कोविडचे (सुद्धा) सेलिब्रेशन .....

आणि मी positive झाले नंतर पुढे चालू ....

आम्ही तालेरा हॉस्पिटलमधून तडक घरी आलो. आता बरीच तयारी करायची होती. मला फोन येणे सुरू झाले होते पण ड्राईव्ह करत असताना मी फोनवर बोलत नसल्याने सिद्धी उत्तरे देत होती. त्यातले त्यात मी स्वतः गाडी चालवत घरी जातीये म्हणजे आम्ही व्यवस्थित आहोत हे समोरच्याला कळत होते. घरी आल्यावर देवाला नमस्कार केला आणि पंधरा मिनिटे फोन बंद करून अगदी शांत बसले. देवळेकर सरांनी आठवणीने डबा पाठवला होता तो मिळाला आणि आम्ही जेवलो. मंजू देणार होती पण काळजीने तिचेच जेवण राहिले होते... रात्री आणून देते म्हणाली. फार वेळ फोन बंद राहिला तर सगळेजण काळजीत पडतील या विचाराने फोन सुरू केला.  सिद्धी आणि मी कोविड positive आहोत.आत्ताच टेस्ट झाली.आम्ही घरातच आहोत.आपण संपर्क टाळूया.मनपावाले त्यांची procedure  करतीलच. असा मेसेज मी मैत्रिणींच्या गटावर केला आणि तोच मेसेज स्टेटसला ठेवला. मेसेजचा महापूर ... meanwhile लेकीने फेसबुकवर वर छोटीशी बातमी पोस्ट केली की आई आणि मी कोविड positive ... तिलाही फोन/मेसेज सुरू झाले. एव्हाना तीन तास झाले होते. लोक इतक्या आपुलकीने विचारतात त्यांना उत्तर म्हणून मी एक ऑडिओ मेसेज तयार केला आणि तो फोन/मेसेजला उत्तर म्हणून पाठवणे सुरू केले.

आईला विश्वासात घेऊन सगळे सांगितले. तिच्या पायाखालची जमीनच सरकली असणार हे मला माहितीये पण ती तोंडदेखलं जपून राहा ग , तनुला पण जप असं म्हणाली. मीही विषय संपवला. आत्या , मावशी , काकू , मामी ..... सगळ्याांचे काळजीचे फोन येऊन गेले. बहीण.. स्वप्नाला तर आता चैन पडत नव्हते. ती पनवेलला.. इतक्या दुरून काही करू शकत नाही म्हणून वाईट वाटत होते. शिल्पा तर अमेरिकेत.. तिचाही फोन .. नणंदेचा फोन ... मोठया जाऊबाईंचे सोलापूरहून फोन/मेसेज... मेसेजने शंभरी पार केली असेल अक्षरशः ....

रात्री तर तालेरा हॉस्पिटलमधून फोन ... तुमचा ऑडिओ ऐकून छान वाटले. आमच्याबद्दल छान बोललात वगैरे... काही जणांनी formality म्हणून तर काहींनी खरोखरीच प्रेमाने लवक्कर बरी हो ग अशा शुभेच्छा दिल्या. एकदम सेलिब्रिटी झाल्याचा फील यायला लागला होता इतका माझा ऑडिओ , सिद्धीची फेसबुक पोस्ट viral झाली होती. (जावेच्या हैद्राबाद मधील मैत्रिणीने तर सिद्धीची पोस्ट वाचून ... सिद्धी तिचीच मुलगी समजून... कशी आहेस ग असा मेसेज केला 😂😂) 

काहींनी कोरोना झालाच कसा ? तुम्ही तर कुठंही बाहेर जात नव्हता दोघी वगैरे (खरं तर आत्ताच्या घडीला निरर्थक) प्रश्न विचारले. या प्रश्नांची माझ्याकडे उत्तरे नाहीत .. असली तरी मी देऊ इच्छित नाही .. मी आता मात्र कोरोना लढाईत उतरले आहे आणि ही लढाई आम्ही जिंकणारच हे मनात पक्के केले. मी टेस्ट उगाचच केली , टेस्ट केली की ती positive च येते , डॉक्टरांची खेळी आहे वगैरे मेसेजनंतर मात्र माझे डोके फिरले. तालेरा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना जीव ओतून काम करताना मी स्वतः डोळ्यांनी बघितले होते. मेडिकल ताफा इतका आपल्यासाठी राबतोय आणि काही लोक असा विचार करतात यांच्याबद्दल ? चीड आली या समाजाची. आणि ठरवलं आपल्या प्राणांची पर्वा न करता आपल्यासाठी काम करणाऱ्या या सगळ्यांचे जाहीर आभार मानायचे 🙏🙏. अनायासे २१ ऑगस्टला सिद्धीचा एक पूर्वनियोजित फेसबुक live कार्यक्रम आहेच.

मनात अजून एक समाधान होते. किमान ५०० लोकांची साखळी तोडल्याचे. आमच्या बिल्डिंगमध्ये अनेक बच्चेकंपनी आणि ज्येष्ठ नागरिक राहतात. सकाळी संध्याकाळी पार्किंग मध्ये फिरतात. मी जर टेस्ट केली नसती तर माझा त्यांच्याशी संपर्क आला असता ... त्यांचा अजून कुणाशी... शिवाय गणपतीच्या दर्शनासाठी किंवा अन्य काही कामासाठी मी आईकडे गेले असते म्हणजे त्यांच्याशी संपर्क... गौरी गणपतीला आमचे व दिरांचे कुटुंब एकत्र असते म्हणजे तो संपर्क... बापरे कितीजण आले असते आमच्या संपर्कात... मी टेस्ट करून घेतली , क्वारंटाईन झाले म्हणजे एक प्रकारे या सगळ्यांना वाचवून एक छोटी का होईना कोरोना साखळी तोडू शकले. या विचाराने आणि दिवसभर बरीच दमणूक झाल्याने छान झोप लागली. सकाळीच फोन वाजला..... 

