लेकीचे (पहिले) रक्तदान
लेकीचे (पहिले) रक्तदान .....
अनेकांचे रक्तदान केल्याचे स्टेटस पाहिले आणि या बयेच्या मनाने रक्तदान करायचे ठरवले. असंही सज्ञान (१८ वर्षे पूर्ण) झाल्यापासून जगातली प्रत्येक गोष्ट मी अगदी करूच शकते याचा उच्चार ती वारंवार करत असतेच. सध्याची परिस्थिती , रक्ताची निर्माण झालेली तीव्र गरज , येऊ घातलेलं लसीकरण हे सगळं बघता तिच्या या उत्साहात मी पण सहभागी झाले. सावरकर भवनमध्ये होणाऱ्या रक्तदान शिबिरात सहभागी होण्यासाठी जी लिंक होती त्यावर रजिस्ट्रेशन केले. आता काय काय तयारी करूया इकडे गाडी वळली. सर्वप्रथम वजन तपासले ... ४७ किलोग्रॅम भरले. संयोजकांनी किमान ५० किलो वजन असावे ही अट सांगितली होती. ही नेहमीप्रमाणे गूगलबाबांच्या आश्रयाला गेली आणि त्यावर किमान वजन ४५ किलो लागते हे शोधून काढले. पुरावा म्हणून तो स्क्रीनशॉट काढला. हिमोग्लोबिन १२.५ पाहिजे होते .... हिचे १३.५ ... (आम्हाला कोरोना झाला होता त्यावेळी हिमोग्लोबिन तपासले होते ना) .. स्वारी खुशीत होती एकदम. अजून काय काय तयारी करूया ग ? काल संध्याकाळपासून विचारत होती. सगळी दुकाने - मॉल्स बंद असल्याने नवीन ड्रेसची खरेदी वाचली. कुठलीही गोष्ट असो तिचे सेलिब्रेशन झालेच पाहिजे असा तिचा एक अलिखित शिरस्ता आहे जो मलापण खूपच आवडतो. आज सकाळीच एरवी नाष्टा करायला कटकट करणारी ही मुलगी आई लवकर आणि खूप खायला कर असे मागे लागली. भरपेट नाष्टा करून आम्ही प्राधिकरणाच्या दिशेने प्रस्थान केले. अगदी वेळेत इथे पोहोचलो. इथे संयोजकांपैकी दोघातिघांनी तिला वय विचारले असता तिने पुराव्यासाठी आणलेले कॉलेजचे आयकार्ड दाखवले. लेकीची ही चाणाक्ष बुद्धी बघून मी अवाक ...😅😅. हुश्श !! नाहीतर प्रत्येक प्रश्नागणिक तिचे मोठमोठे होणारे डोळे बघून मला भीती वाटत होती. हिला जर रक्तदान करण्यासाठी नाकारले तर दिवसभर घरात होणारे तांडव मला स्पष्ट दिसत होते. आता संयोजकांनी तिला वजन तपासायला सांगितले. तोही पुरावा जवळ होताच. तरीही उगाचच भरलेला फॉर्म वाया जाऊ नये म्हणून तिला आधी वैद्यकीय तपासणी करायला पाठवले. त्या सगळ्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन तिने त्या आनंदातच फॉर्म भरला आणि ती रक्तदान करायला गेली. माझे विचारचक्र सुरूच होते. आज इतकी रक्ताची आवश्यकता , तुटवडा आहे . राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पिंपरी चिंचवड , स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, अ.भा.वि.प., श्री शंकर महाराज सेवा मंडळ यांच्या वतीने रक्तदान महाशिबिर आयोजित करण्यात आले होते. १ मे नंतर होणाऱ्या व्यापक लसीकरणा नंतर आगामी काळात रक्तदानाची संख्या खूपच कमी होणार आहे. त्यामुळे आपण रक्तदान शिबीरात सहभागी होऊन रक्तदान करावे व रक्तदात्यांना रक्तदानासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन त्यांनी केले होते. कोविड लस घेतल्यानंतर पुढे किमान एक महिना रक्तदान करता येत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर सिद्धी आज रक्तदान करत होती. माझे स्वतःचे हिमोग्लोबिन नेहमीच कमी असते त्यामुळे मी कधीच रक्तदान करू शकत नाही ही खंत सदैव वाटते. पण चला ही तरी करतीये हा एक आनंद वाटत होता. सावरकर भवनमध्ये कोरोना काळातील सर्व नियमांचे उत्तम पद्धतीने पालन करत सर्व दाते रक्तदान करून जात होते. हे सगळं शालेय शिक्षण पद्धतीत समाविष्ट केलं तर ... मनात एक विचार चमकला. पण हल्ली सगळे मार्क्सवादी असल्याने ते मार्क्स मिळवण्यासाठीच असं होईल आणि रक्तदान करणे हा एक संस्कार आहे ही संकल्पना मागे पडेल हेही जाणवले. तरीही सध्या रक्तदान करणाऱ्यांना लसीकरणात लवकर नंबर द्यायला काही हरकत नाही हे ही वाटले. तिथे वीणा मोने ही मैत्रीण जिने स्वतः नुकतंच प्लाझ्मादान देखील केलं आहे ती स्वयंसेवक म्हणून काम करत होती तिच्याशी बोलले.
