काळजीवाहू -केअरटेकर पिं चिं म न पा

आज १ सप्टेंबर ....अनंत चतुर्दशी ... आज आम्ही घराबाहेर न पडण्याचा चौदावा दिवस ... आता unknown नंबरवरून येणाऱ्या फोनची सवय झालीये. मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून बोलतेय/ बोलतोय... कशी आहे तब्येत ? ... माझे विचारचक्र जोरात फिरू लागले. एका सामान्य व्यक्तीसाठी किती मोठी यंत्रणा राबतीये आणि आपण मात्र ह्या लोकांना काय काम असतं असं किती सहज म्हणून मोकळे होतो ना. 😥😥
१९ ऑगस्टपासूनचा प्रत्येक क्षण माझ्यासमोरून चमकून गेला. सकाळीच नंबर मिळवून मेटे सिस्टरना केलेला फोन.... तालेरा हॉस्पिटलची तपासणीची वेळ विचारण्यासाठी... कधीही या , काळजी करू नका , घाबरू नका हे त्यांचे अनोळखी व्यक्तीसाठी असलेले आश्वासक शब्द... तिथेच धीर येतो माणसाला. पुढे प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये तपासणी. केसपेपर काढण्यापासून health चेकिंग , नोंदणी , स्क्वॅब घेणे , शिक्का मारणे , announcement , संगणक एन्ट्री किती किती प्रक्रिया त्या देखील शिस्तीत चालू होत्या. आम्हाला फार काही त्रास होत नव्हता त्यामुळे मी बारकाईने निरीक्षण करत होते. पीपीई किट घालून नेहमीच पैचान कौन या अवतारात असणारी ही डॉक्टर - नर्स मंडळी अखंड कामात व्यस्त होती. अक्षरशः कौतुक वाटत होते या लोकांचे ! आमची केवळ नाकातून स्क्वॅब घेण्याची टेस्ट झाली होती व आम्हाला जायला सांगितले होते. पुढची टेस्ट आमच्यासाठी नव्हती. सगळी प्रक्रिया झाल्यानंतर भेटलेल्या डॉ. प्रतिमा माटोले ... इतकी पेशंटची गर्दी - गोंधळ , आरडाओरडा असताना देखील हसतमुख चेहऱ्याने उत्तरे देणारी ही डॉक्टर मुलगी मला खूपच आवडली. मला हे सगळे कुठेतरी नोंदवायचे होते म्हणून मी तिथे थांबले होते. तुम्ही positive आहात हे डॉ. प्रतिमाने आम्हाला (आम्ही नॉर्मल वागतो आहोत हे बघून) सांगितले. अन्यथा हा रिपोर्ट फोनवर दुसऱ्या दिवशी कळवला जातो. काही काळजी करू नका , तुम्हाला फोन येईल , तुमची पुढची सगळी व्यवस्था केली जाईल हे सांगितल्यावर खूपच हायसे वाटले होते मला तेव्हा. मी कोविड positive आहे हे सगळ्यांना सांगण्यासाठी मी एक ऑडिओ मेसेज बनवला होता तो डॉ. प्रतिमाला पण पाठवला. तो त्यांच्या डॉक्टर्स गटावर viral झाला असावा कारण त्याच रात्री मला डॉ. रोहन पाटील यांचा फोन ... काळजी करू नका , धन्यवाद छान मेसेज केल्याबद्दल.... मला राहून राहून वाटत होतं.... धन्यवाद ... किती छोटा शब्द , पण त्याची महती किती मोठी. आज आपण हेच विसरत चाललोय. आता हे दोघे आमचे फेसबुक फ्रेंड झाले होते.🤝
दुसऱ्या दिवशी सकाळीच फोन .... मनपातून बोलतोय... पत्ता सांगा. तुमची बिल्डिंग सॅनिटाईझ होईल , तुमच्याकडे चौकशी आणि पुढच्या procedure करता माणसे येतील. बापरे ! किती तत्पर व्यवस्था होती मनपाकडून. आदल्या दिवशीच मी आमच्या बिल्डिंगच्या व्हाट्सएपच्या गटावर आम्ही positive असल्याचे सांगितले होतेच (मला पहिल्यापासूनच काहीही लपवायला आवडत नाही त्यामुळे मला गुप्तहेर खात्यात कधीही घेणार नाहीत असे सगळे चिडवतात सुद्धा...😂😂 ) पुन्हा फोन ... मनपातून ... बिल्डिंग सॅनिटाईझ झाली का ? लोक येऊन गेले का ? इन्स्पेक्टर सुकटे यांच्या नेतृत्वाखाली, नियोजनात संपूर्ण बिल्डिंग , लिफ्ट , पार्किंग सगळीकडे फवारणी झाली. हे होईपर्यंत मला प्रत्यक्ष डॉक्टरांचे मेसेज सुरू....
