राष्ट्रसंत गाडगेबाबा

जय भवानी जय श्री जगदंबे । नमन तुज अंबे । करुनि प्रारंभे । डफावर थाप तुणतुण्या ताण । शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण । शाहीर हा भारतीयांची शान । आधुनिक संतांचे गातो गुणगान जी जी जी ।।१।।
महाराष्ट्रातील वऱ्हाड । तिथे जन्मले । कीर्तनकार । भक्ती नको केवळ मूर्तीची । सेवा करू आपण समाजाची । धडे स्वच्छतेचे ज्यांनी दिले । अन्याया विरुद्ध बंड केले । जातिभेदाला नाही मानले । व्यसनाला तडीपार केले । जनतेला सन्मार्गास लावले । गाडगेबाबा कीर्ती भली पावले हो जी जी जी ।। २।।
शेंडगावचे जानोरकर । बडे प्रस्थ ते होते फार ।
झिंगराजीचा मोठ्या झोकात । मान तो होता सर्व गावात ।
पूर्णा काठच्या दापुऱ्याची । लेक सखूबाई कोळसेकरांची ।
लगीन सोहळ्यात प्रथेप्रमाणे । सांडली दारू बोकड बळी दिले ।
व्यसनाधीनता घात हा झाला । मुकले घरदार शेतीवाडीला ।
सावकारी देणी वाढत गेली। धूळधाण प्रपंचाची झाली ।
तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर । महाशिवरात्रीचा उपवास निरंकार ।
झिंगराजी नि सखूबाई पोटी । जन्मे संतती गोरी गोमटी ।
माता पित्याला आनंद झाला । डेबूजी ठविले नावाला ।
पितृछत्र लवकर हरपले । माय लेकरू पोरके झाले ।
पिता मायेला सांगून गेला । एकटीच सांभाळ लेकराला ।
नको नादावू उगा देवाला । दूर ठेव दारू व्यसनाला ।।३।।
दोघे दापुऱ्यास परतले । मामाघरी ते । राहू लागले । कामाचा आळस मुळी नाही । गुरांना चरावया नेई । त्यांच्या स्वच्छतेचे पाही । गुराखी जमवून भजन गाई ।खेळामध्येही रस घेई । शेतीकामात प्रवीण झाला । सावकाराला धडा शिकविला । भोंदूपणा मुळी नाही रुचला । दारूला मुळी नाही शिवला । घरातील कर्ता पुरुष बनला जी जी जी ।।४।।
नित्यक्रम : पूर्णेमध्ये स्नान करावे । मुद्गलेश्वरा । पाणी घालावे । देवापाशी ध्यान करून बसावे । नंतर कामाला लागावे । मनाशी विचार करीत राहावे । देवाने जग का निर्मियले । त्यामागे काय असेल हेतू । कशामुळे सुख दुःख होते । निसर्गामागे रहस्य काय ते । तो का मूर्तीमध्ये राहतो । तेथूनच जग हे चालवतो । कशाने संतुष्ट होतो । अनेक प्रश्नांनी थैमान घातले जी जी जी ।।५।।
सन एकोणिश्शे पाच साला । मार्गशीर्ष मासी । भाग्योदय झाला । डेबूला गुरुराय भेटला । घरदाराचा त्याग केला । मनीचा निश्चय पक्का झाला । सारली दूर मोह माया । जुनेरे परिधान केले । काठी नि गाडगे हाती धरले । मुक्त संचारासाठी निघाले । गाडगेबाबा नामाभिधान झाले जी जी जी ।।६। 
तपश्चर्येसाठी बाहेर पडले गावोगावी फिरले 
दिनभर कष्ट कामे रात्री कीर्तन करू लागले।
त्यांनी कीर्तनामधून वऱ्हाडात ज्ञान पेरले 
बाबा अशिक्षित जरी शिक्षणाचे धडे दिधले ।
परिभ्रमण बहु केले , भिक्षा मागून राहिले , परि मोहा दूर सारले
अंगी फाटका तो वेश ,काठी नि गाडगे एक , एकतारीवर सूर बोले ।
प्राण्यांवर दया करा , दुबळ्यांना मदत करा , असे जनासी सांगितले।
स्वच्छतेचा ध्यास भारी , हाती स्वतः झाडू धरी , आधी केले मग उपदेशले ।।७।।
बाबांचा सूर मधुर । कीर्तन करी । अति सुस्वर । वाणीतून तेज प्रकट होई । भल्याबुऱ्याची जाणीव देई । ऐकणाऱ्याला सद्बुद्धी होई । मनातील भीती दूर जाई । भोळा भोंदू भाव कमी होई । कोणी व्यसनाला सोडून देई । कोणी चुकांची कबुली देई । सर्वत्र चैतन्यधारा वाही जी जी जी ।।८।।
वऱ्हाडात पूर्णेच्या तीरी । ऋणमोचन । यात्रा तयारी । सालाबादेने सुरू झाली । यंदाची मौज काही आगळी । अनेक हात कामाला लागले । दानवीर भले दांडगे जमले । यात्रेकऱ्यांच्या सोयीसाठी । पूर्णाकाठी घाट उभे राहिले । वऱ्हाडाने कधी नव्हते पाहिले । बाबांनी काम असे केले जी जी जी ।।९।।
