देणाऱ्याचे हात हजारो .....
आज शिक्षक दिन.... जीवनाच्या वाटेवर , प्रत्येक वळणावर पुस्तकी शिक्षणाइतकेच किंबहुना काकणभर जास्त महत्वाचे जीवन शिक्षण देणाऱ्या सर्वांना हा लेख समर्पित 🙏🙏


कालच आमचे गृह विलगीकरणाचे १७ दिवस पूर्ण झाले. म्हणजे लौकीकदृष्ट्या आम्ही आजपासून कोरोनामुक्त... उद्या आम्हाला तसे औपचारिक प्रमाणपत्र देखील मिळणार आहे. आयुष्यातील हा अतिशय अवघड काळ आता सरलाय ... या काळात आम्हाला सहकार्य करणाऱ्या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार 🙏🙏
आणि मी लिहिती झाले : माझी शाळा..ज्ञान प्रबोधिनी... मी जिथे शिकले ती व आत्ता जिथे संगीत विभागात काम करते ती. प्रबोधिनी सदस्यांचं एक मोठं कुटुंब आहे. केंद्रप्रमुख मनोजराव देवळेकर ... सिद्धीला ताप आल्यापासून ते कालपर्यंत त्यांनी जी मदत केली त्याचे शब्दांत वर्णन कसं करू ? औषधाच्या पुड्या पाठवण्यापासून ते तू तर झाशीची राणी आहेस , बाजी तर मारशीलच या शब्दांत धीर देण्यापर्यंत. त्यांंच्या सौभाग्यवती डॉ.मेधाताईंना तर मी वेळी अवेळी कधीही फोन केलाय. पण मला हसतमुखाने - मैत्रिणीच्या नात्याने धीर दिला त्यांनी. शिवराज अधिकारवाणीने दोघींची काळजी घेण्याबाबत दटावत होता तर आदित्य अगदी मृदू भाषेत ताई काहीही लागलं तरी सांग ग असे सारखे फोन / मेसेज करत होता. एकही सकाळ किंवा संध्याकाळ चुकली नाही जेव्हा पूर्वा - अनुजा या मैत्रिणींनी मेसेज केला नाही. तू अजिबात कामाचा लोड घेऊ नकोस , आम्ही बघतो हे त्यांचे शब्द अजून कानात घुमत आहेत. एक पूर्वनियोजित संगीत सभा रद्द करावी लागली तरी मुक्तिसोपान विभागाने कुठेही नाराजी व्यक्त केली नाही. शाळेतून विद्यार्थी , सहकारी अध्यापक , पालक यांचा शुभेच्छा मेसेजचा महापूर सुरु झाला आणि तिथेच मुहूर्तमेढ ... माझ्या या लेखमालेची. २४ ऑगस्ट पासून न्यूमोनियावर ट्रीटमेंट सुरू झाली होती. त्या दिवशी मी अगदी झोपून होते पण २५ तारखेला पहिला ब्लॉग लिहिला... गौरी आवाहनाच्या दिवशी .... वाचकांचा उदंड प्रतिसाद... आणि मग मात्र मी उत्साहाने लिहायला लागले ही कोरोना लेखमाला...

