अष्टविनायक

अष्टविनायक महती
कालची भवितव्य लेख बैठक संपवून घरी जायला निघताना अनेकांनी येऊन "कार्यक्रम मस्तच झाला ग ... दोन्हीही , युट्यूब लाईव्ह आणि रोजचे रेकॉर्डेड गीत सुद्धा ... आम्ही रोज सकाळी १० वाजता बघायचो बरं का विडिओ" ... ऐकून खूपच मस्त वाटलं. आणि मन मात्र या कार्यक्रमाचा इतिहास आठवायला लागलं. अगदी फ्लॅशबॅक टाईप. लहानपणी कॅसेटवर ही गीते ऐकली होती आणि मोठया आवाजात गायिकेबरोबर म्हटलीसुद्धा होती. पुढे कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेकवेळा या गणपतींना गेले सुद्धा. आत्ता ५-६ वर्षांपूर्वी अष्टविनायक यात्रा सुद्धा केली. तेव्हाच या थीमवर एखादा कार्यक्रम करू असं मनात ठरवलं पण योग आला नाही. मग मागच्या वर्षी ठरवलंच की गणेशोत्सवात मुक्तिसोपान विभागाचा हा कार्यक्रम तयार करूया. नियोजन देखील झाले. सगळ्यांनी आपापल्या गाण्यांची तयारी सुरू केली आणि अस्मादिकांना कोरोना राक्षसाने वेढा घातला. अगदी बरोब्बर मागच्या गणेशोत्सवातच. मग काय ... कोंढाण्यावर जसे तानाजी धारातीर्थी पडल्यावर मावळे पळ काढत होते तसे झाले. तिथे निदान सूर्याजी दोर कापून उभा ठाकला पण आमच्याकडे मात्र तो प्रकल्प बासनात गुंडाळला गेला. मी हतबल ... मनात प्रकल्प अर्धवट राहिल्याची खंत .. गणपती बाप्पा समोर दिसला की भयंकर अपराधी वाटायचं मला. जणू काही एखादा नवस अपूर्ण राहिल्याची भावना असायची. पण तो विघ्नहर्ता विनायक ... त्याने यावर्षी पुन्हा संधी दिली. विभागात एका बैठकीत मी सूतोवाच केले आणि सगळ्यांनी नेहमीप्रमाणे उत्साहात होकार भरला. जय्यत तयारी सुरू झाली. सगळी गीते आपल्या स्टुडिओत रेकॉर्ड करूया असे ठरले. त्यातून आपला रेकॉर्डिंग स्टुडिओ नवीन झालेला , त्यात जास्तीत जास्त ट्रायल घ्यायच्या होत्याच आम्हाला. प्रत्यक्ष कार्यक्रमात (Live मध्ये) अनेक गोष्टी सोप्या असतात. चुकलं तर क्षमस्व म्हणून मोकळं व्हायचं आणि शिवाय तो क्षण निसटलेला. माणसाच्या मेमरीला विस्मृतीचा शाप असल्याने ते कालांतराने चुका विसरूनही जातात. पण रेकॉर्डिंगमध्ये वेगळी गोष्ट असते. चुका अशा पटकन पकडता येतात. कायमच्या रेकॉर्ड होतात. त्यामुळे मोठा धोका असतो. चुकांचे प्रमाण अत्यल्प असेल तर चांगले. त्यामुळे खूप काळजीपूर्वक काम करावे लागणार होते पण अनुभवाची पोतडी मात्र भरणार होती. प्रत्येकाच्या आवाजाची जातकुळी वेगळी असल्याने आपला स्टुडिओ ऑपरेटर केदार दादालाही खूप काम करावे लागणार होते. शिवाय बहुसंख्य सदस्य स्टुडिओ कामाला अगदीच नवखे त्यामुळे त्या तंत्रज्ञानाशी परिचित नाहीत. तरीही हे सगळं एक आव्हान म्हणून स्वीकारायचं ठरवलं आणि सुरू झाला एक सुरेल प्रवास ...
