बाउन्सर .... डक
कालच्या कार्यक्रमाची धुंदी अजूनही उतरली नव्हती आणि त्यातून आज बाप्पाचं आगमन ... गणेशचतुर्थी ... घरोघर साधेपणाने पण उत्साहात गणपती बाप्पा विराजमान होत होते. मी ही एकदम खुशीत होते त्यामुळे मस्त गुळाचा शिरा केला आणि देवाला नैवेद्य दाखवला. आम्हीही खाल्ला. कालच्या कार्यक्रमाबद्दल बोलत असताना सहज लक्षात आले की कालचा XRay कार्यक्रम अजून बाकी आहे तो उरकायला हवा. रोजच्यासारखे रुपाली सिस्टरला तापमान व ऑक्सिजन पातळी दोन्ही reading कळवले होते. बिल्डिंग मध्ये नेमाने येणारे मनपाचे कर्मचारी काय कसं काय बरंय ना ? असे विचारून गेले. त्यांना सगळं काही ठीक आहे असे सांगून आम्ही लोकमान्य हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. आयुष्यात पहिल्यांदा ECG काढला आणि मग गेलो XRay काढायला. लगेचच ती फिल्म आम्हाला मिळाली आणि रिपोर्ट सोमवारी घेऊन जा असे सांगितले. आज गणेशचतुर्थी व उद्या रविवार असल्याने डॉक्टर भेटणार नव्हते. आम्हाला एकदाचे ते रिपोर्ट जमा करायचे होते म्हणजे आमच्या होम आयसोलेशनवर शिक्कामोर्तब होणार होते. अन्यथा त्या रिपोर्टशी मला काहीही सोयर सुतक नव्हते. कारण मी अगदी फिट न फाईन आहे असा माझा जबरदस्त (ओव्हर) कॉन्फिडन्स होता. हे सगळं होइपर्यंत दुपारचे तीन वाजून गेले होते.
घरी आल्यावर जेवण , झोप सगळं यथासांग पार पडल्यानंतर एक नवीन प्रोजेक्ट जो काही दिवसांपूर्वी करायला घेतला होता त्याच्या मागे पडलो. Whatsapp वर अनेकांशी चॅटून झाले. एकंदरीत सगळं मस्त चाललं होतं. रात्रीचं जेवण सुद्धा झालं. आमच्या घरी जर CCTV असता तर ते फुटेज बघणारा अक्षरशः वेडा झाला असता किंवा त्याने डॉक्टरांना वेड्यात काढले असते की हे नक्की कोविड पेशंट आहेत का . रात्री साडे आठ वाजता लक्षात आले की अरे हे रिपोर्ट पाठवायचे राहिलेत की. लगेच रुपाली सिस्टरला भराभर फोटो पाठवले आणि आम्ही पुन्हा निवांत. सगळं गुडी गुडी चालू असतानाच सव्वा नऊच्या सुमारास माझा फोन वाजला.
"हॅलो शीतल कापशीकर का ?" नुसता नंबर होता आणि मी truecaller वर नाव बघितले नव्हते. आम्हाला डिस्टर्ब करणारा हा क्रेडिट कार्ड/लोन पाहिजे का असा फालतू फोन असेल (जे फोन दिवसातून कितीही वेळा आणि कितीही वाजता येतात)असे वाटून मी फोन कट करणार इतक्यात पलिकडून आवाज आला..."मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून बोलतोय... डॉ. विद्याधर फल्ले". मी कान टवकारले. "तुमचा XRay पाहिला (इतक्या लगेच डॉक्टरांपर्यंत पोहोचला सुद्धा ... स्वगत) , त्यात न्यूमोनिया पॅच दिसतोय. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागेल." कोरोना झाला हे कळल्यानंतर आत्ता पहिल्यांदा मी घाबरले. वरकरणी शांत राहून विचारले ... "जास्त सिरीयस आहे का ?"