आषाढी कार्तिकी वारी । पंढरपुरी । जमाव भारी । वारकऱ्यांना कष्ट बहु होत । स्पृश्य अस्पृश्य करिती भेद । बाबांनी मनाशी ठरविले । वारकरी निवारे बांधू चांगले । मदतीचे ओघ वाहू लागले । बांधल्या कितीक धर्मशाळा । नाशिक क्षेत्रीही काम केले । परी कुठे गुंतून नाही पडले । विश्वस्तांच्या स्वाधीन सगळे केले जी जी जी ।।१०।।
गोमाता बहुगुणाची । मानू तिला जिवाभावाची ।
मानवा विचार कर काही । कसायाला विकू नको गायी ।
असा कसा देव तुमचा । घेतो जो जीव दुसऱ्याचा।
हिशोब कुठला जीवन मरणाचा । एका वाचवून दुजा मारण्याचा ।
असले कसले नवस सायास । जे मारी कुण्या जीवास ।
भूतदया सांगती जनास । हिंसाबंदीचा घेतला ध्यास ।
अस्पृश्यता निवारण व्हावे । जातिभेदापलिकडे जावे ।
एकत्र काम करावे । देवासी असे नमावे ।।११।।
डॉ.बाबासाहेब आंबेडकर । राज्यघटनेचे । निर्माते शिल्पकार । गाडगेबाबांना गुरू मानीत । योग्यता त्यांची होते जाणीत । कैक प्रश्नी केली चर्चा मांडणी । दलितांचे कल्याण ध्यानी मनी । कर्मवीर भाऊराव पाटील । बाबांचा लोभ त्यांच्यवरी फार ।  पंजाबराव शिक्षण महर्षी । बाबा जाणती त्यांच्या कार्यासी । शिक्षण कार्यात सहकार्य केले । समाज उद्धार करण्यासाठी झटले । महात्मा गांधीजींना भेटले । देवदूत त्यांना मानियले । कीर्तनामधून गोडवे गायिले हो जी जी जी ।।१२।।
बाबांचे कीर्तन निराळे । नव्हते कधी त्यात । पौराणिक दाखले । दिसले ते सत्य कथन केले । ग्रामीण भाषेतच ते वदले । अनुभवाचे बोल बोलले ।  आधी  केले नंतर सांगितले । श्रोत्यांच्या मनाला ते भिडले । अनेकांनी अनुकरण केले । गाडगेबाबा लोकप्रिय झाले हो जी जी जी ।।१३।।
क्षणक्षण वेळ नि कणकण शक्ती उद्योगात खर्चावी , कष्टाची भाकरी मिळवावी , विकासाची पाऊले चालावी , अज्ञानाची दरी ती बुजवावी हो s s s
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ।।
देव मंदिरात - दगडात नाही , माणसात आहे , सदैव ध्यानात ठेवावे , त्यांना आपले समजावे ,सुखात त्यांच्या आपले सुख मानावे हो s s s
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ।।
स्वच्छता राखा , रोगांना पळवा , व्यसन दूर ठेवा , मुक्या प्राण्यांवर दया करा , त्यांना बळी देणे  टाळा , अंधश्रद्धेला आवर घाला हो s s s
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ।।
जातिभेदाला शत्रू माना , कर्ज काढू नका , हुंडा देऊ घेऊ नका , माता पित्याची सेवा करा , मनी भगवंत आठवा हो s s s
गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला ।।१४।।
गाडगेबाबा जरी अशिक्षित । शिक्षणाचे ते महत्व जाणीत । शिक्षणाने मती शुद्ध होते । विज्ञानाने खरे सत्य कळते । कीर्तनातून शिक्षण महत्व गायले । समाजात परिवर्तन घडले जी जी जी ।।१५।।
हातात खराटा घ्यावा । गाव झाडोनि लख्ख करावा । हाच असे नेम तो नित्याचा । अर्धी भाकरी मागून खावी । गाडग्यामधून प्यावे पाणी । ध्यानाने इंद्रिये जिंकावी । धरती सेवेत रममाण व्हावे । ईश्वरी कार्य ते समजावे जी जी जी ।।१६।।
एकोणिश्शे छप्पन्न साली । वीस डिसेंबरला काळरात्र झाली । गाडगेबाबा प्राणज्योत विझली । सारी  भक्तमंडळी हळहळली । लाखोंनी अंत्यदर्शन घेतले । राष्ट्रसंत तुकडोजी आले । श्रद्धांजली भजन त्यांनी गायिले । शोकाकुल जनतेस समजविले । गाडगेबाबा अमर जगी झाले जी जी जी ।।१७।।
गाडगेबाबा आज नाही जरी । कार्यरूपाने । वास इथे करी । स्वच्छता मंत्र हाच जाणू । महत्व शिक्षणाचे मानू । अंधश्रद्धेला नको थारा । जातिभेदाचा नको वारा । दीन दुबळ्यांना मदत करू । मुक्या प्राण्यांवर दया करू । गोपाला मंत्र मनी स्मरू । अशी बाबांची सेवा करू जी जी जी ।।१८।।
जरी झाली असेल काही चूक । घ्यावी पदरात । मानूनी लेक । गाडगेबाबांना वंदन करणार । योगेश्वराला मनी स्मरणार । शीतल कवनाला रचणार । शीतल कवनाला गाणार । स्वच्छता मंत्र जागर करणार जी जी जी ।।१९।।





Comments