कर्माचा सिद्धांत - २६ ऑगस्टला गौरीपूजन होते. मी मात्र झोपून होते. एकटी आहेस तर खूप धावपळ करू नकोस वगैरे गोष्टी मंजूला सांगितल्या आणि आम्ही कुठल्यातरी उद्योगात गुंतवून घेतले स्वतःला. १० वाजायच्या सुमारास आमच्या बिल्डिंगमधल्या देशमुख काकूंचा फोन... कशी आहे तब्येत ? आज गौरी जेवतात ना !मी तुम्हा दोघींसाठी पुरणपोळी देते आणून... दाराला पिशवी लावून त्या गेल्यासुद्धा... मी पिशवी आत घेतली. पुरणपोळी आणि गरम गरम मसालेभात... वाह ! तोंडाला पाणी तर सुटलेच पण डोळ्यातून पण पाण्याच्या धारा वाहायला लागल्या... इतकं प्रेम ... तेही काही दिवसांच्या ओळखीवर ... या काकू स्वतः अनेक वेळा डबा मागवतात आणि आज माझ्यासाठी ... सण म्हणून पुरणपोळी पाठवली. गौरीपूजनाला सवाष्ण जेवू घालायची रीत सगळीकडे असते. आज मला लेक मानून त्यांनी जे केले त्याचे शब्दांत वर्णन अशक्य 😌😌 जन्मोजन्मीचे ऋणानुबंध इतकंच म्हणू शकते 🙏🏻🙏🏻 त्यांना धन्यवाद मेसेज केला त्यावर त्यांचा रिप्लाय .... कसं आहे प्रेम द्यावे आणि प्रेम घ्यावे ...दुसरं काय आहे आयुष्यात ? मला असं सगळ्यांसाठी करायला आवडतं , पूर्वीसारखे होत नाही इतकंच नाहीतर रोज दिलं असतं ....असो आईच्या नात्याने केलंय लेकीच्या नात्याने खा .... ओके ? ..... लवकर दोघी बऱ्या व्हा .... इकडे तिकडे तुम्हाला घाईघाईने येताना जाताना बघायला आवडेल .👍👍😊. लगेचच आईला फोन करून सांगितले. आणि मला आठवले ... आत्ताच काही दिवसांपूर्वी नारळी पौर्णिमेच्या दिवशी तिच्या घरासमोरचा निलेश कोरोनामुक्त होऊन आला तेव्हा त्याचं तोंड गोड करायला म्हणून आईने त्याला नारळीपाकाचे लाडू दिले होते. आज हेच तिचे लाडू पुरणपोळीच्या रुपात तिच्या लेकीला मिळाले होते.... आपण जे करतो तेच फिरून आपल्याकडे येतं... कर्माचा सिद्धांत पुन्हा एकदा सिद्ध झाला होता.

ऑनलाईन पूजा आरती : गौरी विसर्जनाच्या दिवशी मला बरंच बरं वाटत होतं. सकाळीच मंजूचा फोन. आज तुम्ही दोघी आरतीला हजर राहायचं आहे बरं का. पुतण्या श्रेयसने ऑनलाईन पूजा - आरती करण्याची नामी शक्कल लढवली होती. मलाच आरती म्हणायला लावली होती. अगदी आरती झाल्यावर ते तबक आमच्याकडे करून आम्ही आरती घेतलीसुद्धा. आता काकूच्या आणि मनूच्या कोरोनाला पळवून लावल्याची भावना त्याच्या मनात होती. रोज डबा द्यायला त्याचे बाबा यायचे ... त्यामुळे आम्हाला बघण्यासाठी त्याने ही युक्ती केली होती.

