देव तारी त्याला ...
देव तारी त्याला ...
आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात, ज्यांची कधी आपण अपेक्षा तर सोडाच पण विचारही केलेला नसतो. आपण चारचौघांसारखे मध्यमवर्गीय आहोत, त्यामुळे आपल्या बाबतीत असं काही वेगळं, सनसनाटी, विचित्र, खरं म्हणजे थोडं भयंकर घडणार नाहीच हे आपण पक्कं गृहीत धरलेलं असतं. आणि या विश्वासावरच आपण अगदी बिनधास्त जगत असतो. पण या विश्वासालाच जर तडा गेला तर ? आपल्याच बाबतीत एखादी अनाकलनीय, एखाद्या चित्रपटात शोभेल अशी घटना घडली तर ? ती घटना जर आनंददायी असेल तर निश्चितच आपण हुरळून जाऊ पण भीतीदायक असेल तर ? असाच एक कठीण प्रसंग माझ्या लेकीवर ओढवला होता, परंतु परमेश्वर कृपेने तिची त्यातून सुटका झाली... नव्हे नव्हे तर प्रत्यक्ष परमेश्वराने येऊन तिची सुटका केली असं म्हणणं अधिक योग्य ठरेलं. झालं असं की ....
माझा १४ जानेवारीचा दिवस अगदी छान गेला. गूळपोळी, तिळाचे लाडू, एक दोन ठिकाणी हळदीकुंकू वगैरे गोष्टी अगदी मस्त पार पडल्यानंतर मी दुसऱ्या दिवशीची तयारी करून झोपी गेले. १५ तारखेला माझं schedule अगदीच व्यस्त असणार याची कल्पना तर होतीच पण आगाऊ काम/पूर्वतयारी करणे हा माझा स्थायीभाव असल्याने रात्री १०.३० पर्यंत काम करत होते. अगदी दोन दिवसांवर माझी लंडनवारी येऊन ठेपली होती. लेकीला घर बदलायचं असल्याने ते घर सेट करून द्यायला तू येच असा आग्रह तिने धरला होता. तिचे जे शक्य असतील ते सर्व हट्ट मी नक्की पुरवतेच. परंतु यांचीच जगाविरहित लाडाची लेक आहे का वगैरे टिप्पणी अनेकजण करत असल्याने या लंडनवारीबाबत आम्ही फार वाच्यता केली नव्हती. तिचे तिला करायला शिकू दे की, तू किती दिवस करणार, अमक्या तमक्याची मुलं सगळं एकटे करतात-आई/वडील बघतसुद्धा नाहीत असे अनेक सल्ले मला मोफत सल्ला केंद्रातून नेहमीच मिळतात. त्यामुळेसुद्धा मी या प्रवासाबाबत फार कुणाशी बोलले नव्हतेच. असो ... तर आपला मुद्दा हा होता की मी सगळे काम आवरून अगदी गाढ झोपले. पहाटे मोबाईल वाजल्यावर रोज साडेपाच वाजता होणारा गजर झाला असेल या कल्पनेने मी फोन घेऊन सरळ उठले पण बघते तर तो त्यावर लेकीचा विडिओ होता आणि केवळ ३.४५ वाजले होते. पण तिला कधीही फोन करत जा हे मीच सांगितलं असल्याने चिडचिड न करता फोन उचलला आणि पलीकडून तिचा रडवेला आवाज कानावर पडला ... आई आपल्या घरात कुणीतरी घुसलंय ... ती गंमत नक्की करत नव्हती. इतक्या हजारो मैलांवरून मी खरं म्हणजे काय करणार ? पण आपली आई काहीही करू शकते या तिच्या आईवरच्या विश्वासाला तडा जाऊन उपयोग नव्हता. मी तिला सांगितले की काहीही होणार नाही, रामरक्षा म्हणायला सुरुवात कर. तिने ताबडतोब मोठ्या आवाजात रामरक्षा पठण सुरू केले. इकडे मीही देवासमोर दिवा लावून रामरायाचा धावा सुरू केला.
