आराधना कलेची .....

                                                                             

 प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं .... मी स्टेजवरून कार्यक्रम सादर करावा ... प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करावा जो थांबूच नये. ते कौतुक , तो सन्मान स्वीकारत सगळ्यांना अभिवादन करताना मी सर्वांचे आभार मानावेत. हे स्वप्न उराशी बाळगून तो कलेची साधना करत असतो. कलेतून मिळणाऱ्या मानधनापेक्षाही प्रेक्षकांच्या , श्रोत्यांच्या टाळ्या - दाद जास्त महत्वाची असते त्याच्यासाठी. पण लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कलाकारांचे कार्यक्रमच बंद झालेत पण याच लॉकडाऊन काळात हस्तकला , चित्रकला , पाककला , फोटोग्राफी , गायन , नृत्य या कला सादरीकरणाचे व विविध स्पर्धांचे तर जणू पेवच फुटले होते. पण त्यामुळे समाजात एक जिवंतपणा जाणवत होता. सगळेजण उत्साहात , आनंदात होते. नैराश्याला दूर पळवून लावेल अशी जादू असते कलेत. या काळात अनेकांना आपल्यातील सुप्त कलागुणांचा देखील शोध लागला. सध्या अनेक कलाकारांचे कार्यक्रम फेसबुकवर सुरु आहेत. तेवढीच दुधाची तहान ताकावर.... त्यातही तो कार्यक्रम जर live असेल तर कलाकाराला जास्त मजा येते. समोर comments दिसत असतात. ती एक प्रकारे प्रेक्षकांकडून मिळालेली दादच की ! भले समोर फक्त कॅमेरा का असेना ... तो त्याची कला जीव ओतून सादर करत असतो. 

सिद्धी तिचं पहिलंवहिलं फेसबुक live सादर करणार होती २१ ऑगस्टला ... Magic Of Music , Rajkot या पेजवर. हा कार्यक्रम तिच्या फेसबुक , इन्स्टाग्रामवरील पोस्ट्स बघून या पेजच्या Admin ख्याती पंड्या यांनी दिला होता...कुणाच्याही वशिल्याने नाही , त्यातले त्यात माझ्या ओळखीने तर नाहीच नाही याचा तिला जास्त आनंद होता. पोस्टर सुद्धा बनून आले होते. आणि आता हा कोरोना टपकला ... ध्यानीमनी नसताना. ख्याती पंड्या यांनी फेसबुकवरील सिद्धीची पोस्ट बघून कार्यक्रम कॅन्सल करूया का ? आधी health महत्वाची , नंतर बाकीचे असे सांगितले. आम्ही विचारात पडलो , काय करावे ? शेवटी कार्यक्रम करूया आणि त्यात सर्वांचे जाहीर आभार मानू असे ठरविले. त्याबद्दल ख्यातीला कळवले सुद्धा. 

२१ तारखेला सकाळीच रुपाली सिस्टर ज्यांच्याकडे आमचे रोजचे reporting आहे (यांना आमचे दोघींचेही तापमान व ऑक्सिजन पातळी दररोज तीही दिवसातून दोन वेळेस कळवावी लागते) त्यांना reading कळवले आणि आम्ही सकाळीच सातव लॅबमध्ये ब्लड टेस्टसाठी गेलो. आम्ही positive आहोत.. बाहेरून ओरडूनच सांगितले. हो आमच्यामुळे चुकीने उगाच कुणाला संसर्ग व्हायला नको. खूप छान वेगळी व्यवस्था होती कोविड पेशंटसाठी. बाहेरच वेगवेगळ्या सॅनिटाईझ केलेल्या खुर्चीवर आम्हाला बसवून रक्ताचा नमुना तपासणीसाठी घेतला , गूगल पे ने चार्जेस भरले आणि मेलवर रिपोर्ट पाठवतो म्हणाले. कुठेही जवळून संपर्क नाही. तिथून आमची वरात लोकमान्य हॉस्पिटलमध्ये गेली. प्रवेशद्वारावरच मोठ्ठा बोर्ड होता... कोविड रुग्णालय .. आम्ही ECG आणि XRay कुठे काढायचे याबाबत चौकशी करायला लागलो तर तिथल्या बाई म्हणाल्या इथे सगळे कोरोना पेशंट आहेत , चालणार आहे का तुम्हाला ? चला म्हणजे आम्ही दिसण्यावरून पेशंट वाटत नव्हतो तर ... असेच पेशंट न दिसणारे टेस्ट न करता बिनधास्त इकडेतिकडे फिरत आहेत आणि कोरोना पसरवत आहेत. आत गेलो तर कळले की त्या दिवशी त्या वेळेस ICU मध्ये बरेच काम होते आणि म्हणून आम्हाला दुपारी यायला सांगितले. दुपारी गाढ झोप आणि संध्याकाळी रात्रीच्या कार्यक्रमाची तयारी यात आम्हाला टेस्टसारख्या फालतू गोष्टी करायला वेळसुद्धा मिळाला नाही. त्यावेळेस या टेस्टमुळे पुढे जाऊन काय वाढून ठेवलंय याची पुसटशी कल्पनासुद्धा आम्हाला नव्हती.