मैत्र जीवाचे : मला कोरोना झाल्यादिवशीच योगेशचा फोन ... हा आमचा सख्खा शेजारी (आईच्या शेजारी राहणारा) ... त्याच्या बायकोने ... प्रीतीने माझे व्हाट्सएप स्टेटस बघून त्याला सांगितले.... तो म्हणाला ... कधीही कितीही वाजता बिनधास्त फोन कर. तुला घ्यायला पण येईन मी ... माझ्या बऱ्याच ओळखी आहेत. आपण ऍडमिट करू शकतो. काही ब्लड टेस्ट करून घे , मी डॉक्टरांशी बोलतो. आणि अजून महत्त्वाचे... आईची काळजी करू नकोस , आम्ही आहोत. तिला काहीही लागलं तर बघू आम्ही. मोठं ओझं उतरलं डोक्यावरचं... प्रतिभाने पण फोन केला ... काय ग तू ? असं कसं वगैरे बोलून म्हणाली पण आता मात्र आराम कर. आईकडे पण येऊ नकोस. दुसरी शीतल इथे आहे असं बिनधास्त समज. (आईला गरज लागतेच असं नाही पण लागलीच तर मदतीचे हात तयार होते). विनिता पण कधीही काहीही सांग ग असं म्हणाली होती. डॉ. स्मिता बोरा ... कर्मधर्मसंयोगाने अगदी टेस्ट करण्याच्या आधीपासून संपर्कात होती. ती तरी माझी मैत्रीण पण स्वतः डॉ. बिपीन बोरा सुद्धा आवर्जून स्मिताकडे माझी , माझ्या औषधोपचाराची चौकशी करत होते. प्रत्येक वेळी मी बोरा सरांचे सेकंड ओपिनियन घेत होतेच. माझा सतत एंगेज लागणारा फोन बघून अग बाई हा श्वसनाचा आजार आहे , इतकी बडबड करू नकोस, काही लागले तर संग , भावाला झाला असल्याने आम्हा दोघांनाही अनुभव आहे... असे मला कधीतरी .... कदाचित पहिल्यांदाच फोन करणारा अमित सांगत होता. मंजुषाने अगदी सहज... मला बदल व्हावा म्हणून मारलेल्या मनमोकळ्या गप्पा , माधवीने मी डबा देणारच , तुझी जाऊ रोजच देते आज खा माझ्या हातचं असं अधिकाराने म्हणणं मनाला सुखावून गेलं. अपर्णा स्वाद फूडच्या अपर्णाने एक दिवस डबा पाठवला आणि मी पैसे विचारले तर (केवळ तिचा तो व्यवसाय आहे ह्या जाणीवेने)... नको बाई प्रत्येक गोष्ट पैशात मोजू असे म्हणाल्यावर मीच ओशाळले अक्षरशः ... मधुराने अचानक आम्हाला चवीत बदल म्हणून इडली - सांबार - चटणी आणून दिली... संजीवनी शाहिरी पथकातल्या देशपांडे काकू , वनिता , प्रचिती , अलकाताई , शोभा , हर्षदा सगळ्याच जणी म्हणाल्या... काळजी घे ग , तू खूपच पळापळ करतेस आता सक्तीची विश्रांती....अजून कितीतरी उदाहरणं नावानिशी सांगता येतील. मी गमतीने नेहमीच म्हणायची , एक महिना चूल बंद अभियान राबवले आणि मैत्रिणींच्या घरी जेवायला जायचं ठरवलं तर महिना संपेल , मैत्रिणी नाही. या काळात याची पुरेपूर प्रचिती आली मला. आणि हर्षदाचे वाक्य आठवले.....कायम चांगले पेरीत आली आहेस त्याची चांगली फळं मिळणार तुला🙏

बीमारीसे लडना है बीमारसे नही : एके दिवशी अचानक घराची बेल वाजली. मी दार उघडले तर दारात कुणीही नव्हते. एक शुभेच्छा पत्र ... ज्यावर काळजी घ्या - सुरक्षित राहा असा मेसेज होता आणि छान खाऊ होता. पुन्हा डोळ्यात आसवं जमा झाली की कोण असावा हा हितचिंतक ? ज्याने हे दारात ठेवले आणि क्षणार्धात गायब झाला. पुन्हा देवाचे आभार मानले. TV वरची जाहिरात आठवली... त्यांना एकटं राहायला सांगितलं आहे , एकटं पाडायला नाही. हे सगळं बघून दूधवाल्याने , पेपरवाल्याने दूध-पेपर देणे बंद केले ही रुखरुख नाहीशी झाली.