आधी कागदावर सगळं नियोजन लिहून काढलं. आपण हा प्रकल्प का करतोय हा प्रश्न अनेकदा स्वतःला विचारला. स्टुडिओत गीत गायन करण्याची संधी सदस्यांना मिळावी , या निमित्ताने एखादा तासाभराचा कार्यक्रम बसवला जावा , वेगवेगळ्या रागांचा - तालांचा अभ्यास करता यावा , स्वरात स्वर मिसळून गाता यावे , अध्यापकांचे सादरीकरण बघून मुलांना छान वाटावे ... एक ना अनेक , कितीतरी उद्देश होते या प्रकल्पामागे. शिवाय सगळ्या गीतांची निवेदने आपल्या अभिरुची प्रकल्पातील वाचिक अभिव्यक्ती गटातील विद्यार्थ्यांकडून करून घेऊ म्हणजे त्यांनाही संधी मिळेल असे ठरले. अष्टविनायक .... सर्व स्थलमाहात्म्य लेखन करण्याची जबाबदारी मानसीताईने आपणहून घेतली आणि मला बरंच हुश्श वाटलं. निवेदन करणाऱ्या मुली तर जाम खुश झाल्या होत्या. एकतर प्रदीर्घ कालावधीनंतर शाळेत येणार होत्या आणि स्टुडिओत प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेणार होत्या. ताबडतोब मुलींना स्क्रिप्ट पाठवले गेले आणि तयारी सुरू .... वेळेपलीकडे काम करत मयुरीताई व मानसीताईने मुलींची छान तयारी करून घेतली. चौथीपासून या मुली या दोघींकडे नाट्याचे - अभिवाचनाचे धडे गिरवत आहेत. आत्ता त्याचे प्रकटीकरण सगळ्यांना दाखवता येणार होते. आपल्या अभिरुची प्रकल्पाचा उद्देश पण यानिमित्ताने सफल होत होता.
इकडे गायनाची तयारी जोरदार सुरू होती. चल साधका आणि गणनायका ह्या गाण्यांमध्ये  बहुतांश लोक गडबडतात कारण दोन्ही गीते एकाच अंगाने जातात. कानडाचे दोन्ही प्रकार भेद दाखवत स्पष्ट करायची जबाबदारी स्वरेशाताईवर सोपवली. शिवाय सर्व गीतांना संवादिनी वादन तीच करणार होती. हे सर्व तिने एक आव्हान म्हणून स्वीकारले. कीर्तीताईंनी बारा वर्षे संवादिनी वादन - अध्यापन धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे , आता मी त्यांना मदत करेन हा भाव ती दाखवत होती. हळूहळू गटबांधणी पुन्हा एकदा जमून येत होती. अनघाताईंनी खूप सामंजस्य दाखवत तू देशील ते गाणे मी म्हणणार असे सांगितल्यावर मला खूप हायसं वाटलं. ओझरच्या विघ्नेश्वराचे गीत त्यांच्या वाट्याला आले. मयुरीताई दहा वर्षांपूर्वी सा रे ग म प या रियालिटी शो मध्ये स्पर्धक म्हणून उतरली होती , आता गायचं आहे बरं का बाई आपण या माझ्या म्हणण्याला तिने आनंदाने होकार दिला. मानसीताईच्या तर घरातच गाणं ... पण ही काहीशी गाण्यापासून दूर दूर राहत होती. या निमित्ताने तिला गायलाच लावलं आणि तिने त्या गाण्याचं अक्षरशः सोनं