त्या दिवशी झालं असं की ... तिला त्या संध्याकाळी खूप कंटाळा आला होता. असंही सध्या ब्रिटनमध्ये हिवाळा सुरू असल्याने दिवस खूपच लहान असतो आणि दुपारी साडेतीन-चारच्या दरम्यान सूर्यास्त होतो. खरं म्हणजे कित्येक दिवस सूर्यदर्शनसुद्धा होतच नाही. त्यामुळे वातावरण काहीच कंटाळवाणं असतं. डिसेंबरातही जरी थंडी असली तरीही नाताळमुळे वातावरण उत्साही असतं. ती सुट्टी एन्जॉय करून जानेवारीत सर्वजण पुन्हा आपापल्या कामाला लागत असल्याने फारसं कोणी बाहेर हिंडताना दिसत नाही. त्यातूनच आता आई तिकडे येण्याचे वेध तिला लागले असल्याने तिचं कामात लक्ष लागत नव्हतंच. एरवी ऑफिसमधून लगेचच घरी जाणारी ती उगाचच बाहेर रेंगाळत राहिली. एरवी ती रात्री आठच्या दरम्यान घरी पोहोचली असती, तर त्या दिवशी ती उगीचच एका परिचितांकडे गेली व तिथे तिने तब्बल दोन तास काढले. एरवी शंभर वेळा बोलवूनसुद्धा न येणारी ही मुलगी घरी आल्याने त्या कुटुंबाला आनंदच झाला. तिथून ती दहाच्या सुमारास तिच्या घरी पोहोचली आणि लॅचकीने दार उघडू लागली तर ते उघडेना. तिला वाटलं की आपल्याला उघडता येत नाहीये म्हणून तिने पुन्हा प्रयत्न केला तर तिच्या लक्षात आलं की घराला आतून साखळी लावलेली आहे. म्हणजेच घरात कुणीतरी नक्की आहे. सध्या ती घरात एकटीच राहत असल्याने आणि दुसऱ्या कुणाकडेही किल्ली नसल्याने कुणी घरात असायचा प्रश्नच उद्भवत नव्हता. तिला काहीतरी वेगळं वाटलं आणि कुंपणालगतच्या रस्त्याने ती परसदारी गेली. बघते तर घराचा मागचा काचेचा दरवाजा कुणीतरी फोडलेला होता. आता मात्र ती घाबरली आणि तिने मला फोन लावला. मी तिला सांगितले की ताबडतोब तिथल्या आमच्या एक-दोन स्नेहांना बोलावून घे आणि पोलिसांना फोन कर. तिने ताबडतोब पोलिसांना फोन केला आणि दोन-चार जवळच्या लोकांना बोलवून घेतले. सुदैवाने तिने तिच्या गोड स्वभावामुळे लंडनमध्ये सुद्धा अनेक कुटुंबं जोडली आहेत. आत्ताही अवघ्या १० मिनिटात पाच-सहा जण तिच्या एका हाकेसरशी धावून आले. घडलेला प्रकार बघून सगळ्यांचंच डोकं सुन्न झालं होतं आणि एव्हाना ती चोरांची टोळी पळूनसुद्धा गेली होती. पोलीस येईपर्यंत घरात जाणं शक्य नसल्याने हे सर्वजण एवढ्या कडाक्याच्या थंडी गारठ्यात बाहेर कुडकुडत उभे होते आणि फोनवर माझ्याशी चेष्टामस्करी करत बोलत होते. त्यांचा उद्देश हाच होता की या घटनेचा गंभीर परिणाम तिच्या मनावर होऊ नये आणि इतक्या लांब मला टेन्शन येऊ नये.