हे सगळं चालू असतानाच मनू प्रमाणपत्र नाचवत आली आणि आई आता माझा एक फोटो काढ म्हणून मागे लागली. Meanwhile संयोजकांकडूनही फोटोची व्यवस्था करण्यात आलेली होतीच. गाडी एकदम खुशीत दिसत होती. फेसबुक , इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकायची होती ना तिला. फोटो समारंभ यथास्थित पार पडल्यानंतर तिने मला तिथली प्रोसिजर सांगितली. प्रत्येक वेळी बसायची जागा सॅनिटाईझ होत होती, प्रत्येकाचे ब्लड प्रेशर तपासले जात होते , कुणाला काही त्रास होत नाहीये ना याची काळजी घेतली जात होती. अत्यंत सुरक्षित व स्वच्छतेत रक्तदान झाल्यानंतर प्रत्येकासाठी चहा - बिस्कीट - खाऊची व्यवस्था होती. इतकं मस्त वाटलं मला हे सगळं बघून.
आजच्या तरुणाईला ते दाखवत नसले तरी सामाजिक बांधिलकी , जाणीव ही खूप प्रमाणात आहे हे जाणवले. खरंच आताची गरज लक्षात घेऊन अनेक ऑक्सिजन प्लान्टस् उभे राहत आहेत , रेमडेसीवीरचा पुरवठा वाढतो आहे , लसींचे उत्पादन देखील वाढत आहे. ह्या सगळ्यामुळे आपण या वैश्विक संकटावर मात करणारच हे त्रिकालाबाधित सत्य आहेच पण याचबरोबर आज रक्ताची देखील खूप गरज , तुटवडा जाणवत आहे. मानवी रक्ताला अजून तरी पर्याय सापडलेला नाहीये. जास्तीत जास्त संख्येने सहभाग वाढेल तर रक्ताची उणीव लवकर भरून निघेल आणि अनेक अज्ञातांचे प्राण वाचतील. वयाची १८ वर्षे कधी पूर्ण होतील आणि कधी मला गाडी चालविण्याचा परवाना मिळेल अशी वाट बघत असतानाच माझ्या १८ व्या वाढदिवसाला मी रक्तदानाची सुरुवात नक्की करेन असं या मुलांनी ठरवायला हवं असंही वाटून गेलं. आपण आपल्या मुलांशी नेहमी त्यांच्या अभ्यास , करिअर , मित्रमंडळ याबाबत चर्चा करतोच ... त्याबरोबरच त्याांच्याशी आपण समाजाचे देणे लागतो हे अवश्य बोलायला हवे.
माझ्या मनूने ... सिद्धीने केलेल्या रक्तदानामुळे मी प्रचंड खुश आहे. हा आनंद व्यक्त करावा आणि हे वाचून अनेकांनी रक्तदान करायला प्रवृत्त व्हावे यासाठी हा लेखप्रपंच .... सर्व संयोजकांचे , डॉ. अविनाश वैद्य तसेच त्यांचे अनेक सहकारी , स्वयंसेवक या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
धन्यवाद !!!
🙏🏻🙏🏻
शीतल कापशीकर
२५ एप्रिल २०२१



सिध्दी well done keep it up...
ReplyDeleteलेखन उत्तम....
धन्यवाद 🙏
Deleteग्रेट सिद्धी.....अगदी गुणी आहेस हो.....
ReplyDelete🙏
Deleteसिद्धी खूपच चांगले काम आज तुझ्या कडून झाले,अभिनंदन,दुसऱ्याला देण्यातील आनंद असाच नेहमी तुला मिळत राहो,हाच आशीर्वाद
ReplyDeleteअसेच आशीर्वाद आयुष्य समृद्ध करतात 🙏
Deleteखुपच अप्रतिम लेख... आणि सिद्धिची जिद्द पाहून खुप छान वाटलं. मुलांवरील संस्कार हे आई वडिलांकडून मिळतात हे उत्तम उदाहरण. ताई तुम्हीच प्रत्येक क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावण्याचं धाडस करता, तर तुमची मुलगी का नाहि करणार, ती ही करणारच..! 👍🙏
ReplyDeleteआपल्या ध्येयाला सलाम... 😊🙋♂️
धन्यवाद शाहीर गुरुराज ... आपण पेरत राहायचं ... परमेश्वर साथ देतोच 🙏
DeleteCongratulations Siddhi... 👍👍
ReplyDeleteThank you 🙏
Deleteमस्त सिद्धी.कायमच तू सर्वात हिरिरीने भाग घेतेस आणि नाविन्याची कास धरतेस. तुला प्रत्येक नाविन्यपूर्ण गोष्टी साठी शुभेच्छा.💐
ReplyDeleteखूप खूप आभार 🙏
Deleteअभिनंदन ,
ReplyDelete🙏
Deleteखूप छान,अभिनंदन सिद्धी 👍
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteशीतल जी तुमच्या कन्या ने रक्तदान करून एक महान कार्य केले आहे त्यामुळे तीन गरजू लोकांना हें रक्त मिळणार आहे. आपण समाजात राहातो आणी त्याचे आपण देणे लागतो ही फार मोठी समज सिद्धी नी खरी करून दाखविली. दोघीचे ब्लॉग सुद्धा छान 🌹🙏🌹धन्यवाद दिपक पंडित....
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद 🙏
Deleteप्रेरणदायी!! सिद्धीला अनेक शुभेच्छा!!
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteखूपच मस्त सिद्धी! अश्या सामाजिक कामांसाठी केलेला तुझा हट्ट बाकीच्यांना सुद्धा करावासा वाटो. शीतल ताई as usual तुझा लेखन प्रपंच भारी!👍👍 अनेकांना यातून प्रेरणा मिळून भरपूर लोकांनी रक्तदान करावे, कारण खरंच येत्या काळातील ही खूप महत्त्वाची गरज आहे.
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteआधी मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा! मस्तच ग.... छान वाटले खूप
ReplyDeleteधन्यवाद अस्मिता 🙏
Deleteखुप छान.....सिध्दी आणि ताई तुम्ही पण खरंच कसलं cute लिहिलय वाचताना पण भारी वाटलं....
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद शब्दाली .... 🙏
Delete