आपली माणसं : आम्ही positive आहोत हे कळले त्या दिवशीच आमच्या शाळेच्या पर्यवेक्षिका विद्याताई मला म्हणाल्याच होत्या ... शीतल आता तुला माणसं नक्की कळतील बरं का ग. या काळात लांब राहणाऱ्या अनेकांचे मला काळजीने , आपुलकीने फोन आले होते तर काही अगदी जवळच्या माणसांनी तोंडदेखली सुद्धा चौकशी केली नव्हती. कुणावरही राग नाही... हे लोक आपले नव्हतेच कधी असं समजायचं किंवा कोरोनाची भीती वाटत असेल त्यांना. काही वेड्या लोकांनी फोन करून तुला माहितीये का अमके तमके कोरोनाने गेले असे सांगितले तेव्हा मी हसून हसून बेजार झाले अक्षरशः ... मला अनेक विनोदी किस्से आठवायला लागले. पण इथे देखील मला लिखाणाची प्रेरणा मिळाली बरं का. समाजात सकारात्मकता पसरवायची खूप गरज आहे. मीडियावर वाईट बातम्या रंगवून रंगवून दाखवल्या जातात. मी सकारात्मक बाबी सगळ्यांसमोर आणायचे ठरवले होते. माझ्या आईने तर रोज जपाच्या माळा वाढवल्या होत्या , रोज सकाळी न चुकता कशी आहेस असा फोन करत होती , तिच्यापासून मी न्यूमोनिया लपवला होता पण माझ्या आवाजावरून काहीतरी होतंय हे तिने जाणले होते ....ती तरी बोलून चालून आईच माझी पण मीरा काकू ... ज्यांच्याशी नव्यानेच ओळख झाली होती त्यांनी पण ए पोरी आता शांत बस ग , आमच्या नातीची काळजी घे आणि बरी झालीस की पहिल्यांदा माझ्या घरी जेवायला ये. गजानन महाराज सगळं चांगलं करतील बघ असे म्हणून मला आशीर्वाद दिला होता. मला त्रास नको म्हणून आईकडे फोनवर माझी चौकशी करत होत्या. आईच्या कितीतरी मैत्रिणी गुजर काकू , नगरकर काकू , उपासनी काकू .... माझे ब्लॉग वाचूून कौतुकाने धीराची आहेस बाई पण तरीही जपा बरं दोघीही असे मेसेज करत होत्या.
आत्या , काकू , मामी पण सतत काळजीने विचारपूस करत होत्या. शिल्पा - स्वप्नाचे फोन/मेसेज पण ठरलेले,नियमित.पार्थ , सोहम हे भाईलोग इन्स्टाग्रामवर सिद्धीच्या नित्य संपर्कात होते. श्वेता निनाद सातत्याने फोनवर विचारपूस करत होते. मी तुझ्यासारखाच धीट आहे. कोरोनाला भीत नाही. गरज पडली तर नक्की फोन कर. मी येईन. निनादने अगदी निक्षून सांगितले होते. त्यामुळे माझे मनोधैर्य अजूनच वाढले. अशी प्रेमळ माणसं माझ्याभोवती सकारात्मक लहरी निर्माण करत होती ज्याने कोरोनाला पळून जावेच लागणार होते.
काका मला वाचवा : किती प्रसिद्ध उक्ती आहे ना ही ! पण या काळात चांगल्या अर्थाने आम्ही वापरत होतो. सिद्धीला ताप आल्यादिवशीच रात्री साडे दहा वाजता ऑक्सिमीटर घेऊन येणारे माझे दीर ... माझ्या मनूचे लाडके काका आमच्यामागे खंबीरपणे उभे होते. आम्ही टेस्ट करायला गेलो तेव्हा तेही येत होते बरोबर पण मी निकराने थांबवले त्यांना (कारण मनात कुठेतरी आम्ही positive येणार ही कुणकुण होतीच) ... माझ्या न्यूमोनियाचे निदान झाल्यावर तर कितीतरी मेडिकल दुकाने पालथी घातली होती माझ्या औषधासाठी. रोज डबा आणून देणे , दूध आणून देणे (आणि सगळं बाहेरच्या बाहेर ठेवून निघून जाणे) , प्रत्येक वेळी फोनवर सिद्धीशी हसून काहीतरी बोलणे (या कोरोनाचे त्यांनाही बरेच टेन्शन आले होते पण आम्हाला ते कळू न देण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी केला). शास्त्रीय संगीतातील सा आणि प यांच्यात तिळमात्र भेदभाव न करणाऱ्या माझ्या मनूच्या या काकांनी तिचे दोन्ही फेसबुक live ... संपूर्ण शास्त्रीय संगीत कार्यक्रम मात्र पूर्ण पाहिले , प्रतिक्रिया नोंदवत तिचे कौतुक पण केले. एरवी तिला ए आता तुझं ते वाजवणं बंद कर ग म्हणणारे काका आता इतका मोठा न कळणारा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम कौतुकाने बघत होते... फक्त सिद्धीच्या प्रेमापोटी. रक्ताच्या नात्यातली ओढ , आपुलकी होती ती. माझी जाऊ मंजू पण रोज फोन करणे , डबा करणे , काळजी करू नका दोघी असा धीर देणे करत होतीच. पुतण्या श्रेयसने तर काकूला , मनूला गणपतीचे असे डेकोरेशन आवडेल का वगैरे विचार करून तिरंगा थीम ठेवून साधीशी सजावट केली होती. आम्ही फक्त एकट्या राहात होतो पण सदैव प्रेमाच्या माणसांच्या गराड्यात होतो. या सर्वांचे आभार मी मानूच शकत नाही. ऋण कधीच फेडू शकत नाही. तेवढी श्रीमंती नाहीये माझ्याकडे.