केलं. स्नेहलताईने जे तुम्हाला जमणार नाही ते गाणं मी घेते असं म्हणत महडच्या वरदविनायकाचे गीत गायले. मुळातच तिची गाण्याची पट्टी वरची असल्याने ते गीत अगदी रंगतदार झालं. कीर्तीताईंनी रांजणगावाला या गीताची छान तयारी केली पण ऐन रेकॉर्डिंगच्या वेळी त्यांना आवाजाने दगा दिला. मग मयुरीताईनेे व मी त्यांच्या स्वरात स्वर मिसळला आणि रेकॉर्डिंग पूर्ण केले. कोमल नुकतीच विभागात दोन तासांसाठी यायला लागली आहे. खूपच गुणी पोर. लहान वयात देखील तिची गाण्याची समज चांगली आहे. तिला अगदी सहज विचारले की एखादं गाणं तयार करशील का ? तिने यापूर्वी कधीही न ऐकलेले दरबारी कानडा रागातले मोरगावच्या मयूरेश्वराचे गीत दोन दिवसांत बसवले .. अगदी पेटीवरसुद्धा. स्वरेशाताईची दोन गाणी वगळता सर्व गीतांना कोरसची साथ आवश्यक होती. मयुरीताईने व मी सर्वच गीतांना कोरस दिला. तेव्हापासून आम्हाला कुठल्याही पट्टीत गाणे गाऊ शकणाऱ्या राष्ट्रीय गायिका असे संबोधन विभागाच्या वतीने देण्यात आले. आता तर आमचे येथे कोरस गाऊन मिळेल अशी पाटी लावावी असे देखील मला वाटतंय. एकंदरीत काय ..... मजा घेत काम सुरू होते. पण अजून कामाला म्हणावा तसा वेग येत नव्हता. पण शेवटी ठरवलेच ... अगदी सिरियसली सराव करायचा.  कधी मुख्य गायिका गडबडायची तर कधी कोरस चुकायचा. कधी तालाचं गणित जुळायचं नाही तर कधी एक दोन स्वर पळून जायचे. लय तर प्रत्येक सरावागणिक बदलायला लागली.  आणि टेन्शन यायला लागलं. मज सांगा मी गाऊ कशी । जुळत नसे सूर तालाशी । असं म्हणायची वेळ आली. मग काय विचारता ... एकेक गाणं अक्षरशः १० -१५ -२० वेळा घोटलं. २५ आणि २६ ऑगस्टला दिवसभर म्हणजे १० ते ४ वाजेपर्यंत सराव केला. आणि आता एकेक गाणं आकार घेऊ लागलं. ही सगळी गाणी आम्ही फक्त ऐकली होती. ती विशेष कुणीही गायली नव्हती .. कधीच ... त्यामुळे जास्त काम करावं लागत होतं.
सगळ्यांनी मिळून स्वरात स्वर मिळवून तालाचे गणित जुळवत लयीची सांगड घातली तर संवादिनीचे सूर अधिकच मधुर होऊन गाण्याची मजा वाढवतात याची प्रचिती यायला लागली. शुक्रवारी म्हणजे २७ ऑगस्टला सकाळी १० वाजल्यापासून रेकॉर्डिंग सुरू करूया. किमान चार गीते झालीच पाहिजेत असा निश्चय केला. ठरल्याप्रमाणे विष्णुपंत घरून विविध स्केल (पट्ट्या) मधील तबले घेऊन आले होते. मयुरीताईने सर्व गीतांचे निवेदन व गीताचे बोल याचे एकत्रित संकलन केले होते. १० वाजता आम्ही एक फायनल सराव करायला घेतला आणि तिकडे केदार दादांनी स्टुडिओत माईक व्यवस्था लावली. 