डॉ.विद्याधर फल्ले ... गृह विलगीकरण प्रक्रिया ... त्यासाठी मार्गदर्शक प्रणाली सगळे pdf स्वरूपात त्यांनी मला पाठवले. त्यासाठी आवश्यक ब्लड टेस्ट , XRay , ECG करून घ्या सांगितले. थर्मामीटर , ऑक्सिमीटर आणून त्याच्या नोंदी दिवसातून दोनदा कळवाव्यात असे सांगितले. आरोग्य सेतू व सारथी ऍप डाउनलोड करा व ते ऍक्टिव्ह ठेवा असे सांगण्यात आले. इमर्जन्सी आल्यास संपर्क क्रमांक व अँबुलन्स संपर्क क्रमांक दिले. अबब ! किती मोठी कार्यप्रणाली सहज राबवली जात होती. एका पेशंटमागे किती हात राबत होते. या कोरोनाने मला माझी मनपा एका वेगळ्या रुपात दाखवून सुखद धक्का दिला होता. (दुःखातही सुख शोधायची मला मुळी खोडच आहे...)
दुपारी दोन वाजायच्या दरम्यान दारात मनपाचे कर्मचारी हजर ... पुन्हा रीतसर सगळी नोंदणी .. आमचा दोघींचा स्वतंत्र फॉर्म भरला गेला त्यावर काळजीवाहू.. केअरटेकर म्हणून माझ्या दिरांनी ... जे घराच्या जवळच राहतात त्याांनी सही केली. रुपाली सिस्टरना रोज तापमान व ऑक्सिजन पातळी कळवायची असे आम्हाला सांगण्यात आले.घरात काय सोयी आहेत , पेशंटची स्वतंत्र व्यवस्था होऊ शकते का ? स्वतंत्र वॉशरूम आहेत का ? विलगीकरण कसे अपेक्षित आहे , मास्क लावा , बाहेर जायचे नाही हे सांगून काही औषधे लिहून दिलेले प्रिस्क्रिप्शन , मास्क - टिशू पेपर - कापूस बोळे वगैरे कचरा टाकायला स्वतंत्र पिशवी .. हा कचरा सुद्धा सॅनिटाईझ करायला लिक्विड ... ही पिशवी भरल्यास गोळा करायला येणाऱ्या व्यक्तीचा संपर्क क्रमांक सगळे दिले.(आम्ही धुता येण्याजोगे मास्क आणि रुमाल वापरत असल्याने आम्हाला या कशाचीही गरज भासली नाही)... पण सिस्टीम कशी आहे हे कळले. गनने आमचे तापमान तपासून ते दोघे संपूर्ण इमारतीतील सदस्यांची तापमान तपासणी करण्यासाठी गेले. गेले चौदा दिवस हे दोघे न कंटाळता बिल्डिंगमध्ये येतात .. सगळ्यांच्या तापमानाची नोंद घेतात , आमच्या तब्येतीची चौकशी करतात. न राहवून मी परवा त्यांना नाव विचारलेच .... धनराज नरुटे आणि सतीश चौधरी... ते उत्तरले. असे कितीतरी जण या कोविडविरुद्धच्या लढाईत आपला वाटा उचलत आहेत. सलाम अशा लोकांना जे यंत्रणा चालवायला हातभार लावतात.