"तुमच्याकडे दोन पर्याय आहेत एकतर Hrct करून घ्या किंवा ऍडमिट व्हा"..... डॉक्टर म्हणाले . मी टेस्ट करायचा पर्याय निवडत फोन ठेवला. मेधाताईंना रिपोर्ट पाठवला होताच. त्यांचा रात्री फोन. त्यांचे देखील सेम मत. उद्या टेस्ट करायची निश्चित केले. फक्त स्वप्ना आणि मंजूला कळवले आणि शांतपणे झोपून गेले. पुन्हा एक अस्वस्थ रात्र .... विचारांचे काहूर .... अनेक समीकरणे बदलू पहात होती. अगदी सिम्पल कं चे भा बे व (BODMAS) चे गणित द्विघातीय पदावलीच्या (Quadratic Equation) रुपात समोर आले होते. आता हे गणित सोडवायचं होतं तेही बिनचूक (शकुंतला देवी बघितल्यापासून माझी गणिताची आवड पुन्हा जागी झाली होती)
उद्या ऋषीपंचमी... श्री गजानन महाराज समाधी दिवस.. आमच्या सामुदायिक पारायणाची आज सांगता होणार होती. या सगळ्या गडबडीत माझे अध्याय वाचन बरेच मागे पडले होते. आज मला शेवटचे तीन अध्याय वाचायचे होते जे खूप मोठे आहेत. नवऱ्याने तुझ्याऐवजी मी वाचतो हा पर्याय सुचवला पण मी साफ नकार दिला. एक प्रकारे मी मला टेस्ट करणार होते. लवकर उठले. अमकीला तमुक देते आहे आणि तमकीला अमुक देते आहे असे सांगून डबा कुणाकडून न घेता मीच पोळी भाजी केली. मी करू शकले इतकी मी ठणठणीत होते की. एक अध्याय वाचला आणि मेगा व्हिजन मध्ये hrct करायला गेले.. अर्थातच स्वतः ड्राईव्ह करत (हे मी आवर्जून नमूद करतीये कारण मी इतकी फिट होते हे मला तुम्हाला सांगायचं आहे) . अर्ध्या तासात तिथले काम आटोपले. घरी येऊन जेवलो , उरलेले अध्याय वाचून पारायण पूर्ण केले आणि कालची अर्धवट झोपसुद्धा पूर्ण केली. मी आज खूपच काम करूनसुद्धा दमले नव्हते त्याअर्थी न्यूमोनिया वगैरे अंधश्रद्धा आहेत , आजच्या रिपोर्ट मध्ये सगळं कळेलच हा विश्वास ठाम होता. संध्याकाळी सहाच्या सुमारास मेलवर रिपोर्ट आला. डॉ. मेधा , डॉ. फल्ले आणि डॉ. स्मिता या तिघांना रिपोर्ट पाठवले. अर्ध्या तासात मेधाताईंचा फोन आला. न्यूमोनिया आहेच. त्यांनी अजून दोन तीन डॉक्टरांशी माझ्याबद्दल चर्चा केली होती. कोरोनात ९-१०-११-१२ हे दिवस काही पेशंट्सच्या बाबतीत रिस्की असतात , डाउन फॉल असू शकतो असे त्या म्हणाल्या. मी ऍडमिट व्हावं असं त्यांनी सुचवलं. हॉस्पिटलमध्ये मला योग्य ट्रीटमेंट मिळणार होती. As a Doctor त्या बरोबर होत्या , माझ्याकडे पेशंट म्हणून बघत होत्या पण माझ्यातली आई मला ऍडमिट व्हायला नको म्हणत होती. सिद्धीचे काय हा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. खाण्यापिण्याची व्यवस्था कुणीही केली असती पण ती एकटी राहणार कशी ? कोरोना हा जितका शारीरिक आजार आहे तितकाच किंबहुना जास्त मानसिक आजार आहे. आम्ही दोघी घरात एकत्र होतो , हसून खेळून राहात होतो म्हणून कोरोना जाणवत सुद्धा नव्हता. पण मी ऍडमिट झाले तर या पोरीचं काय ? विचार पण करू शकत नव्हते मी. स्मिताशी बोलले , ती म्हणाली कमी प्रमाणात असला तरी न्यूमोनिया आहे , औषधोपचार लागतील ... ऍडमिट कदाचित न होऊन चालेल तरी तुझ्या डॉक्टरांशी बोल. माझी मनस्थिती द्विधा झाली होती. डॉ. फल्ले यांना फोन केला. ते म्हणाले तुम्ही देखील रिपोर्ट वाचलाय. आत्ता प्रमाण खूप जास्त नाही पण ते कधीही वाढू शकतं. ऍडमिट होणे सेफ असेल पण घरी राहून पण उपचार करता येतील. डाऊन फॉल बद्दल हेही डॉक्टर बोलले. आता मी थोडी घाबरले असल्याने थोडंसं छातीत दुखत होतं. डॉक्टरांनी मला खूप प्रश्न विचारले... सर्दी , खोकला , ताप यातील काही आहे का ? उत्तर : नाही .... तोंडात कफ येतो का ? चिकट काही जाणवते का ? उत्तर - नाही....आणि तुम्ही हे सगळे प्रश्न मला काल पण विचारले होते आणि तेव्हाही मी नाही असेच म्हणाले होते. केवळ दमले होते मी इतकंच काय ते (ते देखील दिवसभर इतकं काम केल्यामुळे हे मी स्वतःच ठरवले ). डॉक्टर म्हणाले आपण आत्ता एक walk test घेऊया. सलग सहा मिनिटे चालायचं. आधी आणि नंतर ऑक्सिजन लेव्हल चेक करू. जर ऑक्सिजन ड्रॉप होतोय असं वाटलं तर मात्र ऍडमिट करावं लागेल. अजूनही ऑपशन आहे म्हटल्यावर मी खुश. देवाला नमस्कार करून चालायला सुरुवात केली. साडे सहा मिनिटे चालले आणि ऑक्सिजन ९८ चा ९८ वर स्थिर.... जबरदस्त खुश झाले मी. लगेच डॉक्टरांना ऑक्सिमीटरचा फोटो पाठवला. ते म्हणाले ठीक आहे औषधे लिहून देतो पण ९५ च्या खाली ऑक्सिजन पातळी गेली तर मात्र ऍडमिट व्हावेच लागेल. कुठलाही पर्याय तेव्हा मात्र नसेल. त्यांनी मला दोन इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर दिले आणि त्या नंबरवर कधीही काहीही सिरिअस वाटले तरी फोन करा असे सांगितले. आता मला बरेच हायसे वाटत होते. पण खूपच थकायला झालं होतं या गडबडीत. डॉक्टरांशी झालेल्या संवादाचा एक छोटासा ऑडिओ बनवला आणि स्वप्ना , शिल्पा, आदित्य , शिवराज , मेधाताई , स्मिता यांना पाठवून दिला.