वन टेक ओक्के करूया सगळी गाणी ... सगळ्यांना स्टुडिओत गायचं आलेलं टेन्शन कमी करण्यासाठी मी बोलले खरी पण आता खरं तर मलाही टेन्शन यायला लागलं होतं. भरीत भर म्हणून मी अगदी उत्साहाने मा. देवळेकर सरांना रेकॉर्डिंग बघायला या असं आमंत्रण देऊन ठेवलं होतं. विभागात कुणालाही याची कल्पना दिली नव्हती. दिली असती तर टेन्शन अजूनच वाढलं असतं. आज सुदैवाने सिद्धीला प्राधिकरणात एके ठिकाणी जायचे होते म्हणून ती माझ्याबरोबर आली होती. थोडा वेळ स्टुडिओत थांबणार होतीच तर कीबोर्ड साथ कर असे तिला सांगितले. लगेचच स्वरेशाताईने माझ्या गाण्यांना पेटी वाजवशील का असे तिला विचारल्यावर तिने आनंदाने होकार दिला. मग स्वरेशाताईची दोन्ही गाणी पाठोपाठ करून घेऊ असे ठरले. तिला वादनाचे दडपण नसल्याने ती आता मुक्त गाऊ शकणार होती. चल साधका या गीताने सुरुवात करू असे ठरले. ती गाण्यात कितीही प्रवीण असली तरी लाईव्ह गाणे आणि स्टुडिओत गाणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे हे जाणवत होते. माईकपासूनचे अंतर , आपली श्वास घेण्याची पद्धत , गाणं बघून म्हणताना किंचित खाली गेलेली मान या सगळ्याचा परिणाम .. अगदी सूक्ष्मसा सुद्धा .. गाण्यावर होत होता. कधी कधी तबला लय सोडत होता. तास उलटला तरी एकही गीत done झाले नव्हते. सगळेच विचित्र मनस्थितीत होतो. शांत होते फक्त केदार दादा. ताई फोन अगदी समोर धरा , माईकपासून बिलकुल हलू नका , पूर्ण एनर्जी लावून तरीही मुक्त गा. मानेचा कोन अंशतः जरी बदलला तरी गाण्याचे प्रोजेक्शन बदलते. ते व्यवस्थित असेल तरच गाणे उत्तम होईल इत्यादी टीप्स त्यांनी अगदी सहज आम्हाला दिल्या. बाहेर हेच सगळं शिकण्याचे महागडे कोर्सेस उपलब्ध आहेत. आणि आज आपल्याला हे सगळं अनायासे शिकायला मिळतंय. बरं शिकून आपलं गाणं छान झाल्यावर टाळ्यांचे , कौतुकाचे धनी आपणच. केदारदादा पडद्याआड गायब होऊन जाणार. अगदी मन:पूर्वक आभार मानले त्याचे. तबल्याचा आवाज मुळात मोठ्ठा असतो . माईकवर तो अजूनच कर्कश वाटेल अशा गैरसमजापोटी विष्णुपंत अगदी बेताने तबला वाजवत होते. पर्यायाने तबल्याचा ऑडिओ ट्रकवर अगदी बारीक आला. त्यांनाही मुक्तहस्ते वाजवा असे केदारदादाने हसतमुखाने सांगितले. बऱ्याचदा ट्रायल घेत एकदाचे गाणे सुफळ संपूर्ण झाले.  तिच्या पुढच्या गाण्याने फार वेळ खाल्ला नाही कारण आता ती या तंत्राशी परिचित झाली होती. पुढे मानसीताईचे गाणे सुरू झाले . या गाण्यात कोरस पण होता. या गाण्याला भरपूर ट्रॅक असणार हे कळले. दोन टेक झाले. आता पुढचा टेक ओके होईल असे वाटत असतानाच देवळेकर सर आणि शिवराज दादा स्टुडिओत आले. जाम खुश झाले दोघेही. अगदी सगळ्यांना थोडे थोडे गाऊन दाखवाच ... आम्हाला इथे स्पीकरवर ऐकत तो फील घ्यायचा आहे असे फर्मान त्यांनी सोडले. आम्ही सर्वांनी आपापल्या गीताची झलक दाखवली. गेल्या दीड दोन वर्षांची सगळी मेहनत फळाला आली. आज तो श्रमपरिहार झाला असं जेव्हा सर म्हणाले तेव्हा तर आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. ते दोघे प्रसन्न चित्ताने गेल्यावर आम्ही पुन्हा बॅक टू वर्क ... मानसीताईचे गाणे उत्तम झाले. मुळात ती आकाशवाणी सर्टीफाईड आर्टिस्ट आहे त्यामुळे ती या तंत्राशी परिचित होतीच. तिचे गाणे ऐकताना मात्र ती स्वतःच म्हणाली ... अग माझे अमुक ठिकाणी स्वर गेलेत , परत करूया. मी गायिका नसले तरी माझा कान उत्तम तयार आहे गो माय .. आपली स्वतःची चूक स्वतःला कळली तर ती नक्कीच आणि व्यवस्थितपणे सुधारता येते याची पुन्हा प्रचिती आली. सगळे जर असं मोकळेपणाने वागले तर काय बहार येईल असे नकळत वाटून गेले. पुढच्या टेकला तिचे गाणे उत्तम पार पडले.