आज परमेश्वराची कृपा , योग्य औषधोपचार आणि सगळ्यांच्या शुभेच्छा यामुळे आम्ही कोरोनामुक्त झालो आहोत. शक्य झाल्यास प्लाज्मा DONATE करणार आहोत. आणि कोरोना हे प्रकरण आयुष्यातून वजा करून टाकणार आहोत. सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार. धन्यवाद !!!
फारच भारी..... धन्यवाद कसले देतेस ग......आपण नेहमी आहोत एकमेकांना
ReplyDeleteया विश्वासावरच तर पळवून लावले कोरोनाला 🙏
Deleteअशा वेळीच माणसे कळतात हे अगदी खरे.... धिराच्या आहात दोघी... तरी काही दिवस नक्की काळजी घ्या...
ReplyDeleteखरं तर माणसांची पारख करून देणाऱ्या कोरोनाचे आभारच मानायला हवेत 😀
Deleteजशी द्रृष्टी तशी स्रृष्टी। . .
ReplyDeleteतू सकारात्मक आहेस म्हणूनच आजूबाजूला तेच वातावरण मिळालं . .
असाच उत्साह आणि आपल्याला जे काही मिळाले आहे त्याविषयीचा क्रृतज्ञ भाव हीच मनाची श्रीमंती !!!!!
अगदी खरंय. आपण ज्या चष्म्यातून पाहू तसे जग आपल्याला दिसते
Deleteताई तुम्ही म्हणलच आहे "जे पेराल ते उगवेल".त्याचाच प्रत्यक्ष अनुभव तुम्ही घेतलात.अंध मुलीं साठी तुम्ही जे काही केले आहे, करत आहात, करणार आहात त्याचे आशिर्वाद सतत तुमच्या पाठीशी नक्की असतीलच....... आणि देवळेकर सर म्हणल्या प्रमाणे तुम्ही झाशीची राणीचं आहात करोना ला तुम्ही हरवणारच होता अशी आम्हाला खात्री होतीच!!!!परत एकदा देवाचे आभार आणि संगितात सिध्दी ला भरपूर यश मिळो....
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद 🙏
Deleteशीतल तू आणि सिद्धी करोनाशी लढून जिंकून आलात अभिनंदन आणि तू आत्ता प्लाझ्मा डोनेट करणार आहेस,अतिशय चांगले काम,खरोखर राष्ट्रीय कर्तव्य करीत आहेस, शुभेच्छा
ReplyDeleteकदाचित ही सकारात्मक लेखमाला लिहिण्यासाठी आणि प्लाज्मा दान करता यावे म्हणूनच मला कोरोना झाला असावा 🙏
Deleteशीतल ताई.. कौतुक करावे तेव्हढे कमी तुम्हा दोघींचे.. कठिण प्रसंगी च आपली माणस ओळखू येतात..
ReplyDelete🙏
Deleteसकारात्मक विचार व सकारात्मक दृष्टिकोन या मुळे तुम्ही दोघी कोरोनाला हरवू शकलात. ब्लॉग लिहून उत्तम अनुभव लेखन आपण वेळोवेळी केले त्यामुळे अनेकांची कारोना भिती कमी होण्यास नक्कीच मदत झाली. अशाच छान आनंदी रहा.
ReplyDeleteआज मीडियावर वाईट बातम्या रंगवून रंगवून दाखवल्या जातात त्यामुळे कुठेतरी सकारात्मकता निर्माण होणे गरजेचे आहे या उद्देशाने ही लेखमाला. तुमच्यासारखे वाचक लाभणे हे देखील भाग्यच 🙏
Delete