पहिलाच कार्यक्रम असल्याने जमलं तर एखादा डेमो घेऊया असे ठरवून सुद्धा डेमो घेता आला नाही. सेटअप लावला , चेहऱ्यावर ताण दिसू नये म्हणून हलकासा मेकअप सुद्धा केला. आणि सव्वा आठ वाजता अचानक महावितरणाने गंमत केली. ती अवघी साडे तीन मिनिटे. पण आमचं तोंडचं पाणी पळालं. आमच्याकडे इन्व्हर्टर नाही , शेजाऱ्यांकडे जाऊ शकत नाही. काय करावे सुचेना इतक्यात वीजबाई अवतरल्या. आणि हुश्श !!!

कार्यक्रम व्हावा ही तो श्रींची इच्छा ....

बरोब्बर नऊ वाजता कार्यक्रम सुरू झाला. हातावरचा शिक्का दाखवून सिद्धीने सर्व डॉक्टर्स , मदत करणारे असंख्य हात यांचे आभार मानले आणि तिने सादरीकरणाला सुरुवात केली. GEOSHRED ... हे तसे आपल्याकडे तितकेसे प्रचलित नसलेले आणि IPad वर वाजवले जाणारे app... पाश्चात्य देशात आणि काही प्रमाणात दक्षिण भारतात देखील हे प्रसिद्ध आहे. सॅक्सोफोन हा टोन सिलेक्ट करून सिद्धी वाजवू लागली. किरवाणीतील द्रुत लयीतील पारंपरिक गत , बिलहरीमधील स्वरजती त्याला वेस्टर्नचा हलकासा टच आणि सरतेशेवटी भैरवी सादर करत तिने तब्बल ३३ मिनिटे कार्यक्रम सादर केला. भरभरून comments येत होते. तिला खूप भारी वाटत होते. तिचे मनोधैर्य वाढविण्यासाठी तिचे बाबा , काका , काकू , मावशी , भाई लोग , मित्रमंडळी सगळे वेगवेगळ्या डिव्हाईसवरून कार्यक्रम बघत होते.. प्रेक्षक जास्त दिसावेत म्हणून. आजमितीला जवळपास दीड हजार लोकांनी तिचा हा कार्यक्रम पाहिला आहे. कार्यक्रम संपल्यावर फोन/मेसेजचा महापूर आणि मॅडम एकदम खुश !! और क्या चाहीये लाईफमे असं म्हणत...

                                                                 

आत्ता आमच्या मनात कोरोनाला इतकीशी सुद्धा जागा नव्हती इतकं आम्ही बुडून गेलो होतो त्या कलाविष्कारात... खरंच कला माणसाला जिवंत ठेवते हेच खरं. आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठीआवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. पुलंचं हे वाक्य आठवत - मनात साठवत आम्ही झोपी गेलो.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2402561590037410&id=110205993975758

ज्यांनी कार्यक्रम पाहिला नाही ते वरील लिंकवर जाऊन बघू शकतात. 🙏🙏


Comments

  1. खरोखरच पु.ल. च वाक्य तुम्ही खऱ्या अर्थाने जगत आहात आणि इतरांनाही तशी प्रेरणा देत आहात

    ReplyDelete
    Replies
    1. कर्ता करविता हरी । आपण केवळ निमित्तमात्र । 🙏

      Delete
  2. या दोघींकडे यातील अनेक कला एकावेळी आहेत... hats off.....

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. अशा अडचणीच्या वेळीही आनंद देण्यासाठी, घेण्यासाठी मनाची सकारात्मक मशागत करत राहावी लागते !! अनेक छंद कला या माध्यमातून तुम्ही दोघीही सकारात्मक वाटचाल करीत आहात.
    या कलाविष्कारासाठी दोघींचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!
    डॉक्टर स्मिता बोरा

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मैत्रिणी , आज तुझ्यासारखे डॉक्टर्स पण पाठीशी असल्याने मी हे सगळं करू शकते. तुम्ही देत असलेल्या वैद्यकीय सेवेचं मोल कुठल्याही प्रकारच्या मोबदल्यात होऊ शकत नाही.
      धन्यवाद 🙏

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

Walkathon : एक आनंदानुभूती

गूंजे बनकर देस राग 🇮🇳

सेवा परमो धर्म: ।