नंतर अनघाताई स्टुडिओत आल्या. अगदी सहजपणे म्हणाल्या ... मला काही स्टुडिओत गाता वगैरे येत नाही बरं का. तुम्ही आग्रह करताय म्हणून गातीये मी. त्यांच्या उच्चारातील चुका सांगितल्यावर त्यांनी अगदी मनापासून त्या सुधारण्याचा प्रयत्न केला. मुळात त्या तालासुरात अगदीच पक्क्या आहेत , फक्त त्यांच्या शब्दोच्चारांवर काम करायचे होते आणि शब्दफेकीवर. ते करत करत हेही गीत पार पडले. कोमलचे गाणे तर दोन टेक मध्ये ओक्के झाले तेव्हा मला खूप छान वाटले आणि त्या मुलीचे कौतुक पण. सांगितलेलं सगळं ऐकलं की निर्मिती छानच होते याचे जणू उदाहरण होते कोमलचे गाणे. नंतर मी आणि मयुरीताई दोघींनी मिळून पालीचे गीत गायले आणि त्या दिवशीचे काम थांबवले. सलग सहा तास काम करून सगळे थकले होते. जाता जाता केदारदादाने हळूच बॉम्ब टाकला ... सगळ्या गाण्यांचा तबला परत वाजवावा लागेल बरं का ... sync होत नाहीये. मला ब्रह्मांड आठवलं. तुम्ही काळजी करू नका , मी घेतो व्यवस्थित करून असे आश्वासन दादाने दिल्यावर मी घरी गेले.
सोमवारी उरलेली दोन गीते आणि निवेदने सगळे रेकॉर्डिंग करूया असा आम्ही पणच केला होता. स्नेहलताईच्या रचिल्या ऋषीमुनींनी या गाण्याचे रेकॉर्डिंग लवकर झाले. तिला आपल्या स्टुडिओत एका वेगळ्या गीताच्या रेकॉर्डिंगचा पूर्वानुभव होता त्याचा उपयोग झाला. आम्हाला दोघींना पण कोरस देताना मजा आली. कीर्तीताई रांजणगावाला हे गीत गाण्यासाठी स्टुडिओत आल्या खऱ्या पण त्यांना एसीमुळे त्रास जाणवू लागला आणि सरतेशेवटी ते गीत आम्ही तिघींनी एकत्रित गायले. सुखकर्ता ही आरती तर मानसीताई , मयुरीताई आणि मी अगदी एका प्रॅक्टिसवर गायलो. पुढे तीन तीन च्या ग्रुपने निवेदन करणाऱ्या मुलींना बोलवले होते. त्यांचे रेकॉर्डिंग सुरू झाले. केदार दादा त्या मुलींना पण व्यवस्थित तंत्र समजावून सांगत होते. सगळ्यांची निवेदने झोकात झाली. पुढे स्वरेशाताईच्या आवाजात एक श्लोक व माझे प्रस्तावनावजा निवेदन रेकॉर्ड केले आणि रेकॉर्डिंग सुफळ संपूर्ण.