रुपाली सिस्टर .... यांना रोज सकाळी व संध्याकाळी आमचे दोघींचे reading पाठवायचे होते. आम्ही न चुकता reading पाठवत होतोच पण कधी पाठवायला जरासा उशीर झाला तर या ताईंचा मेसेज... reading पाठवा असा. सिद्धी तर गमतीने म्हणायची देखील ... आई आपण ऍडमिट आहोत आणि त्या आपल्याला तपासायला येतात असंच वाटतंय मला. पण खरंच मानलं त्यांच्या सातत्याने विचारणा करण्याला. खरं तर पेशंटने आपण होऊन पाठवायला हवे पण इथे उलटी गंगा वाहत होती. पुन्हा एक हलकीशी सुखाची झुळूक सुखावून जात होती.
खरी गंमत तर पुढे आहे... XRay फिल्मचा फोटो पाठवल्यावर अर्ध्या तासात मला डॉ. फल्लेंंचा फोन. न्यूमोनिया पॅच दिसतोय ... घाबरू नका , आपण Hrct करूया किंवा ऍडमिट व्हा. काहीही त्रास वाटला तर कुठल्याही क्षणी फोन करा. दुसऱ्या दिवशी न्यूमोनिया निदानावर शिक्कामोर्तब ... walk test आणि अँटिबायोटिक कोर्स सुरू ... आता माझे रोजचे रिपोर्टिंग या डॉक्टरांना. रोज walk test घ्यायची , सलग सहा मिनिटे चालून ऑक्सिजन पातळी कळवायची ... before - after दोन्ही. एक दिवस उठायला उशीर झाला आणि walk test राहिली. डॉक्टरांचा मेसेज ... आजचे reading तुम्ही कळवले नाही. माझे मन अक्षरशः भरून आले. दहा मिनिटे शांत बसून मग चालले. न जाणो भारावलेल्या मनाने काढलेला रिपोर्ट चुकला तर काय़ घ्या. टेस्टच्या वेळी मन कसे निर्विकार असावे. असं माझं निर्मळ मत ... रुपाली सिस्टर बरोबरच आता या डॉक्टरांना पण मी reading कळवत होते. आणि यावरही कडी म्हणजे मनपातून फोन ... शीतल कापशीकर , तब्येत ठीक आहे का ? .... माझे बिनधास्त उत्तर ... मी डॉक्टरांना संपर्क करतीये बरं का. त्यावर पलिकडून ... हो , त्यांनीच मला रोज फोन करायची ऑर्डर दिली आहे. आता मात्र मी डोक्यावर हात मारून घेत होते. किती मोठी फिल्डिंग लावली होती पालिकेने. होम आयसोलेशनमधल्या प्रत्येक पेशंटची अशी काळजी घेतली जात होती.
मी कोविड positive आहे हे मी व्हाट्सएपच्या स्टेटसला ठेवले होते , लेकीने फेसबुकवर पोस्ट केले होते. माझे कोरोना बाबतचे ब्लॉग देखील मी स्टेटसला ठेवत होते. ते बघून आमच्या प्रभागातील नगरसेवक शीतल शिंदे यांनी देखील काळजी घ्या , लवकर बऱ्या व्हा असा मेसेज मला पाठवला. सत्तारूढ पक्षनेते मा. एकनाथ पवार यांनीसुद्धा फोन करून तब्येतीची चौकशी केली. मदत लागली तर कळवा असे आवर्जून सांगितले.(मला राजकारणात तिळमात्र रस नाही , हे मी केवळ कृतज्ञ भावनेतून नमूद करत आहे याची कृपया नोंद घ्यावी.)
आज औषधोपचार , विश्रांती यामुळे मी बरीच बरी आहे. तरीही थकवा अजूनही जाणवतो आहे असे डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनी संशमनी वटी महिनाभर घ्या असा सल्ला दिला. कदाचित भविष्यात पुन्हा कधी या लोकांशी संबंध येईल न येईल माहीत नाही. पण आत्ता जे ऋणानुबंध जुळले ते अगदी कायमचे लक्षात राहतील. खरं तर एरवी सुद्धा आपण डॉक्टरांकडे गेल्यावर आपल्याला औषधांचा कोर्स लिहून देतात आणि गरज वाटल्यास पुनर्तपासणी साठी बोलवतात. इथे तर आम्ही घरी होतो पण ऍडमिट असल्यावर असतात तशा नोंदी ठेवल्या जात होत्या. वरकरणी आम्ही स्वतः काळजी घेत असलो तरी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या व्यवस्थेखाली ते जमत होते.