दिरांना फोन करून सगळे सांगितले. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांचा मेसेज पण पाठवला. ते लगेचच औषधे आणायला बाहेर पडले. पण अनेक ठिकाणी नकारघंटा. प्रिस्क्रिप्शनशिवाय कुठेही या गोळ्या मिळत नव्हत्या. डॉक्टरांना फोन केला , ते म्हणाले उद्या सकाळी देतो. पुन्हा एक अस्वस्थ रात्र वाट्याला आली होती. सगळं छान सुरू असताना अचानक हा कोरोना झाला. तरीही मी शांत होते. नॉर्मल राहत होते तर हा न्यूमोनिया टपकला. मन सैरभैर व्हायला लागलं होतं. अशातच सिद्धी म्हणाली "काय ग आई आपल्यालाच का ग झाला कोरोना ? तू तर सगळ्यांना कसं वागायचं , काळजी कशी घ्यायची ते सांगत होतीस , आपण स्वतः इतकी काळजी घेत होतो मग असं कसं ग ?आणि तेसुद्धा घरात गणपती असताना".... आणि मी चरकले ... पूर्ण जागेवर आले. तिला समजावलं ... "हे बघ आपण टेस्ट केली म्हणून आपल्याला हे सगळं कळलंय किनई. कळलंच नसतं तर मी नेहमीसारखी पळापळ करत असते आणि या न्यूमोनियाने किती उग्र रूप धारण केलं असतं कोण जाणे (मनातून मीच अक्षरशः शहारले) , बाप्पाने आपल्याला मोठ्या संकटातून वाचवले आहे , त्याला नमस्कार कर" मनोमन आम्ही गणरायाला हात जोडले. माझं मनोधैर्य इतकं सुद्धा खचून चालणार नव्हतं. आत्ता धावपट्टीवर आम्ही दोघी होतो. पण मला आता खेळणे अवघड जात होते. बॉलचा अंदाज येत नव्हता. कसे खेळावे सुचत नव्हते. काय करावे कळत नव्हते. गोलंदाजीत बदल झाला होता. अनपेक्षित बाउन्सर पडत होते. पण खेळणे गरजेचे होते. अशा वेळी काय करायचं ? नुकताच सुशांतचा धोनी चित्रपट पाहिला होता. जब तुमको अनप्लेएबल बाउन्सर आता है तो तुम क्या करते हो ?..... डक करते है । हा डायलॉग माझ्या कानात घुमत होता. मी ह्या बाउन्सरवर डक करण्याचा निर्णय घेतला होता. अजिबात हयगय न करता शांतपणे औषधे घेणार होते. आराम करणार होते , डॉक्टरांचं सगळं ऐकणार होते जे पुढची गुंतागुंत टाळण्यासाठी आवश्यक होते. २२ आणि २३ ऑगस्ट हे दोन्ही दिवस विचित्र पद्धतीने गेले. २४ तारखेपासून ट्रीटमेंटमध्ये बराच बदल होता ज्याला मी सामोरी जाणार होते. आज रात्री व्यवस्थित झोप घेणार होते.......
आयुष्यात प्रत्येक वेळी चौकार - षटकार मारत आक्रमक राहून चालत नाही काही वेळा डक करत स्वतःला धावपट्टीवर टिकवून ठेवावे लागते हे मला कळले होते.
खरच अंगावर शहारे आले
ReplyDeleteहे वाचून लोकांना प्रेरणा मिळाली , त्यांची भीती कमी झाली तर लेखन सार्थकी लागले म्हणायचे 🙏🏻
Deleteकशी आहेस ग.. काल तुझा bolg वाचला.. खूप भरून आले.. आई असल्यामुळे कदाचित जास्तच..
ReplyDeleteकाळजी घे.. आपण आपल्या लेकरांची ढाल आहोत.. तू खूप जास्त कणखर आहेस.. सध्या दुरूनच असेन पण मी मला माहित नसलेली सकारात्मक, कणखर आणि कठीण परिस्थिती ला मोठ्या धैर्याने सामोरी जाणारी शीतल ताई पाहीली..
रोज तुझे status आवर्जून वाचते..
माझी positivity वाढवण्यासाठी🙏🏻🙏🏻🙏🏻
आम्ही दोघीही ठीक आहोत. काळजी करू नकोस. 🙏
Delete