आमचं काम संपलं आणि इथेच केदार दादांचे काम दुपटीने सुरू... एडिटिंग. आधी त्यांनी विष्णुपंतांकडून हेडफोन लावून सगळी गीते त्यांना ऐकवत ऐकवत तबला वाजवून घेतला. तेव्हा कुठे तो sync करता आला. प्रत्येक निवेदनाला गीत जोडले होतेच. आता त्यांनी सिद्धीला बोलवून निवेदनासाठी कीबोर्डवर पार्श्वसंगीत वाजवून घेतले. सर्व गीतांमध्ये आवश्यक तेथे कीबोर्डवर कॉर्ड्स तसेच कधी अन्य वाद्याचा पीस तिच्याकडून वाजवून घेत भर घातली. एक न एक गीत पुन्हा पुन्हा ऐकत ते त्यावर काम करत होते. मानसीताईने या कामात खूपच मोठी मदत अगदी आनंदाने आणि हौसेने केली. सगळी गीते तयार झाल्यावर मयुरीताईने सगळी ड्राईव्हवर अपलोड केली आणि आता एकेक गीत गणेशोत्सवात पाठवूया असे ठरले.
मला काहीतरी अपूर्णच राहतेय असं वाटत होतं. नुसते ऑडिओ फार कमी जण ऐकतात. शिवाय व्हाट्सअप्पवर त्या ऑडिओची मूळ क्वालिटी राहत नाही. अगदी ८०-८५ mb ची फाईल व्हाट्सअप्प स्वतःहून ८-९ mb मध्ये बदलतो आणि याचा परिणाम आवाजावर होतो. मग काय करता येईल ? ड्राईव्ह लिंक दिली तर असा विचार मनात आला पण इतकी मोठी फाईल डाउनलोड करताना खूप डेटा लागतो जो अनेक जण वापरणार नाहीत. परिणामी जास्त जण हे ऐकू शकणार नाहीत हे उघड होते. मग विडिओ बनवूया अशी आयडियाची कल्पना सुचली. स्नेहलताईने वानगीदाखल एक विडिओ बनवलासुद्धा पण याला अजून अधिक छान पद्धतीने एडिट करण्यासाठी मी सिद्धीला गळ घातली. नेहमीप्रमाणे अनेक अटी- शर्ती मंजूर करून ती तयार झाली. मग काय विचारता ?
काम जोरात सुरू झाले. मानसीताई मदत करण्याच्या इच्छेने ipad घेऊन आली पण इतक्या पटकन हे तंत्र मला नाही बाई जमणार , पुढच्या वेळी नक्की करेन असं अगदी प्रांजळपणे म्हणाली. सिद्धीने एक विडिओ छान एडिट करून दिला पण आता निवेदनाच्या आधी थोडे संगीत आवश्यक आहे असे जाणवले. पुन्हा रेकॉर्डिंग करणे ही गोष्ट अशक्यप्राय आहे असे मी तिला ठणकावून सांगितले. दुसरा काहीही उपाय शोध असेही म्हणाले. तिने मग त्या त्या गाण्याच्या पट्टीतला तानपुरा वाजवून रेकॉर्ड करत ती भर घातली आणि विडिओ मस्त झाला. पुन्हा तोच प्रश्न उद्भवला. इतका मोठा HD क्वालिटीचा विडिओ ... डाउनलोड करताना खूपच डेटा खाणार.  मग ८ सप्टेंबरला रात्री ९.३० वाजता आपले एक युट्यूब चॅनेल काढू आणि त्यावर हे विडिओ पोस्ट करू असे मनाने घेतले. यामागे अनेक उद्देश होते. एकतर हा प्रयोग होता. त्यामुळे जर फसलाच तर त्याची झळ शाळेच्या औपचारिक वाहिनीला बसू नये. शिवाय तिथे पोस्ट करायचा म्हणजे अनेकांना कामाला लावणे आले. त्यापेक्षा आमच्या वाहिनीवर मी माझ्या सोयीने पोस्ट करू शकणार होते. काही विडिओ तर रात्री दोन वाजता मी पोस्ट केलेत.
फायनली गणेशचतुर्थीला ... १० सप्टेंबरला सकाळी १० वाजता पहिला विडिओ रिलीज झाला आणि अक्षरशः धन्य वाटलं. गणेशोत्सवातले दहा दिवस रोज सकाळी दहा वाजता एकेक विडिओ रिलीज होत होता. सगळे प्रीमियर सेट केलेले होतेच त्याप्रमाणे. खूपच छान वाटत होते. विभागातल्या आम्ही तिघी चौघी रोज ते विडिओ स्टेटसला ठेवत होतोच पण याखेरीज केंद्रातले काही अन्य  सदस्य पण हा प्रकल्प आपला समजून फॉरवर्ड करत होते , स्टेटसला ठेवत होते तेव्हा मला जास्त आनंद झाला. अगदी घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले. 