एव्हाना शेजारपाजारची सर्व मंडळी व सिक्युरिटी गार्ड देखील परसदारी जमले होते. पोलिसांचा ताफा देखील अवघ्या दहा मिनिटात तिथे येऊन पोहोचला आणि त्यांच्यापाठोपाठ ही सर्व मंडळी आत गेली. अगदी समोरच तिची हार्मोनियम आणि त्यावर ठेवलेले मॅकबुक अगदी सेफ जसेच्या तसे होते हे बघून ती आनंदली आणि तिने मला फोन केला ... आई आपली सगळ्यात महत्त्वाची वस्तू अगदी जागेवर जशीच्या तशी आहे बरं का ग !! ... या दोन गोष्टींवर तिचा फारच जीव आहे. संवादिनी/हार्मोनियम तिच्यासाठी अगदी देवस्वरूप आहे तर मॅकबुक म्हणजे तिचा जीव की प्राण ... कारण तिच्या सगळ्या नोट्स तिने यातच जतन करून ठेवलेल्या आहेत. या गोष्टी सुरक्षित असल्याचे बघून तिला आनंद झाला आणि पुढे तर तिला आनंदाचा धक्काच बसला कारण तिथे ठेवलेली तिची हिऱ्याची अंगठीसुद्धा जशीच्या तशीच (या सर्व गोष्टी लॉकरमध्ये ठेवायला हव्यात हे तिला कळायला हवेच, पण ते सांगायची ही वेळ नव्हती) सर्वजण पुढे जाऊन बघतात तर संपूर्ण घर अस्ताव्यस्त पसरलेले होते. आता जवळपास दहा मिनिटे ती माझ्याशी न बोलता पोलिसांशी बोलत होती. अर्थात मी फोन ठेवला नव्हताच. माझ्याशी ओळखीचे एक जण बाहेर उभे राहून सतत बोलत होते. दहा मिनिटांनी ती बाहेर आली आणि सांगू लागली की पोलिसांना सुद्धा खूप आश्चर्य वाटतंय की कुठलीही गोष्ट चोरीला गेलेली नाही, परंतु सगळ्या बॅग्स मात्र अगदी उचकटून त्यातील वस्तू न् वस्तू बाहेर फेकली आहे.
माझ्या दृष्टीने जरी माझी लेक सुरक्षित आहे ही गोष्ट सर्वात महत्त्वाची होती तरी व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा विचार करणे गरजेचे होते. पोलीस तिला खोदून खोदून विचारत होते की बघ नक्की काय चोरीला गेलंय आणि आम्हाला सांग. ही पोरगी काही चोरीला गेलं नाही यावर ठाम होती. शेवटी ते ब्रिटिश पोलीस पण हसले आणि म्हणाले की This is the worst robbery we have ever seen. काही चोरीला गेलं नाही ही वरकरणी आनंददायी बाब असली, तर मग चोरांना नक्की काय हवे होते हा प्रश्न ऐरणीवर आला होता. तिच्या ऑफिस बॅगमध्ये जवळपास ३०० पाऊंड कॅश होती, तर देवाजवळ ठेवलेली सुट्टी नाणीसुद्धा जवळपास ७०/८० पाऊंड ... यातल्या कशालाही चोरांनी हात लावला नव्हता, परंतु किचनमधल्या सगळ्या ...अगदी फ्रिजमधल्या सुद्धा वस्तू बाहेर काढल्या होत्या. सगळे कॅबिनेट्स विस्कटून टाकले होते. त्यांना नक्की काय हवं होतं हा प्रश्न अनुत्तरीतच .... ब्रिटिश पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत शोध सुरू केला.
इकडे माझ्या मनाने देखील स्वतःला आणि लेकीला समजवायला सुरुवात केली. तिच्या बॅगेत ज्या कप्प्यात कॅश रक्कम ठेवलेली होती त्याच कप्प्यात हनुमान चालीसा देखील. दिवाळीतच एका स्नेह्यांनी ही हनुमान चालीसा तुझे सदैव रक्षण करेल असा आशीर्वाद देत तिला भेट देऊन सांगितले होते की सदैव तुझ्याजवळ ठेव. त्याप्रमाणे सतत तिच्या बॅगेत म्हणजेच तिच्याबरोबर हनुमान चालीसा असायची. आजच तिने बॅग बदलल्यामुळे ही हनुमान चालीसा घरी राहिली आणि त्यामुळे संपूर्ण घराचे संरक्षण झाले. तिला सदैव घरात विष्णुसहस्रनाम, रामरक्षा व हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र म्हणायची सवय आहे. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला होता. प्रत्यक्ष रामराया आणि मारुतीराया तिच्या घरात अवतरले ते देखील रौद्ररूप धारण करून आणि त्यांनी चोरांना पळवून लावले किंवा या देवतांच्या दर्शनाने त्या चोरांची दृष्टीच गेली आणि ते काहीही न घेता पळून गेले असावेत असा माझ्या मनाने कौल दिला. त्या दिवशी ही जर नेहमीच्या वेळेला घरी आली असती तर हा प्रसंग घडताना ती घरातच सापडली असती आणि काय प्रसंग ओढवला असता याची कल्पनादेखील करणं शक्य नाहीये. भगवंतांनीच त्यादिवशी तिला बाहेर थांबायची बुद्धी दिली आणि तिचे रक्षण केले. भविष्यात तिच्या हातून खूप मोठी गोष्ट घडावी ही देखील भगवंतांचीच इच्छा असणार. त्यामुळेच घरात इतकी उलथापालथ होऊनही तिच्या एकाही वाद्याला धक्काही लागला नाही.