माझा जन्म इथला , लग्नानंतर सासरही इथलेच आणि जे काही काम करतीये ते ही इथेच.... त्यामुळे घरचे मला विनोदाने चिडवतात सुद्धा की ही एकदम लोकल क्वालिटीची आहे. पिं चिं म न पा. आज मी अभिमानाने सांगेन की याच माझ्या लोकल क्वालिटीने मला तारले. या महामारीच्या संकटातून मला बाहेर काढले. माझ्या शारीरिक-मानसिक आरोग्याची काळजी घेतली. डॉक्टरांना काय कळतंय असं मला कधीच वाटत नव्हतं पण प्रशासकीय यंत्रणा किती कार्यक्षम आहे याची मात्र मला यानिमित्ताने प्रचिती आली. आपण तांत्रिकदृष्ट्या स्ट्रॉंग तर आहोतच पण त्याच बरोबर प्रशासनामधील माणुसकीचे अनोखं दर्शन देखील यामुळे मला घडलं.
आजही लोक विनामास्क हिंडत आहेत , पावसात धबधब्याच्या ठिकाणी चोरून फिरायला जात आहेत , आपण कसे पकडले गेलो नाही ते रंगवून रंगवून सांगत सोशल मीडियावर फोटो शेअर करत आहेत. या सर्व अजाण लोकांना हात जोडून कळकळीची विनंती की पालिका आपल्यासाठी राबतीये , त्या यंत्रणेवर अजून ताण येईल असे वर्तन कृपया करू नका. अजून एक आणि अत्यंत महत्वाचे .... आजार लपवू नका , ताप -सर्दी-खोकला काहीही झाल्यास आपण होऊन टेस्टसाठी पुढे या , गरज पडल्यास क्वारंटाईन व्हा , आपल्या बरोबरच समाजातील अनेकांना हा आजार होण्यापासून वाचवा. अमके माझे शेजारी आहेत , तमके माझे नातेवाईक आहेत त्यांच्यासमोर कशाला मास्क असा विचार करू नका. सोशल डिस्टंसिंग पाळा. विनाकारण बाहेर फिरू नका. इतकेही करून काही झालेच तर तपासणी करायला हयगय करू नका. स्वतःची तपासणी करून घेणे हेसुद्धा एक राष्ट्रकार्यच आहे. आपण positive आल्यावर लोक कसे वागतील ही भीती बाळगू नका. त्यांना पुरून उरू असा आत्मविश्वास ठेवा. आज जर कोरोनाची साखळी तोडायची असेल तर मी काय करू शकतो हा विचार सगळ्यांनी करायला हवा आणि आपल्या महानगरपालिकेला साथ द्यायला हवी.
माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला गृह विलगीकरण - होम आयसोलेशनमध्ये इतकी रॉयल ट्रीटमेंट देणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला माझा मानाचा मुजरा ... 🙏🙏🙏
खूप छान लिहीले आहेस. नेहमी पोवाडा रचून अनेक विषय/विचार सर्वांसमोर मांडत असतेस. तितक्याच positively हे लेखन केले आहेस. लवकर बऱ्या व्हा दोघी. सतत झटणाऱ्या सरकारी यंत्रणेला सलाम..
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteखरोखर या कोरोनाच्या निमित्ताने मला खूपच गोष्टी कळल्या .
Thanx for sharing your experience
ReplyDeleteखरं तर तुमचे मनःपूर्वक आभार डॉ. फल्ले , खूप खूप धन्यवाद 🙏
Deleteखूप छान अनुभव लेखन, सकारात्मक विचारांचा प्रवाह, अनेक जण आलेल्या अनुभव मांडताना कृतज्ञता ही जाहीरपणे मांडत नाहीत, आपण ही कृतज्ञता सहज पणे व्यक्त केली या बद्दल तुमचे कौतुक ताई.
