. निव्वळ दिखाऊपणा कुठेच दिसत नव्हता. सर्वच दाते खऱ्या अर्थाने , केवळ समर्पण भावनेने मातृभूमीचरणी दान समर्पित करत होते. सातत्याने ऐकू येणाऱ्या समूहगीतांचा देखील तो परिणाम असू शकतो.
आज आपल्याला शारीरिक अंतर पाळावे लागत आहे पण मानसिकरित्या मात्र आपण दुरावता कामा नये उलट जास्त जवळ असले पाहिजे. आज हे स्पष्ट दिसले. कितीतरी दोस्तांचा गळाभेट न घेता याराना दिसला. आलास का रे ? टोकन घेतलं आहेस ना ? आलोच मी , तू बस पाच मिनिटं , तो अमका येईलच इतक्यात , तमका लवकर आला होता ... अशी वाक्यं मनाला सुखावत होती.
आणि काम तर किती शिस्तबद्ध होते !! दारातच टोकन दिले जात होते , ऑनलाईन नोंदणी केली आहे का ? याबाबत विचारणा होत होती. पुढे त्यांना योग्य जागी बसायला सांगितले जात होते. नंबर पुकारल्यावर एखादा युवक त्यांना मातृमंदिरात घेऊन जात होता ... तिथे हिमोग्लोबिन चाचणी ... त्यात उत्तीर्ण झालात तर पुन्हा खुर्चीत बसायला पाठवून वेगळीकडे नोंदणी होत होती. रिजेक्ट होणाऱ्यांना बेटर लक नेक्स्ट टाइम अशा शुभेच्छा दिल्या जात होत्या. रक्तदानासाठी नंबर आल्यावर ब्लड प्रेशर तपासणी , लागेल तिथे योग्य ती दक्षता घेतली जात होती. सगळं झाल्यावर चहा - बिस्कीट , सर्टिफिकेट - पेन ... और क्या चाहीये ? दिल खुश होगया असे म्हणत रक्तदाते मातृमंदिरातून बाहेर पडत होते.
इतका कडक उन्हाळा सुरू असताना आज सूर्यनारायण सुद्धा प्रसन्न झाले. त्यांनी आजचा झाकोळ आनंदाने मान्य केला आणि स्वखुशीने आलेल्या दात्यांना सावलीच्या छत्रछायेत राहायची परवानगी दिली. तरीही पाऊस आला तर ... अशी धाकधूक होतीच. आदित्यदादाला ती बोलून दाखवल्यावर तो म्हणाला सुद्धा ... अग भाऊंच्या अमृतमहोत्सवात यज्ञाची सांगता करायला पाऊस आलाच होता की... यज्ञात् भवति पर्जन्यः । तोही आपण आपल्या यज्ञाला मिळालेला आशीर्वाद समजूया. सकारात्मक वातावरणात विचार - आचार आणि उच्चार देखील सकारात्मक येतात आणि त्यायोगे घडते पण चांगलेच. इथून पुढे सगळं काही छान होईल , याची ही नांदी समजूया हवं तर....
या शिबिरात एकूण ३४० पिशव्या रक्त जमा झाले. कितीतरी अज्ञात व्यक्तींचे प्राण यामुळे वाचणार आहेत. आज खरं तर सर्वत्र बिकट परिस्थिती आहे. ऑक्सिजन , रेमडेसीवीर , लसी या सगळ्यांचा तुटवडा भासत आहे. यावर काम पण चालू आहे. सगळं हळूहळू वाढतंय. पण मानवी रक्ताला (निदान अजून तरी) पर्याय नाही. ते एकाच्या शरीरातूनच दुसऱ्याला मिळू शकते. आपल्या प्रतिज्ञेतील सारे भारतीय माझे बांधव आहेत हे वाक्य सिद्ध करण्याची वेळ आली आहे. रक्तदान करून आपण आपल्या देशबांधवांशी रक्ताचे नाते जोडत आहोत. वेगवेगळे असून एकत्र असल्याचा अनुभव घेत आहोत. Me कडून We कडे होणारा हा प्रवास ... तू आणि मी एकत्र होऊन आपण होणारा हा क्षण.... एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे ... सगळ्यांच्या रक्ताचा रंग लाल ... उगवत्या सूर्यासारखा ... नित्य नवी आशा घेऊन येणारा ... चला या आशेच्या रंगात न्हाऊन जाऊया आणि उद्याची सोनेरी स्वप्नं बघूया .....
🙏🏻🙏🏻
- शीतल कापशीकर

छान शब्दात मांडले आहे ताई डोळ्यासमोर सगळे उभे राहिले
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Delete