आई ग माझ्याच बाबतीत असं का झालं ग ? असं ती कळवळून म्हणाली तेव्हा मनातून मी अक्षरशः हलले. सगळं काही चांगलं सुरू असताना हे असं का घडावं हा विचार मी देखील करत होतेच की ... न कळता कसे ऊन मागून येते । सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते । ... याची जणू प्रचितीच येत होती. पण लगेचच भावना मागे सारून डोक्याने विचार सुरू केला आणि उत्तर मिळालंदेखील. घोडा जेव्हा मोठी झेप घेतो तेव्हा तो आधी दोन पावलं मागे येतो. तसंच काहीसं हिच्या बाबतीत घडलं असावं. तिला भगवंत काहीतरी मोठं बक्षीस देणार असतील, म्हणून आत्ता त्यांनी हा आघात केला आणि तिची परीक्षा बघितली. या परीक्षेतसुद्धा ती खरी उतरली तेही भगवंताच्या सहाय्यानेच. अदृश्यरुपात भगवंतांनी तिच्याभोवती सुरक्षा कवच निर्माण केलं होतं. जेव्हा चोर घरात होते तेव्हा ही मुलगी दार उघडायचा प्रयत्न करत होती. जर चुकून जरी त्यांनी दार उघडलं असतं तर हिचं काय झालं असतं या विचाराने सुद्धा अंगावर सरसरून काटा येतोय. ती अंधारात चालत चालत परसदारी एकटी आली तेव्हा देखील तिच्यापासून काही फुटांवर ही टोळी होती. पण संरक्षण करायला भगवंत असल्याने तिच्या नखालासुद्धा धक्का लागला नाही. काळ आला होता पण वेळ आली नव्हती असंच म्हणावं लागेल अक्षरशः ... अवघ्या काही मिनिटांचा खेळ पण चिरकाल स्मरणात राहणारा !! मनूला लहानपणापासूनच हनुमान खूपच आवडतो, त्यामुळेच गीतरामायणातील असा हा एकच श्री हनुमान हे गीत जे फारसं गायलं जात नाही ते ती आवडीने म्हणायची. शक्ती, बुद्धी आणि भक्तीचा संगम ज्याच्या ठायी आहे त्या हनुमंतांनी त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या रामरायांसह माझ्या लेकीला अदृश्यरुपात सहाय्य करून माझ्यावर खूप मोठी कृपाच केली आहे.