१७ सप्टेंबर रोजी हा संपूर्ण कार्यक्रम आपल्या बाप्पासामोर सादर करा असे अनुजाताई म्हणाल्या आणि आम्ही तो कार्यक्रम लाईव्ह सादर केला तेव्हा तर खूपच भारी वाटले. आदल्या दिवशी केदारदादाने सगळ्यांना पोजिशन देऊन माईकवर लाईव्ह गाताना कसं बसायचं याचे एक छान ट्रेनिंग दिले ज्याचा खूपच उपयोग झाला. कार्यक्रम अगदी दर्जेदार झाला. सगळ्यांनी नावाजला. शाळेच्या युट्यूब चॅनेलवरून प्रसारित झाल्याने अनेकांपर्यंत पोहोचला.
काही त्रुटी , उणिवा निश्चित राहून गेल्या आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे. जसे की विडिओ करताना गायक - वादक - निवेदकांचे नुसते फोटो आले त्याऐवजी विडिओ हवे होते. पण एकतर वेळही कमी पडला आणि तेवढे प्रशिक्षित मनुष्यबळ माझ्याकडे उपलब्ध नव्हते. मी स्वतः ८ सप्टेंबरला दिवसभर तीन लोकेशनवर शूटिंग करत एका जाहिरातीत काम केले होते. अवघ्या दीड मिनिटाच्या त्या जाहिरातीसाठी तब्बल ३७ माणसे राबत होती हे मी पाहिलंय. आणि इथे आपल्या या प्रकल्पात आम्हीच सर्व भूमिकांमध्ये होतो. त्यामुळे मनात असूनही तसा विडिओ करता आला नाही. पुढच्या वेळी अजून छान काम करायचा नक्की प्रयत्न असेल. एकदा प्रत्यक्ष अष्टविनायकांचे दर्शन घेत  त्या त्या ठिकाणी ते ते गीत सादर करावे अशी इच्छा आहे. बघूया गणरायाच्या मनात आले तर होईलही पूर्ण.
या प्रकल्पाच्या निमित्ताने संपूर्ण विभागाचा एक वेगळा अभ्यास झाला. या सर्व स्थळांची भौगोलिक  - ऐतिहासिक पार्श्वभूमी कळली. कुठले गीत कुठल्या रागात - कुठल्या तालात हे अभ्यासले गेले. स्टुडिओचे तंत्र थोडेफार समजले. अभिरुची प्रकल्पातील विद्यार्थिनींना संधी देता आली. एक ना अनेक उद्देशांनी हाती घेतलेला हा प्रकल्प पूर्ण गणरायाच्या चरणी अर्पण करता आला हे समाधान खूप मोठे आहे. तुम्ही सर्वांनी पण खुल्या मनाने कौतुक केलेत त्याबद्दल मनःपूर्वक आभार ..  सर्वांचे मनोरथ बाप्पांच्या आशीर्वादाने पूर्ण होवोत अशा सदिच्छा देते आणि माझ्या लेखणीला विराम देते.
शीतल कापशीकर
२२ सप्टेंबर २०२१

Comments

  1. ग्रेट शीतलताई...सलाम तुला

    ReplyDelete
  2. मस्तच ग ताई.... छानच प्रयोग.... सगळेच उत्तम....

    ReplyDelete
  3. शीतल खूपच छान आणि वेगळा अनुभव आणि उत्कृष्ठ नेतृत्व आणि संघटन

    ReplyDelete
  4. वा भारीच ग ताई! गाणी ऐकली होतीच, आणि तुझे शब्दांकन वाचतांना परत सगळे विडिओ डोळ्यासमोर आले.
    योगिनी.

    ReplyDelete

Post a Comment