हॅलो , शीतल कापशीकर का ? महानगरपालिकेतून बोलतोय , तुम्ही काल तालेरात टेस्ट केली होती ना ? पुढचे काही मला ऐकूच आले नाही. उठून भराभर आवरले आणि मनपाच्या लोकांची वाट बघत बसलो. दीर येऊन घराबाहेर नाष्टा ठेऊन गेले. कोणीच कोणाशी बोलत नव्हते. फक्त मनपावाल्यांना फोनवर उत्तरे देत होते. बाकीच्यांचे फोन चक्क टाळत होते (काही अपवाद वगळता) कारण त्यांना पुढच्या procedure पेक्षा मला कोरोना कसा झाला यात अधिक रस होता. जे उत्तर मी कदापि देणार नव्हते. फक्त योग्य औषधोपचार , वेळीच तपासणी करून कोरोनावर मात कशी करता येते हे जगाला दाखवणार होते. मनपाकडून संपूर्ण बिल्डिंगचे सॅनिटायझेशन झाले. दोन जण येऊन आमची चौकशी करून , आम्हाला औषधे देऊन , होम आयसोलेशनची procedure सांगून बिल्डिंग मधील इतर सदस्यांची तपासणी करून गेले.

 कोणत्याही आजाराची पार्श्वभूमी नसल्याने , विशेष काही त्रास नसल्याने आणि वय ५० च्या आत असल्याने आम्हाला घरी राहायची सहज परवानगी मिळणार होती. फक्त काही ब्लड टेस्ट , ECG , XRay वगैरे गोष्टी जमा करायच्या होत्या. आम्ही ती तयारी दर्शवली. आम्ही बरेच फेमस झालो होतो असे लेक कौतुकाने म्हणत होती. माझा भाऊ निनाद तर तुम्ही दोघी तर कोविडचे सेलिब्रेशन करताय ... त्याला भावच देत नाहीये ... जातोय आता तो तोंड लपवून पळून असे म्हणाला आणि आम्ही खो खो हसलो. एकंदरीत कोरोनाला आपल्यावर राज्य न करू देता त्याच्यावर पलटवार करून त्याला पळवून लावू असे बेत आखत झोपून गेलो. उद्याची ... फेसबुक live ची स्वप्ने बघत...

( https://drive.google.com/file/d/1zdwqG326h1jGERv6axEgq2NrYzpvc_5u/view?usp=drivesdk या लिंकवरील माझा ऑडिओ अवश्य ऐका. Positive आहे हे कळल्यावर अवघ्या तीन तासात तो केला आहे.)


Comments

  1. तुम्ही दोघीही ग्रेट आहात ताई! ही साखळी तोडण्याचे अत्यंत महत्वाचे काम तुम्ही केले. बऱ्याच जणांना हे लक्षातच येत नाही. या नंतर झालेला सिद्धीचा live कार्यक्रम ऐकला मी! Amazing! खरंच या करोनाला तुमच्या पोसिटीव्हीटीमुळे पळून जावे लागणार आहे.
    Hope you both are fit and fine. Take care. Get well soon.. get negative soon. निगेटिव्ह व्हायच्या शुभेच्छा द्याव्या लागतायत या करोना मुळे😛 लवकर बऱ्या व्हा!👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद योगिनी .... खरंय ग. Positive शब्दाला वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातंय. पण आपण या फालतू कोरोनापेक्षा लय भारी आहोत हे दाखवून देऊया 👍

      Delete
  2. Khup chhan. Kharatar mentally jasta ghabartay. Covid la ashya positivity ne ghetle ani proper precautions ghetle tar its easy to defeat it. Mazya sasre suddha covid positive zale hote (as he is also a doctor). Mi and maze husband (both being a doctors) tyanna gheun gelo Apollo hospital la. Later when we tested ourselves we were negative. To say is that only by proper precautions we can b safe. Aj baryach vel amhi hospital madhe suddha pahto ki lok without mask yetat, proper history det nahit karan te ghabartat ki may be tyanche jawal che lok tyanchyashi bolnar nahi n all. Ase reasons aikayla miltat. Hyamule kharatar jasta spread hotoy covid. Please don't do such things. I liked d post because of their positive attitude. Asa vichar karuya ki apan that we get our 14 days for ourself, to read what we want, to spend time with only urself. Take it positively n we can defeat it.

    ReplyDelete
  3. झक्कासच की! कोरोना योद्ध्यांवर एक पोवाडा करून टाका आता मायलेकी

    ReplyDelete
    Replies
    1. अनेकांनी सुचवले आहे , नक्की विचार करेन

      Delete
  4. लई भारी ताई... मला वाचूनच तो कोरोना पळून जातोय असे चित्र दिसले डोळ्यासमोर....😂😇

    ReplyDelete
    Replies
    1. याचसाठी केला होता अट्टाहास... आता तो दिवस दूर नाही 😌😌

      Delete
  5. Great tai .!!!! tumche v siddhiche khup kautuk vatle . tumchya +ve aatittude ne ch tumhi hi ladhai nakkich jinkar yat kahi shankach nahi .



    ReplyDelete
    Replies
    1. खूपच छान पिंपरी-चिंचवङ महापालिकेतील कर्मचारी अधिका-यांनबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पुनःपुन्हा धन्यवाद ! ! रामकृष्णहरी !!जयसंताजी

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

Walkathon : एक आनंदानुभूती

गूंजे बनकर देस राग 🇮🇳

सेवा परमो धर्म: ।