पंधरा तारखेपासून सतत वेगवेगळ्या पोलिसांशी बोलावं लागतंय, forensic चे लोक घरी येऊन जाताहेत, CCTV फुटेज तपासणी सुरू आहे ... या सर्व गोष्टी प्रोसिजर प्रमाणे सुरू आहेत पण याचवेळी मनावर जो आघात झाला त्याचं काय ? सुदैवाने तिने केलेल्या हट्टापायी मी visa काढला आणि १७ जानेवारी रात्रीचं लंडनचं तिकीटसुद्धा. तेव्हा जर तिला मी म्हणाले असते की आत्ता मला वेळ नाही, एप्रिल किंवा मे महिन्यात बघूया तर काय झालं असतं? मी visa पण काढला नसता आणि आत्ता मला इथे येता आलं नसतं. माझं तिकडेसुद्धा कुठल्याही गोष्टीत लक्षच लागलं नसतं. भगवंतांनीच हे वेळेचे गणित जुळवून आणलं आणि मला इकडे बोलवून घेतलं. त्यामुळेच आपली आई येऊन सगळं काही नीट करेल या आशेवर ती व्यवस्थित होती. खरं म्हणजे ती त्यानंतर घरी राहिलीच नाही, ओळखीच्या लोकांकडे राहत होती. १७ जानेवारीला संकष्टी चतुर्थी असल्याने मोरया गोसावी मंदिरात गणपती बाप्पाला अभिषेक केला, आलेल्या विघ्नाचं त्या विघ्नहर्ताने निवारण केलं म्हणून त्याचे आभार मानले आणि मी विमानतळाकडे जायला निघाले. १८ जानेवारीला आम्ही एकत्रच घरी आलो आणि आल्या आल्या आधी घरातल्या काचा आवरल्या. घरातला पसारा आवरणं अजून सुरूच आहे, पण मनातल्या पसाऱ्याचं काय ? हळूहळू back to routine यावं तर लागेलच ना !! ते सर्व सुरळीत करायचा प्रयत्न करतोय आणि त्यातही साथ भगवंतांचीच आहे. तिला तिच्या कामाच्या ठिकाणी सुद्धा कमालीचं सहकार्य मिळतंय. तिच्या मनावर झालेला आघात बघून तिच्यावर फारसा कामाचा लोड न देता ती आनंदी कशी राहील असा प्रयत्न तिथले सर्व लोकदेखील करत आहेत. लंडनमधल्या संगीतक्षेत्रातील जवळपास सर्व मंडळींना एव्हाना ही गोष्ट घडल्याचं कळलंय, त्यांनीसुद्धा तिला खूप मोठा धीर दिला आहे. परमेश्वराने तिच्यासाठी काहीतरी छान योजना आखली आहे हे मात्र नक्की. त्यामुळेच तर इतक्या मोठ्या आघातातून ती हळूहळू सावरतीये. आज तर चक्क तिने तासभर हार्मोनियमसुद्धा वाजवली. आणि त्यामुळेच खरं तर माझ्याही मनाला थोडीशी उभारी मिळाली. स्नेही, हितचिंतक, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे इतक्या मोठ्या कठीण प्रसंगातून आम्ही बाहेर पडत आहोत.
इथे येत असताना संपूर्ण प्रवासात माझ्या मनात एक गोष्ट ठाम होती की आता इथला गाशा गुंडाळून तिला माझ्याबरोबर भारतात घेऊनच जायचं. कोण काय म्हणेल याचा काहीही विचार करायचा नाही, आपली लेक आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. पण इथे आल्यावर, घर आवरताना परमेश्वर मला क्षणोक्षणी म्हणत होता .... अगं असं इतक्या छोट्या संकटामुळे घाबरून जायचं नसतं, आणि ती एकटी नाही तर मी सदैव तिच्या पाठीशी ठाम उभा आहे. तिच्या कष्टाचं फळ मी तिला देणारच आहे. पण त्यापूर्वी मी तिची परीक्षा घेत होतो आणि त्याचवेळी तिचे संरक्षणसुद्धा करत होतो ... देव तारी त्याला कोण मारी ... त्या जगद्गनियंत्या परमेश्वराला शिरसाष्टांग नमस्कार ... सर्व काही त्याच्याच इच्छेने सुरू आहे, आपण केवळ निमित्त मात्र 🙏
(माझी लेक या प्रसंगातून खूप काही शिकली आहे. इतका अवघड प्रसंग तिने हाताळला म्हणजे ती आता बरीच धीटसुद्धा झाली आहे. प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायची आपल्याला खोडच आहे हेच खरं !!सध्या इथे ब्रिटिश पोलिसांशी बोलायचा अनुभव मी घेतीये. त्यांच्या मार्गाने ते तपास करत आहेतच पण माझ्यासाठी या घटनेबाबतचा निकाल माझ्या मनाने दिलेला आहे. आत्ता हे लिहितानासुद्धा हात थरथरतोय, डोळे पाणावतायंत, डोकं सुन्न होतंय पण मन मात्र भगवद्भक्तीने भरून आलंय)
शीतल कापशीकर (लंडन)
२१ जानेवारी २०२५
अंगावर अक्षरशः काटा आला ताई!!