ReplyDeleteमी समाजाप्रती असलेलं आपलं छोटंसं कर्तव्य या निमित्ताने पार पाडतीये 🙏
Deleteखरंच आपली मनपा व त्यातील कर्मचारी किती योग्य काळजी घेतात हे अतिशय मनापासून लिहिलेले वाचून सर्व कर्मचाऱ्यांना सलाम
ReplyDeleteहो
Deleteमनपा तुफान काम करत आहे
स्वानुभवातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न
शीतल ताई तुम्ही हे सर्व सांगितलं आहे ते खुप सुंदर तर लिहलेला च आहे पण खरच सामान्य नागरिकांना हे सर्व अनुभव नक्कीच उपयोगी पडतील असे मला वाटते कारण हा विषय किती गंभीर आहे याची जाणीव आता कमी कमी होत चालली आहे पण एका व्यक्ती साठी इतकी लोक काम करत आहेत ते ही स्वतः चा जीवाची पर्वा न करता 24 तास काम करत आहेत त्यांना खर च सलाम
ReplyDeleteआणि तुम्ही लवकर पूर्ण ok व्हावे ही गजानन महाराजनाच्या चरणी प्रार्थना
अगदी खरंय प्रियांका . ... लोकांना जाणीव होणे अत्यंत गरजेचे आहे . एक चूक सुद्धा महागात पडू शकते. जनजागृती ह्या हेतूनच लेखन सुरू केले.
Deleteमहानगरपालिका खरचं खूप महत्वाचे काम बजावत आहे. नुसत्या बातम्यांमधून खरं काय ते कळत नाही ग! पण तुझ्या अनुभवांमधून खात्री पटते या सगळ्यांच्या कामांची! Great काम चालू आहे. पण अजूनही जे लोक काळजी घेत नाहीत त्यांनी मात्र आतातरी सुधारले पाहिजे म्हणजे परिस्थिती लवकर पूर्ववत होईल.
ReplyDeleteतू या काळात हे सर्व positively घेतले आहेस. ग्रेट! लवकर बरी हो!
योगिनी.
मीडियाने पण अशा सकारात्मक गोष्टी पुढे आणल्या पाहिजेत. सकारात्मक बोलू , वागू तर होईल पण चांगलेच अशी दृढ श्रद्धा ठेवून पुढे जाऊया आणि कोरोना राक्षसाला चारी मुंड्या चीत करूया
Deleteहा अनुभव मोकळेपणाने लिहिल्याबद्दल तुझे कौतुक आहे .
ReplyDeleteप्रशासनातील बारकावे यानिमित्ताने आम्हालाही कळले. सगळ्याच नगरपालिका इतक्या कार्यक्षम नाहीत!
पि.चि. मनपाची ही प्रक्रिया खरोखर खूपच परिणामकारक आहे. सर्व गावांनी, शहरांनी ही प्रक्रिया स्वीकारावी, असे एक डॉक्टर म्हणून मला वाटते!!
इतरत्र होम आयसोलेशन असलेले पेशंट त्यांच्या डॉक्टरांच्या भरोशावरच आहेत .
प्रशासनाचा सहभाग काडी मात्रही नाही.
तुमच्या इथे पेशंट, डॉक्टर ,हॉस्पिटल ,आणि प्रशासन यांची साखळी छान मेंटेन करीत आहेत !!
खरंय .. पिंपरी चिंचवड मनपा चे काम वाखाणण्याजोगे आहेच ... इतरांनीही आदर्श घ्यावा असे. फक्त लोकांचा प्रतिसाद सकारात्मक असणे अत्यंत आवश्यक आहे. अजूनही कोरोना लपवला जातोय , पेशंट हिंडत राहतात , व्हाट्सएपवर चुकीचे ... प्रशासन आणि डॉक्टर विरोधात मेसेज नाचत आहेत , ते प्रमाण कमी व्हायला हवं. मुख्य म्हणजे औषधोपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवेत , मनानेच किंवा गूगल डॉक्टरकडून नाही असे वाटते. म्हणूनच हा लेखप्रपंच
DeleteThank you shetal tai...
ReplyDeleteThank you shetal tai..
ReplyDeleteFrom mete sister.
तुम्हा सर्वांना धन्यवाद खरं तर... मी फक्त स्वानुभव सांगितला 🙏
Deleteकाळजी घ्या
ReplyDelete🙏🙏
Deleteखूप छान अनुभव लिहिला आहे शीतल ताई, शासन त्यांच्या परीने खरच खूप कष्ट करत आहे.
ReplyDeleteहो , प्रशासनाचे काम खरोखरच वाखाणण्याजोगे आहे... निदान PCMC मध्ये तरी
Delete