ReplyDeleteसिद्धी ताईचं विशेष कौतुक की तिनं एकटीनं खूप धीरानं प्रसंगाचा सामना केला! परक्या देशात आजूबाजूला आई वडील खूप जवळचं कोणी नसताना हे प्रसंगावधान राखणं खरंच अवघड आहे, पण अर्थात तू म्हणालीस तसं "देव तारी त्याला कोण मारी"...
आपण संकटात असताना तो देव कधी कोणाच्या रूपात आपल्यासमोर उभा राहिल, कोणत्या मार्गानं आपल्याला शक्ती देईल सांगता येत नाही! आपण मात्र त्याच्यावरचा विश्वास आणि भक्ती ढळू देता कामा नये, इतकंच खरं!!..
सिद्धी ताईला माझ्याकडून hats off! ती तिचं मनोबल ढळू देणार नाही याची खात्री आहेच!
पण खरं सांगते उद्या जर मी बाहेरच्या देशात शिकायला गेले, तर सिद्धी ताई नक्कीच माझा आदर्श असेल!!
आपण परमेश्वरावर विश्वास ठेवून त्याच्या साक्षीने चांगलं काम केलं की तो आपल्या मागे ठामपणे उभा राहून सदैव आपले रक्षण करतो याचीच जणू प्रचिती आली आम्हाला ... आता भगवंतांवरील श्रद्धा अधिकच दृढ झाली आहे. भगवंतांनीच आम्हाला धीट बनवले आणि प्रसंगाशी दोन हात करायची शक्ती दिली .... जय श्रीराम 🙏
Delete🙏खरच भगवतशक्ती शिवाय हे शक्य नाही…आपणच का नेहमी चांगलं वागायचं ….कोणी विचार करत नाही आपला…का देवाचं नाव घ्यायचं …कोणी बघितला आहे देव…पण असं नसतं आणि जेव्हा कोणी नसतं तेव्हा फक्त भगवंतच असतात…आणि आपल्या भक्ताची सगळी काळजी घेतात…हे या घटनेतून सिद्ध होतय…हे निव्वळ reciprocation आहे …आपल्या भक्ताच्या भक्तीचं…😊…खूप काळजी वाटत होती …पण विचारावं कसं…असं वाटत होतं पण हे वाचून जरी भीती वाटली तरी बरं सुद्धा वाटलं……
Deleteअगदी खरंय बघ ... आपण येणाऱ्या संकटाला टाळू शकत नाही, पण भगवंताच्या नामस्मरणाने त्या संकटाची तीव्रता कमी करू शकतो आणि त्या संकटातून पार मात्र नक्की होऊ शकतो 🙏
Deleteखूपच भयानक, वाचताना पुढं काय पुढं काय घडलं याची उत्सुकता होती पण भीती वाटतच होती, खरंच सिध्दीच्या धाडसाला सलाम एव्हढ्या लहान वयात तीच हे धाडस बघून ' बाप रे ' अस झाल आणि ते ही परदेशात, उपरवाल्याचे तर शुक्रीया आहेतच आपण एकाने करतो तर तो दहा पटीने देतो पण संकट टळलं म्हणायचं अशीच बाप्पाची कृपा सदैव राहो
ReplyDeleteधन्यवाद .... खरं म्हणजे देव सदैव आपल्याबरोबर असतो पण ते आपल्या लक्षातच येत नाही. असं एखादं मोठं संकट जेव्हा स्पर्शून जातं तेव्हा त्याचं अस्तित्व स्पष्ट जाणवतं.
Deleteखूपच भयानक, वाचताना पुढं काय पुढं काय याची उत्सुकता होतीच पण भीती ही वाटत होती खरंच सिद्धीच्या धाडसाला सलाम एव्हढ्या लहान वयात तीच हे धाडस बघून ' बाप रे ' अस म्हणावं वाटत, उपरवाल्याचे शुक्रीया तर आहेतच
ReplyDeleteआपण एकाने करतो तर तो दहा पटीने देतो अशीच बाप्पाची कृपा सदैव राहो
Hats off to Siddhi.👍.You really managed the situation with remarkable calmness and bravery.🌹......You will definitely achieve even greater heights of success by learning from this crisis.
ReplyDeleteBless you dear❤️
खूप खूप धन्यवाद ... असेच प्रसंग खरं म्हणजे आपल्याला खूप काही शिकवून जातात
Delete